ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
पाप कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. हिंसा करणे, असत्य बोलणे, चोरी करणे, परस्त्री अगर परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवणे, मद्यपान अगर व्यसन करणे, परद्रव्य हरण करणे, अशा अनेक निषिद्ध कर्मांचा संतांनी उल्लेख केलेला असून ही कर्मे तुम्ही कधीही करू नका, असा उपदेश केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात –
पाप त्याचें नांव न विचारितां नीत ।
भलतें चि उन्मत्त करी सदा ॥
नीती-अनीतीचा विचार न करता उन्मत्तपणाने भलतेच काहीतरी करत राहणे हे पापच होय.
आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात –
पुण्य पर उपकार । पाप हे परपीडा ॥
दुसर्यावर उपकार करणे हे पुण्य असून दुसर्याला पीडा करणे, त्रास देणे हे पाप आहे. संत निळोबाराय यांनी पाप म्हणजे काय हे एका अभंगामध्ये सांगितले आहे ते असे –
पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार ॥
पाप तेंचि निंदा परपीडा द्वेष ।
पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥
पाप तेंचि जीवीं विषयाची आसक्ति ।
पाप अभक्तीं कुळाचारीं ॥
निळा म्हणे पाप मुख्य तेंचि साचें ।
नावडे देवाचें नाम मुखीं ॥
सर्वसाधारपणे यज्ञ, याग आणि तत्सम कर्मकांड विधी आपण पुण्य संपादन करण्यासाठी करतो. या पुण्य संपादनातून आपले या लोकीचे नाहीतर परलोकीचे (स्वर्ग) जीवन सुखमय होईल, अशी आपली कल्पना असते.
पुण्य संचयाने स्वर्ग मिळतो आणि पापाचा संचय झाला की नरक. मग स्वर्ग मिळवण्यासाठी जे जे विधी करायचे ते पुण्य आणि निषिद्ध कर्म ते पाप अशी आपली पाप-पुण्याची व्याख्या असते.
ज्ञानेश्वर माउलींनी ही व्याख्याच बदलली. त्यांनी पाप-पुण्याला दिलेला अर्थ किती सखोल, किती वेगळा आहे पाहा
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे ।
पापात्मके पापे नरका जाइजे ।
स्वर्गाला जाण्यासाठी तुम्ही जे विधी, यज्ञ, याग करता ते पुण्य नव्हेच ते पाप आहे पाप! फक्त पुण्यात्मक पाप एवढंच. उडदामाजी काळे गोरे – काळे काय, गोरे काय, उडीद ते उडीदच. पाकीटमारी करणारा काय आणि घरफोडी करणारा काय – दोन्ही चोरच. एकाला दुसर्या दिवशी नवी चोरी करावी लागेल. दुसर्याला कदाचित काही काळ ऐशआरामात जगता येईल.
अरे मग आपण पुण्य समजत होतो ते पुण्य नसून पापच आहे, तर खरे पुण्य कोणतं? ज्ञानेश्वर माउलींनी याचे उत्तर पुढे दिले आहे –
मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥
माझे स्वरूप ज्याने जाणता येतं, ते खरे शुद्ध पुण्य. हे शुद्ध पुण्य कोणतं? ज्ञानेश्वरीतच किमान दोन यज्ञांचा उल्लेख आहे. १. स्वधर्म रूपी नित्ययज्ञ २. नामस्मरण रूपी जपयज्ञ.
इतर यज्ञादी विधींना पुण्य का म्हणायचे नाही? माउलींची भाषा कठोर बनते. आपण सर्व त्याच्यातच सामावलेले आहोत. मग त्याला दुसरीकडे शोधणे अगदी स्वर्गात याला पुण्य कसे म्हणता? तुमची जीभ कशी झडत नाही!
आणि मजचिमाजीं असतां ।
जेणें मी दूरी होय पांडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥
माउलींनी ज्या स्वर्गाकडे जाणार्या चोरांच्या आडवाटेचा उल्लेख केला आहे. तो उल्लेख यज्ञ-यागादी काम्यकर्माबाबत आहे हे कशावरून? तुम्ही उगीच याज्ञिकांना धोपटता असा आरोप कोणी करील म्हणून याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. माउली स्वर्गसुखाचे विस्तृत वर्णन प्रथम करतात त्याची सुरुवात अशी –
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित ।
यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥
याप्रमाणे ते यज्ञ करणारे (वस्तुत:) माझी आराधना करतात. पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात.
मग मी न पविजे ऐसें । जें पापरुप पुण्य असे ।
तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥
माउली पुन्हा सांगतात, मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे पापरूप पुण्य आहे, त्यामुळे मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गात येतात. पुढे स्वर्गाचे विस्तृत वर्णन आहे. स्वर्गात काय काय आहे? न मरणे हे सिंहासन आहे. ऐरावत वाहन आहे. अमरावतीसारखी राजधानी आहे. महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, कामधेनूचे कळप आहेत. देवसमुदाय सेवक आहेत. चिंतामणीच्या जमिनी आणि करमणुकीकरिता कल्पवृक्षांचे बगीचे, गंधर्वांचे गाणे, रंभेसारख्या अप्सरांचे नृत्य आहे. विलास करण्याकरिता उर्वशीसारख्या अप्सरा आहेत. इथे शय्यागृहात प्रत्यक्ष मदन (कामदेव) चाकरी करतो, इत्यादी – इत्यादी. पण हे सर्व तुच्छ! का?
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे ।
मग दारही चेपूं न ये तियेचें ।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगो ॥
मग या पापात्मक पुण्याचा साठा संपला की इंद्रपणाचे तेज नाहीसे होते. मृत्युलोकात परतावे लागते. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा संपला की तिच्या दाराला हात लावण्याची सोय नसते. तशी या यज्ञकर्त्यांची लाजिरवाणी स्थिती आहे. सामान्य माणसाला पारलौकिकाचे आकर्षण राहू नये म्हणून स्वर्ग-नरकाचे माउलींचे हे शवविच्छेदन !
संत तुकाराम महाराज हाच विचार एका अभंगात सांगतात तो असा –
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥
कैचें पुण्य तिये गांठी । व्रतें वेची लोभासाठी ॥
वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥
तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमल ॥
पती बाहेरगावी गेला असेल तर सुखरूप घरी यावा यासाठीच पत्नी नवस करते, पण ते व्रत ती लोभासाठी करते. त्यामुळे तिच्या ठिकाणी पुण्य राहात नाही. संतान वाढवावे, घरांमध्ये धनधान्याची वाढ व्हावी यासाठी लोक यज्ञयाग असे कर्म करतात. हे असे केले तर परीस देऊन त्याच्या बदल्यात गारगोटी मागितल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सोमल नावाचे विष भरपूर द्रव्य देऊन विकत घ्यावे तसेच मूर्ख मनुष्य सकाम बुद्धीने व्रत करतात आणि ते व्यर्थ वाया घालवितात.
निषिद्ध कर्म हे पाप कर्म असल्याने ते करायचे नाही हे निश्चितच. याबाबत स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता नाही. पण सर्वसाधारणपणे पुण्य कर्म समजून आपण जप-तप पूजा इत्यादी कर्मकांड करत असतो. ही कर्मे करताना आपल्या मनामध्ये जर काही कामना असेल तर ते काम्यकर्म होते. उदाहरणार्थ पूजा करताना आपण संकल्प करतो –
“ममात्मनः सपरिवारस्य सर्वारिष्ट निरसन पूर्वक सर्वपाप क्षयार्थं, दीर्घायु शरीरारोग्य कामना धन-धान्य-बल-पुष्टि-कीर्ति-यश लाभार्थं, श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं, सकल मनोरथ सिद्ध्यर्थं ……..करिष्ये।”
मी आणि माझ्या परिवार यावरील सर्व संकटे दूर जाऊ देत, आम्ही केलेले सर्व पाप नष्ट होऊ दे, आम्ही दीर्घायु होऊ दे, आमचे आरोग्य उत्तम राहू दे, आम्हाला धनधान्य, बल, यश, कीर्ती मिळू दे, आमच्या सर्व कामना पूर्ण होऊ दे यासाठी आम्ही ही पूजा अगर उपासना करीत आहोत. अशी कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण उपासना केली तर ते काम्यकर्म होय. असे काम्यकर्म करणे पुण्य कर्म नसून पाप कर्मच आहे, असे ज्ञानेश्वर माउली निक्षून सांगतात, अशा कर्माचा निषेध करतात व असे कर्म तुम्ही करून आपले पापच वाढवत आहात, असा इशारा देतात.