एन. डी. सरांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

राजीव देशपांडे -

१७ जानेवारी २०२३, एन. डी. सरांचा पहिला स्मृतिदिन!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासूनच एन. डी. सर समितीचे अध्यक्ष होते. एन. डी. सरांना महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारप्रवाहाची सखोल जाण होती. त्याला मार्क्सवादी विचारांची जोड होती. त्यांचा वैयक्तिक, कौटुंबिक आचारही सामाजिक, राजकीय पातळीवर सत्यशोधकीय विचारधारेप्रमाणेच होता. त्यामुळे ते केवळ नामधारी अध्यक्ष राहिले नाहीत. खरे तर अध्यक्ष म्हणून त्यांनी समितीच्या दैनंदिन कामाकडे लक्ष द्यावे, अशी काही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्यशोधकीय जाणिवा यांचा सुटसुटीत अभ्यासक्रम तयार करत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार महाराष्ट्रात सर्वदूर पसरवणारा प्राध्यापक, शिक्षक यांच्या सहाय्याने राबवायचा ‘सत्यशोधक प्रज्ञा परीक्षे’सारखा प्रकल्प असो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी ‘विवेकवाहिनी’सारखा प्रकल्प असो, त्यासाठी आपला वेळ आणि ताकद देण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्याचबरोबर जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी झालेली रस्त्यावरची आंदोलने, धरणे असो, वैधानिक लढाई असो किंवा शनिशिंगणापूरचे आंदोलन असो, एन. डी. सर डॉ. दाभोलकरांच्या बरोबर या आंदोलनात उतरले, तुरुंगातही गेले. तसेच मराठा समाजात आजही निषिद्ध मानला जात असलेला विधवा विवाह केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांनी पुढाकार घेऊन ‘रयत’मध्ये घडवून आणला व विधायक कृतिशील धर्मचिकित्सेच्या कृत्याच्या मागे आपण ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणार्‍या पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. समाजात व्यापक परिवर्तन होऊन शोषणरहित समतेवर आधारित समाजनिर्मितीशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा यशस्वी होणार नाही, असे अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते. त्यामुळेच समिती व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी आपली बांधिलकी मानते आणि एन. डी. सर तर अशा पर्यावरणीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाविरोधातील आर्थिक लढ्यात अग्रभागी असत. साहजिकच या व्यापक परिवर्तनाच्या लढ्याशी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नाते निर्माण होत होते. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘आज आम्ही उभे आहोत, त्यामागे एन. डी. पाटील सरांच्या विचारांची स्वच्छता, स्पष्टता आहे. इतका कणखर सत्यशोधकी वारसा चालविणारी फारच कमी माणसे महाराष्ट्रात असतील.’ अनेक वेळा प्राध्यापकांच्या सभेत त्यांनी म्हटले आहे, ‘तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक असाल आणि घरात सत्यनारायण घालत असाल तर मी कुलगुरू झाल्यास तुमच्या विज्ञानाच्या पदव्या काढून घेईन.’ या पध्दतीची त्यांची कणखर वैचारिक भूमिका होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांनी असणे स्वाभाविक होते. या दृष्टीने ‘फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर’ या भूमिकांमध्ये एन. डी. सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभले होते.

एन. डी. सरांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृती जागवत असताना आपण आज अत्यंत चिंताजनक सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीला सामोरे जात आहोत. त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एन. डी. सरांसारख्या गेल्या ५० वर्षांच्या महाराष्ट्रातील सर्व धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, पुरोगामी, दलित, वंचित, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या चळवळींचे आधारस्तंभ बनलेल्या सर्वमान्य वडिलकीच्या व्यक्तिमत्त्वाची उणीव आपणा सर्वांना खूपच भासत आहे. कारण एन. डी. सरांनी संविधानात समाविष्ट असलेली मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात येण्यासाठी आयुष्यभर आंदोलने केली, काहींच्या बाबतीत ते यशस्वीही झाले. पण त्याच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा या संवैधानिक मूल्यांना आज धर्मांध आणि साट्यालोट्यांच्या कॉर्पोरेट भांडवलवाद्यांकडून कडवे आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानांचा मुकाबला करायचा तर एन. डी. सरांच्या बुद्धिनिष्ठतेचा, सामाजिक आणि राजकीय, नैतिक आचरणाचा, सर्वसामान्य दलित, वंचित जनतेशी असलेल्या घट्ट बांधिलकीचा, बेडर लढवय्येपणाचा वारसा पुढे चालवला पाहिजे. हेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन ठरेल. एन. डी. सरांचा हा सत्यशोधकी वारसा पुढे नेण्याचा निश्चय करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व ‘अंनिवा’चे संपादक मंडळ एन. डी. सरांच्या स्मृतींना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन करत आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]