प्रा. प्रविण देशमुख -
20 ऑगस्ट, 2022 रोजी पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चित्रकार उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा रविवर्मा कलादालनात हे चित्र प्रदर्शन 20 ते 22 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले होते. चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्य कार्यकारी समिती सदस्य मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव; तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले हे आवर्जून उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, प्रख्यात लेखक सदानंद मोरे आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
पूर्वी चित्रकला शिक्षक असलेले आणि आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्ण वेळ पदाधिकारी असलेले डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष उदय देशमुख यांनी ‘माणूस मारता येतो; विचार मारता येत नाहीत’ या थीमवर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण खुनावर आधारित अनेक चित्रे विविध माध्यमांचा वापर करून तयार केलीत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर समाजप्रबोधनाच्या चळवळीत काम करणार्या सर्वच समाजसुधारकांचे पोर्ट्रेटस् तयार केलीत. यामध्येे राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बी. प्रेमानंद, अब्राहम कोवूर, डॉ. एन. डी. पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेकांची पोर्ट्रेटस् तयार केलीत.
आजपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिथे-जिथे कार्यक्रम झालेत, त्या अनेक ठिकाणी तर भरवण्यात आले; त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी या चित्रांचं भरभरून कौतुक केलं. यातूनच या सर्व चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन भरवण्याची कल्पना समोर आली. या प्रदर्शनासाठी चित्रकार उदय देशमुख यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त गणेश चिंचोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
– प्रा. प्रवीण देशमुख, डोंबिवली