सदानंद देशमुख -
…अखेर शेवटी वाटणी करण्यासाठी बैठक बसलीच. रंगनाथ शिंदे आणि त्याची बायको मनकर्णा दोघेही कासावीस झाले होते. रंगनाथ शिंदेचा लहान भाऊ रामेश्वरही कासावीस झाला होता. पुन्हा-पुन्हा आपली बायको कावेरीकडे रागाने पाहत होता. पण तीही काही कमी नव्हती. नवर्याच्या नजरेला तोडीस तोड असं उत्तर नजरेनेच देत होती.
“…तुमाले काई समजत नाई… तुम्ही बावळट हाय. तुम्ही भावजयीचं ताकाचं वणारू हाये. जिकडं ताक नेलं तिकडं तोंड फिरवला,” असं नेहमी तोंडाने बोलून दाखवते, ते ती फक्त आज नजरेने बोलून दाखवत होती. तरी तिची ती भाषा तिच्या नवर्याला – रामेश्वरला – बरोबर कळत होती.
दोन भावांचा वाटण्याचा तंटा मिटविण्यासाठी गावकी-भावकीतले पंच अंगणात बसले होते. मोठे जाणते बुजुर्ग खाटेवर बसले होते, तर तरण्या शिणेचे खाली टाकलेल्या दशा निघालेल्या नायलॉनच्या चटईवर बसलेले होते.
बापाच्या हातचं जुन्या जोडणीचं सहा तसम्याचं घर होतं. वर लालवट झालेल्या गंज खाल्लेल्या टिनपत्र्याची बसकट ठेंगणी माडी होती. घराच्या समोर पलिकडच्या रस्त्याला जोडून घेणारं अंगण होतं. अंगणात लाकडी ठुण्या शिणारून वर बांधलेलं, पळसाच्या फांद्याचा अन् गवताचा बसकट गोठा होता. त्याच्या छताचं पाखं एका बाजूनं कललेलं होतं. त्यामुळे पाख्याखालून बैलाची सोड-बांध करण्यासाठी म्हणा, चारा गव्हाणीत टाकण्यासाठी म्हणा, जेव्हा आत जावं लागायचं, तेव्हा मान खाली घालूनच घुसावं लागायचं. आत गेल्यावर उभं राहिलं तरी वरचं आढं टाळक्याला लागायचं.
बर्याच दिवसांचा हा कुजलेला वसाड येणारा गोठा काढून तिथं लोखंडी पाईपावर वेल्डिंग करून चांगला लोखंडी टिनपत्र्याचा मजबूत गोठा बनवावा, असं मोठा बोलायचा. लहानाही त्याला दुजोरा द्यायचा. पण या ना त्या कारणाने ते राहूनच जायचं. “आता पुढच्या वर्षी बरसातीच्या आधीच बनवून घेऊ. काहीचे साठी काम सोडून बनवून घेऊ… आपून या बैलायच्या जीवावर आपली कुणबिक तोलतो. त्याह्यचे हा नको व्हायले. पावसाळ्यात वसाडीचं पाणी, हिवाळ्यात थंडी, बैलायची लाय हाय काढती… चांगला नवा कोठा बांधूनच घेऊ आता…” असं रंगनाथ शिंदे बोलून जायचा. बोलून जायचा तसा मग शेतीवाडीच्या कामाच्या धबडग्यात विसरूनही जायचा.
बैलांना चारा-पाणी टाकण्यासाठी समोरच्या बाजूनं भिताडावरून एक मोठं गोंधणीचं चिवट लाकूड तासून-तुसून मुळात गोल होतं, ते चौकोनी करून ठेवलेलं होतं. ते अलिकडं सरकू नये म्हणून दोन हातभर उंचीचे गोंधणीच्या लाकडालेच चिवट खुंटे ठोकलेले होते. त्या खुंट्यातच तीन ठिकाणी गव्हाणीचं लाकूड खमाटून टाकलेलं होतं. त्यात टाकलेला वैरण-चारा व्यवस्थित बसायचा. अलिकडं बैलांच्या अंगाखाली सरकून जाणं व्हायचं नाही, म्हणजे वाया जायचं नाही. अधून-मधून आलाच समजा बैलांच्या अंगाखाली, तर मोठा रंगनाथ, लहाना रामेश्वर किंवा रंगनाथाची बायको मनकर्णा अशा तिघांपैकी कोणीतरी उठून वाकून गोठ्यात घुसून ती चारा-वैरण सामरा गरायचे… गोठ्यातल्या तिन्ही बैलांना जीव लावण्यात तिघांचाही समान वाटा होता.
मात्र आता वाटण्या झाल्यावर हा गोठा सुना-सुना होणार, या जाणिवेने तिघांच्याही मनाला कातरकळा लागल्या होत्या. कारण घरा-वावरासोबत बैलांच्याही वाटण्या करायच्या, असा कावेरीने धामाच लावला होता.
“आता एका बैलाच्या पाठीवर बसून काय तुम्ही घोड्यासारखी सवारी करणार हाये का? त्याच्यापेक्षा बैलजोडी चिखलीच्या बैलबाजारात नेऊन, नाईतर बेपारी, हेड्याले घरी बलावून इकून टाका अन् जोडीचे जे येतील ते पैसे वाटून सम-समान आपसांत वाटून घ्या…”
असा पर्याय चुलत्याने; म्हणजे मोतीराम शिंदेने सुचवला होता. पण त्याच्या आधी बरीच बोलबहसबाजी आणि मचमच झाली होती.
“झाली आता वाटणी, घराची झाली. तीन तसमे मोठ्याचे, तीन लाह्यण्याचे. आंगण फुटानं अर्धा-अर्धा मोजून मंधातून सध्याची ताटव्याची कूडभीत करायची. माळावरच्या दहा एकरातलं उगवतीकडून मोठ्याचं पाच आन मावळतीकडून लहाण्याचं पाच… खालच्या आठ एकर जमिनीतली नाल्या काठावून उभी वाटणी करून देवीच्या मंदिराकडची चार एक्कर रंगनाथची, चार एक्कर रामेश्वरची… मंजूर…?” बंडूतात्यानं विचारलं.
“मंजूरच करा लागील नं… नामंजूर करायसारखी खिंड ठेवलीच नाई. तुम्ही मंधातरे म्हणूनच त भावा-भावातल्या वाटण्या करण्यात अन् तंटा मिटवण्यात समद्या गावात नावलौकिक हाये तात्या तुमचा…” सतीश मंगळेने तात्याची स्तुती केली.
तसा बंडूतात्या खुलून आला. आपल्याशीच खूष होत आपल्याच मांडीचा तबला करत म्हणाला –
“आरे ह्या वाटण्या म्हणजे सोपा खेळ नसते. जनमजुतीचा मेळ आस्ते बावाच्या नाना हा… लाह्यन्याची बायको गंज म्हणत जाय. आडव्या वाटण्या करा अन् मले नाल्याकडचा डाबरीचा भाग द्या म्हणून; पण मले माईत होतं नं उत्तमभाऊच्या ह्या वावराचं गणित…”
“कसं काय? वावराचं काय गणित आसणार हाये.” सतीश मंगळेने विचारलं.
“आरे म्हणजे हुबेहूब हिशेबाचं गणित म्हणत नाई मी. हे गणित म्हणजे शेतीवाडीचं गणित. खालच्या नाल्याकडच्या भागातली काळी खाप जमीन हाये अन् वरच्या आंगी जरा भुरमटीची हाये. पुन्हा पुढं चालून समजा नाल्याचं पाणी घ्यायचं काम पल्ड मोटार इंजिन लावून, त दोन्ही भावाचा हिस्सा पाह्यजे तिकडच्या नाल्याकन. म्हणून हिकमतीनं काटेकोर वाटण्या केल्या म्या!”
“पण तात्या, त्यो नाला का काही कामाचा हाये का? पावसाळ्यात वाह्यते अन् हिवाळ्याच्या पहिल्याच तोंडी आरते त्यो… त्याच्यावर काय वलिती शेती करणार हायेत हे दोघं भाऊ…”
“बरोबर हाये तुहं. पण काय सांगता येते. उखंड्याचाही पांग फिटते…. येऊबी शकते पुढं चालून पाणी!”
“ते काहीबी आसो. वाटण्या कशा फेसोफेस झाल्या बिट्यायहो.. बरं, मंग राहा आता गुण्या-गोविंदाने अन् काही वाईट हिवसं वाटू देऊ नको रंगनाथा….”
“कशाचं तात्या?”
“नाई; वाटण्या व्हायच्या आधी आम्हाशी बाचाबाची, आमासिक मचमच, भांडणं-तंडणं होतच आसतात कोणत्याही घरात. त्याच्यानं हे काही नव्या नव्हाळीचं नाई. महाभारत काळापासून अन् त्याच्या बाद बी, राजे-रजवाड्याच्या काळातबी होतच आले. राजपुत्रात आशे भांडणं…”
बंडूतात्याचं हे बोलणं ऐकून मोतीराम शिंदे गालातल्या गालात; पण ऐकू येईल असा खुद्कन हसला.
“काहून हासले काका…?” सतीश मंगळेने विचारलं.
“नाई…. राजपुत्र म्हणले तात्या; म्हणून हासलो मी..”
म्हणताना मोतीराम शिंदे पुन्हा खुदकन हसला. तशी रंगनाथच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण त्याला माहीत होतं. ‘आपल्या घरात आतून पेटवायचं काम ह्या चुलत्यानं केलं हाये. काहून की त्या कावेरीची याह्यच्याच घरी जास्त ऊठबस होती. ह्याची बायकोच त्या अवदसेला खवळणीचं पाणी देत होती. काहून की, आपल्या घरात फूट पडावं अन् असे एका घराचे दोन घरं व्हावं, आसं त्यालेच वाटाजाय. काहून की आपली शेतीवाडी त्याले खटकाजाय… त्याच्या पोरायनं त्याची जमीन डोनेशनासाठी इका लावली. दोघं नवकरीले लागले. मंग एकबी त्याले जगणे ना… मोठा म्हणजाय मलेच का एकट्याचे मायबाप हायेत का? लाह्यन्यानं जगवावं… अन् लाह्यना म्हणाजाय मीच थोडं काही त्याह्यचा पोरगा हाये. मोठाबी हाये. आसं करू करून म्हातारा-म्हातारीची हेळणा करत. तव्हापासून हे भूमिहिन होऊन घरात तडफडत बसतात… बरं झालं साल्यायनं घर इकलं नाई. नाई त् त मंग पाल ठोकूनच राहावं लागलं आस्तं याह्यले देवीच्या माळाखाली लतरकर्यासारखं!’
असा तो काहीसा आठवणीत, काहीसा विचारात गढला होता, तर पुन्हा तसंच कुजकं हसत मोतीरामने त्याला विचारलं, “तू कोणत्या विचारात बुडून गेला रंगनाथ? आता काई इच्यारात बुडून जाऊ नको…”
“नाई नाई… मी काई इच्यार न् फिच्यार नाई करून राह्यलो कशाचा…”
“नाई पण वाईटत वाटतल असंल नं… या गोष्टीचं…”
“माहं म्हणणं आसं होतं की आजून चालू द्यायचं आस्तं काई दिवस! माही पोरगी उजवाय आली. पोरगं शिकून राह्यलं. रामेश्वरचं लेकरूबी आजून लहान हाये. पोरायले शिकू द्यावं, नवकरीले लागू द्यावं.. घर पुढं न्यावं… मंग वाटण्या करावं….”
असं तो बोलतच होता, तर एकदम आतल्या घरातून कावेरी बाहेर आली अन् आपल्या भायाला वाकडं लावावं, तशी म्हणाली… “आसं होऊ द्यावं, तसं होऊ द्यावं… अन् आम्ही इतक्या दिवस जसा माल हेमकाडला तसाच हेमकाडून मस्त आपलं गठूडं भरून घ्यावं…”
तसे बैठकीत बसलेले सगळे आरबळून गेले. एकदम कसे अवाक् झाले अन् घराच्या दारात उभी असणार्या कावेरीकडे टकामका पाहायला लागले…. चुलत्याच्या मनात आलं, बरं झालं ही आगजाळ भवानी, गांधीलमाशी पुढं आली. आता याह्यचे चांगले घनघोर भांडण व्हावं, मारामारीबी झाली त चालती लेकाच्यायची… रिपोटा-रिपोटी होऊन चांगले थंड्या फरशीवर जाऊन बसायले पाह्यचे साले… पण असं काही झालं नाही; उलट तिचा नवरा जो बसलेला होता. तो बसल्याचा उठता झाला अन् आपल्या बायकोकडे रागाने पाहत म्हणाला –
“अय टवळे…. चूप बैस आत जाऊन. पचर-पचर बोलू नको माणसायच्या मंधात येऊन… नाई त् एक देईल थुतरात ठेवून.. मायची धांगड तुझ्या…. मायची आगजाळ भवानी…”
तशी ती मागे तर सरकलीच नाही; पण पदर खोचून पुढे आली…
“काय पचर-पचर बोलू नको म्हन्ता मले आं.. तोंड तरी हाये का बोलायले? या भावजयीच्या ताटाखालचं मांजर हाये तुम्ही. ताकाचं वगारू हाये. तिने ताकाचं टोपलं दाखवलं की, तिच्या मागं डेराव-डेराव करत फिरता तुम्ही. मले काय धांगड अन् आगजाळ भवानी म्हणता हो? बोळ्या उचल्या… काय पचर-पचर करू नको म्हणतू मले. आरे मी आली म्हणून वाचला तू… जगवलं म्या तुले. नाई त धाकट्या भावानं अन् भावजयीनं सारं हापकाल्ड आस्तं… जमलं तर मारलंबी आस्त खाण्यात घालून… मी आले म्हणून वाचले तुमी…”
“ओ, आगजाळ भवाने आसा काईच्या काई आळ नको घेऊ माह्या बायकोवर… अन् हा मेंघ्याबी कसा आयकून घेऊन राह्यला हिचं बोलणं…”
रंगनाथ शिंदे कासावीस होत म्हणाला… “थोबाड फोडून टाकलं आस्त एखाद्यानं…”
“ओ.. भाऊ. इसरा म्हणलं आता ती थोबाड फोडायची भाषा.. मला भाऊबी जसं म्हन्तात खमक्या हाये. एक रिपोट देईल त सम्दे थंड्या फरशीवर जाऊन बसतान तुम्ही!”
“चला, गड्यायहो! आता इथं बसण्यात काई मजा न्हाई… पण बरं झालं रंगनाथ, तुवा वाटे हिस्से करून टाकले. काई मजा नाई राह्यली आता तुमच्या घरात… लय इतळलं काम.. म्हन्तात नं फाटलं त शिवता येते; पण इतळल्यावर टाका ठरत नाई कपड्यावर.. बरं झालं, तुवा वाटे हिस्से केले… चलो रे गड्यायहो आपआपल्या घरी… झालं न आता कावेरीच्या मनासारखं… झालं नं एका घराचे दोन घर? चला, आपून आपलं घर जवळ करू?”
असं म्हणून बंडूतात्याने पायाला चपला दिल्या आणि ते जायला वळले, तशी कावेरी एकदम पुढे झाली.
“ओ, तात्यासाहेब! चाल्ले कुठी? धर्मराजा म्हणून आले नं तुम्ही न्यायनिवाडा करण्यासाठी? पुरा न्यायनिवाडा करा मंग!”
“आता काय राह्यलं बाकी? तुमच्या घरातले अन् साक्षीदार वाटणीपत्रावर सह्या करा अन् मोकळे व्हा! आण रे सतीश त्यो वाटणीपत्राचा कागद…”
“आसे कसे काय वाटणीपत्रावर सह्या करता म्हणता? वाटण्या कुठं झाल्या आजून पुर्या?”
“मंग काय राह्यलं? झाला नं सम्दा निर्र्हा-पिर्हा…”
“कशाचा गोधड्याचा झाला निर्र्हा-पिर्हा झाल्या नाईत म्हण्लं आजून वाटण्या…. एका गोष्टीच्या…”
“कशाची वाटणी राह्यली पण? सांगशील त सही…” रंगनाथ शिंदेने कंटाळून विचारलं.
कावेरीचा धिंगाघोळ पाहून तिच्या नवर्याला म्हणजे रामेश्वरलाही तिचा राग येत होता. एका बाजूनं तो इथं होता, तर मनात एकाच वेळी दोन-दोन, तीन-तीन विचार येत होते…. ‘आपला बाप म्हणायचा, माणसाले एकुलतं एक पोरगं पाह्यजे. दोन पोरं आसनं म्हणजे घरातच दुश्मन पैदा करणं… त्याच्यासाठी कोणाले एक लेकरू झालं त त्यानं दुसरं होऊच देऊ नाई. भावाच्या पाठीवर बहीण झाली त पुरती. पण आजकालच्या जमान्यात त बहिणींनी भावातल्या हिश्श्यासाठी कोर्टकचेर्या करतात. लय उदाहरण हायेत आसे…”
“त्यो मोटार इस्टानाच्या बाजूनं फलाट नाई का घेल… त्याच्या वाटण्या करा म्हणलं जसं. दोन गुंठे फलाट हाये नं त्यो. मोठीच्या नावावर. तिच्यातला एक गुंठा आम्हालेबी पाह्यजे…”तसं रंगनाथ शिंदे अन् त्याची बायको मनकर्णा दोघेही एकाच वेळी खवताळून उठले..
“त्यो फलाट कसा काय वाटून भेटंल तात्या. आहो, समद्या गावाले अन् आमच्या सोयर्या-धायर्यालेबी माईत हाये की फलाट मनकर्णाले तिच्या मायनं घेऊन देल हाये म्हणूनसन्या… आहो, हिचा बाप मेल्यावर हिच्या मायनं जे वावर इकलं होतं तिच्या पुतण्यायच्या धाकमारी ते पैसे तिनं तिच्या पोरीयले वाटून देलते समसमान. त नव्हा तिच्या नातवाले धंदा पाणी चालू करायच्यासाठी मोठा झाल्यावर आधार व्हावं म्हणून बक्षिसी दिली होती तिनं… माह्या सारंगपूरच्या सालीलेबी दिले होते पैसे! तिनंबी फलाट घेत हाये सुलतानपूरच्या मोटार स्टँडवर.. त्यो का आपल्या बापजाद्याच्या इस्टेटीतला थोडा काई भाग हाये… मनकर्णाच्या मायची लोकभेट हाये ती…”
“कशाची लोकभेट हाये फतराची. कोणाले माहीत हाये काय गुपीत द्याला हाये त तुमीच कारभारी होते नं माह्या ह्या बावळट नवर्याले गाफील ठेवून पैसा मागं सारला आशीन.. अन् द्या चादल्डीचं नाव करून या बाईच्या नावानं फलाट घेतला आसंल…”
“ये कावरे, पिसाळल्या तोंडाचे. काहीच्या काही नको बकू.. अन् माह्या मायले काहून शिव्या देती? तिले काहून चादल्डी म्हणते डाकीण तोंडाचे? तू हाय चादल्डी! तूच हाये वातानं वाकेल वातल्डी.” अशी बायका-बायकांत तुफान बोलाचाली सुरू झाली अन् वाटणी करणारी पंचमंडळी कशी कावरीच्या बावरी झाली. ते सगळे टकामका असे बंडूतात्याच्या तोंडाकडी पहाय लागले अन् इथला वितंडवाद काही आता मिटत नाही, हे लक्षात येऊन बंडूतात्या कसे तडकन उठून उभे झाले.
“ही आपल्या बसच्या बाहीरची गोष्ट हाये बाप्पा. आजून काही तुमच्या कदोड्यात आडकून बसत न्हाई आता. निर्हानाय पांगत चाललं आता इथोलच काम…”असं म्हणत बंडूतात्या उठून चालाय लागले. तसे मग बाकीचेही उठून पायास पायताण देऊन चालाय, सटकाय लागले. मागच्या बाजूनं आता कुत्र्यांची लवकांड आपसात भांडावं, तसे रंगनाथ शिंदेच्या घरातून भांडणाचे आवाज येत होते अन् थोड्याच वेळात आता भांडणाचे रूपांतर मारामारीत होणार, असं वातावरण रंगनाथ शिंदे अन् रामेश्वर शिंदेच्या अंगणात तयार झालं. तिकडं जाऊभायाशी भांडता-भांडता कावर्या कावेरीनं इकडं पंचमंडळींच्या नावानंसुद्धा सपासप दोन-चार शब्दांचं हार फेकले.
“आशे पंच काय कामाचे बैना… एकाले छातीशी अन् तुकाले जांघीशी घेतात… जा-जा तुम्ही.. सुखढाळा घ्या… तुम्ही काय वाटणी करतान आमची… मीबी आता कोर्टानं केस लढणार हाये.. माह्या अजय भाऊच्या लय वळखी-पाळखी हायेत वरच्या लोकायशी…” असं म्हणून ती बोटं मोडू लागली अन् रामेश्वर शिंदेने बरोबर ओळखलं. अशी गोम हाये का ही? त्या सुलतानपूरच्या आजू इंगळ्यानं आग लावली म्हणायची ही.. लय कळलाव्या अन् ऊठेरेटे करणारा नंबरी माणूस हाये त्यो… एकीकडे त्याला आपल्या भावजयीची सुद्धा दया यायला लागली. तिच्या तोंडाकडे पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्याची बायकोही कशी आता पिसाळल्यासारखीच चवताळू-चवताळू बोलत होती. तिचं थोबाड फोडून काढावं, नाहीतर पायाखाली घेऊन तिले चांगलं चेंदून काढावं, असं वाटत होतं. पण तो काहीच करू शकत नव्हता.
“आरे बसला काय मेणघुण्यावाणी… सांग न या आरकाट भवानीले. ही त कानामागून आली अन् शायनी झाली. दीड दिसात अन् माकडीण उसात झाली ही. तिचं लगनबी होऊन या घरात आली, त्याच्या आधीच्या गोष्टी हायेत ह्या.. ती लेकभेट हाये मनकर्णाची. आजोळात वाटण्या होणार नाई त्या.
“आशा कशा वाटण्या होणार न्हाई… मी घेतल्याबगर राह्यणार नाई. मोठे म्हन्तात तिच्या मागनं पैसे देले म्हणून. काही देले नाईत. तुम्हीच कारभार करताना घापला केला अन् बाईच्या नावानं फलाट घेतला. आसंच सांगते माही माय अन् भाऊ मले.. भावकीतले लोकंही तेच बोलतात; पण मी नाई चालू देणार तुमची चतुराई… लय आरकाट बाई हाये जसं! डोंगरेची लेकबाळ हाये म्हणलं जसं, डोंगरावाणीच हिमतीची खानदान हाये आमची…” मग दोघी जावात घेघाल कचकचाट सुरू झाला…
“मी आजेबात वाटून देणार नाई… माह्या मायची लोकभेट हाये जस ती…” मनकर्णा म्हणत होती.
“मी त घेतल्याबगर राह्यणार नाई…. डोंगरेची लेक हाये मी”
“तू डोंगरेची लेक हाये त मी बीन खंडागळेची लेक हाये…”
“त्यो फलाट म्हणजे तुम्ही कारभारात घापला करून घेल हाये…” शेवटची ही दोन वाक्यंच त्या पुन्हा-पुन्हा बोलत राहिल्या. धापी लागून थकून गेल्या.
मग ‘शिंदेचं घर म्हणजे रोजच्या कदोडीचं घर हाये,’ असं गावगल्ली बोलाय लागली.
असंच एक दिवस घनघोर मारामार्या झाल्या. पोलीस स्टेशनात एकमेकांच्या तक्रारी झाल्या. चलबुलावती झाली अन् जाऊ द्या आता… आशा भांडणापायी एखांद्याचा खून होण्यापेक्षा मिटवून टाळू कदोड… पुढी आपल्या नशिबात आसलं त अजून उजूक कमाई करू…” अशा निर्णयापर्यंत रंगनाथ शिंदे अन् त्याची बायको मनकर्णा असे दोघेही आले… एक दिवस पुन्हा बैठक बसवून ज्याचं त्याच्या नावी लिहून, वाटणीपत्रावर सह्या करून मोकळे झाले.
एक महिना झाला. मग एक दिवस कावेरीची माय आपल्या लेकीचा संसार पाहायला आली. चार दिवस उसणीत लेकीच्या घरी राहिली.
“बरं झालं आपल्यालेबी, मेली आगजाळ भवानी खाल्ला तुकडा आंगी लागू देत नव्हती अन् तिचं तोंड कसं खऊट राहत जायकंधीबी… जसा काही तिच्या तोंडावर कावळ्याचा कळप हागून गेला. अशी उदास राहत जाय… मले त वाटते ती आपल्यातून येगळी झाली तशी उदासीबी येगळी झाली…”
“बरोबर हाये तुहं म्हणणं… उदासी भिताडाच्या आड गेली. आता सुखाची झोप तरी लागती आपल्याले आपल्या घरात…” एक दिवस घराला कुलूप लावून दोघं वावरातल्या कामासाठी आले होते अन् कवठाच्या गडद पानाच्या, काळ्या खोडाच्या अन् लदबद-लदबद शेंडाबुडखी पांढरं कवठ लागलेल्या झाडाच्या सावलीत बसून दोघं नवरा-बायको घरसंसाराच्या गप्पा मारत बसले होते. बांधावर उगवून आलेलं हे कवठाचं झाड कधी काळी त्याने साळसूळ करून असं मोठं केलं होतं. ते आता चांगलंच भारणसूद, चांगलंच डेरेदार झालं होतं.
असं बोलता-बोलताच तो मग तिच्याजवळ सरकला अन् तिच्या मांडीवर डोकं ठेवून निवांतपणे वर पाहत बसला. काळ्या खोडपानाच्या डाहाळ्यातली भुरकट पांढरी कवठं आपल्याकडे पाहत आहेत, असं त्याच्या मनात आलं. मनातल्या या विचारानं त्याचं त्यालाच हसू आलं. ते त्याच्या गालावर उमटलं.
“कशाचं हासू या लागलं एवढं गुलूगुलू. किती दिवसाचं आसं हासताना पाह्यलंच नवत म्या तुम्हाले.”
“बरोबर हाये तुहं…ती दळभद्री, भांडखोर आपल्या घरात आल्यापासून हासूच पळून गेलं होतं आपल्या तोंडावरचं. एखादं माणूसच आसं बदवकर्या वाणाचं आस्ते…. जिथं गेलं तिथी उदासी अन् चिडचिडी पसरते…”
“बरोबर हाये तुमचं.”
“आता तूच पाह्य बरं, तुझ्या मायनं देल पैशातून फलाट घेतला. तिच्यातला आर्धा त्या दोघा नवरा-बायकोनं बळकावला. तरीबी कशी खूष राह्यली…”
“काय करता मंग… आसं समजू की आपूनच लहान्या भावाले बक्षिशीत दिला अन् कुठंलबी कोणी मढ्यावर बांधून नेणार हाये… अन् माणसाचा कुठी काय भरोसा राह्यला का? पाह्यलं नाई; या कोरोनाच्या महामारीत चांगले चांगले धट्टेकट्टे, जानजवान पोरं गेले. काहीच्या त मातीबी करणं नशिबी नाई आलं… इथं गडीचा भरोसा नाई अन् कुठं बसता ‘हे माहं, ते माहं,’ करत! कशात-कशात जीव गुतवत!” ती दमदार शांत आवाजात समजूतदारपणे म्हणाली.
“पण माह्यातला जीव नको काढू…”
“जीव हाये तुमच्यात म्हणूनच सम्दं सहन करते मी अन् तोंड कसं हसतमुख ठेवते. घरातली लक्ष्मी खूष राह्यली तरच घराले बर्कत येती. घरातली काव-काव करती आसली तं लक्ष्मीबी कावून कट्टाळून घर सोडून जाती म्हन्तात…”
“आपल्याबी घराले कसा भंग आत्म्यासारखाच झाला होता, ती टवळी घरात आल्यापासून…”
“अन् आपुन नवरा-बायको हावोत हेबी इसरून गेलो होता आपुन.” म्हणताना ती सूचक हसली. त्याच्या डोईच्या केसात फिरणारा तिचा हात मग त्याच्या छातीवर, मानेवर अन् इथं-तिथं गुरमळाय लागला.
सभोवताली सगळं वातावरण कसं शांत-शांत होतं. शिवारात सगळीकडं शाळूच्या ज्वारीचं तरणंताठं पिकं लहर्या मारत होतं. ते ज्या झाडाशी निजलं होतं, ते कवठाचं झाडही कसं शांत-शांत म्हणजे जवळपास उभ्या-उभ्याच निजल्यासारखं वाटत होतं.
‘झाडाच्या मनात जरी झोपायचं आलं, तरी त्याह्यले थोडं काही भुईवर आडवं होता येते; आपल्यासारखं. त्याह्यले कशी उभ्या-उभ्याच झोप घ्यावं लागती,’ एकीकडे तिच्याशी रममाण होताना असेच काहीतरी विचार त्याच्या मनात दुसरीकडे येत होता.
संध्याकाळी प्रसन्न मनाने ते घरी येत होते, तर आडव्या रस्त्यातच त्यांना सिंधूबाई भेटली.
“आले का वावरातून? लय खूष दिसा लागली जोडी..”
“हाव सिंधूबाई… वावरात त जावंच लागंल ना… घरी बसून कसं भागंल; आपलं शेतकरी लोकायचं…”
“ते बरोबर हाये म्हणा… तुम्ही गेले वावरात; पण इकडी गावात आग लागली तुमच्या घराले!”
“काहून, काय झालं…?” मनकर्णाने घाबरून विचारलं.
“तुमच्या लहाण्याची बायको लय भडकली नं बाप्पा. तुमचा राजू घरी होता नं… त त्याच्याशीबी तिनं भांठण उकरून काल्ढं कशावून तरी, अन् लय झोडपलं त्याले… सम्दी गल्ली जमा झाली होती तुम्हच्या घरापुढी.”
“काहून ते? काय केलं होतं आमच्या राजूने, आसा कोणता केळीचा बाग कापला होता तिचा?”
“वड्याचं तेल वांग्यावर काल्ढं तिनं… तिचा खरा राग हाये तुमच्या नवरा-बायकोवर. तिचं म्हणणं हाये की तुम्ही तिले फसवलं…”
“कसं काय? उलट माहीच आर्धी जागा देली त्याह्याले.. गावले माहीत हाये…”
“ते बरोबर हाये तुमचं… पण तिची माय अन् ती फलाट पाह्याले गेलत्या दोघीजणी आज! त तिच्या मायनं देल तिले बघून.. म्हणे तुह्या जाऊनं अन् भायानं कोसाची जागा देली तुले.. त्याच्यानं ही कावेरी कावरली अन् काहीच्या काही अशा आनप-सनप शिव्या देल्या तुमच्या नवरा-बायकोले. आता त्या जागेची अदला-बदल करून सांगणार हाये ती तुमच्या नवरा-बायकोले…” सिंधूचं बोलणं ऐकलं अन् रंगनाथनं कसा कपाळावरच हात मारून घेतला.
“घ्या रे बाप्पा! आता त्यालेच त तिकडून पाह्यजे होती नं जागा… म्हणून तिकडून देली…”
“त्याच्यानं तिच्या नवर्यालेबी लय शिव्या देत होती ती हमेशासारख्या. तू ताकाचं वगारू हाये, तुले कोणीबी चुत्या बनवते. आसं म्हणून धावू-धावू जात होती तिच्या नवर्याच्या अंगावर…”
“कावं मनकर्णा, आता कसं करावं? म्हणलं, बरे मोकळे झालो आपून त्या कैदासणीच्या तावडीतून. त तिनं पुन्हा नवीनच लचांड आणलं हे आपल्यामागं.”
“काही-काही दळभद्य्रा बाया अशाच राह्यतात, रंगनाथ भावजी. आपूनबी सुखानं जगत नाईत अन् आपल्या घरातल्यालेबी सुखानं जगू देत नाईत. अशाच राह्यतात ह्या रंभा… कशातच सुखी राहत नाईत. माही जाऊबी तशीच हाये; तुमच्या जाऊसारखी आरकाट बोड्याची…” असं सिंधूबाई बोलत होती अन् तिचं बोलणं ऐकून हे दोघं नवरा-बायको कासावीस झाले होते. आता घरी गेल्यावर आपल्याला पुन्हा त्या भांडकुदळीशी भांडणं करत बसावं लागीन, या विचाराने त्या दोघांच्याही मनाची शांती भंग झाली होती. घराकडे येताना कसे पायात पाय अडकल्यासारखे झाले होते.
घराकडे येताना त्याच्या मनात विचार येत राहिले; जे रंगनाथ शिंदेला माहीत होतं – कावेरीच्या मायनेच तिच्या मनात असं हे भूत घातलं असणार. रामेश्वराच्या सोयरिकीसाठी गेलो होतो, तव्हाच पाह्यलं होतं, या घराचं चलिंतर काही बरोबर नाही. तिथं कावेरीचं मायबापच नाही, तर गल्लीतले सगळेच, गल्लीतले सगळेच नाही, तर गावातले सगळेच अंधश्रद्धेने ग्रस्त झालेले होते. गावात एकशेसात छोटी-छोटी मंदिरं होती. बुवा-महाराजांचे मठ होते…. करणी कवटाळ, भूतबाधा… याच विचारानं गावातल्या माणसांची अन् जास्तकरून बायकांची मनं ग्रासली होती. तिथं अंगातलं भूत काढणार्या बाईचं एक ठाणं होतं, जिथं काहीही बीमारी झाली की, लोकं डॉक्टरकडे जाण्याऐवजी मांत्रिकाकडे जात… अंगारा-धुपारा करत. अशा घरातली पोरगी करायचीच नाही, असं त्यानं ठरवलं होतं. नापसंतीही कळवली होती; पण रामेश्वरानं हेकाच धरला… “मले हीच पोरगी करायची.”
काय त्याले आवडली होती कोणाले माईत.
“ही पोरगी जर तुह्या घरात आली त तुझ्या घराचं वाटुळं होईल माह्यचे चलिंतर काही ठीक नाहीत,” असं बंडूतात्या म्हणाला होता. अशोकराव नाना म्हणाला होता… “पण आपून फसले ते आता पुरेच फसलो.”
पण यावेळी एक घडलं; रंगनाथ शिंदेनं अन् मनकर्णानं यावेळी निकराने लढा दिला अन् मग जागेची अदलाबदल करण्याऐवजी जागा विकून, तो पैसा भावाच्या नावानं बँकेत टाकायचा अन् सोनं-नाणं घेऊन हौसमौज करायचा पर्याय कावेरीनं स्वीकारला. तो रामेश्वरालाही विनातक्रार स्वीकारावा लागला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. भावाभावात वाटण्या झाल्यावर बायकोच्या सांगण्यावरून नको-नको त्या भानगडीत फसत गेला. वाट्याला आलेल्या वावरात कामासाठी जायचं जिवावर येऊ लागलं. ते ठोक्यानं दिलं; पन तेवढ्या पैशात काही घरखर्च भागेना. प्लॉट विकून आलेल्या पैशापैकी बराच पैसा तिच्या भावानं – आजू डोंगरेनं – हडप केला. मागायला गेलं की पाच हजाराच्या जागी पाचशे रुपये देऊन तो रामेश्वरची बोळवण करू लागला.
रामेश्वरनं विकलेला प्लॉट परराज्यातून आलेल्या एका धंदेवाईक; पण कष्टाळू माणसाने घेतला होता अन् तिथे ‘बिकानेर स्वीट मार्ट’ नावाचं चहा-नाश्त्याचं अन् मेवा-मिठाईचं दुकान टाकलं होतं. आपल्यासोबतच्या माणसांसोबत संध्याकाळचा चहा घेण्यासाठी म्हणून रामेश्वर जायचा. तेव्हा त्याला दिसायचं, आपण विकलेल्या ह्या कोसाच्या जागेचा आता कायापालट झालेला आहे. बस स्टँड, शाळा, कॉलेज, स्टेट बँक, बाजारगल्ली अन् कसली-कसली दुकानं जवळ असल्यामुळं या हॉटेलवर सतत गिर्हाईकचा राबता असायचा. गिर्हाईक अजिबात खंडायचं नाही. चहा, फराळ असं सकाळपासून तर रात्रीपर्यंत घेघाल सुरू असायचं. हॉटेलचा मालक सतत नोटा सावटत राहायचा. कोणाची जागा अपशकुनी असते, म्हणून इथल्या जागेत बरकत येत नाही, म्हणून आपल्या बायकोच्या आणि सासूच्या सांगण्यावरून रामेश्वरने विकली होती. पण त्या जागेवर रात्रंदिवस पैशांची कमाई परराज्यातला बिकानेर स्वीट मार्टचा मालक करत होेता. प्रचंड नफा कमावून दिसामासी श्रीमंत होत होता.
आता वावर ठोक्यानं दिलं होतं. त्यामुळं काही काम नसायचं. कधी-कधी; कुठं-कुठं नव्या बांधकामावर तो पाणी मारायचं काम असलं की जायचा. कारण भारी कामं झेपावत नसती. काम नसलं की मग रिकामं भटकणं…
असाच एक दिवस चहा प्यायला म्हणून आला. तेव्हा सोबतचा गोविंदा काळे म्हणाला, “पाह्य रे रताळ्या, तुवा दोन लाखात जी जागा इकली. ती आता या माणसाने महिन्याची दोन लाख कमाई करून देती अन् इकायची म्हणलं त इच्यारून पाह्य, पन्नास लाखालेबी देणार नाई आता त्यो.”
“हावं न सालं, लय जीव पस्तावते महाबी… आपल्याले कशी देवानं अशी बुद्धी देली नाई, आसा इचार मनात येते कंधी-कंधी.”
“लेका, तुले बुद्धी तरी हाये का? त्या अंधश्रद्धाळू बायकोचा भाड्या झाला तर… नसता धंदा केला; पण भाड्यानं जरी देली आस्ती; त दहा हजार रुपये नुस्तं मह्यण्यानं भाडं आलं आस्तं तुले. आरे लेका. फुकाची जागा भेटली होती मुले भावजयीची. तीबी पचवता आली नाई तुले. इतक्या सस्त्या भावात इकली… अन् पैशाचं काय केलं. शानशौकीन अन् उसणवारीत खलास केला सादा पैसा. पण मी म्हणतो इकलीच काहून तुवा जागा…”
“आरे बायको म्हणाजाय आपशकुनी हाये जाग ती…”
“आरे रताळ्या, आपशकुनी आपले इचार आस्तात अन् कोसाचं म्हणतू त मंग देशालेच कोस आसला तर मंग काय देश सोडून जाईल का तू.. आता आपल्या गावालेच कोस हाये. तिरपं-तिरपं कोरत नवीन गाव नेलं हाये. मंग गाव काहून नाई सोडून जात तू.. आरे, तुह्या बायकोच्याच मनाले कोस हाये. तिचं मनच तिरपी चाल चालते. तिले आजून तरी सुदरव.. नाईत बरबाद होशील लेका… तिच्या ओंजळीनं नको पाणी पिऊ… तुह्या ओंजळीचा म्हणजे बुद्धीचा इचार कर… अन् आसा रिकामा घंट्या हालवत फिरस्तोर त्या वावरात मेहनत करा दोघं नवरा-बायको. मंग पाहू कशी बर्कत येत नाही तुमच्या संसाराले…’
दोस्ताना असणारा गोविंदा काळे असा फाडफाड बोलत होता अन् त्याचं बोलणं ऐकून रामेश्वरला मनापासून आपल्या बायकोचा राग येत होता. त्याच्या मस्तकात आता वेगळंच वारं सुटलं होतं. ते वारं आपल्याला आतल्या आत दुखावून जात आहे, असं त्याला जाणवत होतं.
– सदानंद देशमुख
वृंदावननगर, माळ विहिर, चिखली रोड, बुलढाणा – 443 001.