गुणवत्तेचा (तथाकथित) ‘तटस्थ’पणा

-

रजत रॉय

कोलकाता येथील एका कॉलेजात जाधवपूर विद्यापीठातील प्रा. मरुना मुरमू यांच्या बाबतीत घडलेली एक घटना भारतातील शैक्षणिक संस्थातील जाती आधारित हिंसाचाराचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहता येईल. भारतातील इतर अनेक राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही जातीय हिंसाचार ही एक सार्वजनिक गुप्ततेची बाब आहे. दैनंदिन व्यवहारात जातीयता तर पाळायची पण त्याबाबत सार्वजनिकरित्या उघडपणे बोलायचे नाही. प्रा. मुरमू दलित स्त्रीवादासंदर्भातील चर्चेला तोंड फोडण्यात आघाडीवर होत्या. एक कॉलेज विद्यार्थी त्यांच्यावर ‘गुणवत्ताहीन’, ‘कोटा प्रोफेसर’ असे ओरडत धावून गेला. ही घटना जातीकरणाला एका अत्यंत सूक्ष्म प्रकारात प्रतिबिंबित करते ज्यात आरक्षणाच्या धोरणाविरोधात गुणवत्तेचा दृष्टिकोन निगडीत केला जातो.

काही महिन्यांपूर्वी काही आयआयएमनी आपल्याला अत्युत्कृष्ट संस्थेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. अशा दर्जामुळे या संस्थांची ‘आरक्षण धोरणा’तून सुटका होईल, असा त्यामागे कयास होता. अगदी तिसर्‍या जगाच्या अल्पफीत जागतिक दर्जाची सेवा पुरवणार्‍या या भारतीय अभिजन संस्थातील अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही नेहमीच गुणवत्तेचा खून असे म्हणत कोलकत्याच्या त्या विद्यार्थीप्रमाणे आरक्षण विरोधी टिपण्या करत असतात. भारतातील शिक्षणाचा दर्जा आरक्षणामुळे खालावला असल्याचा व ऐतिहासिक चुकांच्या नावाखाली आजच्या काळात हा अन्यायच आहे असा दावा आरक्षणविरोधक नेहमीच करत असतात.

या पार्श्वभूमीवर दोन कळीचे पण एकमेकाशी निगडीत मुद्दे पुढे येतात, एक गुणवत्ता म्हणजे काय? आणि दुसरा आरक्षण कशासाठी?

इंग्रजीतील ‘मेरिट’ ज्याला मराठीत आपण ‘गुणवत्ता’ संबोधतो त्याचा ऑक्सफर्ड डिक्शनरीतील अर्थ चांगला आणि कौतुकास्पद किंवा बक्षीसयोग्य असण्याचा अंगभूत गुण असा आहे. धोरणात्मक पातळीवर व्यापक अर्थाने ही व्याख्या एक तटस्थ व्याख्या आहे. जेव्हा ही तटस्थता मान्य केली जाते तेव्हा आपण गुणवत्तेचे मोजमाप करतो आणि बहुतांशी प्रकरणात हे मोजमाप परीक्षेद्वारेच केली जाते.

भारतात उच्च शिक्षण हे काही मूलभूत हक्कात मोडत नाही, ते एखाद्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्याहीपेक्षा समाजशास्त्रज्ञ सतीश देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे उच्च शिक्षणाचे आवश्यक आणि सर्वसाधारण वैशिष्ट्य ‘वगळणे’ आणि ‘भेदभाव’ या तत्वावर आधारित आहे. परीक्षेच्यामार्फत प्रत्यक्ष व्यवहारात आणल्या जात असलेल्या या भेदभावाचे समर्थन गुणवत्ता म्हणजे तटस्थ ही विचारसरणी करते. इथे ‘तुम्ही किती हुशार आहात याला महत्व नाही तर परीक्षेत तुम्ही किती उत्कृष्ट कामगिरी केली याला महत्व आहे’ याकडे देशपांडे बोट दाखवतात. अशाप्रकारे परीक्षा किंवा गुणवत्ता साहजिकच सापेक्ष बनते.

यातूनच मी दुसर्‍या प्रश्नाकडे वळलो, आरक्षण का?

सामाजिक रचना आणि त्यातील परस्परसंबंध यांचा आपण काय आहोत यावर मोठा प्रभाव पडतो. गुणवत्ता ही तटस्थ वर्गात येते, असे जरी कोणी प्रतिपादन केले तरी सामाजिक संबंध काही तटस्थ नसतात, उलट ते आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत आकाराला येतात. या दोन्ही व्यवस्थेतील विषमता मानवी क्षमता आणि नैतिक कुवत यांना छेद देत राहते.

परीक्षेत चांगले गुण मिळवून (विशेषत: उच्च शिक्षणात) गुणवंत म्हणून नावाजण्यासाठी एखाद्याला अनेक सुविधांची गरज असते; आर्थिक (चांगले प्राथमिक शिक्षण, सराव, कामापासून सुटका), सामाजिक-सांस्कृतिक (संपर्क, संबंध, प्रतिष्ठा, विश्वास, मार्गदर्शन) आणि कठोर परिश्रम. परस्परांशी जोडलेल्या सामाजिक संबंधांचे काम म्हणजेच या सर्व वेगवेगळ्या सुविधा. या सुविधांचे मग त्या आर्थिक असोत किंवा सांस्कृतिक असोत त्यांचे वाटप आपल्या समाजात समान आहे का? ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जातीआधारित उतरंड व्यावसायिक आणि सामाजिक वस्तीस्थानांच्या पातळीवर आजही आपल्याला दुभंगवत आहे. आरक्षणाच्यानंतरही शाळा, विद्यापीठ परिसर, कामाची ठिकाणे, संसद, बाजार किंवा हाऊसिंग सोसायटी यात तथाकथित खालच्या जातीतील लोकांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न केले जातात. प्राथमिक आणि उच्च शिक्षणातील प्रवेश, शैक्षणिक गळतीचे प्रमाण, शिक्षक भरती, संशोधनाचे स्वरूप हे सर्व सामाजिक वास्तव असलेली जात निश्चित करत असते.

अशा या हिंदू समाजाच्या दुभंगलेल्या सामाजिक वास्तवात गुणवत्तेचे पीक कसे तरारून येईल? अशा या सामाजिक वास्तवात गुणवत्ता व्यक्तीगतरित्या विकसित कशी होऊ शकेल? गुणवत्ता ही पोकळीत निर्माण होणारी गोष्ट आहे असा युक्तिवाद कोणताच राष्ट्रवादाचा किंवा विकासवादाचा समर्थक करणार नाही. उलट गुणवान जीवन म्हणजेच चांगलेपणाचा गुण मिरविणारे जीवन असे मानणारे सामाजिक वास्तव मान्य करून ते बदलण्यासाठी काम करतील. आरक्षणविरोधी गुणवत्ता ही व्यक्तिगत फायद्यासाठी एक कपोलकल्पित गोष्ट आहे आणि यामुळे सामाजिक प्रगतीला चालना मिळू शकणार नाही. उच्च जातीसाठी शिक्षण म्हणजे सुखदायक, संरक्षित जीवन जे व्यक्तीवादी आहे ते जगण्याचे साधन आहे तर तथाकथित खालच्या जातींसाठी सकारात्मक भेदभाव हा सामाजिक बदलांसाठीची कृती आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात सामाजिक न्याय ही गुणवत्तादर्शक कृती ठरते.

या अभिजनवादी शैक्षणिक संस्था काही सामाजिक वास्तवाला अपवाद नाहीत. या संस्था निखालसपणे आरक्षणविरोधी आहेत. कारण त्या बहुतांशी उच्चवर्गाकडून चालवल्या जातात. उदाहरणार्थ – २०१८ मध्ये आरटीआयतून गोळा केलेल्या माहितीनुसार १८ आयआयएममध्ये प्राध्यापकांच्या एकूण ७८४ जागा मंजूर होत्या. त्यापैकी ५९० सर्वसाधारण वर्गातून, २७ ओबीसीतून, ८ एससीतून तर २ एसटीतून भरल्या गेल्या होत्या आणि १५७ जागा भरल्याच गेल्या नव्हत्या. ही स्थिती आयआयएम सारख्या जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा दावा करणार्‍या संस्थांची. यावरूनच सहज समजून येते की उच्च वर्गाच्या फायद्यासाठी गुणवत्तेच्या तटस्थतेची वर्गवारी कशी वापरली जाते. उपहासाने कोणी असेही म्हणेल, जर वंचित विभागाना संधी दिली गेली नाही तर गुणवत्तेचा वापर करत या संस्था फक्त उच्च जातींनाच सगळ्या जागा आरक्षित करतील.

वंचित कुटुंबातील (आर्थिक अथवा जातीनुसार किंवा दोन्ही) कोणी अशा संस्थात आरक्षणासह अथवा शिवाय प्रवेश किंवा चांगली नोकरी मिळविली तर अशा अपवादात्मक आणि तुरळक घटना मुख्य प्रवाहातील माध्यमातून आणि समाजाकडून प्रचंड गौरविल्या जातात. त्यामुळे एकतर गुणवत्तेच्या तटस्थपणाच्या दाव्याला एक प्रकारची मान्यता मिळते आणि या संस्थातील उच्चवर्गीय अधिकारशाहीचे समर्थन केले जाते आणि दुसरे म्हणजे आपण अशा घटनांत गुणवत्तेनंतरच्या कालखंडाकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे परीक्षेत भरपूर यश पण त्यानंतरची कामगिरी काय? ती आपण दुर्लक्षित करतो. गुणवत्तेनंतरच्या कालखंडानंतर नवनवीन कटू अनुभव येण्यास सुरुवात होते ‡तथाकथित खालच्या जाती आणि जमातीशी अलगतेचे व्यवहार करत त्यांच्यावर अन्याय करणे, जातीय दूषणे देत त्यांच्या अस्तित्वाचा निषेध करणे, नातेवाईकशाही, त्यांच्या कौशल्याला नाकारत त्यांची कोंडी करणे. वर सुरुवातीला दिलेले मुरमू यांच्याबाबत घडलेली घटनाही या यादीत घालता येईल.

पदवी, नोकरी हे उच्च जातींसाठी प्रगतीचे लक्षण असते पण तथाकथित खालच्या जातीतील किंवा जमातीतील बुद्धिवादी असो किंवा सामान्य, त्याचे सतत समाजाकडून मूल्यमापन होत असते. जरी त्यांनी शैक्षणिक जगतात कृतीशीलपणे भर घातली असली तरी…. हे सामाजिक ओझे सांभाळता सांभाळता चुनी कोटाल, रोहित वेमुला, पायल तडवी, बालमुकुंद भारती अशा अनेक ज्ञात-अज्ञातांनी आपले जीव गमावले. या व्यक्तींना त्यांच्या मृत्यूने उदाहरण म्हणून पुढे आणले. पण ते त्यांचे व्यक्तिगत मृत्यू नव्हते तर गुणवत्तेच्या ‘तटस्थ’पणाच्या नावाखाली सामुदायिक आत्मविश्वास आणि प्रतिष्ठेचे झालेले ते मृत्यू होते.

(प्रा. रजत रॉय कोलकता येथील प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिकल सायन्सचे असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

स्वैर अनुवाद ः राजीव देशपांडे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]