लिझ माइटनर आणि तिची अढळ मानवता

डॉ. नितीन अण्णा - 8956445357

48 वेळा नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळालं; मात्र एकदासुद्धा पुरस्कार मिळाला नाही, ती व्यक्ती स्वतः केलेल्या संशोधनासाठी आपल्याच सहकार्‍याला ‘नोबेल’ घेताना पाहते आणि तरी ती शांतपणे त्यांचं कौतुक करते. सहकारी जेव्हा त्या पुरस्कारातील रक्कम देऊ करतो, तेव्हा ती संपूर्ण रक्कम दान करून टाकते. लिझ माइटनर.. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भविज्ञानात पायाभूत संशोधन करणारी भौतिकशास्त्रज्ञ. विज्ञानाचा वापर विधायक कामासाठी झाला पाहिजे; विध्वंसक कामासाठी नाही, या तत्त्वाशी प्रामाणिक राहणारी.. स्वतः लिंगभेद आणि वंशभेदाची बळी असून देखील मनात कधीच कोणती कटुता न बाळगणारी, मानवतेची पाईक लिझ माइटनर..

1878 मध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं एका श्रीमंत आणि सुसंस्कृत ज्यू कुटुंबात एलिसा फिलिप माइटनरचा जन्म झाला. एकूण आठ भावंडं.. पैकी हिचा नंबर तिसरा. तिच्या जन्मदाखल्यावर 17 नोव्हेंबर तारीख असली तरी नंतरच्या सगळ्या कागदपत्रांवर 7 नोव्हेंबर तारीख आहे. लिझची आई संगीतज्ज्ञ आणि पप्पा चेसमास्टर. कला आणि क्रीडा यांचा वारसा घरातूनच मिळाला, जो तिने आयुष्यभर जपला देखील. तिनं स्वतःचं एलिसा नावाचं ‘लिझ’ हे लघुरूपांतर केलं. मुलीचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे लिझची संशोधक वृत्ती अगदी आठव्या वर्षी जागृत असलेली दिसून येते. वेगवेगळे अडथळे वापरून प्रकाशाची गंमत पाहणं आणि त्याची अगदी शास्त्रीय प्रयोगाप्रमाणे नोंद ठेवणं, हा तिचा छंद!

त्या काळात व्हिएन्नामध्ये स्त्रियांना उच्च शिक्षणाची सोय नव्हती. मुलींना वयाच्या केवळ चौदाव्या वर्षापर्यंत शिकता येई. चौदा वर्षांची लिझ पप्पांच्या मागे लागली की, ‘मला पुढं शास्त्र शिकायचं आहे.’ मात्र पप्पांच्या हातात काय होतं? त्या काळात स्त्रियांपुढं केवळ शिक्षिका होणं हा एकच पर्याय होता आणि लिझ शिक्षिका झाली. मात्र 1897 मध्ये नवीन नियम आले. विद्यापीठात स्त्रियांना परवानगी मिळाली. पप्पांनी शिकवणी लावून लिझची विद्यापीठ प्रवेशपरीक्षेची तयारी करवून घेतली. 1901 मध्ये लिझ व्हिएन्ना विद्यापीठात दाखल झाली. 1906 मध्ये तिने डॉक्टरेट मिळवली. रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा लिझने पदवीसाठी अभ्यास केला असला तरी भौतिकशास्त्राची तिला गोडी लागली. व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्राची डॉक्टरेट मिळवणारी लिझ ही केवळ दुसरी स्त्री होती!

शिक्षण झालं, आता पुढं काय? लिझने तिची आदर्श मॅडम मेरी क्युरी यांना पत्र पाठवून काही काम आहे का विचारलं; परंतु तिथं काही काम मिळालं नाही. 1907 मध्ये जर्मनीमधील बर्लिन विद्यापीठात ती आली. पण जर्मनीतील समाज अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाबाबत मागासच होता. लिझला तर पुढं शिकायचं होतं. तिनं मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाला भेटून त्याच्या व्याख्यानाला बसू देण्याची विनंती केली. पुंजसिद्धांताविषयी अधिक माहिती मिळवू लागली. इथं ओट्टो हान सोबत तिची भेट झाली. ‘रेडिओथोरियम’ हे किरणोत्सर्गी द्रव्य शोधणारा हान हा रसायनशास्त्रज्ञ रूदरफोर्ड यांचा शिष्य. त्याला पुढील संशोधनात जोड हवी होती एका भौतिकशात्रज्ञाची. एक ‘रेडिओ-फिजिसिस्ट’ आणि एक ‘रेडिओ-केमिस्ट’ यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे होते.

पण एक अडचण होती. हानची स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. एमिल फिशर यांच्या संस्थेत तो आपले काम करायचा. जुन्या विचारांच्या फिशरने आपल्या संस्थेत स्त्रीला प्रवेश द्यायला नकार दिला; पण लिझ आणि हान यांनी विनवणी करून सशर्त परवानगी मिळवली. लिझने इतर कुठेही पाऊल न टाकता संस्थेच्या एका लाकडी फळ्यांच्या खोलीत काम करायचे, कोणत्याही पुरुषाच्या नजरेस पडायचे नाही. (उगाच त्यांचे संशोधन करताना चित्त विचलित व्हायला नको.) हान जरी इमारतीमधील प्रयोगशाळेत काम करत असले तरी हिनं खालीच थांबायचं.

काम करताना गैरसोय होतीच; परंतु ‘राईट टू पी’चे काय? लाकडी खोलीला टॉयलेटची सोय देखील नव्हती. निसर्गाची हाक आली तर लिझने रस्त्यापलिकडे असलेल्या हॉटेलमधील टॉयलेटचा वापर करायचा होता. लिझचे काम पाहून फिशरने कालांतराने प्रयोगशाळा वापरायची परवानगी दिली. मात्र तेथील संशोधकांनी तिचा भरपूर मानसिक छळ केला. पाच वर्षांनी लिझ सोडून गेली, तोवर महिला संशोधकांची संख्या वाढली म्हणून फिशरने लेडीज टॉयलेटची सोय केली; मात्र तेव्हा फिशरला चक्क पुरुष संशोधकांनी विरोध केला होता. किती हा नीचपणा!

हानची आणि लिझची भागीदारी छान फुलली. त्यांनी किरणोत्सर्गविषयक नऊ रिसर्च पेपर प्रकाशित केले. हानसोबत तिनं ‘क्टीनियम’ हे समस्थानिक शोधून काढलं. तसेच किरणोत्सर्ग तपासणीसाठी ‘रेडिओअ‍ॅक्टिव रिकॉइल’ पद्धत शोधली. 1912 मध्ये जर्मनीमध्ये कैसर विल्यम इन्स्टिट्यूट उभारले जात होते. हानला तिथं चांगला पगार मिळणार होता. लिझला देखील तिथं बोलावण्यात आलं. परंतु स्त्री असल्यामुळे लिझने तिथं बिनपगारी फुल्ल अधिकारी म्हणून काम करायचं होतं. एक वर्ष विनामूल्य काम केल्यावर तिला हानच्या समदर्जाचं पद मिळालं. पण वेतन…? हानला मिळायचं त्याच्या फक्त एक पंचमांश!

याचवेळी पहिल्या महायुद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. जर्मन सैन्याला मदत करायला हान आणि इतर शास्त्रज्ञ मैदानात उतरले. लिझदेखील क्ष-किरण तंत्रज्ञ परिचारिका म्हणून ऑस्ट्रियन सैन्यात रुजू झाली. गंमत म्हणजे लिझची आदर्श मेरी क्युरीदेखील त्यावेळी हेच काम; मात्र विरोधी आघाडीकडून करत होती. युद्धाला लिझचा नेहमीच विरोध होता. मात्र जखमी सैन्याच्या मदतीसाठी तिनं हे काम पत्करलं होतं. कैसर विल्यम संस्था केवळ युद्धोपयोगी संशोधनाचं काम करत असल्याचं लक्षात आल्यावर तिनं संस्था सोडायचा निर्णय घेतला. तिला भरघोस पगारवाढीचं आमिष दाखवण्यात आलं; मात्र तत्त्वापुढे बाकी कशाची फिकीर तिला नव्हती.

1917 मध्ये हानसोबत लिझनं ‘प्रॉक्टानियम’ हे समस्थानिक शोधून काढलं. तिला बर्लिन अकादमीकडून ‘लाईबनिझ’ पदक मिळालं. कैसर विल्यम संस्थेत संचालक पदावर नोकरी सुद्धा मिळाली. काही काळ प्राध्यापकी केली, जर्मनीमधील भौतिकशास्त्राची पहिली प्राध्यापिका तीच. जर्मनीमधील सर्वांत आघाडीची संशोधक म्हणून लिझ ओळखली जाऊ लागली. आइन्स्टाइन तर तिला कौतुकाने आपल्या ‘जर्मनीची मेरी क्युरी’ असे संबोधायचा.

1932 मध्ये जेम्स चॅडविकने ‘न्यूट्रॉन’चा शोध लावला आणि जगभरातील संशोधकांमध्ये अणुचे विभाजन करण्याची स्पर्धा निर्माण झाली. एकाचवेळी इंग्लंडमध्ये रुदरफोर्ड, डेन्मार्कमध्ये निल्स बोहर, फ्रान्समध्ये मेरीची पोरगी आयरीन क्युरी आणि तिचा नवरा, रशियामध्ये फ्रेंकेल, इटलीमध्ये फर्मी आणि जर्मनीत लिझ- हान जोडी.. अणुबॉम्ब बनवण्याचा उद्देश कोणाचा असेल-नसेल; उत्सुकता होती ‘अल्केमी’ची, मूलद्रव्य बदलता येईल याच्या शक्यतेची. कोणत्याही धातूला सोन्यामध्ये बदलता येईल, या वेड्या आशेवर तर रसायनशास्त्र जन्माला आलं होतं…

1933 मध्ये जर्मनीवर एडॉल्फ हिटलरची हुकुमशाही सुरू झाली. ज्यू संशोधकांना बडतर्फ केलं गेलं किंवा राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं. लिझला वाटलं, आपण तर ज्यू धर्म सोडून कधीच ख्रिस्ती धर्मातील ‘लुथेरियन’ पंथाची दीक्षा घेतली आहे, आपण पहिल्या महायुद्धात देशाची सेवा देखील केली आहे; शिवाय आपण ऑस्ट्रियन नागरिक. तिचे नातलग, इतर संशोधक देश सोडून गेले तरी ती संशोधनात मग्न राहिली. ऑस्ट्रिया जर्मनीने गिळंकृत केल्यावर साहजिक लिझ पण जर्मन नागरिक ठरली. आता मात्र लिझच्या जीवावर कधीही बेतलं जाणार होतं, तिच्यावर परागंदा व्हायची वेळ आली होती.

मात्र आता नवीन कायद्यानुसार संशोधक लोकांना देश सोडून जाता येत नव्हतं. हानच्या मदतीने अगदी चित्रपटात शोभेल अशा गुप्त पद्घतीने तिने जर्मनी सोडली. खरंतर इंग्लंड, अमेरिका सगळीकडे तिचं स्वागत झालं असतं; मात्र तिचं इंग्लिश कच्चं होतं. म्हणून साठ वर्षांची ही संशोधिका स्टॉकहोम, स्वीडन इथं गेली. तिथं सीगबान या शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत काम स्वीकारलं. मात्र सीगबान हा स्त्रियांच्या बाबतीत अतिशय पूर्वग्रहदूषित होता. काम करताना खूप त्रास झाला तरी निल्स बोहरसोबत काम करण्याची संधी इथंच मिळाली.

आता संशोधनात लिझला नवीन जोडीदार मिळाला होता. तिचा भाचा ओट्टो फ्रिश्च, जो जर्मनीमधून पळून इंग्लंडमध्ये आणि आता त्याच्या मावशीच्या मदतीला स्वीडनमध्ये आला होता. जर्मनीमध्ये हाननं ‘युरेनियम’वर ‘न्युट्रॉन’चा मारा करून ‘बेरियम’ हे मूलद्रव्य मिळवलं होतं. पण त्यामागचं गणित त्याला सुटत नव्हतं. त्यानं पाठवलेल्या निष्कर्षावर लिझ आणि फ्रिश्चनं काम सुरू केलं आणि त्यांना त्यामागचं कोडं सुटलं. अणुशक्तीचा शोध लागला! आइन्स्टाइनचं e=mc2 समीकरण उपयोगात येणार होतं..

‘युरेनियम’वर ‘न्यूट्रॉन’ कणांचा मारा केल्यावर त्याच्या अणुचं केंद्र विभाजित होतं… त्यातून ‘बेरियम’ आणि ‘क्रिप्टॉन’ ही दोन मूलद्रव्ये तयार होतात. मात्र या सर्वांत ‘युरेनियम’च्या अणुकेंद्रातून तीन ‘न्यूट्रॉन’ आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. अणुकेंद्रातून निघालेले ‘न्यूट्रॉन’ मग पुन्हा तीन नव्या अणुकेंद्रांचं विभाजन करतात, पुन्हा ऊर्जा मुक्त होते आणि नवे नऊ ‘न्यूट्रॉन’ बाहेर पडतात. जोवर ‘युरेनियम’च्या शेवटच्या अणुचं विभाजन होत नाही, ही साखळी सुरूच राहते. या प्रक्रियेतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.

‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’चा हिशोब लागला… ऊर्जा किती तयार होते, याचं समीकरण देखील जुळलं. लिझने ही बाब हान याला, तर फ्रिश्चने निल्स बोहर याला कळवली. मात्र याबाबतचा रिसर्च पेपर प्रसिद्ध होण्याआधी ही बातमी बाहेर फुटली… हानने त्याचा रिसर्च पेपर पब्लिश केला होता; मात्र त्यात लिझ आणि फ्रिश्चचं नाव नव्हतं (कदाचित लिझला पळून जाण्यात मदत केल्याबद्दल आपल्यावर आळ येईल, ही भीती हानला असावी.) हानने मात्र लिझचं योगदान कधीच अमान्य केलं नाही. त्यामुळे या सगळ्यांमागे लिझ आहे, हे जगाला समजलं. लिझला अमेरिकेत ‘मॅनहॅटन’ प्रकल्पात काम करायला बोलावण्यात आल; मात्र तिनं बॉम्ब बनवायला येणार नाही, हे निक्षून सांगितलं.

1944 मध्ये हानचं नाव आण्विक विभाजनासाठी नोबेल पारितोषिकसाठी पुढं आलं. अनेक शास्त्रज्ञांनी लिझदेखील तेवढीच हक्कदार आहे, यासाठी आवाज उठवला; मात्र त्यावेळी नोबेल समितीवर सीगबान होते. त्यांनी तिचं नाव पद्धतशीर डावललं. हानने नोबेल भाषणात लिझचा उल्लेख केला; तसेच पारितोषिक रकमेतून निम्मा वाटा लिझला देऊ केला. लिझनं तो लगेच दान करून टाकला. झाल्या प्रकाराचं लिझला वाईट वाटलं असलं, तरी हान आणि लिझमध्ये कटुता आली नाही. त्यांनी एकमेकांसाठी भरपूर केलं होतं. अगदी कुणाला लाच द्यावी लागेल म्हणून स्वतःच्या आईची अंगठी हाननं लिझला पळून जाताना दिली होती.

हिरोशिमा, नागासाकीवर बॉम्ब पडला आणि लिझचं नाव बॉम्बची जननी म्हणून जगापुढं आलं. अमेरिकेत तर ती ‘सेलिब्रिटी’ झाली. त्यात, तिचा ज्यू धर्म देखील पुन्हा-पुन्हा अधोरेखित करण्यात येऊ लागला; मात्र तिला ना कोणत्याही धर्माशी घेणं होतं, ना बॉम्बशी! केवळ संशोधनात रस होता. संशोधनात अडथळा नको म्हणून तिनं लग्न, संसार सगळं टाळलं होतं. तिला ना प्रसिध्दी पाहिजे होती ना पैशांचा हव्यास. मनानं ‘श्रीमंत’ असणारी लिझ आठ वर्षं कोणत्याही समारंभाला एकच ड्रेस घालून जात होती. तिची आवड केवळ संगीत आणि मोकळ्या रस्त्यावर चालणं.

किरणोत्सारी मूलद्रव्यांना हाताळणं धोक्याचं असतं, याची जाणीव तिला होती. मेरी क्युरीनं केलेली चूक लिझनं केली नाही. रुदरफोर्डनं हानसाठी पाठवलेलं किरणोत्सारी पदार्थाचं पार्सल घेऊन येणार्‍या पोस्टमनलादेखील तिनं आवश्यक काळजी घ्यायला शिकवलं होतं. त्यामुळेच वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत ती काम करू शकली.. आणि 89 वर्षांचं समाधानी आयुष्य जगली. मृत्यूनंतर तिच्या थडग्यावर फ्रिश्चने जी समाधिशीला लावली आहे त्यावर लिहिलं आहे – Lise Meitner : – physicist who never lost her humanity. अगदी यथायोग्य शब्दांत लिझप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

1982 मध्ये पीटर आर्मब्रूस्टर या जर्मन शास्त्रज्ञाने एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. लिझ माइटनरच्या सन्मानार्थ त्याने या 109 व्या मूलद्रव्याचे नाव ‘माइटनरियम’ असं ठेवण्यात आलं. पीटर म्हणतो- “लिझ माइटनरचा सन्मान देशातील सर्वांत महत्त्वाची शास्त्रज्ञ म्हणून केला पाहिजे. आजवर 943 लोकांना ‘नोबेल’ भेटलं आहे. त्यातील किती जणांची नावं सर्वसामान्यांना ठाऊक असतात; मात्र ‘आवर्तसारणी’मध्ये केवळ 118 मूलद्रव्यं आहेत… त्यात लिझला मिळालेला मान अगदी मोठमोठ्या ‘नोबेल’विजेत्यांना मिळाला नाही. लिझ ही तिथं ध्रुव तार्‍यासारखी अढळ झाली आहे.. अमर झाली आहे…

लेखक संपर्क ः 89564 45357


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]