फकिराच्या नादी लागलेल्या परिवाराच्या डोक्यातून काढले ‘बाहेरचे’ खूळ

मधुकर गायकवाड - 9423748334

– ‘अंनिसने परिवाराचे केले प्रबोधन

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलूद, एक छोटेसे गाव. जालन्यापासून जवळजवळ नव्वद किलोमीटर दूर असलेले हे गाव आहे. येथील बाबाराव खराटे यांचा मला फोन आला व त्यांनी माझा नंबर डॉ. हमीद दाभोलकर यांच्याकडून घेतला, असे सांगितले व तसा संदर्भ मला डॉ. हमीद दाभोलकर यांच्याकडूनही मिळाला. बाबाराव खराटे हे राऊत परिवाराचे स्नेही; पण डोळस विचारांचा गृहस्थ. त्यांनी राऊत यांच्या आईच्या आजारपणाविषयी सांगितले व त्यांचा मुलगा राऊत यांचा बाहेरची बाधा व झपाटले आहे, यावर पूर्ण विश्वास आहे. ते फकीर, बाबा, बुवा यांना घेऊन येतात, उतारे करतात असे सांगितले. त्यामुळे संध्याकाळी मी राऊत यांच्याशी बोललो. ते म्हणाले, “म्हातारी सारखे बडबडते, ओरडते, नावे घेते व कुत्र्यांसारखे भुंकते. तिला बाहेरचे झाले आहे.” त्यामुळे मी त्यांना म्हणालो, “आम्ही तुमच्या घरी येऊ आणि नेमके काय आहे ते सांगू!”

म्हातारीला मानसिक आजार आहे आणि त्यांनी डॉक्टरला दाखवावे, असे खराटे यांना वाटत होते; परंतु म्हातारीचा मुलगा ऐकत नव्हता. त्याच्या डोक्यात बाहेरचे झपाटलेले आहे, असेच होते. त्यामुळे ‘महा. अंनिस’चे बुवाबाजीविरोधी संघर्ष समितीचे कार्यवाह शंकर बोर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, युवा कार्यवाह मनोहर सरोदे, वैज्ञानिक जाणिवा समितीचे कार्यवाह संजय हेरकर यांच्याशी चर्चा केली व शेलूद या गावी जायचे ठरले. त्या अगोदर खराटे यांना सांगून ठेवले की, या परिवाराला मोठे तांत्रिक बाबा येत आहेत, असे सांगा. कारण असे कितीही समुपदेशन केले, तरी राऊत परिवार हा तेथील शेख सुलेमान या फकिराच्या संपर्कात होता व त्याचा या परिवारावर जास्त पगडा आहे, म्हणून या बाबावर कुरघोडी बाबा बनूनच करायची. ठरल्याप्रमाणे 21 जूनला शंकर बोर्डे यांनी महाराजाचा पोषाख घातला व त्यांच्या सोबत मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गिराम, संजय हेरकर, मनोहर सरोदे हे सर्व जालना ‘महा.अंनिस’चे कार्यकर्ते शेलूद या गावी पोचले.

साध्या घरात एका बाजेवर म्हातारी आई पडलेली होती. तिच्यात उठून बसण्याचेही त्राण नव्हते. खूप अशक्तपणा जाणवत होता. आम्ही आवाज दिला, प्रतिसाद म्हणून फक्त डोळे उघडून पाहिले. तीन महिन्यांपासून एकाच जागेवर. वय झालेले, शारीरिक आजारच होता. मानसिक आजाराची कोणतीच लक्षणे नव्हती. बाजेवर फकिराचे लिंबू, गंडे-दोरे होते. हाच उपचार सुरू होता.

या परिवाराच्या डोक्यातील खूळ काढण्यासाठी समोर नारळ ठेवले व अगरबत्ती लावली. शंकर बोर्डे यांनी महाराजाच्या स्टाईलमध्ये गळ्यातील रूद्राक्षांच्या माळेला हात लावला व डोळे मिटवले, थोडा वेळ शांत राहिले. म्हातारीकडे दृष्टी फिरवली व राऊत यांना जवळ बोलावून घेतले व सांगितले, “आता बाहेरच्या बाधेला घाबरायचे नाही. कुणी कितीही मंत्र-तंत्र केले, तरी तुम्हाला काहीच होणार नाही. तुमच्या आईला अजिबात बाहेरची बाधा नाही. यापुढे तुम्ही बाबा-बुवा व फकिराकडे जाता कामा नये. आता फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आईला डॉक्टरचा उपचार सुरू करणे.” म्हातारीच्या बाजेला बांधलेले लिंबू व गंडे-दोरे व इतर साहित्य ज्ञानेश्वर गिराम यांनी जमा करून घेतले. यापुढे लिंबू-गंडेदोरे करायचे नाही, असे सांगितले. ते राऊत परिवाराने मान्य केले व आईला आता चांगल्या डॉक्टरकडे नेऊ, असे सांगितले. त्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाकडे वळलो. राऊत परिवार व त्यांचे जावई आणि खराटे यांनी हात जोडून निरोप दिला.

येताना भोकरदनच्या पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांची भेट घेतली व अंधश्रद्धेच्या प्रकरणाबाबत चर्चा केली. यावेळी भोकरदन शाखेचे कार्याध्यक्ष राजेंद्र दारूंटे व सचिव कमलाकर इंगळे हे उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र भेट देऊन निरीक्षक नाईक यांचा निरोप घेतला.

मधुकर गायकवाड

संपर्क : 9423748334


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]