आमचं नववर्ष..?

अनिल चव्हाण -

कॉलनीत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्षेकाहीच करता आले नव्हते, त्याचा वचपा या वर्षी काढण्यासाठी तरुण कामाला लागले. निवडणुका जवळ असल्याने इच्छुक उमेदवार मदतीला होतेच. डायबेटीस आणि ब्लडप्रेशरच्या गोळ्यांच्या वेळा सांभाळत ज्येष्ठ नागरिकांनी ‘सेलिब्रेशन’चे वेळापत्रक तयार केले. महिला आणि युवतींना दांडिया खेळायचा आहे, बालकांना सिनेगीतावर थिरकायचे आहे, असा सगळा उत्साह वातावरणात भरला.

वीराची चुलत बहीण स्वरा आणि मैत्रीण मीरा जोरजोरात चर्चा करत होत्या. त्याच वेळी गुंड्याभाऊ आपल्या संस्कृतिरक्षक मित्रासह अवतीर्ण झाला.

“तू तुझा ब्ल्यू ड्रेस घालणार ना?” स्वराने मीराला विचारले.

“नाही. माझा दिवाळीतला आहे की, तो पिंक कलरचा. पप्पानी इस्त्री करून ठेवलाय,” वीरा म्हणाली.

“माझाही पिंक कलरचा आहे बरं. मी पण मम्मीला धुवायला सांगणार,” मीरा म्हणाली.

“पण माझ्याकडे नाही गं, पिंक कलरचा.” स्वरा म्हणाली.

“तुझ्याकडे ग्रीनिष-येलो आहे ना?”

“माझ्याकडे ग्रीन आहे, तो घालीन मी, मीरा तुझ्याकडे आहे ना? ग्रीन. तो ग ब्ल्यूइ-शग्रीन आहे तो? तो घाल.” वीराने मार्ग काढला.

आदिला यात इंटरेस्ट नव्हता. पण त्याच्याकडे सांगण्यासारखी नवीन माहिती होती. त्याचा मामा पलीकडच्या गल्लीत राहतो.

“माम्या म्हटलंय, ते दूध वाटप करणार आहेत.”

“तो काय दूधवाला भैय्या झाला काय?” स्वराच्या विनोदावर दोघी हसल्या.

“अगं ‘द’- ‘दारू’चा नाही ‘द’- ‘दुधा’चा असा बोर्ड त्यांनी केलाय. एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी ते दूध वाटणार आहेत.” आदिने माहिती पुरवली. “माम्या मला पण नेणार आहे त्याच्याबरोबर!”

“मग आम्ही पण येऊ! हो ना ग स्वरा.”

वीराच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळवत स्वराने मान हलवली.

“ठरलं तर… आपण तिघींनी ग्रीन ड्रेस घालायचे आणि मामाकडे दूध प्यायला जायचे!” स्वराने सारांश काढला.

एवढा वेळ शांतपणे ऐकणारा गुंड्याभाऊ मात्र अस्वस्थ झाला.

निवडण्यासाठी तांदळाचे ताट बाहेर घेऊन येणार्‍या आईकडे बघत त्यांनी नापसंती व्यक्त केली.

“काय हे आई, आपल्या संस्कृतीशी काही देणे-घेणे आहे की नाही? आपल्या घरात हे असं?”

“काय झालं गुंड्याभाऊ? कधी आलास? मला माहितीच नाही? काऊ चहा टाक गं. गुंड्याभाऊ आलाय.” आईने मागे वळून सांगितले.

“या एवढ्याशा पोरी. नववर्षाचं स्वागत करायचं म्हणतात.”

“मग त्यात काय झालं? आम्हीही करणार आहोत. नववर्षाच्या निमित्ताने आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने ‘आरोग्य आणि आहार’ या विषयावर डॉक्टरांचे व्याख्यान ठेवले आहे. त्यानंतर आम्ही ‘सेलिब्रेशन’ करणार आहोत. अध्यक्षिणबाई बिन साखरेचा केक आणतो म्हणाल्यात.” आईने एका दमात सांगून टाकले.

“मला मेलीला काय कळतेय? पण भाऊजी, आम्ही महिला मंडळही ‘सेलिब्रेशन’ करणार आहोत बरं! फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, झालंच तर खाद्यमहोत्सवही आम्ही घेणार आहोत. तुम्ही दोघांनीही यायचं बरं!” काऊने माहिती तर दिलीच, पण निमंत्रणही देऊन टाकले. गुंड्याभाऊसारखा पाहुणा म्हणजे खाद्यपदार्थांचे मोठे गिर्‍हाईक.

“बघा! बघा काका! यांना काही आपल्या संस्कृतीशी देणे-घेणे आहे का? कोण फॅशन शो करतोय! कोण नवे कपडे घालतोय. रांगोळ्या काय! दूध काय पिताहेत. म्हणे नवे वर्ष! सांगा त्यांना काहीतरी.” गुंड्याभाऊ सात्विक संतापाने बोलला.

“होय गुंड्याभाऊ! आपण बोलले पाहिजे. संस्कृती टिकवायची तर आपल्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही.” संस्कृतिरक्षक काकांनी बोलण्यापूर्वी जमीन नांगरून घेतली.

“आई तुम्ही सांगा, आपलं नवीन वर्ष कधी सुरू होतं?”

फर्स्ट जानेवारीला बालचमूचा एका सुरात आवाज आला. त्यांच्या दृष्टीने हा परीक्षेत येणारा एक मार्काचा प्रश्न होता.

“अरे बाळांनो, ते आपले वर्ष नाही. आपले वर्ष चैत्र महिन्यात सुरू होते. त्याला ‘चैत्रपाडवा’ म्हणतात. सर्व निसर्ग नटलेला असतो, वृक्ष-वेलींना नवीन पालवी फुटते, कोकिळ कुहुकुहू करतो. सर्वत्र आनंदी वातावरण असते. ती आपल्या नव्या वर्षाची सुरुवात” संस्कृतिरक्षक म्हणाले.

“आपण गुढी उभा करून नव्या वर्षाचे स्वागत करतो, गोडधोड स्वयंपाक करतो, नवीन कपडे घालतो, नवे संकल्प करतो.” गुंड्याभाऊंनी मध्येच चंचुप्रवेश केला, “गुढीपाडव्यामागे मोठा इतिहास आहेना गुरुजी?”

“चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा असतो ना?” मीराने आपले ज्ञान उघड केले.

“आणि त्यादिवशी प्रभू राम अयोध्येत आले,” वीराने भर घातली.

“गुरुजी, तुम्हीच माहिती सांगा!” गुंड्याभाऊने पोरांना अडवले. त्यांनीच सगळी माहिती पुरवली तर आपलं कोण ऐकणार, अशी त्याला भीती वाटली असावी.

“ही मुले म्हणतायेत ते बरोबर आहे.” संस्कृतिरक्षक गुरुजींनी सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला समोरच्याचे बरोबर म्हणायचे, म्हणजे तो आपोआप गप्प बसतो. मग त्यांनी सुरू केले.

“या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरासमोर गुढी उभी करतो. ज्या घरासमोर गुढी उभी असते, त्यांच्या घरी सुख-समृद्धी नांदते. आपण जे काम करतो त्यातून घरी सुख यावे. त्याचे प्रतीक म्हणजे गुढी होय.”

“वेदांत ज्योतिषात याचा उल्लेख आहे ना गुरुजी?” गुंड्याभाऊ म्हणाला.

“हो. वेदांत ज्योतिषात साडेतीन शुभमुहूर्त सांगितले आहेत. त्यातील एक म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करतात. अनेक नवीन कामांचा शुभारंभ करतात. गुढीपाडवा हा आपला प्राचीन सण आहे. महाभारतात ओपरिचय नावाच्या राजाने इंद्राने दिलेल्या काठीने गुढी उभी केल्याचा उल्लेख आहे. तिथून गुढीपाडव्याची सुरुवात झाली. 14 वर्षांच्या वनवासानंतर रामचंद्र अयोध्येत परतले, तेव्हा प्रजेने गुढ्या उभा केल्या. शालिवाहनाने शकांचा पराभव केला तो हाच दिवस. त्या दिवशी गुढ्या उभा करण्यात आल्या. आपले वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते; जानेवारीत नव्हे. तेव्हा काय ‘सेलिब्रेशन’ करायचे ते तेव्हा करा, आता काही गरज नाही.” गुंड्याभाऊंनी मूळ मुद्द्याला हात घातला.

“पण आम्ही तेव्हाही ‘सेलिब्रेशन’ करू.” आदिला हे सोडायचे नव्हते; उलट अजून एक उत्सव मिळवायचा होता.

“हो, हो काका: आम्ही गुढीपाडव्यालाही ‘सेलिब्रेशन’ करू. हो ना गं मीरा, स्वरा?” वीराने दुजोरा दिला.

“हो बरं काका. आम्ही आत्ताच वचन देतो!” स्वरा आणि मीराने एका सुरात सांगितले. त्यांना आपली तयारी वाया जाण्याची भीती वाटत होती.

“त्यावेळी करा, पण आत्ता नको. आपली संस्कृती ती नाही.” संस्कृतिरक्षक गुरुजींचा आग्रह सुरू राहिला.

“त्यात तुम्ही ग्रीन ड्रेस घालणार आहात.” गुंड्याभाऊची मळमळ बाहेर आली.

“हो. आमच्याकडे ग्रीन ड्रेसच आहेत ना. आम्हाला एक सारखा ड्रेस करायचा आहे.” वीरा म्हणाली.

गुंड्याभाऊला काय म्हणायचे, ते त्या बालकांना कळत नव्हते; पण आईला समजले.

“गुंड्याभाऊ, काय म्हणू तुला? तुम्ही सण वाटून घेताय. रंगांची वाटणी करताय. प्रत्येक ठिकाणी त्यांचे-आमचे, त्यांचे-आमचे.” आईने फटकारले.

“एवढेच काय, आई, ही मंडळी ‘कोणी काय खावे,’ यावरही आता बंधने आणत आहेत. त्यांच्या नजरेला प्रत्येक ठिकाणी भेद दिसतो, कावीळ झाल्यासारखा. खाणे-पिणे, कपडे सण-समारंभ, रंग, भाषा, एकही गोष्ट सरळ दिसत नाही. हे थांबले पाहिजे,” मी म्हणालो.

“हे पाहा, आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. हवामान, ऋतुमान आणि मानवी विकासाचा विचार करून आपले सण तयार केले आहेत.” गुंड्याभाऊ बोलला.

“हो. निसर्गाचा विचार करूनच आपले सर्व सण तयार झालेत. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. आपण राग, असूया, द्वेष यावर विजय मिळवायचा असतो.” गुरुजी आता अध्यात्मात शिरले.

“असे काही इतरांच्या सणात आहे का?” गुंड्याभाऊचा प्रश्न.

“म्हणजे काय काका?” वीराचा भाबडा प्रश्न.

“म्हणजे आपण सर्वांना समजून घ्यायचे, सर्वांशी प्रेमाने वागायचे, सर्वार्ंबद्दल चांगले बोलायचे. सर्वांशी चांगले वागायचे. कोणाशी भांडायचे नाही.”

“मग तसे तर आम्ही वागतोच आहोत.” मीराने हसत-हसत स्वराला टाळी दिली.

“माणूस उत्सवप्रिय आहे. राग, असूया, द्वेष यावर आपण विजय मिळवायचा तर सर्व धर्माचे सण-समारंभ साजरे करायला काय हरकत आहे!” माझा युक्तिवाद.

“मला मेंलीला काय कळतंय? पण भाऊजी, इतरांचा द्वेष सोडायचा तर, आपण सर्व सण-समारंभात आनंद घेऊ या की. नाही का?” काऊचा प्रश्न.

“होय, माम्या तर प्रत्येक धर्माच्या सणात नाचतोय. माहीत आहे काय? बकरी ईदला त्यांनी रक्तदान ठेवलं होतं.” आदिला मामाचे कौतुक वाटत होते.

“राग -द्वेष सोडला पाहिजे? ठरलं तर. आजपासून राग- द्वेष सोडायचा आणि सर्व धर्मांच्या सणात सामील व्हायचं.” पोरांनी निर्मळ मनाने घोषणा केली.

आणि संस्कृतिरक्षक गुरुजी त्यांच्याकडे पाहातच राहिले.

लेखक संपर्क : 9764147483


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]