कार्याध्यक्षांचा ऑनलाईन संवाद

अवधूत कांबळे - 9921359099

कोरोना ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील (भाई) यांनी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचे पाल्य; तसेच कष्टकरी, असंघटित कामगार चळवळीतील नेतेकार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, परिवर्तनवादी चळवळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी मुक्त संवाद साधला, सर्वांची आपुलकीने चौकशी करून स्वत:ची आणि समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

दि. 27 एप्रिल 2020 : महा. अंनिस कार्यकारी समितीशी संवाद झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पदाधिकार्‍यांनी गतिमान व्हावे ‘भविष्यवेध 2025’ साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजन, प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अविनाश पाटील यांनी केले. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देत आहोत, असे कार्यकारी समितीने सांगितले.

दि. 28 एप्रिल 2020 : महा. अंनिस राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, निमंत्रित सदस्य यांच्या सोबत संवाद झाला. ‘कोविड-19’च्या काळात कार्यकर्त्यांनी गरजूंना कशी मदत केली, याबाबत सविस्तर चर्चा झाली. व्यक्तिगत विचारपूस करून काळजी घेऊन शक्य असेल, तिथे गरजूंना मदत करा, प्रशासनास साथ द्या; तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. ऑनलाईन संवाद शिबिराबाबतही चर्चा झाली. पुढील वर्षाचे नियोजन, अंमलबजावणी कशी कराल, याबाबत मार्गदर्शन व चर्चा झाली. समितीच्या सर्व विभागांनी आपले दस्तऐवजी अद्ययावत करणे, संघटनात्मक शिबिरे घेणे, कार्यकर्त्यांच्यात संपर्क आणि सातत्यपूर्वक संवाद ठेवण्याचे ठरले. यामध्ये राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दि. 29 एप्रिल 2020 : महा. अंनिस जिल्हा पदाधिकारी संवाद सत्रास राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मोठे काम केले आहे. त्यामध्ये ‘मानसमैत्र’च्या माध्यमातून मानसिक आधार व समुपदेशन केले. स्थानिक पातळीवर गरजू व प्रशासकीय, पोलीस विभागास मास्क, सॅनिटायझर्स आवश्यक साहित्य पुरविले. बर्‍याच ठिकाणी जेवणाची पाकिटे, जीवनावश्यक किट्सचे वाटप केले. आरोग्य विभागात स्वयंसेवक म्हणूनही कार्यकर्ते काम करत आहेत, याबाबतचा अहवाल जिल्हा पदाधिकार्‍यांनी दिला.

अविनाश पाटील यांनी जिल्हा पदाधिकार्‍यांना कोरोनाच्या संसर्गात स्वत: व कुटुंबाची काळजी घ्या; तसेच गरजूंना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले.

30 एप्रिल 2020 : असंघटित कष्टकरी, कामगार चळवळीतील राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा, संवाद झाला.

अविनाश पाटील यांनी महा. अंनिसच्या गेल्या तीस वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये समितीचे योगदान असून विविध स्वरुपाच्या शोषणाविरुद्ध समितीने आवाज उठवला आहे, कृती कार्यक्रम आंदोलने केली आहेत.

श्रमिकांच्या चळवळींचे मोठे योगदान आहे. संघटित व असंघटित कष्टकरी वर्ग, कष्टकरी कामगार, महिला, भटके-विमुक्त समाजातील कष्टकरी, या सर्व वर्गांतील समन्वयातून हे सर्व घटक अंधश्रद्धा, व्यसनमुक्त होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

अरुण दामोदर, अदिबा साहेर, रामचंद्र तांदळे, संदीप कुमावत, आनंद जम्मू, कालू कोमसकर, विकास मगदूम, रमेश बिजेकर, मधू बिरमोले, रश्मी कारले, विवेक सपकाळ, हर्षवर्धन अरवाडे, सुमंत आवळे, सुनील पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

1 मे 2020 : पुरोगामी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्याशी संवाद झाला.

जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा ठरला. अविनाश पाटील यांनी आपली भूमिका व्यक्त करताना पुढील मुद्द्यांची चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासाची वाटचाल नवीन पिढीला समजून सांगण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासाची उजळणी केली पाहिजे. समाजवादी, कम्युनिस्ट, गांधी-सर्वोदयी, काँग्रेस या सर्वांचे योगदान व बलिदान महत्त्वाचे आहे.

पुरोगामी, परिवर्तनवादी महाराष्ट्र हे सामाजिक चळवळींचे माहेरघर व कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. येथे 150 वर्षांच्या सुधारणेचा इतिहास आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. ‘महा.अंनिस’ने राज्याच्या विकासात हातभार लावला आहे.

पुरोगामी राजकीय लोकांनी समिती नेहमीच सहकार्य केले आहे. उमेश पाटील (सोलापूर), नीलेश राऊत (औरंगाबाद), प्रा. बाबूराव लगारे (सांगली), अ‍ॅड. जगजित सिंग (नागपूर), विश्वंभर भोसले, मिलिंद पाखले, चंद्रकांत गांगुर्डे, अभय टकसाळ, जिंदा भगत, शैलेज दोंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. ‘महा. अंनिस’च्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

2 मे 2020 : महाराष्ट्रातील समविचारी, पुरोगामी, परिवर्तनवादी, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद झाला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉ. धनाजी गुरव म्हणाले, “चळवळींच्या रेट्यामुळे, पाठपुराव्यामुळे या देशात महत्त्वाचे सामाजिक कायदे झाले आहेत. सामाजिक चळवळींचा इतिहास सातत्याने नव्या पिढीला सांगितला पाहिजे. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे नेते प्रा. शमशुद्दिन तांबोळी म्हणाले, “हिंदू-मुस्लिम प्रश्न वाढत आहेत. ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले, गैरसमज पसरविला. सर्वच संघटनांनी सामाजिक एकोप्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.”

“सामाजिक व नैसर्गिक पर्यावरण निकोप ठेवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. ‘कोविड-19’च्या संसर्गानंतर समाजजीवन कसे असेल, त्यावर अभ्यास करून प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल,” असे मत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

‘मिळून सार्‍याजणी’ चळवळीतील व्ही. बी. उत्पाल यांनी म्हटले की, “चळवळींचा सक्षम आय.टी.सेल हवा. आपण संवादी असायला हवे. ‘महा. अंनिस’चा हा संवाद प्रेरणादायी, उत्साह वाढविणारा आहे.”

डॉ. अमोल पवार, राजेश देवरुखकर, अर्पिता मुंबरकर, विलासभाई शहा, मनोज मोरे, डॉ. सुरेश खुरसाळे, राम काळे, प्रकाश ढगे, राहुल गौरखेडे, अरविंद सोनटक्के आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, “प्रत्येक चळवळींनी आपल्या योगदानाचा दावा केला पाहिजे. राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रत्येकाने कामाचे सिंहावलोकन करावे. एकमेकांशी संवाद वाढवून परिवर्तनाला पूरक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करावा.

दि. 5 6 मे 2020 : कार्यकर्त्यांच्या पाल्यांशी कार्याध्यक्षांनी संवाद साधला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आपले मोठे कुटुंब असून तुम्ही सर्व मुले-मुली आमच्या सोबत असल्याचा आनंद व्यक्त केला.

अवधूत कांबळे राज्य कार्यवाह, सोशल मिडिया विभाग महाराष्ट्र अंनिस