प्रभावी संप्रेषक आणि परस्पर नातेसंबंध

डॉ. चित्रा दाभोलकर -

किशोरावस्थेत म्हणजेच बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करताना लागणार्‍या संक्रमणाच्या काळात जीवनकौशल्ये म्हणजे काय, ती आत्मसात करण्याची निकड, याची मुलांना जाणीव करून देणे आवश्यक आहे. या तिसर्‍या भागात आपण ‘प्रभावित संप्रेषण’ म्हणजे काय, ते समजून घेऊ. संप्रेषण म्हणजे संवाद. विचारांची देवाण-घेवाण, भावनांचे आदान-प्रदान किंवा भाषिक संवाद साधणे, हे सर्व म्हणजे संप्रेषण. संप्रेषणात माहिती, मते, भावना आणि विचार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे अचूकपणे पोचवले जाण्याची क्रिया अभिप्रेत असते. प्रभावी संप्रेषणाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला दुसर्‍या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेता आले पाहिजे. दुसर्‍याचे ऐकणे, त्यावर विचार करणे, आपले मत, आपले विचार आणि आपल्या भावना दुसर्‍याला समजेल अशा पद्धतीने व्यक्त करता येणे, याला प्रभावी संप्रेषण म्हणतात.

आपले म्हणणे, मत, भावना किंवा विचार दुसर्‍याला सांगण्यापूर्वी आपल्या मनात त्याविषयी सुस्पष्ट कल्पना असणे जरुरी आहे आणि ते व्यक्त करताना शाब्दिक किंवा अशाब्दिक (देहबोलीतून) पद्धतीने वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.

किशोरावस्थेत येणार्‍या अनेक मानसिक समस्यांचे निराकरण करताना प्रभावी संप्रेषण उपयुक्त ठरते. या काळात तारुण्यसुलभ भावनेतून भिन्नलिंगी आकर्षण (थोडक्यात प्रेमात पडणे), धोका पत्करायची वृत्ती, नवनवीन गोष्टी करून बघायचे धाडस अशा अनेक अनेकविध वृत्ती जागृत होतात. अशा वेळी कल्पनांची आणि भावनांची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी संवादकौशल्य आवश्यक असते. ती सुलभ झाली तर किशोरवयीन मुलांना योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढते. तसेच संवादामुळे एकमेकांच्या मनात बसलेली विरोधी विचारधारा दूर करण्यास मदत होते. समाजात ऐक्य, सामंजस्य हवे असेल, तर विविध विचारधारांच्या माणसांमध्ये संवाद असणे आवश्यक आहे. विचारांप्रमाणेच भावना व्यक्त करणे, दुसर्‍या व्यक्तीला समजून घेणे, हे कौशल्य अंगी बाणवणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. परस्परसामंजस्य असेल, तरच संवाद होऊ शकतो आणि प्रभावी संप्रेषणामुळे एकमेकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होते. एकमेकांशी बोलून माहितीची देवाण-घेवाण झाल्याखेरीज गैरसमज दूर होणे शक्य नसते. त्यामुळे जर संवाद नसेल, तर गैरसमज वाढत जातात आणि त्यातून तेढ वाढत जाते. वैयक्तिक; तसेच समाजाच्या विकासाला ते अपायकारक ठरते.

वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैश्विक पातळीवर प्रभावी संप्रेषण वातावरण मोकळे करण्यास, भयमुक्त करण्यास आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करते. बालपणापासून मोकळेपणाने आपले विचार, आपल्या भावना शाब्दिक किंवा अशाब्दिक अशा पद्धतीने व्यक्त करण्याचे कौशल्य मुलांमध्ये रुजवले पाहिजे. ज्या घरात, ज्या समाजात हे कौशल्य डोळसपणे मुलांमध्ये रुजवले जाते, तिथे मुलांची मानसिक वाढ आणि सर्वांगीण विकास चांगला होण्याची शक्यता अधिक असते. संप्रेषणाबरोबरच परस्पर नातेसंबंध निरोगी राखण्याचे कौशल्यसुद्धा मुलांना शिकवण्याची नितांत गरज आहे.

बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक जवळीक हा मानवी नातेसंबंधांचा खरा अर्थपूर्ण पाया आहे; परंतु भावनिक जवळीक दाखवण्याची किंवा स्पर्श करून भावना व्यक्त करण्याची कित्येकांना लाज वाटते, त्यांना कमीपणा वाटतो. असा माणूस एकाकी पडतो.

किशोरावस्थेत मुले अधिक संवेदनशील असतात. ‘स्व’च्या शोधात असतात. आजूबाजूच्या माणसांशी विविध स्वरुपात नाती जोडण्याच्या कालखंडात असतात. याच वेळी त्यांच्या आई-वडिलांबरोबरच्या आणि आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींबरोबरच्या नात्यात बदल घडून येत असतात. याच काळात आपण त्यांना निरोगी आणि सुसंवादी अशी नाती जोडण्यास आणि टिकवण्यास शिकवलं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक ठरते. सहकार्याचे, एकमेकांवर अवलंबून असण्याचे, एकमेकांना आधार देणारे नातेसंबंध हे माणसाच्या आरोग्याला पोषक असतात. निरोगी नातेसंबंधाचे काही गुणधर्म आहेत. एकमेकांना समजून घेणारे, एकमेकांना जोडून ठेवणारे, एकमेकांची काळजी करणारे, एकमेकांना पूरक असणारे, एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांना मान्य करणारे, भावनिक-शारीरिक आणि मानसिक बंध जोडणारे, आधार देणारे, नि:स्वार्थी, एकमेकांवर विश्वास असणारे, तडजोडीस तयार असणारे, ऊबदार, मोकळा संवाद ठेवणारे, एकमेकांचा आदर ठेवणारे, एकमेकांना मोकळीक देणारे, एकमेकांच्या नात्याबाबत गंभीर असणारे (सिन्सिअर) आणि एकमेकांना आरामदायी वाटणारे नाते निरोगी असते. दोन व्यक्तींमधील संबंध हे एकमेकांविषयी असलेला आदर, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांच्यावर अवलंबून असतात.

आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जीवन विस्कळीत झाले असताना लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्यातील हिंसक प्रवृत्तीही वाढलेली दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पंधरा-वीस वर्षांपूर्वी केलेल्या भाकितानुसार मलेरिया, टीबी यांसारख्या सांसर्गिक रोगांच्या जागतिक साथीबरोबरच आता हिंसाचाराची साथ येऊ घातली आहे. याची जाणीव समाजातील एक जागरूक घटक म्हणून आपल्याला झाली पाहिजे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी ‘जीवनकौशल्य शिक्षणा’ची लस सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. विशेषत: उद्याचे जबाबदार नागरिक म्हणून सर्व मुलांना देणे आवश्यक आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]