डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे ‘सुत्रधार कोण?’ जवाब दो! : राज्यभर निदर्शने, निवेदने आणि मॉर्निंग वॉक

-

20 ऑगस्ट, 2021

उत्तर नागपूर शाखेचा कॅन्डल मार्च

उत्तर नागपूर शाखेतर्फे इंदोरा परिसरात ‘कॅन्डल मार्च’ काढून डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. या ‘कॅन्डल मार्च’चा समारोप नामांतर शहीद स्मारक, इंदोरा येथील अभिवादन सभेने करण्यात आला. निकिता बोंदाडे यांनी चळवळीच्या, तर अजय रहाटे, गौतम मघाडे यांचे अभिवादन गीतगायन व सीमाताई नांदेश्वर यांच्या संविधान उद्देशिका वाचन करून चालू झालेल्या या सभेचे प्रास्ताविक चित्तरंजन चौरे यांनी केले. राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे अध्यक्ष असलेल्या या सभेत ज्येष्ठ कार्यकर्त्या विजयाताई श्रीखंडे, राम काळे, विभूतीचंद्र गजभिये व शेषराव मुरोडिया हे प्रमुख पाहुणे होते. सर्वच वक्त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे व व्यक्तित्त्वाचे विविध पैलू वर्णन करत त्यांना आदरांजली वाहिली. आभारप्रदर्शन श्वेता पाटील यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन माधुरी मेश्राम यांनी केले. त्यानंतर, ‘खुनाच्या सूत्रधाराना अटक करावी’ या मागणीचे निवेदन रामभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना देण्यात आले. प्रकरण न्यायप्रविष्ट असून उचित कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

कार्यक्रमाचे संचालन ‘सावित्रीबाई फुले’फेम माधुरी मेश्राम यांनी केले. आभार महिला कार्यकर्त्या श्वेता पाटील यांनी मानले. याप्रसंगी अरविंद तायडे, देवानंद बडगे, आनंद मेश्राम, शिवकुमार फुले, कमलेश हुमने, शुभम आवळे, पावेल व रतन गोंडाणे, अमिताभ व प्रीती रामटेके, रमेश ढवळे, अनिल बावनगडे, सतीश जांभुळकर, छबुताई गजभिये, चंदाताई मोटघरे, सुनीता ढवळे, अर्चना राडे, अशोक राऊत, रॉकी घुटके, अतुल वासनिक, कल्याणी डोंगरे, सुनीता गजभिये, आशुतोष टेंभुर्णे, अजय नांदेश्कर, राजेश अलोणे, सुधीर सोनटक्के, शिशुपाल सहारे, राजन ऊके व पानतावणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहने गाळेगाव शाखेच्या अभिवादन सभेत अंनिसचे काम जोमाने वाढविण्याचे आवाहन

कल्याण तालुक्यातील मोहने गाळेगाव या शाखेने डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रज्ञा बुद्धविहार येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. अर्जुन खरात, आकाश पवार, मंगेश गांगुर्डे व सुनीता चंदनशिवे यांनी गायलेल्या प्रबोधन आणि चळवळीच्या गाण्याने सभेची सुरुवात झाली. या सभेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी यांनी भारतीय बौद्ध महासभा आणि “अंनिस” या समविचारी संघटना असून “अंनिस”चे काम जोमाने पुढे नेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. अंनिसचे वरिष्ठ कार्यकर्ते डी. जे. वाघमारे, अविदा वाघमारे यांनी डॉ. दाभोलकरांच्या अनेक आठवणींना उजाळा देत दाभोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्या भाषणातून मांडले. ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे यांनी, जोपर्यंत महामानवांच्या विचारांचा प्रचार करणारे दृढनिश्चयी अनुयायी आहेत, तोपर्यंत कितीही माणसे मारा, विचार संपणार नाही, असे प्रतिपादन केले. मोहने शाखेच्या अध्यक्ष अश्विनी माने अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. के. पी. गायकवाड, जी. एम. राजगुरू यांच्यासह मोहने परिसरातील अनेक मान्यवरांनी डॉ. दाभोलकरांना आपल्या भाषणातून अभिवादन केले. सभेचे सूत्रसंचालन मोहने शाखेचे सचिव राजेश मोरे यांनी केले. सभेच्या शेवटी ‘मी नास्तिक कसा झालो?’ या भगतसिंग यांच्या पुस्तकाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.

रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षे झाली. त्यांच्या सूत्रधारांना कधी पकडणार,’ असा सवाल करत खुनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हाधिकार्‍याकडे रायगड “अंनिस”चे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा “अंनिस”च्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी “अंनिस”चे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, संदेश गायकवाड, नीलेश धरत, मीना मोरे, मंदाकिनी गायकवाड, श्वेता सुभेकर आदी उपस्थित होते.

सांगली शहर शाखेतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप

सांगली शहराला कृष्णा नदीच्या पुराने नुकताच चांगलाच तडाखा दिला. त्यात अनेकांचे संसार वाहून गेले. त्यांच्या मदतीसाठी सांगली “अंनिस”ने गोळा केलेल्या मदतीतून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप मुस्तफा मुजावर यांच्या सावली बेघर निवारा केंद्रात करत “अंनिस”च्या सांगली शहर शाखेने डॉ. दाभोलकरांचा स्मृतिदिन विधायक पध्दतीने साजरा केला. हे वाटप डॉ. सतीश पवार, प्रा. अमित ठाकर, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधारांचा ‘सीबीआय’ने तातडीने तपास करावा, अशी मागणी करणारे निवेदन “अंनिस”च्या सांगली शहर शाखेने जिल्हा प्रशासनाला डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनी दिले. निवेदन देतेवेळी वरील मान्यवरांबरोबर मुनीर मुल्ला, धनश्री साळुंखे, अण्णा गेजगे, चंद्रकांत वंजाळे, संजय गलगले, त्रिशला शहा हे कार्यकर्ते व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहर शाखेचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनया विषयावर ऑनलाइन वेबिनार

शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. 20 ऑगस्ट रोजी सोफिया कॉलेज, मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानानिमित्त विषयाची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांसोबत एक प्रश्नावली ‘गुगल फॉर्म’ स्वरुपात ‘शेअर’ करण्यात आली होती. या प्रश्नावलीला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रिन्सिपल डॉ. सिस्टर आनंदा अम्रीत महल यांच्या मनोगताने झाली. नंतर पाण्याचा दिवा लावून आणि गीत गायन करून वंदना शिंदे यांनी विषयाची सुरुवात केली व चमत्कार सादर केले. त्यानंतर या चमत्कारांमागील विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रकाश पारखे यांनी प्रश्नावलीतील मिळालेल्या उत्तरांच्या अनुषंगाने वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्योतिष, ग्रहणाचा परिणाम, महिन्यांच्या नावांची उत्पत्ती या विषयांवर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाऊसफुल्ल राहिलेल्या या वेबिनारमुळे जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांपर्यंत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा विषय तसेच ‘अंनिस’चे फेसबुक पेज, वार्तापत्राची माहिती पोचवण्यात यश आले. कार्यक्रमास सोफिया कॉलेजतर्फे प्रिन्सिपल डॉ. आनंदा अम्रीतमहल, एनएसएस जिल्हा कॉर्डिनेटर क्रांती उकिरे, डॉ. हेमा, डॉ. रोशन, वैशाली मॅडम, डॉ. मेधा राजाध्यक्ष, एक्स फॅकल्टीदेखील उपस्थित होते. ठाणे शहर शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना समर्पित केलेली एक छोटीशी कर्मांजली.

चाळीसगाव शाखेच्या अभिवादन सभेत अंनिसस्थापना, इतिहास, प्रेरणा, उद्देश, सहभाग, कायदा यावर मान्यवरांचे मार्गदर्शन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिनानिमित्त अंधश्रध्दा निर्मूलन समिती, चाळीसगावच्या वतीने महात्मा जोतिबा फुले लाईफ अँड मिशन सेंटर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून उद्घाटन करण्यात आले. “अंनिस”च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीताताई सामंत यांनी ‘अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्थापना व इतिहास’ यावर मार्गदर्शन केले; तसेच सागर नागणे यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा आणि त्याचा लढा व प्रवास’ समजावून सांगितला. दिलीप चव्हाण यांनी “अंनिस” ः प्रेरणा, उद्देश आणि माझा सहभाग’ यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्पेश देशमुख यांनी केले. प्रास्ताविक नितीन परदेशी यांनी केले. अभिवादन सभेत अभिवादन गीत सादर करण्यात आले. त्यात मोनाली कांबळे, जयश्री गायकवाड, शीतल पाटील, संघमित्रा त्रिभुवन, कविता सावले, रत्ना शेजवाळ, सपना अहिरे, उज्ज्वला कांबळे हे सहभागी होते. तसेच सुनील गायकवाड व आशितोष अहिरे यांनी संगीतसाथ केली. या अभिवादन सभेस प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, प्रतिभा पाटील, मंदा कांबळे, प्रा. गौतम निकम, गणेश भोई, सतीश पाटील, नीलेश परदेशी, शंकर पगारे, प्रा. किरण पाटील, सचिन आगोने यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.

बेलापूर शाखेच्या अभिवादन सभेत नवी मुंबईत अंनिसचे काम वाढविण्याचा निर्धार

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी कॉ. बी. टी. रणदिवे भवन, आग्रोळी, बेलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेची सुरुवात विजय खरात व छोटी कार्यकर्ती झेलम यांनी गायलेल्या अभिवादन गीताने झाली. शाखेच्या कार्याध्यक्ष रेखा देशपांडे यांनी केलेल्या प्रास्ताविकात 14 ऑगस्टपासून नरेंद्र दाभोलकर विचार जागरात झालेल्या कार्यक्रमाचा गोषवारा व ‘अंनिस’तर्फे शासनाला द्यावयाच्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर नरेंद्र लांजेवार यांनी दाभोलकरांना उद्देश्यून लिहिलेल्या पत्राच्या वाचनाची ऑडिओ क्लिप ऐकवली गेली. दाभोलकरांचे विचारविश्व कृतिशीलपणे व्यापक करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल, असा विचार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी आपल्या भाषणात मांडला.

घर हक्क संघर्ष समितीचे हिरामण पगार, ‘अंनिस’चे रमेश साळुंखे यांनी दाभोलकरांना अभिवादन करत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची आपली बांधिलकी असल्याचा पुनरुच्चार केला. युवा कार्यकर्ता अजय बोरकर याने यानिमित्ताने लिहिलेल्या कवितेचे वाचन केले. बेलापूर शाखेचे अध्यक्ष भास्कर पवार सरांनी अध्यक्षीय समारोप केला व ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेलापूर शाखेचे प्रधान सचिव विजय खरात यांनी केले.

या सभेस अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, घरकामगार संघटना, घर हक्क संघर्ष समिती, फेरीवाला संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या समविचारी पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना जिल्हा परतूर शाखेचे उपविभागीय कार्यालयाला निवेदन

डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश या चारही खुनाचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले असूनही त्यांच्या खुनामागील सूत्रधाराचा शोध अजूनही लागत नसल्याने तो शोध त्वरित लावावा, ही मागणी घेऊन ‘अंनिस’च्या परतूर शाखेने उपविभागीय कार्यालयात निवेदन दिले. या निवेदनावर रमाकांत वरिदे, एकनाथ कदम, कल्याण बागल, दिलीप मगर, लक्ष्मीकांत माने, सुनील खरात, सागर रनबावळे, संभाजी तांगडे, आश्विन गुंजकर यांनी सह्या केल्या आहेत.

नांदेड जिल्हा नायगाव शाखेचे तहसीलदारांना निवेदन

अंधश्रद्धेने बुरसटलेले मन आणि डोके स्वच्छ करणारे परिवर्तनवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधाराचा शोध 8 वर्षेहोऊनही लागत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल, असे ठणकावत सूत्रधारांना त्वरित अटक करण्याची मागणी करणारे निवेदन ‘अंनिस’च्या नायगाव शाखेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. त्यावेळी ‘अंनिस’चे पदाधिकारी, कार्यकर्ते खंडगावकर, बलभीम वाघमारे, डॉ. शंकर गड्डमवार, संजय भालेराव, भरत लोकलवार, गोविंद परडे, बालाजी गायकवाड, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

पुणे शहर शाखा जट कापून कृतिशीलतेने आदरांजली

पुणे शहर शाखेतर्फे शहीद डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला (19 ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता; जेथे डॉक्टरांचा खून झाला, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मेणबत्त्या लावून डॉक्टरांना अभिवादन करण्यात आले. 20 ऑगस्टला सकाळी 8 वाजता कार्यकर्ते पुन्हा पुलावर जमले. यावेळी डॉक्टरांना अभिवादन करतानाच खुनाचे सुत्रधार पकडावेत, अशी जोरदार मागणी शासनाकडे करण्यात आली. यावेळी ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करू,’ ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे..’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी डॉक्टरांच्या खुनाचे सूत्रधार म्हणजे ‘तालिबानी’च होय, असे प्रतिपादन केले. यावेळी ‘अंनिस’चे अनेक कार्यकर्तेव मान्यवर नागरिक उपस्थित होते.

याच दिवशी टिंगरेनगर येथील सुमन यादव या 67 वर्षीय महिलेचे जटनिर्मूलन नंदिनी जाधव यांनी केले. गेली पाच वर्षे डोक्यात असलेली दोन किलोची जट काढण्यासाठी या महिलेचे समुपदेशन नंदिनी जाधव व मिलिंद देशमुख यांनी केले. अशा प्रकारे कृतिशील कार्यक्रमातून डॉक्टरांना आदरांजली वाहण्यात आली.

डॉ. दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षे होऊनही त्या खुनामागील सूत्रधार मोकाट आहेत. हे सूत्रधार सापडले असते तर पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांचा खूनही झाला नसता. या खुनामागील सूत्रधार सापडत नाहीत, तोपर्यंत विवेकी विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या खुनामागील सूत्रधारांना त्वरित अटक करा, अशी मागणी करणारे निवेदन ‘अंनिस’च्या पुणे शाखेने तहसीलदार शुभांगी गोंजारे यांना दिले. यावेळी श्रीपाल ललवाणी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, अनिल तिकोणकर, अनिल वेल्हाळ, वसंत कदम आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखेचे निवेदन

20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 8 वर्षे होऊनही खुनाच्या सूत्रधाराला अजूनही पकडण्यात न आल्याच्या निषधार्थ सांगोला शाखेने सूत्रधाराला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी घेऊन सांगोला शाखेचे कार्यकर्ते डॉ.प्रभाकर माळी, डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. एस.के. पाटील, समीर मुलाणी, अ‍ॅड.राजेश्वरी केदार, प्रा. समाधान काटे, विजय माने, महादेव जाधव, रमेश देशपांडे यांनी शासनाला निवेदन दिले.

खुनाचे सूत्रधार मोकाट कसे?’ वर्धा येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभेत शासनाला सवाल

‘महाराष्ट्र अंनिस’, वर्धा शाखा व जातिअंत संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथील कॉ. धनागरे सभागृहात अभिवादन सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान सभेचे यशवंत झाडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य केंद्र, वर्धा येथील डॉ. रुपाली सरोदे या होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असून कोणत्याही चमत्कारी गोष्टीवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीने जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनास आपल्या घरापासूनच प्रारंभ झाला, तर समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. कॉ. यशवंत झाडे यांनी अध्यक्षीय भाषणात विचारांची लढाई लढू न शकणारे धर्मांध आपली फसवेगिरी व राजकारण बंद पडेल, म्हणूनच विचारवंतांचे खून पाडत आहेत, असे सांगून त्यांनी खुनाचे सूत्रधार मोकाट कसे, असा संतप्त सवाल केला. या सूत्रधारांना त्वरित पकडण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र कांबळे यांनी केले. जिल्हा प्रधान सचिव रमेश निमसडकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता भोंगाडे यांनी केले. जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी सुरेश रंगारी, सुषमा वासेकर, रामभाऊ ठावरी, शीतल बनसोड, राजेश वाघमारे, प्रदीप शिणघापुरे, प्रियदर्शन भेले, दशरथ गवळी आदी उपस्थित होते. प्रभाकर धवणे यांच्या प्रबोधनात्मक गीताने चालू झालेली ही अभिवादन सभा चंद्रप्रकाश बनसोड यांच्या आभार प्रदर्शनाने समाप्त झाली.

गडहिंग्लज अंनिसशाखा, पुरोगामी संघटनांच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक

तपास यंत्रणांना आठ वर्षांत डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात आलेल्या अपयशाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध करत व सूत्रधारांना त्वरित पकडण्याची मागणी करत गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलपासून दसरा चौकातील शिवाजी पुतळ्यापर्यंत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले. ‘वॉक’च्या अखेरीस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुल्ला व गणपतराव पाटोळे यांची भाषणे झाली. शंकर नेर्ले, साताप्पा कांबळे, बालेश नाईक, प्रकाश भोइटे, सुभाष कोरे यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करत रत्नागिरी अंनिसच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंतच येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार अजून स्पष्ट झालेले नाहीत, तरी या सूत्रधारांचा शोध त्वरित घ्यावा, अशी मागणी करीत रत्नागिरी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सदर निवेदन सादर करताना विनोद वायगणकर, मधुसूदन तावडे, राजेश कांबळे, राधा वणजू, वल्लभ वणजू आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस कार्यकर्त्यांबरोबर जिल्हाधिकार्‍यांची ‘अंनिस’च्या इतरही कार्यक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

सूत्रधारांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत बार्शी अंनिसबार्शीचे तहसीलदारांना निवेदन

डॉ. दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षेपूर्ण होऊनही त्यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय? त्यांना कधी पकडणार? असे संतप्त सवाल उपस्थित करत बार्शी ‘अंनिस’च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. अशोक कदम, प्र. हेमंत शिंदे, उन्मेष पोतदार, काकासाहेब गुंड, डॉ. रामेश्वर कोठावळे व ‘अंनिस’चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खुनाच्या सूत्रधाराचा तपास लावा : सोलापूर शहर शाखेचे जिल्हाधिकार्‍याना निवेदन

पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या विचारवंत कार्यकर्त्याची हत्या होते आणि त्याच्या सूत्रधाराचा शोध लागत नाही. ही महाराष्ट्राला अत्यंत शरमेची गोष्ट आहे, तेव्हा तपास यंत्रणांनी सूत्रधारांचा शोध त्वरित लावावा, अशी मागणी करत सोलापूर शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन दिले. यावेळी व्ही. डी. गायकवाड, डॉ. राजेंद्रसिह लोखंडे, लालनाथ चव्हाण, केदारनाथ सुरवसे, ब्रह्मानंद धडके, गोरख गडसिंग हे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवेढा शाखेने निंबोणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करून वाहिली आदरांजली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मंगळवेढा शाखा, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन व समस्त ग्रामस्थ निंबोणी यांच्या वतीने डॉ. दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी, मंगळवेढा शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळेस उपस्थित ‘अंनिस’ कार्यकर्ते, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे पदाधिकारी, निंबोणी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार अजूनही न मिळाल्याबद्दल संताप व्यक्त करत तपास यंत्रणांनी सूत्रधारांचा शोध त्वरित लावावा, अशी मागणी केली.

खुनाच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करा : जालना ‘अंनिस’ची मागणी

डॉ. दाभोलकरांच्या खुनातील आरोपींना जरी अटक झाली असली तरी खुनाला आठ वर्षेहोऊनही मुख्य सूत्रधार अजून मोकाटच आहेत. त्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जालना ‘अंनिस’ने दिले. यावेळी जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव, मधुकर गायकवाड, शंकर बोरडे, बसवराज कोरे, एम. डी. सरोदे, संजय हेरकर, अनुराधा हेरकर, गंगा काळे, नारायण माहोरे, माया गायकवाड, राजेभाऊ मगर, कविता दाभाडे, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंब शाखेचा निर्भय मॉर्निंग वॉक

उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘अंनिस’च्या कळंब शाखेने शिवाजी महाराज चौक ते कळंब पोलिस ठाण्यापर्यंत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करून ‘आम्ही सारे दाभोलकर,’ ‘आम्ही सारे पानसरे-शिवराय-शाहू-आंबेडकर,’ ‘खुनामागील मास्टर माइंडवर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले. यावेळी प्रधान सचिव अरविंद शिंदे, अध्यक्ष सुरेश धावारे यांच्यासह कळंबमधील अनेक प्राध्यापक, प्राचार्य, वकील, डॉक्टर व सामाजिक-राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

नळदुर्ग येथे डॉ. दाभोलकरांना अभिवादन

नळदुर्ग बसस्थानकासमोरील संविधान चौकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांनी संयुक्तपणे डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतिदिनी आयोजित केला होता. यावेळी ‘अंनिस’च्या नळदुर्ग शाखेच्या पदाधिकार्‍यांसह रिपाइं (आठवले), बहुजन वंचित आघाडी, शिक्षक भारती या पक्षसंघटनांचे पदाधिकारी, सांमाजिक कार्यकर्तेव गावातील मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील चाकण शाखेचे स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण

डॉ. दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त ‘अंनिस’, कलाविष्कार मंच, राष्ट्र सेवा दल, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने भाभा इंग्लिश मीडियम स्कूल, चाकण येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रबोधनपर गीते गाण्यात आली. तसेच जिल्हा प्रधान सचिव नारायण करपे यांनी डॉक्टरांचा जीवनप्रवास उलगडला. यावेळी प्राचार्या परमिळा गोरे, नामदेव पडदुणे, चंद्रकांत बुट्टे, प्रमोद पारधी, विशाल बारवकर, मनोहर मोहरे, विजयकुमार तांबे, सुवर्णा चौधरी, गजानन बिराजदार, रंजना पारधी, अनुष्का करपे, देविका महाजन आदी उपस्थित होते.

इचलकरंजीत निर्भय मॉर्निंग वॉककरून डॉ. दाभोलकरांना आदरांजली

डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, हे स्पष्ट असताना त्या शक्तींना हात लावण्याचे धाडस तपासयंत्रणा दाखवत नसल्याने त्याचा निषेध व्यक्त करत इचलकरंजीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल आणि शहरातील विविध परिवर्तनवादी संघटना, संविधान परिवार यांच्यातर्फे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ‘शिवराय-फुले- आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, ‘लढेंगे, जितेंगे’ अशा घोषणा देत व परिवर्तनाची गाणी गात शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे आणि राजू आवळे यांना खुनाच्या मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

‘अंनिस’चे शहर कार्याध्यक्ष प्रवीण आंबले, प्रधान सचिव शरद वास्कर व राष्ट्र सेवा दल शहर संघटक प्रफुल्ल आवळे, आंतरभारतीचे अध्यक्ष शामराव नकाते यांच्यासह विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना, पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये सहभागी झाले होते.

सूत्रधारांचा तपास लावा : रोहा ‘अंनिस’ शाखेची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रोहा शाखेने डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधाराच्या तपास लावण्याची मागणी करणारे निवेदन रोहा तहसीलदारांना दिले. यावेळी रोहा शाखा कार्याध्यक्ष राक्षे, वार्तापत्र विभाग कार्यवाह रवींद्र कान्हेकर, युवा विभागप्रमुख खांडेकर, प्रधान सचिव दिनेश शिर्के हे उपस्थित होते.

खुनाच्या सूत्रधाराला त्वरित अटक करा : किनवट शाखेची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट शाखेने खुनाच्या सूत्रधारांना पकडण्याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांना दिले. निवेदन देताना ‘अंनिस’चे कार्यवाह अ‍ॅड. मिलिंद सर्पे, अ‍ॅड. वाय. एम. गजभारे, अ‍ॅड. सुभाष ताजणे, अ‍ॅड. आर. डी. सोनकांबळे, अ‍ॅड. टेकसिंग चव्हाण, अ‍ॅड. एस. पी. सिरपुरे, अ‍ॅड. जे. बी. सिडाम, संतोष जकुलवाड यांच्यासह काही जण उपस्थित होते.

खुनाच्या सूत्रधारांना शोधून तात्काळ अटक करा ः ‘अंनिस’ नांदेड व समविचारी संघटनांतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष व पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला आठ वर्षे पूर्ण झाली. अद्यापही मारेकरी व सूत्र अटक होऊ शकली नाही. याचा निषेध व्यक्त करीत मारेकरी व सूत्रांवर तात्काळ अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

‘अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य सम्राट हटकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रदीप नागपूरकर, कॉ. के. के. जामकर CPI, कॉ. उज्ज्वला पडलवाड CPM, कॉ. गंगाधर गायकवाड CPM, कॉ. शिवाजी फुलवळे CPM, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पिटलेवाड, लक्ष्मण भवरे, जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, कॉ. मारोती केंद्रे, फुले-शाहू-आंबेडकर युवा मंचाचे अध्यक्ष स्वप्नील नरबाग, सचिन गुंडेराव, गंगाधर वडणे, नितीन ऐंगडे, नांदेड शाखा प्रधान सचिव, सागर घोडके, मयूर शेरे आदींसह ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील भोकर शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान संपन्न

डॉ. दाभोलकर यांच्या स्मृती व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ‘अंनिस’चे कार्यकर्ते शिवाजी पिटलेवाड यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार कोण आहेत व ते का सापडत नाहीत, असा सवाल विचारत या गूढ रहस्याचे कारण स्पष्ट करत उपस्थित नागरिकांसमोर त्यांच्या चळवळीविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून भोकरच्या सरपंच श्रीमती वर्षाताई नितीन चौरेकर होत्या. ग्रामीण भागातील समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा प्रगतीचे अडसर ठरत असल्याने ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांचे विचार प्रसारित करताना क्रोधापेक्षा करुणेने व उपहासापेक्षा आपुलकीने या डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गाने चळवळ वाढवणं आवश्यक आहे, असे सांगून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं दाभोलकरांचं काम नजरेसमोर आणून दिलं. यावेळी गावातील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाली असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील गुंडेराव, तुळशीराम कदम, सुजित गुंडेराव, मिलिंद कदम, देविदास गडमोड, अनिल कदम, संजय कदम, कार्याध्यक्ष अंकुश सुरोड, महादू चौरेकर, प्रधान सचिव नागेश इसलवाड आदींनी सहकार्य केले.

तासगाव शाखेचा निर्भय मॉर्निंग वॉकव अभिवादन सभा

भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, देशरक्षण, कष्टकरी यासाठी शहीद होणार्‍यांची संख्या मोठी आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शहीद होणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कदाचित एकमेव भारतीय असतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. बाबूराव गुरव यांनी तासगाव शाखेने आयोजित केलेल्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’च्या नंतर झालेल्या अभिवादन सभेत केले. हा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ तासगावमधील सिद्धेश्वर चौक ते पीव्हीपी कॉलेज चौक असा आयोजित करण्यात आला होता. खुनाला आठ वर्षे होऊनही त्या मागचे मास्टर माईंड सापडत नाहीत, हे अतिशय वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ‘अंनिस’चे फारूक गवंडी यांनी हा ‘मॉर्निंग वॉक’ डॉ. दाभोलकरांच्या विवेकी विचारांचा वारसा निर्भयपणे पुढे नेण्याचा निर्धार असून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये ज्या ठिकाणी पायदळी तुडविली जातात, त्या ठिकाणी अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होते, हे लक्षात घेऊन शिव, शाहू, फुले, आंबेडकर ते दाभोलकर, पानसरे हा वारसा जपला पाहिजे, वाढविला पाहिजे, असे सांगितले.

अमर खोत, सुनील महामुनी, देशमुख, संदेश भंडारे, शरद शेळके, अर्जुन थोरात, नूतन परीट, अमोल कदम या अभिवादन सभेतील इतर वक्त्यानी आपले मनोगत व्यक्त करताना अभिवादन करत असताना डॉ. दाभोलकर यांच्या आठवणी सांगितल्या व अजूनही खुनामागील सूत्रधार न पकडल्याबद्दल तपास यंत्रणांचा धिक्कार केला.

या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’साठी तासगाव तालुक्यातील कवठे एकंद, सावर्डे, वज्रचौंडे, येळावी, मतकुणकी, वासुंबे येथील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वासुदेव गुरव, अशोक पाटील, समीर कोळी, वैभव गुरव, पांडुरंग जाधव, राहुल सदाकळे, विजय जाधव, विकास यादव, कुमार माळी, संदीप नागजे यांनी परिश्रम घेतले.

माळीनगर शाखेतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी. गौरी लंकेश यांचा खून होणे, हीच पुरोगामी महाराष्ट्राला लज्जास्पद गोष्ट आहे आणि त्यामागचे सूत्रधार गेली आठ वर्षेन मिळणे ही तर त्याहून लज्जास्पद बाब असल्याचे नमूद करत प्रांताधिकारी विजय देशमुख यांना माळीनगर शाखेतर्फे खुनातील सूत्रधारांना त्वरित पकडण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन माळशिरस तालुकाध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गिरीश ढोक, कार्याध्यक्ष रघुनाथ वाघमारे, सचिव भीमराव चंदनशिवे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

परभणीत अंनिसचा निर्भय मॉर्निंग वॉक

डॉ. दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षे होऊनही त्यामागील सूत्रधारांचे काय झाले? त्यांना केव्हा पकडणार? असा संतप्त सवाल तपास यंत्रणा व प्रशासनाला करत परभणी ‘अंनिस’ व समविचारी संघटनांनी काढलेल्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ला परभणीत मोठा प्रतिसाद मिळाला. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चा समारोप राजगोपालचारी उद्यानात झाला. यात विविध संघटनांचे कार्यकर्तेसहभागी झाले होते. माधुरी क्षीरसागर यांनी दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार सर्वश्रुतच आहेत, ते उघड करण्यात यावे, अशी मागणी करीत विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार व्यक्त केला. परभणी शाखेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद मोरे, ज्ञानोबा मुंढे, डॉ. परमेश्वर साळवे यांच्यासह ‘अंनिस’च्या अनेक कार्यकर्त्यांनी सभेत सहभाग घेतला. डॉ. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत गांगुर्डे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शेख अलिमोदीन, घनःश्याम साळवी, अमोल गिराम, जयश्री सोनकांबळे, एन. आय. काळे यांनी परिश्रम घेतले.

खुनाच्या मास्टर माईंडला त्वरित पकडा कोल्हापुरातील भव्य निर्भय मॉर्निंग वॉकची मागणी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनास आठ, तर कॉ. पानसरे यांच्या खुनास साडेपाच वर्षे झाली आहेत, तरीही तपास यंत्रणा मास्टर माईंडपर्यंत पोचलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील उभा मारुती चौकापासून बिंदू चौकापर्यंत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन कोल्हापूर ‘अंनिस’ने केले होते. त्याला विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नांगरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. बिंदू चौकात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ची सांगता करताना झालेल्या सभेत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी खुनाच्या मास्टर माईंडला पकडावे, या मागणीबरोबरच चारही खुनांतील आरोपी एकाच धर्मांध संघटनेचे साधक आहेत, तेव्हा धर्मांध साधकांची नोंद पोलिसांत करणे अनिवार्य करावे, संशयित आरोपींना राहायला जागा देणारे; तसेच आर्थिक मदत करणारे साधक सहआरोपी करावेत, अशा मागण्या केल्या. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य विलासराव पवार यांनी, देशाची प्रगती व्हायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. कॉ. चंद्रकांत यादव यांनी वरिष्ठ वर्ग आणि वर्णाची युती झाल्याचे सांगून त्या विरोधात सर्व पुरोगाम्यांनी एकत्र आले पाहिजे, असे विचार मांडले.

‘मॉर्निंग वॉक’मध्ये अ‍ॅड. अजित चव्हाण, प्रा. डॉ. छाया पोवार, मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे प्रा. सुभाष जाधव, सुरेश सूर्यवंशी, शिवश्री चंद्रकांत पाटील, प्रा. डॉ. टी. एस. पाटील, राजू राऊत (शाहीर), सीमा पाटील, संजय अर्दाळकर, अतुल दिघे, वसंतराव पाटील, शिवमती सुनंदा चव्हाण, शिवमती सुवर्णा मिठारी, कॉ. उदय नारकर, शिवमती सुधा सरनाईक, शिवमती सुनीता पाटील, सुजाता म्हेत्रे, गीता हासुरकर, एस आर सांगले, सुधीर हंजे, सुरेश जत्राटकर, अजय अकोळकर, अभिजित पाटील, एस. आर. कांबळे, बिजली कांबळे, शोभा पाटील, रमेश वडणगेकर, अस्मिता चव्हाण, सुभाष सावंत, संजय अर्दाळकर, रवी जाधव इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले.

कोल्हापूर शाखेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बुवाबाजी ः समाजाला लागलेली कीड’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचे पारितोषिक वितरण ‘मॉर्निंग वॉक’नंतर बिंदू चौकात पुस्तक रुपाने करण्यात आले. यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे ः 1) वैष्णवी बंडू माने, शिरोळ 2) फिरदोस जमीर लगीवाले, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर. 3) वेदिका शिवाजी पाटील, अनाजे 4) संस्कार शिवाजी कदम, कंथेवाडी 5) साक्षी राजेंद्र जाधव, साने गुरुजी कोल्हापूर. त्यानंतर सकाळी 11 वा. तीव्र निदर्शने करून यामागील मास्टर माईंडला पकडा, असे जिल्हाधिकर्‍यांना निवेदन देण्यात आले.

सीबीआयने सूत्रधाराचा शोध त्वरित लावावा : सातारा ‘अंनिस’ची मागणी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधारांचा तपास त्वरित लावण्याबाबत निवासी जिल्हाधिकारी थोरवे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, 20 ऑगस्ट 2021 ला डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला आठ वर्षेपूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? डॉ. नंरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे शासनाला या निवेदनाद्वारे आम्ही सातारा जिल्हा ‘अंनिस’तर्फे मागणी करत आहोत.

हे निवेदन देताना ‘महा.अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत एस. पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, जिल्हा प्रधान सचिव हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, राजेंद्र पवार, विलास भांदिर्गे, अभय भांदिर्गे, शंकर कणसे, सीताराम चाळके, दशरथ रणदिवे, जयप्रकाश जाधव, डॉ. दीपक माने, दिलीप महादार, रामचंद्र रसाळ, योगिनी मगर, रुपाली भोसले, दिलीप कणसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र अंनिसतर्फे भुसावळ तहसीलसमोर निदर्शने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भुसावळतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी निवेदन स्वीकारले. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधार कोण, हे जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली. निवेदनावर शहराध्यक्ष शांताराम जाधव, जिल्हा सचिव अरुण दामोदर, शहर कार्याध्यक्ष सागर बहिरुणे, तालुकाध्यक्ष श्यामकुमार वासनिक, भगवान निरभवणे, नरेश वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

जयसिंगपुरात निर्भय मॉर्निंग वॉक

जयसिंगपूर शहरात ‘अंनिस’ने काढलेल्या ‘मॉर्निंग वॉक’ निषेध रॅलीमध्ये समाजवादी प्रबोधिनी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेसहभागी झाले. दसरा चौकातून निषेध फेरी निघून महात्मा गांधी चौक मार्गेक्रांती चौकात आल्यावर तेथे मान्यवरांची मनोगते व्यक्त झाली. यामध्ये डॉ. चिदानंद आवळेकर, डॉ. महावीर अक्कोळे, श्री. कुंभोजकर सर, प्रा. शांताराम कांबळे, डॉ. अतिक पटेल, बाबासाहेब नदाफ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. रघुनाथ देशिंगे, डॉ. अजित बिरनाळे, कल्याणी अक्कोळे, प्रकाश मेटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

लातूर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शहीद डॉ. दाभोलकर यांच्या खुनामागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, यासंबंधीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले. यावेळी प्रकाश घादगिने, रमेश माने आणि चंद्रकांत उळेकर उपस्थित होते.

(संकलन : राजीव देशपांडे)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]