काऊ हग डे

अनिल चव्हाण -

“आई, व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय गं?” वीराने आजीला विचारले.

“आधी सॅक बाजूला ठेव! हात-पाय धू!” तिला उत्तर मिळाले. वीराने पाठ हलवली, एक हात सोडवून घेतला, सॅक दुसर्‍या हातावरून खाली आली. ती ठेवून ती हात-पाय धुऊन आली.

“सांग आता!” पण आजीने कानावर हात ठेवले.

“मला काय ठाऊक? आमच्या वेळी असं काही नव्हतं.”

“मी सांगू का?” मैत्रेय म्हणाला. त्याच्या शाळेत आठवडाभर चर्चा सुरू होती. इतर वेळी शांत असणारा मैत्रेय स्वतःहून बोलू लागला, “या दिवशी जवळच्या व्यक्तीला भेट देतात!”

“व्हॅलेंटाईन नावाचा एक धर्मगुरू होऊन गेला. रोममधल्या त्याच्या राजाने तरुणांना लष्करात भरती केले आणि त्यांनी लग्न करू नये, असा फतवा काढला. पण व्हॅलेंटाईनने प्रेम करणार्‍या तरुण-तरुणींची लग्न लावून दिली! राजा चिडला! त्याने व्हॅलेंटाईनला फाशी दिले; तो दिवस होता १४ फेब्रुवारी! तरुणांनी या दिवसाची स्मृती म्हणून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करायला सुरुवात केली!”

“अरे! अरे!! या परकीय सणाला कशाला किंमत देता? आपली संस्कृती श्रेष्ठ आहे!” गुंड्याभाऊ सात्विक संतापाने बोलला!

गुरुजींनी त्याची री ओढली, “असं प्रेम करणं आणि पुढे पळून जाणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही! आपल्या संस्कृतीत शालीनतेला महत्त्व आहे!!”

“गुरुजी, तुम्ही महाभारतातल्या अर्जुनाने सुभद्रेशी विवाह कसा केला ते वाचले आहे का?” आई म्हणाली!

“मला मेलीला काय कळतंय? पण अहो, प्रेमाची भावना नैसर्गिक आहे आणि ती पुराण काळापासून चालत आली आहे!” अस्मिताने भर घातली!

“ते काही नाही, आपण आपली संस्कृती टिकवलीच पाहिजे! त्यासाठी तर हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजे गोमातेला मिठी मारण्याचा दिवस म्हणून शासनाने जाहीर केला आहे!” गुंड्याभाऊ म्हणाला.

“अर्थात ते परिपत्रक मागं घेतले बरं.” गुरुजींनी खुलासा केला!

“ते काही असो, गुरुजी आज आपण गोमातेची पूजा करायची आणि तिला मिठी मारायचीच!” गुंड्याभाऊने निर्धार व्यक्त केला.

“काका, आज माताजी कुठे दिसत नाहीत?” अर्णवने कुत्सितपणे विचारले. “आहेत ना, आज त्या पलिकडच्या गल्लीत सेवा देत आहेत.” अध्यात्मात सेवा देणे या शब्दाला खूपच अर्थ आहेत. मठात जाऊन झाडलोट करणे, पाणी भरणे, बागकाम, महाराजांचे पाय चेपणे, भजन म्हणणे, इथपासून घरच्या घरी नामसेवा घेता येते. गोमातेला मिठी मारणे या एका नवीन सेवेची त्यात आता भर पडली होती. एकाच गल्लीत सलग दोन वेळा सेवा द्यायची नाही, असा आमचा नियम आहे.

गुंड्याभाऊंनी खुलासा केला आणि तो हातातील वर्तमानपत्र फडकवत म्हणाला, “आपल्या संस्कृतीने वृक्षांचे, प्राण्यांचे महत्त्व अनेकदा सांगितले आहे. वड, पिंपळ, औदुंबर अशा जास्त ऑसिजन देणार्‍या झाडांचे संवर्धन करा. त्यांची पूजा करा. गोमातेचे संरक्षण करा. गोमूत्र, गोशेण किती आरोग्यदायी आहे माहीत आहे का? परवा एक मंत्री म्हणत होते गाय ऑसिजन सोडते म्हणून.”

“मला मेलीला काय कळतंय! पण रोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय आम्ही तोंडात अन्नाचा कण घेत नाही हो.” अस्मिताने री ओढली.

“होय हो वहिनी, तुळस सुद्धा ऑसिजन जास्त देते बरं; तुळशीला फेर्‍या मारल्याने, अनायसे ऑसिजन मिळतो; आणि व्यायामही होतो. म्हणून तर आपल्या संस्कृतीत तुळशीला महत्त्व आहे, वहिनी! आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. ऋषी-मुनी दूरदृष्टीचे होते. ”

“पण तुळस जास्त ऑसिजन देत असेल, तर तपासता येईल ना आपल्याला?” वीराला प्रयोग करण्याची खुमखुमी होती.

“तपासणीची गरज नाही! वनस्पती ऑसिजन का देतात त्याची माहिती करून घ्या फक्त!” मी म्हटले.

“बाबा, वनस्पती हवेतला कार्बन डाय-ऑसाइड वायू शोषून घेतात, सूर्यप्रकाशात हरित लवकांच्या साह्याने अन्न तयार करतात; त्यावेळी ऑसिजन तयार होतो; तो हवेत सोडतात म्हणजे हिरवा रंग नसेल तर अन्न आणि ऑसिजन तयार करता येत नाही. गायीकडे तर हरित लवके नाहीत आणि त्यामुळे गोमाता ऑक्सिजन सोडू शकणार नाही; उच्छ्वासावाटे तीसुद्धा, आपल्यासारखा कार्बन डाय-ऑसाइडच सोडणार!” आदिने उत्साहाने ज्ञान दिले.

“दुसरी गोष्ट म्हणजे, वनस्पतींनी अन्न तयार केले तरच ऑसिजन बाहेर पडतो. म्हणजे ज्यादा अन्न तयार केले, तर ज्यादा ऑसिजन बाहेर पडणार.” कबीर म्हणाला.

“म्हणजे तुळस, इतरापेक्षा जास्त अन्न तयार करते का हे पाहावे लागेल. हो ना दादा?” स्वरा म्हणाली.

“हो! अन्न तयार केले की, वनस्पती, ते मूळ, खोड, पान ,फळ यामध्ये साठवून ठेवते.” आदि. “म्हणजे, बटाटा, वांगी, भेंडी, मुळा त्यापेक्षा जास्त ऑसिजन सोडतात, असं म्हणायचे का तुम्हाला?”

पवित्र म्हटल्या जाणार्‍या वनस्पतीही इतरांएवढाच ऑसिजन सोडतात, हे गुंड्याभाऊला काही आवडलेले दिसले नाही. हातातला सोटा चाळवत त्याने मुद्दा मांडला. “मग या वृक्षांना, सर्वत्र का पुजले जाते?”

“धर्माने त्यांना पवित्र मानले आहे; उपयोगी नव्हे. जेव्हा पवित्र मानले, तेव्हा हवेचे घटक आणि उपयोग ठाऊक नव्हते. त्या काळात ‘झाडे लावा-झाडे जगवा’ अशी मोहीम नव्हती. ‘जंगल तोडा-शेती करा’अशी मोहीम होती. म्हणून तर परशू असलेला राम श्रेष्ठ ठरला,” मी म्हटले.

“म्हणजे बाबा, वस्तूचे धार्मिक महत्त्व आणि उपयोग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, असेच ना?” आदिने विचारले.

“बरोबर आहे. काहीवेळा यामागची रुढी पर्यावरणरक्षणाला उपयोगी असते. वड, पिंपळाला धार्मिक महत्त्व असल्याने ते तोडताना दहा वेळा विचार केला जातो. त्याने पर्यावरण संरक्षण होते, तर काही वेळा याच रुढी पर्यावरणाला हानीही पोचवतात. वैभवलक्ष्मी व्रत करणारे फळझाडांच्या फांद्या तोडतात; शिलंगणाला आपट्याच्या पानांचा नाश केला जातो. गौरी-गणपतीचे निर्माल्य व मूर्ती पाण्याचे प्रदूषण करतात,” मी.

“गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात सोडण्याचे फायदे आहेत पोरांना. मूर्तीवरची सूक्ष्म पवित्रके वाहत्या पाण्याबरोबर सर्वदूर पसरतात. वाफेबरोबर हवेतही जातात.” गुंड्याभाऊने माहिती दिली.

“पवित्रके जर पाण्याबरोबर वाहत असतील, उष्णतेने हलकी होऊन हवेत जात असतील, तर ती भौतिक वस्तू झाली; आध्यात्मिक नव्हे.” आदिने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

“अरेच्या, होय की! म्हणजे पवित्रके, कोणत्या तापमानाला गोठतात, वितळतात, बाष्प बनतात, हे मोजता येईल.” इराला प्रयोगाची संधी आली.

“पण आता, निर्माल्य आणि मूर्ती पाण्यात सोडत नाहीत. लोक प्रदूषण टाळत आहेत. तेव्हा वाद थांबवा आणि चहा घ्या,” अस्मिताने चहाचे कप हातात देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “पण आमच्या श्रद्धेच्या विषयाला हात घालण्याचे कारण काय? आमच्या धार्मिक भावना का दुखावता? बघा ना! यांना ऊठसूट आमची प्रार्थनास्थळे आणि मठ दिसतात. काय आहे, त्यांच्याकडे एवढे?” सोट्याला हात घालत गुंड्याभाऊने निकराची भाषा केली.

“भाऊजी, मला मेलीला काय कळतंय! पण, प्रदूषण टाळून सण साजरे करायला काय हरकत आहे?” अस्मिताचा भाबडा प्रश्न.

“अस्मिता तू तर मुद्द्यालाच हात घातलास. प्रदूषण टाळायचं तर श्रद्धा बाजूला ठेवून विचार करावा लागतो आणि हेच तर धार्मिक संघटनांना नको असते.” मी.

“आपण ‘…झाडे जगवा’संबंधी बोलत होतो ना?” आईने आठवण करून दिली. एवढ्यात दारात गडबड ऐकू आली.

“ये गाय कुणाची हाय? आमची कुंडीतली रोपं आणि तुळस बी खाऊन टाकली.” एक बाई बाहेर आरडाओरडा करत होत्या. पर्यावरण रक्षणासाठी गुंड्याभाऊने बाहेर धाव घेतली. सर्वांनाच बाहेर बोलवले!

“आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे! सर्वांनी बाहेर या!” गुंड्याभाऊ गायीच्या गळ्यातली दोरी पकडून उभा राहिला, तर इतरांनी गायीभोवती सुरक्षित अंतर ठेवून कडे केले. एकेक जण पुढे येऊन गायीच्या दिशेने हात लांब करत असे. पण ‘ती’ प्रेमळ नजर लक्षात न आल्याने, गाय शिंग उगारून अविश्वासाने मान वळवत होती!तरीही धीटपणाने अस्मिताने गायीच्या पाठीवरून हात फिरवला, गाय शांत झालेली पाहून गुरुजी पुढे सरकले, त्यांनी गायीला मिठी मारली! पण ही वेळ गाईच्या शी-शू विसर्जनाची होती!

तिने वेळ तर साधलीच; पण आपली शेपटीही ओवाळली. सर्वांच्या चेहर्‍यावर आणि कपड्यावर गायीचे शेण आणि मुताचे थेंब उडाले. एकच गोंधळ उडाला. पोरं ‘शी-शी’ म्हणत मागे पळाली! पण यामुळे गाय बिथरली. आज आपला दिवस आहे, हे विसरली. तिने सर्व बळ एकवटून मान खाली घेतली; जवळच उभा असणार्‍या गुरुजींना, गुंड्याभाऊला एक धक्का दिला आणि उधळली!

लेखक संपर्क : ९७६४१४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]