प्राचार्य विलासराव पोवार -
–प्राचार्य विलासराव पोवार
राजर्षी छत्रपती शाहू महाराज १८९४ साली गादीवर आले आणि सुरुवातीपासूनच त्यांना गुणवत्ता डावलत असल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले. गादीवर बसण्यापूर्वी त्यांनी संस्थानचा दौरा केला. त्यांच्या चाणाक्ष नजरेला अनेक गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणात मागासलेला समाज. दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय नोकर्यामध्ये बहुजनांना नगण्य स्थान. तिसरी बाब म्हणजे या दोन्हीच्या परिणामी बहुजनावर होणारा अन्याय. महाराजांनी यावर उपाय योजले आणि त्यानंतर पुण्यातील ब्राह्मणी वृत्तपत्रांनी त्यांच्या विरोधात एकच काहूर उठविले. “महाराजांनी गुणवत्ता डावलून नोकरभरती केली “हा त्यांचा मुख्य आरोप होता.
सुरुवातीची देशातील परिस्थिती :
भारतात ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी शैक्षणिक परंपरा ब्राह्मण समाजापुरती मर्यादित होती. शेणवी, प्रभू व मराठा समाजात अत्यंत कमी प्रमाणात शिक्षित लोक असत. युरोपियनांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांनी व त्यांच्याबरोबर आलेल्या ख्रिश्चन मिशनर्यांनी भारतातील सर्व लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांचा फायदा येथील थोड्याफार शिकलेल्या व ज्यांच्या घरामध्ये परंपरागत विद्या आहे अशा लोकांनी घेतला. इंग्रजी विद्या शिकून पुढे आलेल्या ब्राह्मण समाजातील लोकांनी ब्रिटिशांच्या राजवटीतील महत्त्वाच्या जागा पटकावल्या. ब्रिटिश समाज जीवनाचे निरीक्षण केल्यानंतर काही ब्राह्मण लोकांना, भारतात आपण इतरांना कसे तुच्छतेने वागवतो याची जाणीव होऊन त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला.
बहुजन समाजात काही लोकांनी शिक्षण घेतले, पण राजदरबारातील गुणवत्तेप्रमाणे नोकर्या मिळवणे त्यांना शक्य नव्हते. तिथे ब्राह्मण वर्गाची हुकूमशाही चालत असे. अशी स्थिती महाराष्ट्रात १९ व्या शतकात होती.
कोल्हापूरची परिस्थिती :
माधवराव बर्वे कोल्हापूरचे दिवाण होते. त्यांनी अनेक ब्राह्मण व पारशी अधिकारी दरबारामध्ये नेमले होते. मुख्य न्यायाधीश बी. एन. जोशी तर मुख्य पोलीस अधिकारी दोराबजी पट्टणजी, शॉनॉन मुख्य अभियंता होते. मिस लिटल या शिक्षण खात्यात अधीक्षक होत्या.
श्रीमती सारा साइक्स या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात सुईण आणि परिचारिका होत्या. कँडी हे राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. दुसर्या अधिकार्यांची नावे बावडेकर, गोळवलकर, थत्ते, भावे, आळतेकर, गोडसे, अशी होती. यावरून असे दिसते की, कोल्हापूरच्या राजदरबारामध्ये वरच्या हुद्द्यावर सर्व अधिकारी ब्राह्मण पारशी आणि ब्रिटिश होते. स्थानिक बहुजन राज्यकारभारात अजिबात नव्हते.
१८९४ मध्ये महाराज गादीवर आले तेव्हा कोल्हापूर राज्यकारभारात ६० ब्राह्मण अधिकारी आणि ब्राह्मणेतर ११ होते. महाराजांच्या खासगी नोकरीत ४५ ब्राह्मण तर सात ब्राह्मणेतर होते. येथे ब्राह्मणेतर म्हणजे शेणवी, पारशी वगैरे मराठा व इतर मागास जाती नव्हेत. कोल्हापूर संस्थांनची वस्ती नऊ लाखाची होती व ब्राह्मण आणि इतर वरिष्ठ वर्ग यांची संख्या २६००० होती.
शैक्षणिक परिस्थिती :
संस्थानातील शिक्षणाचा विचार केला तर ७९.१ टक्के ब्राह्मण शिकलेले होते. तर मराठा ८.६ टक्के, कुणबी १.५ टक्के, मुसलमान ७.५ टक्के, जैन व लिंगायत यांचे प्रमाण १०.१ टक्के होते. अशा तर्हेने शिक्षणात प्रचंड प्रमाणात विषमता होती.
उपाय शोधला :
शिक्षणातील आणि राज्यकारभारातील ही विषमता नष्ट करण्याचे आव्हान महाराजांच्या पुढे होते. त्यांनी प्रथम राजप्रतिनिधी मंडळाला दिलेले राज्यकारभाराचे हक्क रद्द केले. त्यांचे स्वरूप बदलून त्यांचे सल्लागार मंडळ केले. मंडळाचे अध्यक्ष दिवाण, तर महसूलमंत्री व मुख्य न्यायाधीश हे सभासद झाले. त्याला हुजूर ऑफिस असे नाव दिले. त्याचे सचिव म्हणून रघुनाथ व्यंकोजी सबनीस यांची नेमणूक केली. त्यांच्यावर सर्व शासकीय कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली. सबनीस जातीने कायस्थ होते. त्यांना या जागेवर नेमू नये, असा प्रयत्न कोल्हापुरातील ब्राह्मणांनी केला. पण महाराजांनी तो निष्फळ ठरवला.
कार्यक्षम अधिकारी :
आपल्या दरबाराची कार्यक्षमता वाढावी व प्रशासनाचा दर्जा सुधारावा म्हणून कार्यक्षम अधिकारी नेमण्याच्या शोधात शाहू महाराज होते. तसेच राज्यकारभारात समतोलपणा राहावा, म्हणून सर्व जातीतील तरुणांनी शिक्षण घेऊन आपली गुणवत्ता वाढवावी यासाठी महाराजांनी राज्यकारभारामध्ये ब्राह्मणेतर समाजातील सुशिक्षित तरुणांना नेमून त्यांना राज्यकारभाराचे ज्ञान देण्याचे ठरविले. पण दिवाण तारापूरवाला यांना महाराजांचे धोरण पसंत पडले नाही. बी. ए. च्या वर्गात शिकत असलेल्या एका जैन तरुणाला संस्थांनच्या नोकरीत घेतले. तेव्हा मुख्य न्यायाधीश जोशी यांनी त्या विरोधात कांगावा केला. जोशी यांचे म्हणणे असे होते की, “ब्राह्मण पदवीधर कमी पगारावर मिळू शकतात त्यांचीच नोकरीत भरती करावी.”महाराजांनी भास्करराव विठोजी जाधव यांची सहाय्यक सरसुभा म्हणून एक जून १८९५ रोजी नेमणूक केली. भास्करराव मुंबई विद्यापीठाचे अत्यंत हुषार विद्यार्थी होते. ते बी. ए. आणि एम. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. पण या नेमणुकीने प्रस्थापितांना खूप दुःख झाले. ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी ब्राह्मणेतर अधिकारी नेमल्याबद्दल महाराजांना दोष दिला. या नेमणुकीचे न्यायमूर्ती रानडे यांनासुद्धा आश्चर्य वाटले. तेव्हा ते धुळ्यात नोकरी करत होते. ते सबनीसना म्हणाले,”आपण जितके चांगले काम करू शकू तसेच जाधव करू शकतील काय?”रानडे यांच्यासारखा उदारमतवादी, मोठ्या मनाचा नेता सुद्धा’ ब्राह्मणेतर मनुष्य हा ब्राह्मणा इतकाच कार्यक्षम असू शकतो’, हे खुल्या मनाने ओळखू शकले नाहीत असे दिसते. भास्करराव जाधव यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाच, पण विवेकनिष्ठ लेखनही केले आहे. रामायणावर नवा प्रकाश हा त्यांचा ग्रंथ आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी कोल्हापुरात सहकाराला मोठे प्रोत्साहन दिले. त्यांच्याच पुढाकाराने सन १९१३ साली अर्बन बँकेची स्थापना झाली. या बँकेच्या अनेक शाखा कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या बाहेरही आहेत. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून कोल्हापूर भागात सत्यशोधकांची फौज उभी केली. दाजीराव विचारे या अभियंत्याची परीक्षा पास झालेल्या ब्राह्मणेतर तरुणाला महाराजांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात नेमले. त्यांनी राधानगरी धरणाचे बांधकाम इतके उत्कृष्ट केले आहे की महाराजांनी त्यांच्या नावे दाजीपूर हे गाव वसवले. या धरणाने कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. गुणवत्ता ही जातीवर आधारित नसते हे महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
शिक्षण विभागात लिटल या अधीक्षक होत्या. त्यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या जागी सौ. राधाबाई कृष्णराव केळवकर यांची नेमणूक एक सप्टेंबर १८९५ पासून महाराजांनी केली. अनेक प्रमुख पदावर महाराजांनी गुणवान ब्राह्मण अधिकार्यांचीही नेमणूक केलेली आहे.
सर्व समावेशक धोरण :
सुरुवातीपासूनच आपल्या प्रजेतील सर्व घटकांना पुढे आणण्याचे धोरण महाराजांचे होते. पुढे घडलेले वेदोक्त प्रकरण त्याला कारणीभूत आहे, असे म्हणता येत नाही. उलट वेदोक्त प्रकरणामुळे राज्यकारभाराप्रमाणेच धार्मिक क्षेत्रातही ब्राह्मणी विचारांचे वर्चस्व होते हे लक्षात येते.
धार्मिक क्षेत्रातील मक्तेदारी :
पुराण काळापासून ब्राह्मणांनी संस्कृत शिकण्याचा अधिकार आपल्या हातात ठेवून आपणच गुणवान आहोत असा समाजाचा समज करून दिला. आजही हा समज दूर झालेला नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हे वर्चस्व प्रचंडच होते. त्यामुळेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना तोंडावर शुद्र म्हणण्याचे धाडस त्यांच्या हाताखालचा पगारी नोकर करू शकला. या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी महाराजांनी आर्य समाज, सत्यशोधक समाज, ब्राम्हो समाज थिऑसॉफिकल सोसायटी यांना प्रोत्साहन दिले. खास क्षत्रिय जगद्गुरूची स्थापना केली.
कला, क्रीडा कौशल्य :
कला, क्रीडा कौशल्य यातही महाराजांनी गुणवान व्यक्तींची कदर केली. प्रचंड आर्थिकबळ देऊन त्यांना समाजापुढे आणले! त्यांच्यातील नैपुण्य समाजाला दाखवून दिले. बालगंधर्वातील अभिनयाचे गुण व त्यांची गायन कला किती उच्च प्रतीची आहे हे महाराजांनी सर्वप्रथम ओळखले आणि त्यांना पुढे आणले. भारतीय कीर्तीचे गायक अल्लादिया खां यांना कोल्हापुरात आणून, त्यांचा सन्मान करून, त्यांच्याकडून अनेक शिष्य तयार करून घेण्याची योजनाही महाराजांनी यशस्वी केली. गायन, वादन, कला व त्यातील गुणवंत व्यक्तींची महाराजांनी जोपासना केली. सर्व क्षेत्रातील कलावंतांचे महाराज चाहते होते. कलाकारांच्या अंगच्या गुणांचा विकास करण्यासाठी महाराज कलाकारांना सहाय्य करीत. अनेक कलाकारांना व नाटक कंपनीवाल्यांना महाराजांनी प्रोत्साहन दिले, आणि अडीअडचणीत मदत केली. चित्रकला तपस्वी अबालाल रहमान, पेटीवादक गोविंदराव टेंबे, तबलानवाज कामता प्रसाद, पखवाज पटू साधले बुवा, भेदिक गाणे लिहिणारे शाहीर लहरी हैदर, शिल्पकार कृष्णराव मिस्त्री, माधवराव धुरंदर, आनंदराव पेंटर, जरीकाम करणारे दत्तोबा जिनगर अशा गुणवंत कलाकारांच्या बरोबर पंजाबी कुस्तीगिराशी सामना देतील असे व्यंकाप्पा बुरुड, देवाप्पा बुरुड, बाबू बिरे, गणपत शिंदे, श्रीपती चव्हाण यासारखे बलशाली कुस्तीपटू त्यांनी घडवले आणि कोल्हापूरला कलापूर बनवले.
शैक्षणिक कार्य :
महाराजांचे शैक्षणिक कार्य संपूर्ण देशाला मार्गदर्शक आहे. संस्थानाने चालविलेल्या एकमेव वसतिगृहात सर्व जाती-धर्माच्या मुलांना प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा होती. पण महाराजांच्या लक्षात आले की, यात केवळ ब्राह्मण जातीच्या विद्यार्थ्यांचा भरणा आहे. इतर जातीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच छाटले तर त्यांच्या गुणवत्तेचा विकास होऊ शकेल काय? महाराजांनी ते वसतिगृह सुरू ठेवलेच, पण १९०१ पासून विविध समाजासाठी वसतिगृहे काढण्याची सुरुवात केली. मराठा, जैन, लिंगायत, मुसलमान, महार, सारस्वत, प्रभू, सोनार, शिंपी, जिनगर, देवांग, सुतार, नाभिक अशा जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृह काढण्यास प्रोत्साहन दिले आणि मुबलक आर्थिक मदत केली. त्यांना जमिनी दिल्या, उत्पन्नाचे साधन दिले. त्या त्या समाजातील पुढार्यांनी ही वसतिगृह चालवावीत आणि समाजातील गुणवान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये यासाठी वसतिगृहाचे व्यवस्थापन समाजातील पुढार्यांच्याकडे दिले.
शिकलेल्या तरुणांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे नोकर्या मिळाव्यात म्हणून २६ जुलै १९०२ रोजी शिक्षणात मागासलेल्या समाजासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. कोल्हापूर विद्येचे माहेरघर आणि वसतिगृहांच्या सोयीमुळे मोठे शैक्षणिक केंद्र बनले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मागासलेल्या समाजाची अनेक मुले कोल्हापुरात शिक्षणासाठी जमा होऊ लागली आणि येथील वातावरणात वावरून समतावादी बनली. हे तरुण आपापल्या गावी परत गेले. तेथे त्यांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात शाळा, वसतिगृह शैक्षणिक केंद्र निर्माण केली. नाशिक, पुणे, खामगाव, धुळे, अमरावती अशा अनेक ठिकाणी वसतिगृहे आणि शिक्षण संस्था निघाल्या.
१९१८ साली कोल्हापूर संस्थानमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. मुलांना शाळेत न पाठवणार्या पालकांना दंड ठोठावला. अशा तर्हेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा केली. आजच्या राज्यकर्त्याप्रमाणे कायदे केवळ कागदावर ठेवले नाही. आपली धोरणे अमलात आणताना त्यांना अनंत अडचणी आल्या. एका अधिकार्याने त्याच्या हाताखाली नेमलेल्या ब्राह्मणेतर तरुणाबद्दल तक्रार केली. त्याला महिनाभर काहीच काम दिले नाही, त्याचा पगार कापला आणि काढून टाकण्यासाठी दरबारला पत्र दिले. यावरील महाराजांची प्रतिक्रिया वाखाणण्याजोगी आहे. महाराजांनी त्या अधिकार्याला खरमरीत पत्र लिहिले,”तुम्हाला हाताखाली दिलेल्या उमेदवाराकडून काम करून घेता येत नसेल तर तुमच्यावर कारवाई का करू नये? “हाताखालच्या ब्राह्मणेतर कर्मचार्याला त्रास देण्याचे धाडस पुन्हा त्या अधिकार्यांने केले नाही. सर्वांसाठी वसतिगृह काढून गुणवत्तेवर प्रवेश द्यावा, ही मागणी वरिष्ठ वर्गाची आणि वरिष्ठ वर्णाची नेहमीच असते. आपल्या मागणीला ते गुणवत्तेचा तात्विक मुलामा चढवतात. महाराजांचे अभ्यंकर नावाचे स्नेही त्यांच्याकडे अशा कृत्याबद्दल तक्रार करत होते. महाराजांनी त्यांना घोड्याच्या पागेत नेले. इथे लहान-मोठे तरुण वृद्ध घोडे होते. मध्ये असलेल्या मैदानात घोड्यांच्या चंदीचा ढीग ठेवण्यात आला. आणि सर्व घोड्यांना एकदम सोडण्याचा हुकूम महाराजांनी दिला. चारही बाजूला असणार्या पागामधून घोडे मध्याच्या दिशेने धावू लागले. तरुण आणि सशक्त घोडे पुढे आले त्यांनी चंदी फस्त केली. अशक्त, दुबळे, वृद्ध आणि लहान घोड्यांना काहीही मिळाले नाही. काही न सांगता अभ्यंकरांच्या लक्षात आले, सर्वांना जगवायचे असेल तर प्रत्येकाला खायला घालावे लागेल. जातवार वसतिगृहे आणि राखीव जागा आवश्यक आहेत. महाराजांनी विद्यापीठाची पदवी नसलेल्या बहुजन समाजातील काही वकिलांना कोल्हापूर संस्थानात वकिली करण्याच्या सनदा दिल्या. समाजाला आत्मविश्वास यावा यासाठी या सनदा दिल्या होत्या. त्यावर नेहमीप्रमाणे टीका झाली महाराज म्हणाले, “त्यांना वकिली करण्याची संधी दिली आहे! तुम्हाला त्यांचे वकीलपत्र घेण्याची सक्ती नाही. तुम्ही कशाला काळजी करता? “त्यांनी संस्थांनी कारकीर्दीत आणि संस्थांने खालसा झाल्यानंतरही कोल्हापूरच्या कोर्टात वकिली केली! आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यापैकी काही वकील विद्यापीठाच्या पदव्या घेतलेल्या वकिलांपेक्षाही चांगले होते, असो!. महारांजांचा हेतू स्पष्ट आहे.
गुणवत्तेचा बुरखा पांघरून बहुजन समाजातील गुणवान व्यक्तींची अवहेलना करणार्यांना महाराजांनी आपल्या कृतीतून ठोस प्रत्युत्तर दिले. बहुजन समाजाला पुढे आणण्यासाठी विविध कायदे केले त्याचेच प्रतिबिंब स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत उमटलेले आहे.
लेखक संपर्क : ९८५०७ ८२००१