क्रिकेटच्या देवांचे मातीचे पाय?

डॉ. हमीद दाभोलकर -

जवळजवळ दीड महिने चाललेला क्रिकेट वर्ल्ड कपचा माहोल नुकताच संपला असला, तरीही भारताच्या अंतिम फेरीतील पराभवाचे पोस्टमार्टेम अजून चालूच आहे! खेळ म्हटला की हारजित ही आलीच हे आपण समजू शकतो, पण ह्या वर्ल्ड कप दरम्यान दोन ओव्हरमधील ब्रेक दरम्यान कपिल देव आणि सुनील गावस्कर यांना पान मसाल्याच्या नावाखाली तंबाखू / गुटखा यांची जाहिरात करताना बघणे हे मात्र माझ्यासारख्या भारतीय क्रिकेट रसिकाला पचवणे खूपच अवघड जाते आहे. भारतातील क्रिकेट रसिकांच्या तीन-चार पिढ्यांनी सन्मानित केलेले हे दिग्गज आहेत! क्रिकेट हे एखाद्या धर्माच्या सारखे जगणार्‍या आपल्या देशात कपिलदेव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर सारख्या लोकांना क्रिकेटचे देव म्हणूनच पुजले जाते. सत्तरीला आलेल्या कपिल देवला एक फिटनेस आयकॉन म्हणून अजून देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा आदर आहे. एकदा ही इन्जुरी ब्रेक न घ्यावा लागता तो शंभर कसोटी खेळला आहे. तो घेत असलेला चौरस आहार, दूध यांचे किस्से क्रिकेट रसिक अजून ही चवीने चघळतात. ‘८३’ सारख्या सिनेमामध्ये ते दाखवले गेले आहेत. असा माणूस वयाच्या सत्तरीमध्ये तरुणाईला तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची जाहिरात करून आवाहन करतो तेव्हा ती खटकणारीच गोष्ट आहे. तीच गोष्ट सुनील गावस्कर यांची! क्रिकेटपटू म्हणून त्यांनी ऑफ स्टंप बाहेरचे बॉल सोडताना दाखवलेला संयम हा आज देखील एक उदाहरण म्हणून सांगितला जातो. ज्या निग्रहाने ते ऑफ स्टंप बाहेरचा बॉल सोडत तो निग्रह तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीमधून मिळणार्‍या पैशाच्या मोहात पडताना मात्र ते दाखवू शकलेले नाहीत हे नकी.

तरुण क्रिकेटपटूंनी केलेल्या चुका कोणतीही भीडभाड न ठेवता ते आपल्या समालोचनामधून सांगत असतात. त्यांच्या ह्या स्पष्टवक्तेपणाचे देखील खूप चाहते आहेत. आपण विश्लेषण करत असताना, भाषा कठोर असली तरी वेळीच चुका दाखवून देणे हे भविष्यातील गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी महत्त्वाचे असते असे सुनीलसरांचे म्हणणे असते आणि ते रास्त देखील आहे. हेच लॉजिक ते कमला पसंद पानमसाला जाहिराती करताना मात्र सोयीस्कररित्या विसरतात! त्यांचे चाहते असलेल्या अनेक तरुण मुलांना सुनीलसर व्यसनाचा अनुभव घेण्यास उद्युक्त करतात हे शोचनीय आहे. वीरेंद्र सेहवाग सारख्या सत्तेपुढे ‘वाका म्हटले तर रांगणार्‍या’ खेळाडूंकडून किंवा ख्रिस गेल सारख्या खेळाडूंकडून ही अपेक्षा नाही, पण गरज पडली तर सत्ताधारी लोकांच्या विरोधात जाऊन महिला कुस्तीगीरांना पाठिंबा देणार्‍या कपिल देव आणि सुनील गावस्कर ह्यांच्याकडून हे अपेक्षित नकीच नाही.

आता या जाहिराती पान मसाल्याच्या आहेत तंबाखूजन्य पदार्थांच्या नाहीत, असे एक लंगडे समर्थन त्यांचे समर्थक करू शकतात पण विमल किंवा कमला पसंद हे केवळ पान मसाला नसून प्रामुख्याने गुटखा आहेत हे अगदी शालेय मुलांना देखील माहीत असते. पानमसाला या नावाच्या खाली गुटखा, पाण्याच्या बाटलीच्या नावाखाली दारू (बॅगपायपर, इ.) यांच्या जाहिराती करणे याला ‘सरोगेट जाहिराती’ म्हटले जाते. व्यसनाच्या पदार्थाची जाहिरात करता येत नाही या कायद्यामुळे अशा सरोगेट पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात. केवळ कायदेशीरतेला फाटा देण्यासाठी दुसरे नाव असलेले प्रॉडक्ट वापरले जाते. खरे सांगायचे तर अशा स्वरूपाच्या सरोगेट जाहिरातींना बंदी घालणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून देखील त्याची अमलबजावणी केली जात नाही. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी अशा जाहिराती केल्यानंतर आम्हाला या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आहेत हे माहीतच नव्हते असा पवित्रा घेतला होता! तसे करण्याची संधी देखील कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांना आहे, पण इतके जग बघितलेल्या एवढ्या मोठ्या लोकांना इतकी छोटी गोष्ट माहीत नाही हे सामान्य माणसाला पचणे थोडे अवघडच आहे. त्यापेक्षा सरळ आपली चूक मान्य करून जाहिरातीचे पैसे परत देऊन तातडीने जाहिरात बंद करावी हे उत्तम. या निमित्ताने खरेच या जाहिरातींनी काही तोटा होतो का असा प्रश्न काही जणांना पडणे स्वाभाविक आहे. तर याचे उत्तर निःसंशय ‘हो’ असे आहे. अन्यथा, टोबॅको आणि लिकर लॉबीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरातीमध्ये पैसे खर्च केले नसते.

जगभरात झालेले विविध अभ्यास देखील हेच दाखवतात की या जाहिरातींचा संदेश आणि संभाव्य वर्ग हे अतिशय विचारपूर्वक नियोजन करून ठरवलेला असतो. जसे की, ‘कमला पसंद’च्या जाहिरातीमध्ये दोन पिढ्यांचे खेळाडू हे जीवन जगण्याची पद्धत वेगळी असली तरी आनंद साजरा करताना कमला पसंद वापरतात हा संदेश जाहिरातीमधून दिला जातो. लहानथोर अशा सर्व पिढ्यांना कवेत घेणारी जाहिरात मोहीम असावी असा ‘उदात्त’ हेतू असतो हे वेगळे सांगायला नको! ‘आनंद साजरा करणे म्हणजे व्यसन करणे!’ ‘चांगली दोस्ती म्हणजे एकत्र व्यसन करणे’ असे समजत खोलवर रुजलेले विचार हे आपोआप तयार झालेले नसून जाहिरातीमधून नियोजनबद्ध पद्धतीने रुजवले आहेत हे आपण समजून घ्यायला हवे.

आपल्याला हे देखील माहिती हवे की एकट्या भारतात दर वर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दहा लाखांपेक्षा अधिक मृत्यू होतात. हे सर्व टाळता येणारे मृत्यू आहेत. ग्रामीण भागात ३० ते ५० टके पुरुष आणि महिला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यामधून हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सगळ्यांना उत्तेजन देण्याचे काम वरील जाहिरातीद्वारे कपिल देव आणि सुनील गावस्कर करत आहेत. समाज म्हणून त्यांना आपण सगळ्यांनी हे वास्तव ठणकावून सांगणे आवश्यक आहे. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या चाहत्यांच्या प्रेमाचा हा टोकाचा गैरवापर आहे. खरे तर या जाहिरातींच्या पैशामधून सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचे काही अडले असेल असे अजिबात नाही. आणि अडले असेल तरी असा तरुणाईला मृत्यूकडे ढकलणारा पैसा आपल्याला हवा का? हा देखील विचार त्यांनी करायला पाहिजे.

लेखात जरी सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्याविषयी लिहिले असले, तरी अशाच जाहिराती करणारे अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान, रणवीर सिंग हे देखील काही त्या दोघांच्यापेक्षा वेगळे नाहीत. सचिन हा वडिलांना शब्द दिला म्हणून तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करत नाही, पण त्याच्यासकट सौरभ गांगुली, शुभमन गिल, रोहित शर्मा असे एकापेक्षा एक लोक ऑनलाईन सट्टा या नव्याने रुजवणूक होऊ घातलेल्या व्यसनाची जाहिरात करत आहेत. कोका कोलाची जाहिरात नाकारणारा पी. गोपीचंद किंवा भर प्रेस मध्ये स्वतःसमोर असलेला कोका कोला बाजूला करणारा क्रिस्तीयानो रोनाल्डो हे खेळाडू म्हणूनच आपल्या क्रिकेटमधल्या देवांच्या तुलनेने खूप मोठी माणसे वाटतात.

भले हे क्रिकेटचे देव कितीही मोठे असले, तरी त्यांचे चाहते म्हणून ते करत असलेल्या चुकीविषयी बोलायचेच नाही हे वागणे देखील योग्य नाही. यामधूनच काळ सोकावत जातो. क्रिकेटच्या देवांच्या ह्या भूमिका मान्य असलेलं सगळ्या चाहत्यांनी आपले याविषयी मत कोणतीही भीडभाड ना बाळगता या लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. सध्याच्या काळात हे सगळे लोक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपले म्हणणे आपण नकीच पोचवू शकतो. महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था या विषयी सोशल मीडियावर एक मोहीम चालू करत आहे. त्यामध्ये ज्यांना वरील विचार योग्य वाटतात त्यांनी जरूर सहभागी व्हावे. क्रिकेटचे देव इथपासून ते तंबाखूजन्य पदार्थांपासून होणार्‍या हानीचे लाभार्थी हे आपल्या आवडत्या खेळाडूंचे अध:पतन थांबवण्यासाठी आपण एवढे तरी करायलाच पाहिजे!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]