प्रा. प. रा. आर्डे - 9822679546

संगर म्हणजे संघर्ष. विज्ञानाची प्रगती सुखासुखी झालेली नाही. विज्ञानाच्या निर्मितीपासून ते आजतागायत धर्म आणि विज्ञान यांचा संघर्ष चालूच आहे. विज्ञानाने अनेक धार्मिक गैरसमजुतींशी कडवट संघर्ष केला आहे. हा संघर्ष जेवढा रोमांचकारी, तेवढाच वेदनादायीसुद्धा आहे. विज्ञानाच्या वाटेवर धर्माने अनेक अडथळे आणले; पण त्यावर मात करीत विज्ञान पुढे चालले आहे. विज्ञान आणि धर्म यांच्यातील हा संगर अखेर विज्ञानानेच जिंकला. सतराव्या शतकात दाखल केलेल्या गॅलिलिओवरील खटल्याचा निर्णय पोपने विसाव्या शतकाच्या अखेरीस दिला. त्याला निर्दोष ठरविले. विज्ञानाची विश्वरचनेची कल्पना धर्माने मान्य केली. आज हीच कल्पना विज्ञानाच्या शिक्षणात समाविष्ट झाली आहे. सत्याचा विजय झाला; पण गॅलिलिओला छळून.
विज्ञान आणि धर्म यांच्यात संघर्ष होण्याचे कारण म्हणजे धर्माने सृष्टीच्या रचनेबाबत आणि विश्वातील मानवाच्या स्थानाविषयी आणि उत्पत्तीविषयी मांडलेले अज्ञानमूलक विचार. ‘बायबल’ या ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथात विश्वरचना आणि त्यातील मानवाचे स्थान याबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. आकाशातील ग्रह-तार्यांचे अस्तित्व ही मानवासाठी परमेश्वराने केलेली योजना आहे आणि या योजनेत माणसाला मध्यवर्ती स्थान आहे. परमेश्वराने विश्व माणसासाठी निर्माण केले, अशी ही धर्मकल्पना. या कल्पनेला कोपर्निकस-गॅलिलिओ यांच्या क्रांतीमुळे आव्हान मिळाले. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांचं अस्तित्व माणसासाठी नाही. माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू नाही, ही विज्ञानप्रणित कल्पना ख्रिस्ती धर्मपीठाने अमान्य केली. गॅलिलिओच्या सूर्यकेंद्री कल्पनेला त्याने पुरावा देऊनही केवळ धर्मवचनांच्या विरोधात म्हणून धर्मपीठाने गॅलिलिओला पाखंडी ठरवले. त्याला न्यायासनासमोर खेचून नजरकैदेची शिक्षा दिली. विज्ञान आणि धर्म यांच्यातील हा संगर अखेर विज्ञानानेच जिंकला. सतराव्या शतकात दाखल केलेल्या गॅलिलिओवरील खटल्याचा निर्णय पोपने विसाव्या शतकाच्या अखेरीस दिला. त्याला निर्दोष ठरविले. विज्ञानाची विश्वरचनेची कल्पना धर्माने मान्य केली. आज हीच कल्पना विज्ञानाच्या शिक्षणात समाविष्ट झाली आहे. सत्याचा विजय झाला; पण गॅलिलिओला छळून.
गॅलिलिओनंतर न्यूटनने वैज्ञानिक पद्धतीचा विस्तार केला. विज्ञानाचे महत्त्व लोकांना पटू लागले. हळूहळू का होईना भौतिक सृष्टी आणि जीवसृष्टी यात सखोल संशोधनाला प्रारंभ झाला. रसायनशास्त्रातील प्रगतीने वस्तूंची निर्मिती होऊ लागली. भौतिक विज्ञानाच्या प्रगतीने दळणवळण सुलभ होऊ लागले. शरीरविज्ञानाच्या संशोधनातून अमूल्य माहिती मिळू लागली; पण नवे विचार, नव्या कल्पना सामान्य लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. विज्ञानाचं संशोधन एका विशिष्ट वर्तुळात फिरत असतं, सामान्य लोकांपर्यंत ते लवकर पोचत नाही; परिणामी विज्ञानाने फोल ठरवलेल्या परंपरा-रुढी आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव जनमानसाच्या वर असतोच. पुरोहित नावाच्या धर्माच्या ठेकेदारांना सामान्य माणूस परंपरेच्या ओझ्याखाली दबून राहावा, असेच वाटत असते; परिणामी नवे संशोधन करणार्या संशोधकांना सामाजिक रोषाला बळी पडावे लागते. याची काही ऐतिहासिक उदाहरणे समजून घ्यायला हवीत.
देवाचा शाप उलटवला
इ. स. 1752 साली धार्मिक अंधश्रद्धेतून समाजाला मुक्त करणारा एक निर्णायक बदल घडून आला. या अजब परिवर्तनाची कहाणी मोठी रोमांचकारी आहे. इतिहास काळापासून अंगावर वीज पडण्याच्या शेकडो घटना घडत आल्या आहेत. याचे कारणही धर्माने दिले होते. पापी माणसाच्या अंगावर वीज पाडून देव त्याला शिक्षा करतो, असे धर्म सांगत होता. अनेक धार्मिक ग्रंथांतून विजेचा संबंध परमेश्वरी प्रकोपाशी जोडला आहे. ग्रीकांच्या मते ‘झॉईस’ नावाचा देवांचा राजा वीज फेकून मारतो; तर नॉर्वेमधील लोकांना वीज हा ‘थोर’ नावाच्या देवाच्या हातातील हातोडा वाटतो. ‘बायबल’मधील कनवाळू देवही विजेचे अस्त्र सोडू शकतो; मात्र अशा समजुतींमुळे आपल्या भोवताली घडत असलेल्या घटनांबाबत एक विरोधाभासात्मक प्रश्न निर्माण होतो.
वस्तुत: ज्या वस्तू उंच आहेत, त्यांच्यावर वीज बहुधा कोसळते, असा अनुभव आहे. लहान वस्तू त्या मानाने विजेपासून सुरक्षित असतात. आता आधुनिक युगाच्या प्रारंभीच्या काळात युरोपातील कोणत्याही लहान गावी सर्वांत उंच मनुष्यनिर्मित वस्तू कोणती होती? तर ती होती त्या गावातील चर्चची इमारत. या चर्चच्या छपरावर एक उंच मनोरा बांधलेला असे आणि या मनोर्याचे निमुळते टोक पार आकाशात गेलेले असे. याचा अर्थ थोडा विपरीत वाटला, तरी अगदी स्पष्ट होता. परमेश्वरी प्रकोपाचे लक्ष्य बहुतेक वेळा हे प्रार्थनास्थळच ठरायचे. 18 व्या शतकातील 33 वर्षांच्या कालखंडात एकट्या जर्मनीत वीज पडून 400 हून जास्त चर्चच्या इमारतींची नासधूस झाली. यापेक्षाही एक भयंकर गोष्ट म्हणजे गडगडाटी वादळात विजा कडाडू लागल्या, म्हणजे त्या सर्वप्रतापी परमेश्वराला शांत करण्यासाठी चर्चच्या घंटा जोरजोरात वाजवल्या जात आणि मनोर्यात बसून घंटा वाजवणारे हे देवभोळे भक्त त्या विजेच्या तडाख्यात सापडत. वर नमूद केलेल्या 33 वर्षांत एकूण 120 जण अशा प्रकारे मृत्यू पावल्याची नोंद आहे; आणि तरीही मनुष्याने केेले. पाप आणि त्याबद्दल त्याला होणारी शिक्षा, हाच वीज पडण्याचा अर्थ 18 व्या शतकातील माणसाच्या मनात घट्ट रुतून बसला होता.
बेंजामीन फ्रँकलीन या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनातून वरील अंधश्रद्धेवर मात केली; पण हे घडत असताना धर्माने जोरदार विरोध केला. या संघर्षात लोकांनी विज्ञान स्वीकारले आणि अंधविश्वास टाकून दिला. फ्रँकलीनने एका लाकडी चौकटीवर एक पतंग तयार केला आणि त्या चौकटीला धातूची एक अणकुचीदार सळई बसवली. त्या सळईपासून एक दोरी घेऊन, ती त्याने पतंगाच्या दोरीला जोडली. या दोरीच्या दुसर्या (खालच्या) टोकाला फ्रँकलीनने एक लोखंडाची किल्ली बांधली.
कल्पना अशी होती की, ढगामध्ये जमा झालेला विद्युतभार पतंगावरील सळई खेचून घेईल व पावसाने भिजल्यामुळे विद्युतवाहक बनलेल्या दोरीवरून तो भार किल्लीपर्यंत येऊन किल्लीवर जमा होईल; परंतु एवढे करून थांबायला फ्रँकलीन काही वेडगळ नव्हता. भिजलेल्या दोरीवरून तो विद्युतभार त्याच्या हातापर्यंत आल्यामुळे त्यालाही इजा होण्याचा चांगलाच संभव होता. हा धोका टाळण्यासाठी किल्लीपासून खाली पतंगाच्या दोरीला त्याने एक दुर्वाहक रेशमी दोरी बांधली व ती दोरी हातात धरली; तसेच ही रेशमी दोरी भिजू नये व आपणही कोरडे राहावे, म्हणून तो एका झाडाखाली येऊन उभा राहिला. या योजनेमुळे त्याचा विद्युतभाराशी संपर्क येणे अशक्य होते.
जोराच्या वार्यामुळे पतंग आकाशात विहरू लागला आणि वादळी ढगही आकाशात जमू लागले. बघता-बघता पतंग ढगात नाहीसा झाला आणि त्याचवेळी पतंगाला बांधलेल्या दोरीच्या दशा एकमेकींपासून अलग होऊन ताठ उभ्या राहिल्या. विद्युतभार जमा होत आहे, हे फ्रँकलीनच्या लगेच लक्षात आले. परंतु यानंतरचा भाग खरा धोक्याचा होता. फ्रँकलीनने तेही धाडस केले. त्याने आपली मूठ लोंबणार्या किल्लीजवळ नेली. ताडकन् एक ठिणगी किल्लीपासून निघून त्याच्या मुठीवर येऊन आपटली. फ्रँकलीनला मंद कडकड आवाज ऐकू आला आणि हाताला झिणझिण्याही जाणवल्या. हजारो वेळा पाहिलेली ‘लेडन बरणी’तील हीच ती ठिणगी आणि हाच तो आवाज. फ्रँकलीनच्या मनात चमकून गेले. फ्रँकलीनने मग आणखी एक गोष्ट केली. या विज्ञानप्रयोगातील ती पुढली पायरीच होती. त्याने आपल्याबरोबर विद्युतभार नसलेली एक ‘लेडन बरणी’ आणली होती. (लेडन बरणी हे विद्युतभार शोधून काढणारे एक उपकरण आहे.) तिचे एक टोक किल्लीला लावल्याबरोबर ती बरणी विद्युतभारित झाली. निसर्गातील विद्युत व प्रयोगशाळेतील विद्युत यात काहीच फरक नाही, हेही फ्रँकलीनच्या लक्षात आले.
आकाशात चमकणारी वीज म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून ढगांवरील घर्षणामुळे तयार झालेल्या विद्युतभाराचे विशाल ठिणगीरूप विसर्जन असते, हे फ्रँकलीनने स्पष्टपणे दाखवून दिले.
प्रयोगशाळेतील निरीक्षणातून फ्रँकलीनच्या असे लक्षात आले होते की, बोथट टोकापेक्षा अणकुचीदार टोक असलेल्या वस्तूंमुळे विद्युतभाराचे विसर्जन चटकन होते. या तत्त्वानुसार जमिनीवरील कोणत्याही इमारतीच्या शेंड्यावर जर धातूचा एखादा टोकदार दांडा बसवला व तो दांडा जमिनीच्या व्यवस्थित संपर्कात आणला (अर्थिंग), तर गडगडाटी वादळात त्या इमारतीवर जमा होणारा विद्युतभार दांड्याच्या टोकातून मुकाटपणे विसर्जित होईल. त्यामुळे त्या वास्तूवर विद्युतभार जमा झाला तरी वीज कोसळण्याइतके आक्राळ-विक्राळ रूप तो धारण करणार नाही आणि ती इमारत वीज पडण्यापासून वाचेल.
फ्रँकलीनने 1753 साली अशा विद्युत निवारकाची कल्पना पुढे मांडली. ही कल्पना इतकी साधी होती, त्यामागील युक्तिवाद इतका स्वच्छ होता, त्यासाठी लागणारी सामग्री इतकी थोडी होती व पैसा इतका अल्प होता आणि त्यापासून मिळणारा संभाव्य फायदा इतका मोठा होता की, त्याने लोक तात्काळ प्रभावित झाले नसते, तरच नवल ठरले असते. ताबडतोब फिलाडेल्फिया या एकाच गावात शेकड्यांनी विद्युत निवारकाचे ध्वज घराघरांवर दिसू लागले. त्यानंतर न्यूयॉर्क, बोस्टन व अल्पावधीत सर्व युरोपभर हाच प्रकार दिसून आला.
आणि अशा प्रकारे विद्युत निवारक घराचे संरक्षण करतात, याची लोकांना खात्री पटू लागली. जेथे-जेथे असे निवारक लावले गेले, तेथे वीज पडण्याचे प्रकार खूप कमी होऊ लागले. मनुष्याच्या इतिहासात, अगदी पहिल्यांदाच निसर्गाचा ‘शाप’ उलटविला गेला आणि हा जो विजय माणसाने मिळवला तो जादूने, दैवी शक्तीने किंवा कुणाची आळवणी करून नव्हे, निसर्गाच्या नियमांना ओलांडून नव्हे; तर विज्ञानाच्या पद्धतीने तो नियम समजावून घेऊन आणि त्याच्याशी डोळस सहकार्य करून!
पण हे मान्य करेल तर तो धर्म कसला! वीज पडणे हा देवाचा शाप नाही, याचा अर्थ देवाचे महत्त्व कमी होईल; मग आपली पुरोहितशाही आणि त्यायोगे चालणारी ‘रोजगार हमी’ कशी चालणार? विजेपासून लोकांचे व इमारतींचे संरक्षण करणे, हा वैज्ञानिकांचा प्रयत्न म्हणजे देवाच्या इच्छेला आव्हान होय. हा पाखंडीपणा आहे, असेच ख्रिस्ती धर्माचे समर्थक मानत होते. गंमत म्हणजे 1755 साली म्हणजे लगेच दोन वर्षांनी लिस्बनला प्रचंड भूकंप झाला आणि चर्चमधून अतिशय जल्लोष झाला. विद्युत निवारक वापरणार्या पाखंडी लोकांविरुद्ध आपला राग देवाने पुन्हा एकदा भूकंपाच्या रुपाने व्यक्त केला, अशी घोषणा धर्माच्या ठेकेदारांनी लिस्बनमधील नाक्या-नाक्यावर केली; परिणामी लोक घरावर विद्युत निवारक बसवायला घाबरू लागले. पण चर्चसारख्या उंच इमारतीवर विद्युत निवारक न बसवणे आत्मघातकीपणाचे सिद्ध होऊ लागले. देवाचे निवासस्थान असलेल्या चर्चचे मनोरे, गावातील सर्वांत उंच वास्तू असायच्या आणि त्यावर वीज पडायची; तर साध्या-साध्या विद्युत निवारक लावलेल्या इमारती सुरक्षित राहायच्या. हे लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले आणि लोक आपल्या घरावर विद्युत निवारक बसवण्याचे धाडस करू लागले. अखेर अशी एक घटना घडली की, त्यामुळे ‘विद्युत निवारक’ नावाच्या विज्ञानाचा विजय लोकांनी मान्य केला आणि अंधविश्वास हरला.
इटालीमधील ‘ब्रेसीया’ गावी ही घटना घडली. या गावातील ‘सॅन नाझारो’ चर्चवर निवारक बसविलेला नव्हता आणि त्या चर्चच्या तळघरात शंभर टन गंधकाची दारू साठवून ठेवली होती. गावातील तमाम जनता या बाबतीत निर्धास्त होती. कारण त्या पवित्र ठिकाणावर सर्वांचा एवढा जबरदस्त विश्वात होता की, काहीही झाले तरी तेथे कोणालाही धोका उद्भवणार नाही, याची त्यांना पक्की खात्री होती.
आणि 1764 साली ‘ती’ भयानक शोकांतिका घडली. ‘त्या’ चर्चवर वीज पडली आणि भयंकर स्फोट होऊन जवळजवळ 20 टक्के गाव बेचिराख झाले. 3000 गावकरी तात्काळ मृत्युमुखी पडले. अंधश्रद्धेच्या उत्पाताची ही एक प्रकारे परमावधीच ठरली. या घटनेपासून ‘विद्युत निवारका’ची सरशी आणि अंधश्रद्धेची पीछेहाट सुरू झाली. प्रत्येक चर्चवरील निवारक हा विज्ञानविजयाचा पुरावा ठरला. माणसांनी कल्पनेतून निर्माण केेलेल्या जादूविधीच्या पसार्यात नव्हे; तर विश्वाचे नियंत्रण करणार्या नियमांचा स्वच्छ दृष्टीने शोध घेण्यात परमेश्वराप्रत जाण्याचा मार्ग लपलेला आहे. ही गोष्ट ‘त्या’ धर्मग्रस्त समाजालाही हळूहळू पटू लागली आणि येथे अंधविश्वासाच्या विरोधात विज्ञान विजयी होऊ लागले.
धर्मथोतांड म्हणजेच अंधविश्वास. हा खर्या धार्मिकतेला हानिकारक ठरतो. खरंतर लोकांना अभय देणे, त्यांची नैतिकता वाढविणे आणि नैसर्गिक आपत्तींना धैर्याने सामोरे जावे, ही खरी धार्मिकता होय. याला खरंतर विज्ञानाचे संशोधन अधिक उपयोगी पडते; पण अशा संशोधनाला धार्मिक अंधविश्वासाने विरोध करावा, हे आश्चर्यजनक होय. याचे दुसरे उदाहरण म्हणजे प्रसूतिवेदना कमी करण्याचे भूलतंत्र.
इ. स. 1847 मध्ये जेम्स यंग सिंप्सन या एका स्कॉटिश डॉक्टराने प्रसूतिगृहामध्ये भूलतंत्र वापरण्यास सुरुवात केली आणि धर्मरक्षकांमध्ये एकच क्रोधकल्लोळ उसळला. ‘पवित्रते’च्या या संरक्षकांनी व्यासपीठावरून या नव्या तंत्राची निंदानालस्ती चालविली.
चर्चमधल्या अनेक प्रार्थनासभांतून परमेश्वराच्या ‘त्या’ प्राचीन शापाचे लोकांना पुन:स्मरण करून देण्यात आले. ईव्हने हित व अहित यांच्या ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वराने तिला हा शाप दिला होता. चर्चमधील पाद्री, स्वत: पुरुष असल्यामुळे पुत्रप्रसूतीच्या जीवन-मरणाच्या धोक्यापासून मुक्त होते. त्यामुळे निर्विकार मनाने ते घोकू शकत होते की, ‘तो स्त्रीला म्हणाला की, मी तुझे दु:ख आणि तुझ्या प्रसववेदना सहस्त्रपट वाढवेन. अत्यंत क्लेष होऊनच तू मुलाला जन्म देत राहशील.’
जगातील यच्चयावत सर्व मातांच्या माथी मारलेल्या या अभिशापाचे ते धर्मसंरक्षक समर्थक होते. जो देव प्रत्येक पिढीतील लक्षावधी मातांच्या प्रसूतिकळा, ते दु:ख हलके करण्याचे साधन हाताशी असताना शांतपणे पाहतो, त्या देवाचे भक्त होते. गोष्ट अशी सांगतात की, ‘बायबल’मधील एक उदाहरण देऊन सिंप्सनने त्यांना निरुत्तर केले.
‘बायबल’मध्ये नमूद केलेला पहिला जन्म खुद्द ईव्हचाच आहे. अॅडमच्या बरगडीतून तिचा जन्म झाला आणि ती प्रसूती तरी कशी होती? ‘जेनेसिस 2.21’मध्ये लिहिले आहे – ‘…आणि देवाने अॅडमला एका गाढ झोपेत नेले. अॅडम झोपला. नंतर देवाने त्याची एक बरगडी मोडून काढली आणि त्या ठिकाणची जागा मांसाने पुन्हा भरून टाकली.’
थोडक्यात, सिंप्सनच्या मते देवाने तेथे भूलतंत्रच वापरले. धार्मिक गैरसमजुतीचा प्रतिवाद धर्माच्या आधारे करणे खरं तर अपुरे ठरते. कारण एका अंधश्रद्धेचा दुसर्या अंधश्रद्धेने नि:पात करता येत नाही. त्या काळी धर्माच्या कर्मठ प्रेरणांचा पराभव केला, तो स्त्रियांच्या आंदोलनाने. सर्व मातांनी योग्य वेळी भूल देण्याचा आग्रह धरला आणि परमेश्वराने स्त्री जातीला दिलेला शाप अमान्य केला. अखेर व्हिक्टेरिया राणीनेच तिच्या पुढील बाळंतपणात भूलतंत्राचा स्वीकार केला आणि तेथेच सर्व संघर्ष संपुष्टात आला.
विज्ञानपूर्व काळात सृष्टीतील घटनांचे योग्य आकलन माणसाला होत नव्हते. अशा वेळी मानवाने निसर्गातील विविध घटनांचा परमेश्वर किंवा डेमन म्हणजे दुष्ट देवता कारण आहे, असे समजणे क्षम्य होते. पाप किंवा पुण्य या कल्पना मानवी समाजाशी निगडित आहेत आणि त्यासाठी काही नियम करणे यासाठी धर्माची निर्मिती झाली; पण या विश्वाच्या प्रचंड पसार्यात सूर्य, चंद्र, तार्यांच्या गतीत किंवा भूकंपासारख्या घटना आणि वादळे, पूर यामुळे येणारी आपत्ती या घटना खरंतर मानवनिरपेक्ष असतात. माणसाच्या सुख-दु:खाशी भौतिक घटनांचे काहीही देणे-घेणे नसते; पण धर्म सृष्टीच्या व्यापारात घुसला आणि त्यातून नानाविध अंधश्रद्धांचा पुरोहितांनी बाजार मांडला. त्यातूनच विज्ञान आणि अंधविश्वास यांच्यात संघर्ष होऊ लागला; पण आपल्याला काय हिताचे आणि काय अनहिताचे, याचा विवेक माणसाला असतोच. त्यामुळे केवळ धर्माने सांगितले आहे म्हणून एखादी गोष्ट स्वीकारण्यापेक्षा ती आपल्याला हिताची नाही, हे विज्ञानाने दाखवून दिल्यावर माणूस बदलतो आणि अंधश्रद्धा गळून पडतात. हे ‘विद्युत निवारका’चा शोध आणि ‘भूलतंत्र’ या उदाहरणाबाबत पुरेसे स्पष्ट होते. अंधविश्वास हरतो आणि विज्ञान पुढे जात राहते; पण विज्ञानाचा हा प्रवास काटेरी असतो, एवढे मात्र खरे.
अंधविश्वासाच्या विरोधात अशीच एक मोठी जबरदस्त लढाई 1859 साली सुरू झाली. या लढाईचे कारण होते, चार्लस रॉबर्ट डार्विनचा ‘जीवजातीचा उद्गम’ (ओरिजीन ऑफ स्पेशीज) हा नैसर्गिक निवड तत्त्वावर आधारलेला जीवसृष्टीय उत्क्रांतीचा सिद्धांत धार्मिक विचारवंतांनी याला विरोधाचा लक्ष्यबिंदू केले. अखेर जीवसृष्टीत माणूस हा देवाचा लाडका आहे, या धर्मसिद्धीत मानवी अहंकाराला उत्क्रांतीचा सिद्धांत आव्हान देत होता. गॅलिलिओ-न्यूटनच्या सिद्धांतानुसार विश्वाच्या पसार्यात मानवाचे स्थान नगण्य आहे, हे सांगत होता; तर पृथ्वीवरील प्राणिसृष्टीत माणूस हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे आणि तो माकडापासून उत्क्रांत झाला आहे, असं डार्विनचा सिद्धांत सांगत होता; परिणामी सत्यनिष्ठ विज्ञान आणि मानवी अहंकारातून निर्माण झालेल्या धर्मकल्पना यांच्यात संघर्ष झाला नाही तरच नवल.
वीज किंवा वेदना यांच्यापासून बचाव करून घेण्यासाठी माणूस एकवेळ विज्ञानाच्या बाजूने आणि अंधसमजुतींच्या विरुद्ध उभा राहील. कारण त्यात त्याला त्याचा फायदा दिसतो; परंतु ‘तुम्ही देवाची प्रतिकृती आहात,’ ही विरुद्ध बाजू सांगत असता ‘तुमचे पूर्वज गोरिलासारखे होते,’ हे विधान मान्य करण्यासाठी कुणी विज्ञानाची बाजू घेईल, हे बहुधा असंभवच होते.
उत्क्रांतीवादाबाबत धर्माची बाजू मांडणारा एक राजकीय नेता पुढे आला. ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद असलेल्या या गृहस्थाचे नाव बेंजामीन डिझरेली. हा पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला. तो म्हणाला, “माणूस माकड आहे की देवदूत? माझा कौल निश्चितपणे देवदूताच्या बाजूने राहील.” आणि कुणाला तसं वाटणार नाही? आम जनताही डार्विनच्या सिद्धांताच्या विरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि विज्ञानाला पराभव पत्करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली; पण बहुसंख्य लोकांच्या विरोधाला न जुमानता डार्विनच्या सिद्धांताचे समर्थन करणारा एक अवलिया वैज्ञानिक निघालाच. त्याचे नाव होते, थॉमस हेन्री हक्सले.
इ. स. 1860 मध्ये ऑक्सफर्डला ‘ब्रिटिश असोसिएशन फॉर दि अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेची सभा भरली होती. डार्विनच्या सिद्धांताचा या सभेत सार्वजनिकरित्या निकाल लावावा, असे ऑक्सफर्डच्या एका धर्मोपदेशकाने ठरविले होते. या पाद्य्राचे नाव होते सॅम्युअल विल्बरफोर्स. अतिशय प्रभावी वक्ता म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती.
सभेच्या दिवशी सभागृहात 700 माणसांची तुडुंब गर्दी भरली होती. विल्बरफोर्स बोलायला उठला आणि अर्धा तास त्याने सर्व जमावाला आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. हे भाषण चालू असता हक्सले आपली बोलण्याची वेळ केव्हा येते, म्हणून वाट बघत बसला होता. भाषणाच्या शेवटी विल्बरफोर्सने खालच्या आवाजात समजावणीच्या सुरात हक्सलेकडे वळून त्याला विचारले की, ‘आमचे सन्माननीय विरोधक एका गोष्टीचा कृपाकरून खुलासा करतील काय? कपिकुलातील त्यांचे पूर्वज त्यांच्या आजीकडच्या वंशावळीतून होते की आजोबांकडच्या?’ टाळ्यांच्या कडकडाटात सभागृहात एकच हशा पिकला. त्या क्षणी ‘परमेश्वराने शेवटी तुला माझ्या ताब्यात दिले म्हणायचे,’ असे पुटपुटत हक्सले बोलायला उठले. व्यासपीठावर येऊन ते विरोधी सभेला न्याहाळत, गदारोळ संपण्याची वाट बघत शांत उभे राहिले. त्यानंतर त्यांनी सुरुवात केली. “कुणी जर मला प्रश्न विचारत असेल की, आजोबा म्हणून मला गोरिलासारखा एखादा कपी पसंत आहे की, मोठे बुद्धिवैभव प्राप्त झालेला, कौशल्यसंपन्न आणि समाजात उत्तम प्रतिमा असलेला; परंतु त्याचबरोबर त्या सर्व क्षमता एका गंभीर, वैज्ञानिक चर्चेची टिंगल करण्याकरिता वापरणारा तुमच्या-आमच्यासारखा एखादा मनुष्य पसंत आहे, तर मी तात्काळ आणि बिनदिक्कत त्या कपीची निवड करीन.” या एका वाक्याने सभेचा सगळा नूरच पालटला.
हक्सलेच्या या निर्णायक फटक्याने विज्ञानावरील अंधश्रद्धेचा अखेरचा हल्ला सुद्धा पराभवाची वाट चालू लागला; पण लढाई येथे थांबली नाही. बेंजामीन डिझरेलीचे वर सांगितलेले उद्गार हे या वादानंतर आले. पुढे अनेक दशके धर्मपीठे आणि वैज्ञानिक यांच्यातील उत्क्रांतीवरील वाद चालूच राहिला; पण विज्ञानाची सत्यनिष्ठा अखेर विचारवंतांच्या वर्तुळात आणि शैक्षणिक विद्यापीठांतून मान्य झाली. आजघडीला जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील विद्यापीठांत जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमात ‘डार्विनचा उत्क्रांतीवाद’ शिकविला जातो; पण अजूनही अमेरिकेत काही धार्मिक संस्था आणि त्यांना पाठबळ देणारे काही राज्यकर्ते ‘उत्क्रांतीवादा’ला विरोध करून ‘निर्मितीवाद’ ही कल्पना प्रसारित करतात. ‘निर्मितीवाद’ हा माणूस हा प्राण्यापासून उत्क्रांत झालेला नसून सर्व प्राणी एकाच वेळी देवाने निर्माण केले आणि माणूस हा देवाची त्या वेळची खास निर्मिती आहे, असे विचार मांडतो. अमेरिकेतील काही राज्यांत तो ‘उत्क्रांतीवादा’बरोबरच शिकविला जातो.
पण आजघडीला विज्ञानाला होणारा धर्माचा विरोध क्षीण होत आहे. धर्माने मानवी व्यवहाराचे नियंत्रण करताना नैसर्गिक नियमांचा विज्ञानाने सांगितलेला आवाज दाबू नये, हाच इतिहासाचा संदेश आहे. विज्ञान हा आजच्या युगाचा ‘निधर्मी’ धर्म आहे आणि वैज्ञानिक एका अतिशय उचित अर्थाने त्या धर्माचे ‘उपदेशक’ आहेत. या धर्माचे नाव ‘सत्यशोध’ आणि याची सुरुवात झाली 1609 साली गॅलिलिओने आपली दुर्बिण चंद्रावर रोखली तेव्हाच.
प्रा. प. रा. आर्डे संपर्क : 9822679546