-
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2021/03/kavita-2.jpg)
प्रश्नकाळ स्थगित आहे
जसा स्थगित आहे न्याय
जशी स्थगित आहे समता
जसे स्थगित आहे स्वातंत्र्य
जसे स्थगित आहे प्रेम
प्रश्न मारले जाताहेत प्रत्येक ठिकाणी
जसे मारले जाताहेत पक्षी
जशी मारली जाताहेत झाडं
जशा मारल्या जाताहेत नद्या
तसेच मारले जाताहेत प्रश्न
प्रश्नांची शिकार करणे एक फॅशनच नव्हे, तर
राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे
प्रत्येक गोष्टीत आता हो म्हणायची रीत आहे
‘हो-हो’चा एक विराट ध्वनी दुमदुमत आहे
ज्या वेळेस आता प्रश्न विचारणेच धोकादायक आहे
तेव्हा कोण विचारणार की, का स्थगित आहे प्रश्नकाळ?
खरोखर काही दिवसांनंतर यावर विश्वास ठेवणे अवघड होईल की
कधी काळी आपल्या भाषेत
प्रश्नचिन्हदेखील असायचे!
मूळ हिंदी कविता : संजय कुंदन
अनुवाद : भरत यादव