श्रीकृष्ण राऊत - 8275087370
(1)
लाभो आम्हा तुकोबा शेजार निंदकांचे
दारापुढे असावे ते दार निंदकांचे ॥
किरकोळ-थोर कोणी, आहे लहान-मोठा
देवा, किती घडवले आकार निंदकांचे ॥
टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले
मानू हजार वेळा आभार निंदकांचे ॥
मिळतात ठोक येथे साबण तर्हेतर्हेचे
दुनियेस स्वच्छ करती बाजार निंदकांचे ॥
ज्ञानेश्वरास छळती, पिळतात जे तुकयाला
पाहून घ्या विठोबा अवतार निंदकांचे ॥
स्वर्गात थेट नेते त्यांची विमानसेवा
झाले अनंत कोटी उपकार निंदकांचे ॥
(2)
वैशिष्ट्यपूर्ण आहे एकेक भामटा
तो साव भामटा अन् हा नेक भामटा ॥
जनतेस भाकरीने खाऊन टाकले
खुर्चीत खात आहे पण केक भामटा ॥
ज्याने न कापसाचे विकलेत बोंडही
वटवून घेत आहे तो चेक भामटा ॥
ज्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो
देवास घालतो पण अभिषेक भामटा ॥
विश्वास नाव याचे हा तज्ज्ञ घातकी
स्नेहातही करे जो अतिरेक भामटा ॥
गावास आग लावी, देशासही कधी
लागू न दे स्वत:ला पण शेक भामटा ॥
राज्यात कोतवाली त्यालाच लाभते
लाचेत देत आहे जो लेक भामटा ॥
(3)
सोडेन बायकोला जर ऐकणार नाही
पण देश सोडण्याचा माझा विचार नाही ॥
चालेल ना मिळाल्या शेरास खूप टाळ्या
मी कल्पना कुणाची पण चोरणार नाही ॥
बांधून हात माझे घेतोस तू परीक्षा
देऊ कशी हमी मी लाथाडणार नाही ॥
याहून वेगळी का असणार देशसेवा
फाईल कोणतीही मी दाबणार नाही ॥
थकलीत औषधे अन् शिणलेत वैद्य सारे
वेडेपणात त्याच्या काही उतार नाही ॥
फुटणार घाम नाही दगडास यंत्रणेच्या
तितका प्रभावशाली तुमचा प्रहार नाही ॥
तो देव एक सच्चा बाकी दुकानदारी
होताच स्पर्श स्त्रीचा जो बाटणार नाही ॥