‘अलक्षित’ विवेकवादी विदुषी : महाराणी चिमणाबाई

सुरक्षा घोंगडे -

८ मार्च, जागतिक महिलादिनानिमित्त विशेष लेख

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध अशा जवळजवळ शतकाचा कालखंड हा स्त्रीसुधारणा आणि स्त्रीसंघटन या दोन्ही दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, पण १९ व्या शतकात स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता करून उन्नती घडवून आणण्याविषयी जागृती झाल्याचे दिसते. १८४८ मध्ये पुण्यात भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांची पहिली शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. १९ व्या शतकात १८५० नंतरच्या उत्तरार्धात शिक्षणाच्या बरोबरीने स्त्रियांना सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सहभागी करून घेण्याची तत्कालीन समाजसुधारकांची विलक्षण धडपड होती. स्त्रियांसंदर्भात सामाजिक काम करणार्‍या स्त्रियांची पहिली पिढी यातून पुढे आली. सावित्रीबाईंनी यादृष्टीने पहिले पाऊल टाकले. महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी ‘महिला सेवा मंडळा’ची स्थापना केली. त्या अंतर्गत त्यांनी स्त्रीउद्धाराचे कार्य हाती घेतले. एकूणच, ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात आधुनिकीकरणाची प्रबोधन परंपरा निर्माण झाली. या परंपरेत भारतीय मानदंड निर्माण करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरण या क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने पुढे महाराणी चिमणाबाई यांनी स्त्रीउद्धाराचे कार्य हाती घेतले. मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करणार्‍या चिमणाबाईंनी बालविवाहाची रुढी बंद करण्याची मागणी केली होती.

भारतातील बहुतांश राजघराण्यातील स्त्रियांचे आयुष्य राजवाड्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. या बाबीला बडोदा संस्थान अपवाद होते. कारण सयाजीरावांनी आपल्या पत्नीला देशी शिक्षिकांबरोबरच विदेशी शिक्षिकांकडूनही शिक्षण दिले. १८८७ च्या पहिल्या परदेश वारीपासून सर्व २६ परदेश दौर्‍यांत चिमणाबाईंना आपल्यासोबत ठेवले. पहिली परदेशवारी करणार्‍या चिमणाबाई या भारतीय राजघराण्यातील बहुधा पहिल्या महिला असतील. या सगळ्याचा परिणाम म्हणून चिमणाबाई एक स्वतंत्र दृष्टी असणारे विवेकवादी, त्याचप्रमाणे बौद्धिकदृष्ट्या पूर्ण विकसित व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आल्या.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १८८१ मध्ये राज्याधिकार प्राप्त झाल्यापासूनच अस्पृश्य, आदिवासी आणि स्त्रिया यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समताधिष्ठित तत्त्वाने समाविष्ट करून घेण्याचे धोरण अवलंबिले. १८८२ मध्ये अस्पृश्य व आदिवासींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी केली. १८९३ मध्ये ७ ते १० वर्षेवयाच्या सर्व मुलींना शाळेत येणे सक्तीचे केले. १९०६ मध्ये संपूर्ण बडोदा संस्थानात सर्व जातीधर्मांच्या मुला-मुलींसाठी सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. याचा परिणाम म्हणून १९३३ मध्ये बडोदा संस्थानात ९० हजार विद्यार्थिनी शिकत होत्या. प्राथमिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या माध्यामिक, उच्च; तसेच परदेश शिक्षणासाठी सयाजीरावांनी भारतातील सर्वोत्तम काम उभे केले. याचा परिणाम म्हणून १९३५ मध्ये बडोदा कॉलेजमध्ये ४८ विद्यार्थिनी पदवी, तर ३५ विद्यार्थिनी पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत ८ महिलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवले. मुलींना शिक्षण देण्यासाठी स्त्रीशिक्षिका तयार करण्याच्या उद्देशाने १८८२ मध्ये ‘फिमेल ट्रेनिंग कॉलेज’ची स्थापना केली. १९०७ मध्ये महिला ग्रंथालयाची स्थापन करून महिला ग्रंथपालाची नेमणूक केली. संपूर्ण भारतातील हा पहिला प्रयोग होता. महिलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, यासाठी फिरती ग्रंथालये सुरू केली. शेकडो स्त्रीविषयक ग्रंथांची निर्मिती बडोद्यात झाली.

महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन यासाठीची धोरणे आणि संस्थात्मक कामांबरोबर महिलांसाठीचे अनेक कायदे भारतात सर्वप्रथम बडोद्यात झाले. यामध्ये १९०१ चा विधवा पुनर्विवाह कायदा, १९०४ चा बालविवाह प्रतिबंधक कायदा यांचा समावेश होतो. स्त्रियांच्या सर्वांगीण समतेसाठी सयाजीरावांनी भारतीय राज्य घटनेत चर्चा सुरू होण्याअगोदर ४५ वर्षेम्हणजेच १९०५ मध्ये सहा कायद्यांचा समावेश असणारे क्रांतिकारक ‘हिंदू कोड बिल’ बडोदा संस्थानात लागू केले. सयाजीरावांनी सत्यशोधकीय बाण्याने स्त्रियांच्या सर्वंकष प्रगतीसाठी केलेले कार्य भारतात सर्वोत्तम होते. बडोदा संस्थानाबरोबर संपूर्ण भारतातील स्त्रीविषयक कार्याला भरीव पाठबळ दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात बडोद्याच्या बाहेर स्त्रियांसाठीच्या कामाला सयाजीरावांनी केलेली मदत १०० कोटींच्या घरात जाते. या पार्श्वभूमीवर महाराणी चिमणाबाई यांचे स्त्रीविषयक कार्य आणि त्यांनी लिहिलेला आजअखेरचा अजोड आणि जागतिक कीर्तीचा ग्रंथ समजून घ्यावा लागेल.

विवाह, शिक्षण आणि वैचारिक जडणघडण

सयाजीराव महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी चिमणाबाईंचा ७ मे १८८५ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे इंदूरजवळील देवास येथील बाजीराव अमृतराव ऊर्फ मामासाहेब घाडगे यांच्या पाचव्या कन्या गजराबाई यांच्याशी महाराजांचा दुसरा विवाह झाला. गजराबाईंचा जन्म १६ नोव्हेंबर १८७१ रोजी परंपरावादी कुटुंबात झाला. वयाच्या १४ व्या वर्षी गजराबाईंचा (दुसर्‍या महाराणी चिमणाबाई) महाराजांशी २८ डिसेंबर १८८५ रोजी विवाह झाला. या महाराणीचे आधीचे नाव बदलून ‘चिमणाबाई दुसर्‍या’ असे नामकरण करण्यात आले. लग्नावेळी निरक्षर असणार्‍या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यात महाराजांचा सर्वाधिक वाटा होता. विवाहानंतर चिमणाबाईंनी घेतलेल्या शिक्षणामागे सयाजीराव महाराजांची प्रेरणा होती. परंपरावादी कुटुंबात वाढलेल्या चिमणाबाई विवाहानंतर आधुनिक जीवनप्रणालीचा स्वीकार करण्यास सुरुवातीला तयार नव्हत्या. परंतु महाराजांमुळे शक्य झालेले युरोपियन देशांचे दौरे आणि पाश्चात्य राजघराण्यातील जोडप्यांशी झालेले वैचारिक आदान-प्रदानामुळे चिमणाबाईंना स्त्रीशिक्षणाचे महत्त्व पटले.

१८८१ साली महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली, तेव्हाच आपल्या राज्याचे सुधारलेल्या आणि पुढारलेल्या राज्यात परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. स्त्रीशिक्षणाला आरंभ केला. सयाजीरावांनी महाराणींनाही शिक्षण देण्याचा निश्चय केला. सुरुवातीला महाराणींना शिकवण्यासाठी सगुणाबाई देव, नंदाबाई पितळे या दोन शिक्षिका होत्या. परंतु महाराणींच्या शिक्षणात फारशी प्रगती होत नसल्याने महाराजांनी १८९६ साली Miss Vivaseua या युरोपियन शिक्षिकेची प्रथम नियुक्ती केली. तेव्हापासून काही युरोपियन शिक्षिका महाराणींजवळ नोकरीत होत्या. मिस सोराबजी, मिस मिड, मिस जेफर्येस, मिस मक्कीन, मिस टोटनहम या शिक्षिका आणि सोबतकार महाराजांनी चिमणाबाईंना उपलब्ध करून दिल्या. परिणामी महाराणींच्या व्यक्तिमत्त्वात अपेक्षित बदल घडून आले. महाराणी चिमणाबाई अतिशय जिद्दी आणि कष्टाळू विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे त्या अल्पावधीतच मराठी, संस्कृत, इंग्रजी व गुजराती शिकल्या. युरोपातील अनेक चांगल्या चाली-रीतींचे अनुकरण केले. युरोपियन शिक्षिकांच्या प्रयत्नांनी व स्वतःच्या इच्छाशक्तीने त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारक बदल घडवून आणला. याठिकाणी महात्मा फुले यांचे सत्यशोधक अनुयायी म्हणून महाराजांनी बजावलेली विवेकवादी भूमिका अधोरेखित होते.

पडदा पद्धत

परदेश प्रवासावेळी महाराज त्यांच्यासमवेत चिमणाबाईंनाही घेऊन जात. परदेश प्रवास करताना महाराणी चिमणाबाई पडदा पद्धतीचा अवलंब करत नव्हत्या. पाश्चिमात्य स्त्रीइतक्याच मोकळेपणाने त्या परदेशात वावरत. स्त्रियांबद्दलच्या पारंपरिक धारणा आणि कल्पना दृढमूल असणार्‍या काळात महाराणी चिमणाबाईंनी पडदा पद्धतीचा त्याग केला. १९१४ पासून भारतातही पडदा पद्धतीचा त्याग केला. पडदा पद्धतीचा त्याग करणार्‍या चिमणाबाई या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. स्त्रीबाबतचा परंपरावादी दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा नाकारण्याची ही कृती परंपरेचा विवेकवादी विचार बौद्धिक तयारीनिशी करण्याच्या भूमिकेचा सूचक आहे.

स्त्रीपुरुष समानतेसाठी आग्रही

स्त्री-उन्नतीसाठीच्या विविध प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार्‍या महाराणी चिमणाबाई स्त्री-पुरुष समानतेसाठी विशेष आग्रही होत्या. सैनिकी खात्याच्या ‘कवायती फौजे’संदर्भातील सेक्शन ९५ नियमामध्ये राजघराण्यातील व्यक्ती व इतर सन्माननीय व्यक्तींना त्यांच्या श्रेणीनुसार विविध समारंभप्रसंगी द्यावयाच्या अंगरक्षकांची संख्या निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार महाराणी व युवराज यांना ३२ स्वारांचा मान देण्यात आला होता. परंतु समानतेच्या तत्त्वानुसार विविध समारंभांप्रसंगी महाराजांइतकेच अंगरक्षक आपल्याला मिळावेत, अशी मागणी करतानाच चिमणाबाईंनी अंगरक्षकांची ही संख्या कशाच्या आधारावर निश्चित करण्यात आली, याचीदेखील माहिती मागवली.

१९०४ मध्ये बडोद्याच्या दिवाणांनी मंजुरी दिलेल्या सैनिकी खात्याच्या टिपणात सर्वप्रथम अंगरक्षकांची ही संख्या निर्धारित करण्यात आली होती. पुढे, महाराजांच्या आदेशानुसार प्रकाशित झालेल्या ‘कवायती नियमां’त हीच संख्या कायम ठेवण्यात आली. महाराणी चिमणाबाईंची समान अंगरक्षकांची ही मागणी अमान्य करण्यात आली असली तरी यातून चिमणाबाईंचा स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह यातून स्पष्ट होतो. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटीश सरकारने पत्रात केलेल्या (विधवा) महाराणी या उल्लेखावर आक्षेप नोंदवत असा उल्लेख न करण्याची विनंती चिमणाबाईंनी केली होती. त्यांची ही मागणी ब्रिटीश सरकारकडून मान्य करण्यात आली.

ग्रंथमय’ महाराणी

महाराणी चिमणाबाईंमधील एक जिज्ञासू वाचक निर्माण होण्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. महाराजांसोबत केलेल्या जगप्रवासातून त्यांची दृष्टी अधिक विशाल झाली होती. महाराजा सयाजीराव यांचा वाचनाचा व्यासंग खूप मोठा होता. पुढे तोच गुण महाराणींनी घेतला. त्या निरनिराळ्या प्रदेशांतील साहित्य वाचू लागल्या. वैचारिक आणि गंभीर वाचन करण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांनी वाचलेली काही पुस्तके यादृष्टीने विचारात घेता येतील. ‘रेमिनिसन्स ऑफ लेडी डोरोथी नेव्हिल’, ‘सर्व्हिस बुक फॉर द वाइफ’, ‘रुलर्स ऑफ इंडिया’, ‘इंडिया अंडर हर्ष’, ‘द ड्युटीज ऑफ मॅन’, ‘द लॉस ऑफ मून’ अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे वाचन महाराणींनी केले होते. वाचन करत असताना त्या स्त्रीविषयक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असत. वाचनाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर इतका परिणाम झाला होता की त्या पुस्तकातील संदर्भ देऊन बोलत असत. महाराजांप्रमाणेच त्यांचेही ग्रंथालय समृद्ध होते.

अनेक विषयांवरील आणि भाषांमधील पुस्तके त्यांच्या ग्रंथालयात होती. ‘द ड्युटीज ऑफ मॅन’ या पुस्तकाचा चिमणाबाईंवर खूप प्रभाव होता. मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे हे पुस्तक होते. या पुस्तकाचा चिमणाबाईंवरचा प्रभाव पाहून महाराजांनी हे पुस्तक वाचण्यास घेतले. पुढे असे झाले की, या पुस्तकाची दुसरी प्रत मिळेपर्यंत दोघांनी हे पुस्तक दिवसाचा अर्धा-अर्धा वेळ विभागून वाचले. ही आठवण मिस टोटेनहॅम यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितली आहे. तसेच ‘इंडिया अंडर हर्ष’ या युआन चुंग यांच्या पुस्तकाच्या प्रभावामुळे राजा हर्षाची राणी राजश्री ज्याप्रमाणे हर्षाच्या मागे बसून यात्रेकरूंशी चर्चा करत असे, त्याप्रमाणे चिमणाबाईसुद्धा महाराजांशी संस्थानातील अनेक विषयांवर चर्चा करत होत्या. महाराणी नेहमी देशातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबाबत विचार करत होत्या. देशातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. स्त्रियांसंदर्भातील अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले होते.

महाराणींचा महाग्रंथ

भारतीय स्त्रियांच्या स्थितीचे जगातील ७ खंडांतील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करून १९११ मध्ये ‘The Position of Women in Indian Life’ हा ग्रंथ लिहिला आहे. महाराणी चिमणाबाई लिखित भारतीय स्त्रियांना अर्पण केलेला हा ग्रंथ लंडनमधून प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ म्हणजे सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च बिंदू होता. ३१ जुलै १९११ ला पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांत ही आवृत्ती संपली. दुसरी आवृत्ती ६ महिन्यांनी, म्हणजेच १ फेब्रुवारी १९१२ मध्ये प्रकाशित झाली. यावरून या ग्रंथाच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेची प्रचीती येते. लंडनमधील ‘फरगॉटन बुक्स’ने २०१५ मध्ये या ग्रंथाचे त्यांच्या Classical Reprint Series मध्ये पुनर्मुद्रण केले. ‘फरगॉटन बुक्स’चे वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ ग्रंथांचे कोणताही बदल न करता पुनर्मुद्रण करते. चिमणाबाईंच्या या पुस्तकाला ‘फरगॉटन बुक्स’ने Classical Reprint Series मध्ये निवडले आहे. यावरून या पुस्तकाचा ऐतिहासिक दर्जा लक्षात येतो.

जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहिलेला हा आजअखेरचा एकमेव ग्रंथ आहे. कारण ही तुलना करत असताना १०० संदर्भ ग्रंथांचा वापर केला आहे. या ग्रंथात चिमणाबाईंनी स्त्रियांसंबंधित ३६ व्यवसायांची व वेगवेगळ्या ३२ विषयांची चर्चा केली आहे. तसेच जगातील विविध देशांतील २३ कायद्यांचा, ९ अभ्यास समित्यांच्या अहवालाचा आणि २१ सामाजिक संघटनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व खंडांतील स्त्रियांच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करून हा ग्रंथ लिहिला आहे. अशा प्रकारची सर्व जगातील स्त्रियांची प्रत्यक्ष पाहणी करून या स्थितीची भारतातील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना या ग्रंथात केली आहे. अशा पद्धतीने जगात कोठेही चिमणाबाईंच्या अगोदर किंवा नंतर आजअखेर एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. म्हणूनच जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करता हा ग्रंथ एकमेवाद्वितीय ठरतो. या ग्रंथाचे लेखन चिमणाबाईंनी एस. एम. मित्रा या विद्वानाच्या सहकार्याने केले होते.

सार्वजनिक जीवनातून स्त्रियांना वगळले जाण्याची कारणमीमांसा करतानाच त्यावरील उपाययोजना कशाप्रकारे लागू करता येतील, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चिमणाबाईंनी या ग्रंथात केला आहे. भारतातील अनेक प्रगतशील योजनांच्या अपयशाचे मुख्य कारण या योजनांमधील स्त्रियांचा अत्यल्प सहभाग हे असल्याचे प्रतिपादन चिमणाबाईंनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन कल्याणकारी सामाजिक कार्य करण्याची इच्छा असणार्‍या स्त्रियांना उपयुक्त अनेक व्यावहारिक सूचना चिमणाबाईंनी या ग्रंथात केल्या आहेत. पडदा पद्धतीच्या परंपरावादी काळात स्त्रियांनी कृषी, कला, कारागिरी, लोकोपयोगी सेवाकामे, हॉटेल व्यवसाय इ. आर्थिक व्यवसायांशी परिचित होऊन त्यांचा स्वीकार करतानाच बौद्धिक क्षेत्रसुद्धा स्त्रियांनी आपलेसे केले पाहिजे, अशी इच्छा या ग्रंथाच्या माध्यमातून त्या व्यक्त करतात. जगातील ७ खंडांतील २९ देशांतील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करत स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी ३७ वर्षे भारतीय स्त्रियांच्या उत्कर्षाचा ‘मार्ग’ आखून देणार्‍या या एकमेव ग्रंथाचे नावही स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासकांना माहीत नाही, ही बाब धक्कादायक तर आहेच; परंतु आपल्या चर्चाविश्वाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

१८८२ साली ताराबाईंनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा स्फोटक निबंध लिहून स्त्रीशोषणाचा अध्याय लिहिला. त्यानंतर २७ वर्षांनी या ग्रंथाद्वारे चिमणाबाईंनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा महामार्ग आखला होता. आजच्या स्त्रीवादी साहित्याला आत्मचिंतनाकडून आत्मटीकेकडे घेऊन जात असताना पुरुषद्वेषाची बाधा होऊ न देता समतावादी आणि प्रत्येक कालखंडातील सुसंगत असा कृतिकार्यक्रम म्हणजे हा महाग्रंथ आहे. हे पुस्तक स्त्रियांसाठी बायबलसमान आहे. परंतु दुर्दैवाने स्त्रीमुक्ती चळवळीच्या इतिहासाने, इतिहास अभ्यासकांनी आणि महाराष्ट्राने आजअखेर महाराणी चिमणाबाईंची व त्यांच्या या ग्रंथाची दखल घेतली नाही. भारतात आणि महाराष्ट्रात बेदखल राहिलेल्या या ग्रंथावर इंग्लंड, अमेरिकेतील नियतकालिकांनी दिलेले अभिप्राय मात्र या ग्रंथाचे आंतरराष्ट्रीय स्थान अधोरेखित करणारे आहेत.

राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय मानसन्मान

सयाजीराव महाराजांच्या ‘वाटेने’ मार्गक्रमण करत स्त्री-उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ रोजी ब्रिटीश महाराणींनी ‘Emperial Order of the Crown of India’ या किताबाने सन्मानित केले. १९०६ मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या हिंदी औद्योगिक परिषदेतील महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून चिमणाबाईंची निवड करण्यात आली होती. याच अधिवेशनाच्या सर्वसाधारण विभागाचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. राजा आणि राणी पती-पत्नींना एकाच वेळी एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सन्मानाने मिळण्याचा भारतातील हा एकमेव प्रसंग असावा.

१९२६ मध्ये त्या ‘नॅशनल कौन्सिल फॉर वुमेन इन इंडिया’च्या अध्यक्ष झाल्या. पुढे महाराणींच्या स्वच्छ, स्पष्ट आणि अभ्यासू भूमिकेमुळे १९२७ ला पुण्यात भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले. ज्या काळात स्त्रियांबद्दलच्या पारंपरिक धारणा आणि कल्पना समाजात दृढमूल झाल्या होत्या, त्या काळात महाराणींनी अत्यंत आश्चर्यकारकरित्या मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. बालविवाहाची प्रथा नाहीशी करावी, याची जोरदार मागणी केली. या परिषदेमध्ये मिसेस कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महाराणी चिमणाबाईंच्या प्रगत दृष्टिकोनाची प्रशंसा करताना म्हटले, “पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड या होत्या. त्यांनी आणि महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला व त्यातही स्त्रियांचे लग्नाचे वय वाढवून यासंबंधी कायदेशीर सुधारणा सर्वांत लवकर व वेगाने केल्या. या त्यांच्या कार्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. त्यांचे पती महाराजा सयाजीराव हे सुधारणावादी राज्यकर्तेहोते आणि महाराणी त्यांना सर्वतोपरी योग्य अशा साथीदार होत्या. पडदा पद्धतीचा त्याग करणार्‍या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. स्वयंप्रेरणेने जगणार्‍या महाराणीचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली आहे.”

१९२९ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे ‘तौलनिक भाषाशास्त्र’ या विषयावरील भाषण बडोद्यातील सहविचारिणी सभेने आयोजित केले होते. या भाषणाचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचून महाराणी चिमणाबाईंनी विठ्ठल रामजी शिंदे यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी चिमणाबाईंनी ‘रशियातील कम्युनिझम’ या विषयावर आपल्याशी चर्चा केल्याचा संदर्भ शिंदे यांनी त्यांच्या ‘माझ्या आठवणी व अनुभव’ या आत्मचरित्रात नोंदवला आहे. ज्या काळात भारतात कम्युनिझम हा विषय नुकताच चर्चेत आला होता, त्या काळात एक मराठी राणी कम्युनिझमसारख्या गंभीर विषयांत रुची ठेवते, यातच महाराणी चिमणाबाई यांचे बौद्धिक क्षेत्रातील अनन्य स्थान स्पष्ट होते.

महाराणी चिमणाबाई यांच्या उत्तुंग बौद्धिक व्यक्तिमत्त्वाची साक्ष असणारा हा ग्रंथ सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाला तर भारतीय स्त्रीला आपली जीवनविषयक भूमिका निश्चित करण्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल. याबरोबरच जागतिक कर्तृत्व सिद्ध करूनही इतिहासात अदृश्य असणार्‍या या राणीच्या कर्तृत्वाला भारतीय इतिहासाने न्याय दिला, असे होईल. फक्त महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारताला भूषण असणार्‍या या महान राणीचा मृत्यू २३ ऑगस्ट १९६३ मध्ये झाला.

सुरक्षा घोंगडे, वारणानगर मो. ७५०७३९९०७२

(लेखिका महाराणी चिमणाबाई गायकवाड यांच्या

‘The Position of Women in Indian Life’ या ग्रंथाचा अनुवाद आणि संपादन करत आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]