केऊंझरमधील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक

राहुल थोरात -

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. महिलांवर समाजाने केलेल्या दुष्कर्मांची साक्ष देत हे स्मारक आजही उभे आहे.

चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या कुटुंबीयांचे अश्रू पुसणारे हे अनोखे आणि जगातील एकमेव स्मारक उभे केले आहे, ओरिसा पोलीस दलातील जय नारायण पंकज (आय.पी.एस.) या कल्पक आणि संवेदनशील पोलीस अधिकार्‍याने. (या स्मारकाबाबत आपण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल २०१९ च्या अंकात छोटी स्टोरी प्रसिद्ध केली होती.)

आमच्या ओरिसा दौर्‍यात या स्मारकाला भेट देण्याची आमची तीव्र इच्छा होती. तसेच हे स्मारक बनविणार्‍या जय नारायण पंकज या पोलीस अधिकार्‍याला भेटून त्यांची मुलाखत आम्हाला घ्यायची होती. इंटरनेटवरून माहिती काढल्यानंतर समजले की, जय नारायण पंकज हे सध्या ओरिसाचे सी.आय.डी.चे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम करतात. एवढ्या मोठ्या अधिकार्‍याची वेळ मिळविण्यासाठी आम्ही ‘अंनिस’चे हितचिंतक आणि राजकोंडा पोलीस कमिशनर महेश भागवत सरांशी संपर्क साधला. त्यांनी ओरिसामधील मराठी आय.पी.एस. अधिकारी नितीन कुसाळकर यांचा फोन नंबर दिला. त्यांना आम्ही फोन करून पंकज सरांच्या भेटीची वेळ मागितली. त्यांनी लगेच पंकज सरांशी बोलून आमची आणि त्यांची एक तासाची भेट घडवून आणली.

दि. १३ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता आम्ही भुवनेश्वरमधील ओरिसा पोलिसांच्या सी.आय.डी. ऑफीसला पोचलो. पंकज सरांनी अगोदरच आम्ही येणार आहोत, अशी पूर्वकल्पना त्यांच्या पी.ए.ना दिली होती. त्यांनी आमचे स्वागत करून आम्हाला गेस्टरूममध्ये बसविले. त्यावेळी एवढ्या मोठ्या अधिकार्‍यांशी बोलायचे म्हणून आम्हाला थोडे टेन्शन आले होते. पाचच मिनिटांत पंकज सरांनी आम्हाला आत बोलावले. प्रसन्न चेहर्‍याच्या ऑफिसरला पाहून आमचे टेन्शन थोडे कमी झाले. चेटकीण प्रथेविरोधात काम केल्याबद्दल आणि चेटकीण पीडितांचे अनोखे स्मारक उभे केल्याबद्दल सुरुवातीला आम्ही त्यांचे ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन करून मुलाखतीस सुरुवात केली…

प्रश्न:पंकज सर, सुरुवातीला आपल्याविषयी थोडे सांगाल का?

– मी बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मलो. लहानपणापासून चेटकीण प्रथेच्या कहाण्या ऐकत मोठा झालो. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे गावातील वेगवेगळ्या अंधश्रद्धा, रुढी-परंपरा जवळून पाहता आल्या.

२००५ मध्ये मी आय.पी.एस. झाल्यानंतर मला ओरिसा केडर मिळाले. ओरिसा राज्यातील रामगढा, कंधमाल या जिल्ह्यांत सुरुवातीच्या काळात मी काम केले. हे दोन जिल्हे आदिवासी आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. तेथेही चेटकिणीची प्रथा होती. पण माझ्याकडे नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्यामुळे चेटकीण प्रथेच्या कामाकडे पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अशातच माझी बदली केऊंझर या जिल्ह्याचा एस. पी. म्हणून झाली. हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. पण तेथे नक्षली प्रभाव कमी असल्याने मी चेटकीण प्रथेविरोधी कामाकडे अधिक लक्ष द्यायचे ठरविले.

ओरिसा राज्यात चेटकीण प्रथेचे स्वरूप काय आहे?

– राज्यातील ग्रामीण आदिवासी भागात आजही चेटकीण या कल्पनेवर विश्वास आहे. राज्यभरात दरमहा तीन ते चार घटना घडत असतात. चेटकीण बळीच्या हत्येमध्ये देशात ओरिसाचा दुसरा क्रमांक लागतो, हे खेदाने सांगावे वाटते. याची दखल घेऊनच ओरिसा सरकारने सन २०१३ ला राज्यात चेटकीण हत्या प्रतिबंधक कायदा केला आहे. ओरिसामध्ये पुरुषांनाही चेटकीण ठरवले जाते, हे इथले वेगळेपण आहे.

कोणत्या कारणाने चेटकीण म्हणून हत्या होतात?

– आजही आदिवासी भागात शिक्षण आणि आरोग्य सेवांची कमतरता आहे. मलेरिया आणि डायरिया हे रोग येथे मोठ्या प्रमाणात होतात. घरातील मूल आजारी पडले, गाय आजारी पडली तर आदिवासी लोक ‘गुनिया’ (देवऋषी) कडे घेऊन जातात. हे गुनिया लोक आदिवासींना सांकेतिक माहिती देऊन एखाद्या महिलेचे वर्णन सांगतात आणि हीच चेटकीण (आदिवासी भाषेत ‘दहिनी’) आहे, असे समजून त्या निरपराध महिलेची हत्या करतात. एखादा मुलगा कुपोषणाने आजारी पडून गेला, तर तो चेटकीण करणार्‍या महिलेने टोणाटोटका करून मारला, असे मानले जाते. केवळ संशयावरून आणि अंधश्रद्धेतून अशा हत्या घडत आहेत.

आदिवासी लोकं चेटकीण हत्येचा गुन्हा केल्यावर पळूनही जात नाहीत. ते सरळ गुन्हा कबूल करतात. ‘माझ्या मुलाला ती खाणार होती, माझ्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मी तिला मारले,’ असा सरळ कबुलीजबाब ते पोलिसांना देतात. खरेतर हे आरोपीही या अघोरी प्रथेचे एक प्रकारचे बळीच आहेत. हे आरोपी ही अशा प्रकारच्या भ्रमाने, अंधश्रध्देने ग्रासलेले असतात.

केऊंझर जिल्ह्यात चेटकीण प्रथेचे स्वरूप कसे होते?

– मी केऊंझर जिल्ह्याचा पोलीस प्रमुख असताना चेटकिणीच्या दरमहा चार-पाच केसेस दाखल होत असत. केऊंझर हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्यात पहाडी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे आजही आदिवासी लोक पहाडी एरियामध्ये राहतात.

२०१५ मध्ये केऊंझर जिल्ह्यातील लहांडा या आदिवासी पाड्यावर चेटकिणीच्या संशयाने एकाच कुटुंबातील सहा जणांना ठार केले गेले. तेव्हा या प्रथेचे क्रूर स्वरूप जगासमोर आले. हे हत्याकांड त्या वेळी खूप गाजले. लहांडा हत्याकांडानंतर ओरिसा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा सर्वत्र राबवण्याचा निश्चय केला.

या कामाला सुरुवात कशी केलीत?

– ओरिसा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा २०१३ मध्ये पास केला. या कायद्याचा मला माझ्या या कामात मोठा आधार होणार होता. मी माझ्या जिल्ह्यातील चेटकीण कुप्रथेच्या बळी पडलेल्या केसेसचा डाटा एकत्र केला. तेव्हा मला त्यातील भयानक दाहकता दिसली. गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त निरपराध लोक या कुप्रथेला बळी पडले आहेत. हा चेटकीण प्रतिबंधक कायदा आदिवासी भागात पोचला नव्हता. शहरी भागात याची थोडीफार माहिती होती.

या कायद्याचा प्रचार करण्यासाठी तुम्ही जे प्रबोधन अभियान राबविले, त्याविषयी आम्हाला सांगा.

– मी केऊंझर जिल्ह्यात चेटकीण प्रतिबंधक कायद्याचा प्रचार/प्रसार करण्याचे ठरविले. यासाठी एक व्हॅन भाड्याने घेऊन तिला पोस्टरने सजवले, त्यावर कायद्याची कलमे लिहिली. पोलिसांचा एक फोन नंबर जाहीर केला. ही चित्ररुपी व्हॅन जिल्ह्यातील पहाडी आदिवासी भागात जात असे. चेटकीण प्रथेविरोधात पत्रके वाटत असे. मोठ्या गावातील आठवडे बाजारात आमचे पोलीस अधिकारी ही व्हॅन घेऊन उभे राहत आणि चेटकीण प्रथेविरोधात प्रचार करत. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून या नव्या कायद्याची माहिती पोलीस देत असत. (आपल्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याबाबत असेच घडायला हवे, अशी पटकन इच्छा आमच्या मनात आली.)

या प्रबोधन अभियानाचा काय उपयोग झाला?

– दुर्गम भागात चेटकीण हत्येची केस घडली, तर ती खबर पोलिसांपर्यंत येत नसे. कारण संपूर्ण गाव एका बाजूला असायचे; मग खबर देणार कोण? या अभियानानंतर चेटकीण प्रथेविरोधात लोकांचे प्रबोधन होऊन चेटकीण हत्येच्या केसेस पोलिसांपर्यंत यायला लागल्या. आम्ही त्यावर लगेच कारवाई करत असू. पोलीस त्या गावात मीटिंग घेऊन चेटकीण कुप्रथेविरोधी प्रबोधन करीत. आमच्या या अभियानामुळे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढले. खून, मारामारी, चोरी या नेहमी घडणार्‍या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस गुंतल्यामुळे त्यांची चेटकीण हत्येच्या गुन्ह्याबाबत प्राथमिकता नसायची. या अभियानामुळे पोलिसांचाही या गुन्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

चेटकीण प्रथेच्या पीडितांचे हे अभिनव स्मारक उभे करण्याची कल्पना कशी सुचली?

– माझ्या हे लक्षात आले की, एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा चेटकिणीच्या संशयावरून खून होतो, तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबाकडे संशयाने बघितले जाते. चेटकिणीचे कुटुंब म्हणून त्यांची समाजात हेटाळणी केली जाते. अगोदरच खोट्या आरोपातून हत्या आणि वरून समाजाकडून होणारी निंदा-नालस्ती यामुळे हे कुटुंब सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत होते. या कुटुंबीयांना आपण आधार देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला नेहमी वाटायचे. अशा कुटुंबांना समाजाकडून मान-सन्मान मिळाला पाहिजे, समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी निकोप झाली पाहिजे, असे मला मनोमन वाटते. त्यातूनच मला एके दिवशी या पीडितांचेच स्मारक उभारण्याची कल्पना सुचली. जगामध्ये अनेक नेत्यांची स्मारके असतात; पण गरीब, पीडित, अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या निरपराध लोकांचे कोणीच स्मारक उभे करत नाहीत. आपण हे काम ओरिसा पोलिसांच्या वतीने करायचे, असे ठरवून कामाला लागलो.

अनोख्या स्मारकाचे स्वरूप काय आहे?

– आमच्या केऊंझर मुख्यालयाच्या परिसरामध्येच हे स्मारक उभे केले. स्थानिक कलाकाराकडून आदिवासी महिलेचे एक सात फुटी दगडी शिल्प बनवून घेतले. या शिल्पातील महिलेच्या चेहर्‍यावरचे भाव हे ‘माझ्याकडे चेटकीण म्हणून पाहू नका, तर एक शालीन स्त्री म्हणून पाहा’ असे आहेत. हे दगडी शिल्प चेटकीण कुप्रथेत बळी पडलेल्या समस्त स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. या स्मारकाच्या भोवती मार्बल दगडावर केऊंझर जिल्ह्यातील चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या सर्व स्त्री-पुरुषांची नावे कोरून मरणोत्तर त्यांना आम्ही सन्मानित केले आहे.

समाजात असणार्‍या कुप्रथेमुळे बळी पडलेल्या स्त्री-पुरुषांचे हे जगातील पहिले स्मारक असावे, या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन डी. आय. जी. शर्मा साहेब यांच्या हस्ते आणि या जिल्ह्याचे मराठी जिल्हाधिकारी आशिष ठाकरे सर यांच्या उपस्थितीत केले. उद्घाटनानंतर सर्व पोलीस अधिकार्‍यांनी पीडित कुटुंबीयांसोबत सहभोजन केले. या सहभोजनाने सामाजिक बहिष्कार टाकलेली पीडित कुटुंबे भारावून गेली. या स्मारकाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. इंग्रजी वर्तमानपत्राने याच्या बातम्या केल्या. ओरिसा पोलिसांच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले.

हे अभिनव स्मारक साकारल्यानंतर आज तुमची काय भावना आहे?

– चेटकीण कुप्रथेच्या बळी पडलेल्या कुटुंबांचे थोडे तरी दु:ख या स्मारकामुळे कमी झाले, तर माझे हे काम सत्कारणी लागेल. समाजाने या कुप्रथेकडे बघण्याची दृष्टी बदलली, तर ती माझ्या कामाची पोचपावती असेल; आणि सर्वांत महत्त्वाचे गरीब, आदिवासींच्या जीवनातून ही दुष्ट अमानवी चेटकीण प्रथा ज्या दिवशी हद्दपार होईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावयास हवा.

***

ओरिसाचे सी.आय.डी.चे महासंचालक असणार्‍या जय नारायण पंकज या संवेदनशील आणि कल्पक अधिकार्‍याशी गप्पा मारताना एक तास कसा गेला, हे समजले नाही. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे काम एक शासकीय अधिकारी आपल्या अधिकारातून कसे करू शकतो, याचे पंकज सर हे आदर्श उदाहरण आहेत. प्रशासकीय कामासोबत असे समाजसेवी काम प्रत्येक अधिकार्‍याने केले, तर सामाजिक बदलाचा वेग नक्की वाढेल. पंकज सरांचे आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करून केऊंझर जिल्ह्यातील या स्मारकाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लगेच याबाबत केऊंझरचे एस. पी. मित्रभानू मोहपात्रा यांना फोन करून आम्हास सहकार्य करण्यास सांगितले.

***

केऊंझर दौरा

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही पुरी-बारबिल एक्सप्रेसने पाच तास प्रवास करून केंऊझरला पोचलो. केंऊझर जिल्हा पोलीस मुख्यालयात जाऊन तेथे जिल्ह्याचे पोलीसप्रमुख मित्रभानू मोहपात्रा (IPS) यांची भेट घेतली. त्यांना पोलीस महासंचालक जय नारायण पंकज यांनी फोन करून आम्ही येणार आहोत, ही कल्पना दिली होतीच. त्यांना आमच्या दौर्‍याचे प्रयोजन सांगितले. त्यांनी लगेच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख बिरांची प्रसाद देहुरी यांना बोलावले आणि आमचा परिचय करून दिला.

आम्ही त्यांना एका चेटकीण कुप्रथापीडित कुटुंबाची भेट घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याला होकार दिला. मुख्यालयातील चेटकीण केसेसच्या फाईल शोधून दोन कुटुंबांची भेट घेऊ शकता, असे सांगितले. ‘पण त्यांची घरे येथून ७५ किलोमीटर दूर पहाडी जंगल एरियामध्ये आहेत, तेथे तुम्ही जाल का?’ विचारले, तेव्हा आम्ही लगेच आनंदाने होकार दिला. त्याअगोदर स्वतः बिरांची साहेबांनी आम्हाला चेटकीण पीडितांचे ‘ते’ स्मारक फिरवून दाखवले. त्यांची सविस्तर माहिती दिली.

आदिवासी भागात प्रवास

त्यानंतर बिरांची साहेबांनी पटापट फोनाफोनी केली. तिथून जवळजवळ ७५ किलोमीटरवरील जंगलपट्टीत ‘बारबिल जोडा’ या आदिवासी भागात आमचा दौरा आयोजित केला. आमच्या प्रवासासाठी सोबत आम्हाला पोलीस जीप दिली. चालक कीर्तन आम्हाला न्यायला आला. आम्हाला डाकीणपीडित कुटुंबीयांना भेटायचे होते. केंऊझरहून दुपारी तीनला निघालो. इकडचे रस्ते चारपदरी असो की दुपदरी; फक्त सिमेंट काँक्रीटने बनवलेले. दोन तासांच्या प्रवासात रस्त्यावर चुकून एखादी कार किंवा मोटारसायकल दिसायची; बाकी फक्त खनिजमाती वाहून नेणारे मोठमोठे ट्रक आणि डंपरच दिसत. जणू सगळे रस्ते केवळ खाणमालकांसाठी आहेत की काय, असं वाटावे.

चेटकीण पीडित कुटुंबाची भेट

दुपारी साडेचार वाजता बारबिल पोलीस बीटवर पोेचलो. आम्ही येणार आहोत, हा निरोप त्यांना एसपी ऑफिसमधून अगोदर मिळाला होता. त्यामुळे एएसआय भागबत, एएसआय नायक आणि पोलिस शिपाई खिरोट जेना यांनी जंगलात राहणार्‍या चेटकीण कुप्रथा पीडित कुटुंबातील सदस्य असणार्‍या रामदेव मुंडा आणि शिबा मुंडा या दोन चुलत भावांना बोलावून आणलेले होते. दोघेही भाऊ रेल्वे लाईनवर मोलमजुरी करणारे. त्यांना हिंदी समजत नव्हते, त्या वेळी आदिवासी भाषेचे भाषांतर हिंदीमध्ये करून द्यायला एएसआय नायक सोबत होतेच.

शिबा मुंडाची आई बुधुनी. साठी पार केलेली आदिवासी समाजातील एक गरीब स्त्री. २०२० मध्येे; म्हणजे दोन वर्षांपूर्वी तापाने फणफणली होती. या बारबिल जंगलपट्टीत कोणत्याही आजारावर गावठी उपचार केले जातात. आजार मोठा असेल तर गुणिया (भगत) यांच्याकडे घेऊन जातात. बुधुनीचा ताप सतत कमी-जास्त व्हायचा. या दुर्गम भागातील आदिवासी असो अथवा मैदानी प्रदेश लोक; आजारी पडण्याचे कारण म्हणजे दहिनी (चेटकीण) चा प्रताप आहे, यावर त्यांचा आजही हा ठाम विश्वास आहे. कोणीतरी ‘दहिनी’ तिच्या काळ्या शक्तीचा वापर करून आपल्याला आजारी पाडते, हे डोक्यात पक्के बसलेले. बुधुनीचा भ्रम असा झाला की, शेजारच्या २० वर्षांच्या तरुण विवाहित सविताने तिच्यावर काहीतरी जादूटोणा केला असणार! त्या संशयाने बुधुनी सतत सविताला ‘दहिनी’ म्हणून चिडवायची! त्यामुळे आदिवासी पाड्यात बदनामी होऊ लागल्याने सविताला वाटले की, खरेच आपल्याला ‘दहिनी’ समजून एक दिवस बुधुनी आपल्याला मारून टाकेल. तिने उलटा गेम करायचे ठरवले. एक दिवस जंगलात गुंजा गोळा करण्याचे निमित्त करून बुधुनीला ती पाड्यापासून दूर एका डोंगरावर जंगलात घेऊन गेली. सोबत बुधुनीची नातवंडे होती. जंगलात गेल्यावर दोन्ही नातवंडांना सविताने खाली पाड्यावर पाणी आणायला पाठवले. मुले गेल्यावर बुधुनीवर लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला करून तिला ठार केले. तिचा मृतदेह जंगलात फरफटत नेत अर्धवट जाळून टाकला. मुले परत जंगलात आली तर दोघी गायब! शोध, हाका मारणं झालं; पण उत्तर आलं नाही. मुलांना वाटलं, आजी दुसर्‍या वाटेने घरी गेली असेल. घरी शोध झाला. तोवर रात्र झाली. बुधुनींच्या मुलांना वाटले की, आपली आई शेजारच्या पाड्यावर नातेवाईकांकडे मुक्कामाला गेली असेल. सकाळी पुन्हा शोध घेतल्यावर जंगलात तिचा जळून खाक झालेला, फक्त पाय बाकी असलेला मृत भाग दिसला. पोलिसांत केस झाली. सवितावर गुन्हा दाखल झाला. तिला अटक झाली. कोर्टात केस सुरू असतानाच सविताने जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. केवळ चेटकीण संशयाने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

चेटकीण हत्याकांड घटनास्थळी भेट

शिबा मुंडाची ही कर्मकहाणी ऐकता-ऐकता अंधार पडू लागला होता. आम्ही शिबा मुंडा राहत असलेल्या लाहांडा या आदिवासी पाड्यावर भेट द्यायची ठरवले. कारण याच पाड्यावर २०१५ मध्ये देशातील सर्वांत भयंकर चेटकीण हत्याकांड घडले होते. चेटकीण समजून एकाच कुटुंबातील सहाजणांना कुर्‍हाडीने घाव घालून ठार केले होते, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. आमच्या सोबत एएसआय नायक होते. पाऊस उतरला होता. आमच्या दोन्ही जीप जंगल पायथ्याला ठेवून आम्ही जंगलातील पाऊलवाटेने पायी लाहांडा पाड्यावर पोचलो. ज्या घरामध्ये हे हत्याकांड झाले होते, त्याची पाहणी केली. ज्या सहा जणांची ‘दहिनी’ समजून हत्या केली, त्या कुटुंबाचे नातेवाईक शेजारीच राहणारे. शेजारी राहणार्‍या त्या नातेवाईकांनी या मुंडा कुटुंबावर रात्री जोरदार हल्ला केला. यात मृत गौरा मुंडा (३५ वर्षे) त्याची पत्नी बुधुनी मुंडा(३० वर्षे), मुलगा सुनील (१६), आणि खुश नाथ (१०) मुलगी शांभरी (१२) आणि चिमुकली नमिता; जी केवळ ३ वर्षाची होती. त्यांनाही ठार केले गेले; तर गंभीर जखमी झालेले गणित मुंडा (१६) व शंभू मुंडा(९) हे वाचले.

इतक्या भयानक गुन्ह्याचे कारण काय, तर पाड्यावर नवजात बालके वारंवार आजारी पडतात. आजार लवकर बरा होत नाही, याला कारण हे मुंडा कुटुंब असावे, हा संशय लोकांना आला आणि त्यांनी या संपूर्ण कुटुंबाला संपवले. ही केस राज्यभर गाजली, त्यानंतर हायकोर्टाने ओरिसा सरकारला चेटकीण प्रतिबंधक कायदा करण्याचा आदेश दिला. या लहांडा प्रकरणी ९ जणांना अटक झाली. २०१५ पासून जेलमध्येच आहेत.

पोलिसांशी संवाद

या गुन्ह्याची नोंद ज्या जोडा पोलीस ठाण्यात झाली, तिथेही आम्ही या केसची एफआयआर पाहण्यास गेलो. एफआयआरची प्रत तेथील पोलीस अधिकारी श्री. पासायत यांनी दिली. तिथले सध्याचे अधिकारी नुकतेच मयूरभंज जिल्ह्यातून बदली होऊन आलेले होते. त्यांनीही ‘दहिनी’च्या अनेक केसेस हाताळल्या होत्या. ते सांगू लागले, “एका महिलेला दहिनी म्हणून तिच्या शरीराचे तुकडे करून तळ्यात टाकले होते.” ती केस सोडवली होती. आणखी एका केसमध्ये रायरापूर येथे एका भावाच्या स्वप्नात सतत साप यायचे. घाबरून तो मारांग गुरू (देवऋषी-भगत) कडे गेला. भगत त्याला म्हणाला, “तुझ्या बहिणीकडून तुझ्या जीवाला धोका आहे. ती दहिनी आहे, तुला ती खाणार!” असे सांगितले. केवळ चेटकीण संशयावरून भावाने सख्ख्या बहिणीचे मुंडके कुर्‍हाडीने उडवले. किती अमानुष आणि भयानक परिस्थिती आहे? कायदा आहे; पण कागदावर! जंगलात जाऊन आदिवासी बांधवांना कोण समजावून सांगणार? ना लोकचळवळ! (आहेत त्या क्षीण स्वरूपात!) ना सरकारी यंत्रणा!’

“लोक दहिनीच्या अफवा का पसरवतात? हा गैरसमज अद्याप ही का दूर होत नाही,” असे आम्ही पोलीस निरीक्षकांना विचारले असता ते सांगायला लागले, “येथील आदिवासी समाज आजही मूळ शिक्षण प्रवाहात आलेला नाही. त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था यांनी मिळून सातत्याने प्रबोधन करण्याची गरज आहे. आदिवासी बांधव आजही कोणत्याही आजारावर स्थानिक गुनियाकडून उपचार करवून घेतात. एकंदरच, ओडिया आदिवासी समाजात काळी जादू करून कोणीतरी आजारी पाडू शकते, यावर जनमानसात विश्वास अधिक आहे. जंगलपट्टीत तो जास्त आहे. दहिनीचा आरोप नागरी समाजातही लावला जातो. अशा केसेस आमच्याकडे नोंद आहेत,” असे जोडा पोलीस स्टेशनचे अधिकारी सांगत होते. मागच्या महिन्यातच शहराजवळ एकाने दहिनी समजून शेजारीच राहणार्‍या माणसावर वार केले. तो बिचारा वाचला, पण हाताचा अंगठा मात्र गेला.

पोलीस मात्र या नव्या कायद्याची माहिती लोकांना देण्यासाठी तत्पर असलेले दिसले. सायंकाळी आठ वाजता केंऊझरला परत आलो. एस. पी. मोहपात्रा सरांना व बिरांची प्रसाद देहुरी साहेबांचे आभार मानण्यासाठी गेलो. त्यावेळी एस. पी. मोहपात्रा सरांनी आम्हाला जिल्ह्यातील चेटकीण हत्येच्या केसेससंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, २०१८ ते आजपर्यंत (२०२२) जिल्ह्यात चेटकीण प्रकरणाच्या ५२ केसेस पोलिसांत नोंद झाल्या आहेत. यावरून आपल्याला या प्रश्नाचे गांभीर्य समजते.

आपल्या प्रत्येक समस्येचे कारण आपण न शोधता त्याचा ठपका कोणावर तरी ठेवायचा हा इथला प्रघात. कधी-कधी एखाद्याचे दुखणे गुनियाच्या उपचाराने किंवा उपायाने बरे झाले नाही, तर त्या गुनियालाच मारून टाकण्याचे प्रकारही इथे घडतात. हे प्रकार केवळ आदिवासी भागात घडत नाहीत, तर शिकलेले लोकही यावर विश्वास ठेवतात. शहरी वस्तीतही चेटकीण ठरवून जखमी केल्याचे किंवा हत्या झाल्याचे गुन्हे इथे नोंदले गेलेत. एकूण काय, लोकशिक्षण, कायदा प्रबोधन याची प्रकर्षाने जरुरी आहे; पाड्यात, गावात आणि शहरातही.

चेटकीण शोधण्याचे अघोरी आणि चमत्कारी प्रकार

एखाद्या महिलेला ती चेटकीण (दहिनी) आहे, हे कसे ठरवतात, हे जाणून घेण्याची आमची इच्छा होती. याबाबत या प्रश्नावर काम केलेले ओरिसा रॅशनेलिस्ट सोसायटीचे राज्य सेक्रेटरी देबेंद्र सुतार यांना आम्ही कटक भेटीत विचारले. तेव्हा त्यांनी खूपच मजेशीर; तरीही भयानक असे ५ प्रकार सांगितले, जे चेटकीण ठरविण्यासाठी गुनिया लोक (देवऋषी) वापरतात.

एका प्रकारात गुनिया चारजणांना एखादी खाट (बाजले) गावात वाजत-गाजत नाचवत घेऊन जाण्यास सांगतो. अचानक कुणाच्या तरी घरासमोर ती खाट थांबून राहते किंवा खाली पडते किंवा ठेवली जाते. तेव्हा त्या घरातील बाई अथवा पुरुष चेटकीण ठरवला जातो.

दुसरा प्रकार आणखी भयानक. संशयित व्यक्तीला गरम तेलाच्या कढईत नाणे टाकून बाहेर काढण्यास सांगतात. हात भाजले की ‘दहिनी’ म्हणून शिक्का पक्का. तिसर्‍या एका प्रकारात गव्हाच्या कणकीचे गोळे करून ते संशयित व्यक्तीला पाण्यात टाकायला सांगतात. जिचा गोळा बुडेल ती दहिनी. हा एक हातचलाखीचा प्रयोग असतो. कार्यकर्त्यांनी काही तरंगणारे गोळे तपासले, तर त्यात थर्माकोल लपवलेले आढळले.

चौथा प्रकार तर फुल्ल चमत्कारी. यामध्ये पायाला ओली हळद लावलेल्या संशयित बायकांना सफेद कापडावर हळूहळू एक-एक पाऊल टाकत चालायला लावायचे. ज्या बाईचे पाऊल कापडावर पिवळ्याऐवजी लाल उमटले की ती चेटकीण! कोणत्या महिलेचे लाल पाऊल उमटायचे की नाही, हे तो गुनिया ठरवतो. संशयित व्यक्ती कापडावरून चालण्याअगोदर ते कापड नकळत चुन्याच्या पाण्यात बुडवले की काम फत्ते!

पाचव्या प्रकारात गुनिया नखाला अंजन (काजळ लावून) त्यात दहिनी कोण? हे पाहतो. ही दहिनी फक्त गुनियालाच दिसते म्हणे! खरे तर कोणाला चेटकीण ठरवायचे, हे गुनिया अगोदरच ठरवतो. गावातील निराधार व्यक्ती, विधवा, तरुण महिला या त्याचे ‘टार्गेट’ असतात.

ओडिशाचा चेटकीण हत्या प्रतिबंध कायदा काय आहे?

महिलेला चेटकीण ठरवून तिचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक शोषण करणार्‍या कुप्रथेचा प्रारंभ युरोपमध्ये झाला. सुरुवातीच्या काळात युरोपमध्ये चर्चच्या विरोधात असलेल्या स्त्रीला चेटकीण मानले जात असे. नंतरच्या काळात दुष्काळ, पूर आणि कोणत्याही अप्रिय घटनेसाठी, साथीच्या आजारांसाठी चेटकीण महिलांना जबाबदार ठरवण्यात येऊ लागले.

बळी पडलेल्या स्त्रिया

ह्युमन राईट्स कमिशनच्या अहवालानुसार जगभरात मागील पंधरा वर्षांत २५०० महिलांची चेटकीण म्हणून हत्या करण्यात आली. देशात महाराष्ट्र, झारखंड, बिहार, हरियाणा, गुजरात, ओरिसा, छत्तीसगड, गुजरात, बंगाल या राज्यात महिलांना चेटकीण ठरविण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात सामान्यपणे विधवा, अनाथ, वृध्द, तथाकथित खालच्या जातीतील महिलांना त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी किंवा त्यांचे लैंगिक शोषण करण्यासाठी चेटकीण ठरवले जाते. कधी-कधी गावातील राजकारणामुळे देखील चेटकीण ठरवले जाते.

ओरिसाचा चेटकीण प्रथा विरोधी कायदा

चेटकीण कुप्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी ओरिसा राज्याने २०१४ मध्ये The Odisha Prevention of Witch-hunting Act, २०१३ मंजूर केला. या कायद्याने चेटकीण प्रथेला दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवले आहे.

विधानसभेत काय घडले?

ओरिसामध्ये २०१०, २०११, २०१२ या तीन वर्षांत चेटकीण ठरवलेल्या १०५ महिलांची हत्या करण्यात आली, अशी माहिती ओरिसाचे तत्कालीन संसदीय मंत्री कल्पतरू दास यांनी विधेयक मांडताना दिली. तसेच त्यांनी ओरिसा हे चेटकीणविरोधी कायदा करणारे देशातील चौथे राज्य आहे; यापूर्वी बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांनी चेटकीणविरोधी कायदा केल्याची माहिती दिली. हा कायदा पारित करण्याआधी चेटकीण प्रथा प्रतिबंधासाठी कायदा करावा, असे निर्देश ओरिसा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. विधानसभेत चार तास चर्चा करून हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी :

१. जो कोणी कोणत्याही स्त्रीला चेटकीण म्हणून बळजबरी करतो, तिला कोणताही अप्रिय पदार्थ पिण्यास किंवा खायला लावतो किंवा तिचा चेहरा किंवा शरीर रंगवतो किंवा मानवी प्रतिष्ठेला अपमानास्पद, असे कोणतेही कृत्य करतो किंवा तिच्या घरातून हाकलतो, त्याला एक ते पाच वर्षांपर्यंतचा कारावास किंवा कारावासासह दंडाची शिक्षा आहे.

२.जो कोणी वर उल्लेखलेले कृत्य करण्यास प्रवृत्त करतो, त्यास एक ते तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा कारावासासह १००० रुपयापर्यंतचा दंड ही शिक्षा आहे.

३. ज्या व्यक्तीने दुसर्‍यांदा हा गुन्हा केला असेल त्यास तीन ते पाच वर्षांपर्यंतचा कारावास किंवा कारावासासह १० हजार रुपयांहून अधिक दंड आकारला जातो.

४. जेव्हा न्यायालय या कायद्यांंतर्गत गुन्हेगाराला शिक्षा देईल, तेव्हा शोषित महिलेचे झालेले शारीरिक-मानसिक-आर्थिक शोषण व ते भरून काढण्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम याचा न्यायालय विचार करेल.

५. दंडाची पूर्ण किंवा काही रक्कम शोषित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते.

६. राज्य सरकारला यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सामाजिक जनजागृती कार्यक्रम राबवण्याचा अधिकार आहे.

पुरुष चेटकीण केसमध्ये हा कायदा उपयोगी नाही

या कायद्यानुसार महिलेवर चेटकीण आरोप केला तर गुन्हा दाखल होतो, पण पुरुषावरही ओरिसामध्ये चेटकीण म्हणून आरोप लावला जातो, तेव्हा पुरुषांच्या चेटकीण केसमध्ये या कायद्याचा वापर करता येत नाही, असे तेथील काही पोलीस अधिकारी आणि विवेकवादी कार्यकर्त्यांनी सांगितले. कायद्यामध्ये सरकारने ही दुरुस्ती करावी, ही मागणी होतेय.

केंद्रीय स्तरावर कायद्याची गरज

देशात ओरिसा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांनी चेटकीण प्रथेला प्रतिबंध घालणारे कायदे लागू केले आहेत. मात्र या कुप्रथेमुळे होणारे महिलांचे शोषण पाहता, केंद्रीय स्तरावर भारतीय दंड संहितेत या गुन्हांचा समावेश करण्याची किंवा स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे.

लेखक संपर्क:

राहुल थोरात मो. ९४२२४ ११८६२

अण्णा कडलास्कर मो.९२७०० २०६२१

भूत दाखवा आणि ५० हजार इनाम मिळवा!’ ओरिसामधील मराठी जिल्हाधिकार्‍यांचे आव्हान!

घटना ऑक्टोबर २०१९ ची. ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यातील ग्रामीण जनतेत भूत, जादूटोणा, डाकीण यावर प्रचंड विश्वास. गंजम जिल्ह्यातील काही लोकांनी भुताची अफवा पसरवली. यावरून गोपापूर गावात जादूटोणा करण्याच्या संशयावरून ६ लोकांचे चक्क दात तोडण्यात आले! भुताच्या भीतीने लोक गावातून पलायन करायला लागले. या गंजाम जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे मा. विजय अमृतराव कुलंगे (जे मूळचे महाराष्ट्रातील नगरचे आहेत) यांनी संपूर्ण जिल्ह्यात अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करण्यासाठी प्रबोधन मोहीम राबवली. यावर बोलायला स्वतः शाळा-महाविद्यालयात जायचे. लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी “भूत दाखवणार्‍या व्यक्तीला ५० हजार इनाम!” असे जाहीर आव्हान दिले. ते ओरिसातील विवेकवादी चळवळीत सहभागी होतात. तेथे ते नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याविषयी सांगतात, अशी माहिती के. एन. सेनापती यांनी आम्हाला दिली. एक जिल्हाधिकारी अशी रोखठोक विज्ञानवादी भूमिका घेतात, तेव्हा लोकांमध्ये नक्की विश्वास बसतो.

विवेकवाद्यांनी आयोजित केलेल्या चंद्रग्रहणातील सहभोजनास रुढीवाद्यांचा प्रखर विरोध

परवा, ८ नोव्हेंबरचे चंद्रग्रहण ओडिशातील प्रबोधन चळवळीला ‘ग्रहण’ लावणारे ठरले. ‘ग्रहण काळात अन्नग्रहण करायचे नसते.’ ही अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी ओरिसातील विवेकवादी संघटना, हेतूवादी, विज्ञाननिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन ग्रहणकाळात जाहीर भोजनाचे कार्यक्रम भुवनेश्वर आणि बेहरमपूर येथे आयोजित केले होते. त्यांना रुढीवादी लोकांच्या गटाने धरणे, मोर्चा काढून विरोध केला. विज्ञानवादी संघटना शांतपणे लोकांना, ‘ग्रहणात शुभ-अशुभ काहीच नसते. हा निसर्गातील साधी घटना आहे, तिचा मनमुराद आनंद घ्या,’ असे सांगत होते; तर विरोधकांना हा प्रकार आपल्या परंपरांना उखडून टाकण्याचा प्रयत्न वाटत होता.

बेहरमपूर येथे रुढीवादी लोकांनी विवेकवादी कार्यकर्ते ई. टी. राव, सुरेश, मोहन राव, के. एन. सेनापती यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावर शेण फेकले. त्यांचा मंडप पाडून दहशत पसरवली. त्यानंतर बेहरमपूर पोलिसांनी रुढीवादी लोकांवर लाठीचार्ज केला.

भुवनेश्वर येथे राममनोहर लोहिया अ‍ॅकेडॅमीमध्ये चंद्रग्रहणानिमित्ताने विवेकवादी संघटनांनी जाहीर सहभोजन आयोजित केले होते. तेथेही रुढीवादी लोकांनी येऊन दंगा घातला. बजरंग दलाच्या ८ लोकांना पोलिसांनी अटक केली. सहभोजनाचा कार्यक्रम आयोजन करणार्‍या आयोजकांवर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून रुढीवादी लोकांनी पोलीसात तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे गेला आठवडाभर ओरिसामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. जग चंद्रावर अनेकदा जाऊन आले. पण जुनाट विचारांच्या लोकांना समाज जागा व्हावा, असे वाटतच नाही, हे परवाच्या ओरिसातील या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]