के. डी. खुर्द सर – माझे प्रति दाभोलकर!

हर्षल लवंगारे -

२००७ हे वर्ष असावं. कोल्हापूरमधील कृषि महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणी आध्यात्मिक बुवाबाजीला बळी पडताना पाहून उद्विग्न अवस्थेत एक पानभर मजकूर लिहिला आणि घरात असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकात असलेल्या डॉक्टरांच्या पत्त्यावर पाठविला. माझ्या मनातील खदखद त्यामुळे थोडी कमी झाली. मी विचार केला. पत्र डॉक्टरांना जरी पोचलं, तरी दाभोलकर त्यांच्या व्यापातून कशाला उत्तर लिहितील; पण साधारण महिन्याभराने साध्या पोस्टकार्डवर दाभोलकरांचं उत्तर आलं. त्यांना माझ्या मनाची चलबिचल कळालेली असावी कदाचित त्यात त्यांनी लिहिलं होतं की, कोल्हापुरात के. डी. खुर्द यांना भेट. सोबत खुर्द सरांचा फोन नंबर दिला होता. मी लगेचच खुर्द सरांना फोन केला, सगळी हकिकत सांगितली. खुर्द सरांनी दुसर्‍या दिवशी कोल्हापुरातल्या त्यांच्या घराजवळील महावीर गार्डनमध्ये भेटायला बोलावलं.

दुसर्‍या दिवशी दिलेल्या वेळेत मी त्यांना भेटायला गेलो. साधारण सत्तरी ओलांडलेले खुर्द सर, त्यांचा नातू समीर आणि नात सई यांच्यासोबत रोज या बागेत यायचे. या भेटीत सरांनी मला अंनिसच्या कार्याची ओळख करून दिली. खुर्द सरांची भेट झाल्यानंतर साधारण महिन्याभराने माझी आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांची खुर्द सरांच्या घरी भेट दिली; पण अंनिस बाळकडू तोवर खुर्द सरांनी मला दिलेलं होतं आणि म्हणूनच मी नेहमी त्यांचा उल्लेख माझ्यासाठी प्रति दाभोलकर असा करत आलो आहे.

खुर्द सर एक वेगळंच रसायन होतं. वयाची सत्तरी ओलांडलेली असतानादेखील त्यांच्या ‘स्पिरीट’ नावाच्या स्कूटरवरून ते ‘होळी लहान करा, पोळी दान करा?’ या शीर्षकांची माहिती देणारी पत्रके विविध संस्था, शाळा, महाविद्यालये यांना वाटत. यासाठी त्यांनी मुख्याध्यापक संघ आणि इतर सेवाभावी संस्थांनादेखील या कार्यात जोडले होते. दरवर्षी होळीपूर्वी महिनाभर त्यांची ही मोहीम चालायची. नंतर मला कळालं की, आज महाराष्ट्रभर ‘निर्माल्य दान करा’ व ‘विसर्जित मूर्ती दान करा’ या मोहिमा ज्या सुरू झाल्या तसेच शासन व महानगरपालिकांनी पुढाकार घेऊन त्या राबविल्या. त्याची सुरुवात सर्वांत आधी कोल्हापूरमध्ये झाली आणि त्यात खुर्द सरांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यातला एक प्रसंग या ठिकाणी आठवतो.

त्यांच्या भेटीनंतरच्या पहिल्याच वर्षी गणेश विसर्जनादिवशी अंनिसचे आम्ही कार्यकर्ते रंकाळा तलावावर जमलो होतो. विसर्जनासाठी येणार्‍या नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होतो. अर्थात, हे करण्याला विरोध करणार्‍यांचा एक गटही घाटावर होता. विसर्जनानंतर दान केलेल्या गणेशमूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करायच्या होत्या. रात्री उशिरा किमान १५० हून अधिक मूर्ती इराणी खणीमध्ये न्यायच्या होत्या. त्यासाठी आम्ही एक ट्रॅक्टर मागविला होता, पाण्यातून बुडवून काढून दान केलेल्या मूर्ती ठिसूळ बनल्या होत्या, त्या भंग पावण्याचा धोका होता आणि असे काही घडतेय का, हे या सगळ्या उपक्रमाला विरोध करणारे लोक पाहात होते. विरोधात घोषणाबाजी करीत होते. मी उत्साहाने ट्रॅक्टरमध्ये चढलो होतो आणि खालून इतर कार्यकर्ते त्या मूर्ती उचलून ट्रॅक्टरमध्ये देत होते. घाटावर चिखल झालेला होता आणि त्यामुळे अचानक ट्रॅक्टर त्या चिखलात रुतला आणि त्यातली एक मूर्ती भंग पावली. मला हे लक्षात आले आणि मी लगेचच त्या मूर्तीजवळ बसलो आणि कोणाच्याही लक्षात येण्याआधी त्या मूर्तीला आधार दिला. खुर्द सरांनी ही गोष्ट पाहिली होती. पुढे इराणी खणीपर्यंत मी ती मूर्ती सांभाळून पकडली आणि सगळ्यात आधी तिचे विसर्जन केले. मी आणि खुर्द सर आम्ही दोघांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. पुढे अनेक ठिकाणी त्यांनी हा प्रसंग अनेकांना सांगितला. हर्षलने अतिशय आत्मविश्वासाने कसा तो प्रसंग सावरला याबद्दल कौतुक केले. अगदी अलीकडेसुद्धा त्या प्रसंगाचा ते उल्लेख करत.

दुसरी आठवण म्हणजे शाळातपासणीच्या वेळी गडहिंग्लज तालुक्यात त्यांनी एक दिव्यांग मुलगा पाहिला. दोन्ही हात नसणारा हा मुलगा त्याच्या पायांनी लिहीत होता. त्याची आणखी विचारपूस केल्यावर शाळेतल्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला शाळातपासणीसाठी आलेल्या खुर्द सरांना खूश करावे म्हणून चित्रे काढून दाखवायला लावली. हा मुलगा हात नसताना सायकल कशी चालवतो, पोहतो कसा, आपली सगळी कामे एकटा कशी करू शकतो, हे सर्व दाखवले. त्या शाळेतील किंवा गावातील लोकांना त्याचे अप्रूप नव्हते; पण खुर्द सरांना मात्र आपण या मुलासाठी काहीतरी करायला हवं, या विचारांनी अस्वस्थ केलं. त्यांनी शिक्षण संचालकांनाच ही बाब कळविली, अनेक पत्रव्यवहार केले. तेव्हा चिपळूणकर हे शिक्षणसंचालक असावेत. त्यांनी स्वत: त्याची दखल घेतली आणि त्या मुलाच्या या जिद्दीसाठी तेव्हाच्या पाठ्यपुस्तकात ‘जिद्द’ नावाचा एक धडा पाठ्यपुस्तक मंडळाने समाविष्ट केला.

असंख्य प्रकारच्या उपक्रमशीलतेतून जे विविध उपक्रम अगदी प्राथमिक पातळ्यांवर खुर्द सरांनी सुरू केले आणि त्यातील असंख्य उपक्रम लोकप्रिय झाले, असा हा कॉम्रेड इतरांच्या कामाबद्दल भरभरून बोलायचा. मी नेहमी पाहिलंय की इतरांच्या कार्याबद्दल ते प्रचंड कौतुक करायचे. समोरच्याला म्हणायचे, तुम्ही जे करताय ते काम महत्त्वाचं आहे, मोठं आहे! माझ्यासाठी ज्यांच्यामुळे विचारांना वळण मिळालं, ज्यांना मी नेहमीच माझ्यासाठी ‘प्रति दाभोलकर’ असे विशेषण देत आलो आहे त्या कॉम्रेड के. डी. खुर्द सरांना सलाम..!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]