वेद केले फोल

ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

गीता हेच वेदांचे मूळ आहे, या आपल्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात –

जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे ।

तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥ १४३० ॥

तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।

गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥ १४३१ ॥

म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज ।

गमे आणि सहज । दिसतही आहे ॥ १४३२ ॥

जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग ।

भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥ १८/१४३३ ॥

स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते त्याचे बीज असे जगात म्हणतात. वृक्ष सूक्ष्मरूपाने बीजामध्ये असतो. कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये बीजात वृक्ष असावा तसा आहे आणि म्हणूनही वेदांचे बीज म्हणजे गीता असे मी म्हटले ते तसे सहज दिसतही आहे.

कर्म, ज्ञान, उपासना हे वेदांचे तीन भाग गीतेमध्ये उत्तम रितीने उमटले आहेत.

यापुढे कर्म, ज्ञान, उपासना ही तीन कांडे गीतेमध्ये कशी कशी आहेत याचे सविस्तर वर्णन माउलींनी केले आहे. यानंतर माउली म्हणतात –

एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी ।

गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥ १८/१४५० ॥

याप्रमाणे कर्म, उपासना, ज्ञान त्या तिन्ही कांडांचे निरूपण करणारी गीता ही गोजिरवाणी श्रुतीच आहे.

एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभगवद्गीता प्रबंधु ।

हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥ १४५६ ॥

वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।

जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥

येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।

अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥ १४५८ ॥

तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें ।

वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥ १८/१४५९ ॥

हा श्रीभगवद्गीता ग्रंथ सगळ्या ज्ञानाचा समुद्र आहे. मूर्तिमंत वेदच आहे, पण औदार्याच्या बाबतीत वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. वेद अत्यंत संपन्न खरा, पण तीन वर्णांच्याच कानी त्यांनी आपले ज्ञान असावे असा नियम करून आपल्या मनाची कृपणताच (कंजूषपणा) दाखवली. संसार-दुःखात सापडलेल्या स्त्रीशूद्रादिकांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असा निर्णय करून वेद स्वस्थ राहिले. विचार केल्यावर मला वाटते की मागचे हे उणे फेडावे आणि कुणाच्याही उपयोगी पडावे या सद्बुद्धीने वेद गीतारूपाने पुन्हा प्रकट झाला.

ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा ।

गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥

परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया ।

रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥ १४६३ ॥

तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे ।

कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ १४६४ ॥

यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं ।

रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥ १४६५ ॥

म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता ।

श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥ १८/१४६६ ॥

आता या गीतेची सेवा कोणत्याही रूपाने करणार्‍या संसाराच्या चव्हाट्यावर मोक्षाचे मुक्तद्वार उघडले आहे. अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास आणि सूर्यप्रकाशाला वावरण्यास जसे आकाश हेच आवार आहे त्याप्रमाणे उत्तम, मध्यम आणि अधम असा भेदभाव मनात न आणता कैवल्यदान करून जगाला निवविण्यासाठी हा वेदांचा नवा अवतार कृपणपणाच्या अपकीर्तीला भिऊन झाला आहे. गीतेच्या पोटात शिरून त्याने आता उत्तम कीर्ती मिळविली. सहज सेवन करता यावे असे सुंदर रूप वेदांनी गीतेमध्ये घेतले आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातून हा बोध प्रफुल्लित करीत नेला.

अशा प्रकारे ज्ञानेश्वर माउलींनी धर्मग्रंथ म्हणून वेदांच्या जागी गीतेची प्रतिष्ठापना केली. हे प्रतिपादन ज्ञानेश्वर माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये केले आहे. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी सांगितली ही क्रांतीच आहे, ती कशी हे डॉ. सदानंद मोरे स्पष्ट करतात, ते असे –

“स्त्री आणि शूद्रांना वेदांचा अधिकार नसल्यामुळे व्यासांनी त्यांच्यासाठी गीता रचली हे आपण पाहिलं. पण कालांतराने स्त्री, शूद्रांना गीता ज्या भाषेत आहे, ती संस्कृत भाषाच समजेनाशी झाल्यामुळे त्यांच्यासाठी गीता असून, नसल्यासारखीच झाली. त्यांना मिळालेला धार्मिक आणि आध्यात्मिक समतेचा अधिकार केवळ उपचारापुरता उरला. त्याची प्रत्यक्षात व्यवहारात अंमलबजावणी अशक्य झाली.

स्त्री, शूद्रांची ही कोंडी ज्ञानेश्वरांनी फोडली. ती फोडण्याचा एकच मार्ग त्यांना उपलब्ध होता. तो म्हणजे, सर्व शूद्रांना समजणार्‍या भाषेत गीतेचा अर्थ विशद करून सांगणं. महाराष्ट्रात अशी भाषा अर्थातच मराठी होती. म्हणून ज्ञानेश्वरांनी आपली भगवद्गीतेच्या अर्थनिर्णयाची टीका मराठीत लिहिली. ही फार मोठी भाषिक क्रांती होती.”

भगवद्गीता हा श्रीकृष्णाने केलेला उपदेश आहे. वारकरी संप्रदायाचे म्हणजेच भागवत धर्माचे दैवत श्रीविठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानलेला आहे. ज्ञानेश्वरी म्हणजेच मराठी भाषेतील भगवद्गीतेचा अवतार असल्याने वारकर्‍यांनी तिला वेदांच्या जागी आपला धर्मग्रंथ म्हणून स्वीकारले. आता वेगळ्या वेदांची काही गरज राहिली नाही. ज्ञानेश्वर माउलींच्या या कार्याचे वर्णन संत नामदेवांनी मार्मिक शब्दांत केले आहे, ते असे –

गुह्य काढोनिया वेद केले फोल॥

आपण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला भगवद्गीतेचा अर्थ कसा अचूक आहे, हे सांगताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात –

मूळग्रंथीचिया संस्कृता । वरि मर्हाटी नीट पढतां ।

अभिप्राय मानलिया उचिता ।

कवण भूमी हे न चोजवे ॥ १०/४३ ॥

ज्ञानेश्वरी हे माझे गीताभाष्य कसे आहे याविषयी ज्ञानेश्वर माउली आत्मविश्वासाने सांगतात, मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रितीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला, तर कोणता ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही.

ज्ञानेश्वरीला धर्मग्रंथ म्हणून मान्यता देण्याचे आणखीन एक कारण आहे. स्वतः ज्ञानेश्वर माउली या भगवंताच्या अवतारच आहेत, अशी वारकरी संतांनी दिलेली मान्यता आहे.

संत जनाबाई म्हणतात –

महाविष्णूचा अवतार श्री सखा माझा ज्ञानेश्वर ॥

संत सेना महाराज ज्ञानेश्वर माउलींचे वर्णन करताना म्हणतात –

प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी।

तारिले जगाशी नाममात्रे॥

ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी प्रसंगी नामदेवरायांना अत्यंत दुःख झाले. त्या वेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचे सांत्वन केले ते असे –

देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥

तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥

माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥

नाम्या उपजे मानसीं । ऐसें म्हणे ह्रषीकेशी ॥४॥

हे संत नामदेवरायांनी केलेले वर्णन आहे.

तर संत रामा जनार्दनी यांनी ज्ञानेश्वर माउलींच्या आरती मध्ये म्हटले आहे –

अवतार पांडुरंग। नावं ठेविले ज्ञानी॥

ज्ञानेश्वर माउली हा प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार असल्याने त्यांच्या बोलांना वेदांच्या श्रुतींचाच दर्जा आहे. किंबहुना, ज्ञानेश्वरीतील ओव्या या वारकर्‍यांच्या दृष्टीने वेद श्रुतीच होत.

ज्ञानेश्वरीत सांगितलेले तत्त्वज्ञानच सर्व वारकरी संतांनी आपल्या अभंगातून वारंवार सांगितले. संत तुकाराम महाराज आपले अभंग हे भगवंताचेच उद्गार आहेत, भगवंत माझ्या मुखातून बोलवतो असे वारंवार सांगतात. तुकोबांचे बोल प्रसिद्ध आहेत –

आपुलिया बळें नाहीं मी बोलत ।

सखा कृपावंत वाचा त्याची ॥

आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात –

करितों कवित्व म्हणाल हें कोणी ।

नव्हे माझी वाणी पदरींची ॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार ।

मज विश्वंभर बोलवितो ॥

काय मी पामर जाणे अर्थभेद ।

वदवी गोविंद तेंचि वदें ॥

त्यामुळे वारकरी संप्रदायाने तुकोबांच्या वाणीला वेदश्रुतींचाच दर्जा दिला आहे. वै. मामा दांडेकर तुकोबांच्या अभंगांना “तुकोपनिषद” म्हणत असत.

संत रामेश्वर भट्ट तर द्विजांना स्पष्टपणे सांगतात –

रामेश्वर भट्ट म्हणे द्विजा। तुका विष्णू नाही दुजा॥

अशा प्रकारे वारकरी सांप्रदाय वेद प्रामाण्य मानतो म्हणजे ज्ञानेश्वरी व तुकोबांचा गाथा यांचे प्रामाण्य मानतो. राजारामशास्त्री भागवत यांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवले पाहिजेत, ते असे –

‘ज्ञानेश्वरी व तुकारामबोवांची गाथा या दोन्ही ग्रंथांस आम्हा मराठ्यांचा आगम म्हटले असता ते यथार्थ आहे. आम्हा मराठ्यांस नाही श्रुतींची गरज, नाही स्मृतींची गरज, नाही भगवत्पादांच्या वेदान्तभाष्याची गरज. …जर एखादा धर्मसंबंधी महासिद्धांत मराठ्यांस अगदी सुलभ करून देण्याची इच्छा असली, तर जसे ख्रिस्ती लोक बायबलाच्या वचनाच्या आधारे बोलतात, त्याप्रमाणे आम्हा मराठ्यांस ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामबोवांच्या वचनांचा आधार धरून काम केले पाहिजे.’

लेखक संपर्क : ९४२२०५५२२१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]