उदय चव्हाण - 9423865444
३१ मे – तंबाखू विरोधी दिन
शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राची इतकी प्रगती होऊनही किती लोकांपर्यंत ते ज्ञान पोचले आहे? त्या ज्ञानाचे फायदे किती लोकांना झाले आहेत? कारण व्यसनाने आरोग्याचा प्रश्न जटिल होत आहे.
आज तरुणांमध्ये फॅशन म्हणून व्यसनाची सुरुवात होते व नंतर काहींचे तेच ‘पॅशन’ बनते. अलिकडील काळात शालेय वयापासून तंबाखू, गुटख्यासारख्या व्यसनाची सुरुवात झालेली अनुभवयास मिळते. व्यसनाच्या शाळेतील तंबाखू ही बालवाडी असते. नंतर गुटखा, बीअर असे करत ते पदवी मिळवतात; पण प्रत्यक्ष शैक्षणिक आयुष्यातील पदवी कशीतरी पास होतात किंवा शिक्षण मध्येच सोडतात.
तंबाखू हे व्यसनाचे प्रवेशद्वार म्हटले तर वावगे ठरणार नाही. या प्रवेशद्वारात जाण्याआधीच धोक्याची जाणीव व्हावी म्हणून हा लेखप्रपंच.
31 मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून 1988 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून साजरा केला जाऊ लागला. जगभर तंबाखू सेवन व धूम्रपान हे कर्करोगाच्या कारणांपैकी सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. 2020 सालची या दिनाची संकल्पना आहे. युवकांना तंबाखू उद्योगाच्या विविध क्लृप्त्यांपासून सुरक्षित ठेवणे आणि तंबाखू आणि निकोटिन सेवनाबाबत प्रतिबंध करणे, ही संकल्पना निवडलीय, हे खूप महत्त्वाचे आहे. आजची तरुणाई तंबाखू, गुटखा, सिगारेट, ई-सिगारेट या व्यसनांच्या जाळ्यात तंबाखूजन्य उत्पादकांकडून विविध आमिषांनी आकर्षित केली जात आहेत.
तंबाखूचा इतिहास
तंबाखूला इंग्रजी भाषेत ‘टोबॅको’(TOBACCO) म्हटलं जातं, हे आपल्याला माहीत आहे. अरेबीक भाषेतील ‘टबॅक’ (TABAQ) या शब्दावरून हा शब्द आला असावा. ‘टबॅक’ म्हणजे अत्यानंद निर्माण करणारी, उन्माद निर्माण करणारी वनस्पती. तंबाखूची लागवड जगात आठ हजार वर्षांपासून केली जात असल्याचे पुरावे आहेत. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात ‘रेड इंडियन्स’नी तंबाखूचा वापर प्रथम औषध म्हणून आणि नंतर समारंभात सुरू केला. 11 ऑक्टोबर 1942 रोजी कोलंबसने अमेरिकेच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या ‘रेड इंडियन्स’नी त्याचं स्वागत तंबाखूची सोनेरी पाने देऊन केले. 15 व्या शतकात युरोपात तंबाखू लोकप्रिय झाली. भारतात 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी तंबाखू आणली. मात्र पुढे जहाँगीर बादशहाने आरोग्याला घातक म्हणून तंबाखूला विरोध केला. ब्रिटिशांनी मात्र भारतात तंबाखू लागवडीला प्रोत्साहन देऊन तंबाखूची निर्यात वाढवून महसुलात भर घातली. भारत आज तंबाखू उत्पादनात दुसर्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण 13 राज्यांत तंबाखूची शेती केली जाते. मागील 3 वर्षांत तंबाखूचे भारतातील उत्पादन पुढीलप्रमाणे ः
2016 – 190.19 दशलक्ष किग्रॅ
2017 – 204.07 दशलक्ष किग्रॅ
2018 – 239.94 दशलक्ष किग्रॅ
वरील आकडेवारीतून उत्पादन वाढत चाललेले दिसते. तसेच भारतात प्रतिवर्षी 10 हजार कोटी सिगारेट बनतात व 70 हजार कोटी बिड्यांची निर्मीती होते.
महसूल – तंबाखू उत्पादकांकडून केंद्र शासनास 50 टक्के महसूल मिळतो.
वापराचे प्रकार – भारतात तंबाखू धूम्रपानविरहित म्हणजे तंबाखू-चुना, मावा, पान, पानमसाला अशा; तर धुम्रपानासाठी म्हणजे बिडी, सिगारेट, चिरूट, धुमती, चिलीम याद्वारे केला जातो.
गुटख्याचाही अलिकडे जास्त वापर होतो. महाराष्ट्र शासनाने बंदी आणल्यावरही दोन वेगळ्या पुड्या विकल्या जातात. त्या एकत्र करून गुटख्याची तलफ भागते.
तंबाखू गुटख्यातील घटक ः
तंबाखूत ः 3500, तर धूम्रपानाच्या धुरात 4000 रसायन असतात. यापैकी निकोटिन, कार्बन मोनोक्साईड, पारा, शिसे, अॅसिटोन, अमायनो अॅसिड्स, क्रोमियम, कॅडमियम इत्यादी नावे आपल्या ऐकण्यातली आहेत. तंबाखूतील निकोटिनमुळे माणूस व्यसनाधीन बनतो.
गुटख्यात ः तंबाखू, चुना, कात (कृत्रिम), मॅग्नेशिअम कार्बोनेट (आरोग्यास अपायकारक) इत्यादी घटक आहेत.
तंबाखू, गुटख्याचे दुष्परिणाम ः
1) हात-पाय ः रक्तवाहिन्यांना इजा होऊन गँगरीन होण्याची शक्यता
2) हाडे ः हाडे ठिसूळ होऊन अस्थिभंग होतात
3) त्वचा ः त्वचा रूक्ष पडून अकाली सुरकुत्या पडतात
4) पुनरुत्पादन संस्था ः तात्पुरते किंवा कायमचे नपुंसकत्व, वंधत्व येऊ शकते
5) पचनसंस्था ः अन्ननलिका, जठर, यकृत, आतडी यांचा कर्करोग होऊ शकतो
6) फुफ्फुसे ः क्षयरोग, दमा, फुफ्फुसांचे संसर्ग, न्युमोनिया यांच्यात भर पडते, फुफ्फुसांच्या कर्करोगांपैकी 87 टक्के रुग्ण धूम्रपानाचे असतात
7) तोंड ः तोंडाच्या कर्करोगापैकी 90 टक्के रुग्ण तंबाखू सेवन करणारे असतात.
8) दात, हिरड्या ः दंतरोग, हिरडीचे आजार, मुखदुर्गंधी
9) नाक ः वासाची क्षमता कमी होते
10) नेत्र ः दृष्टिदोष वाढतो
11) मेंदू ः पक्षाघात (पॅरॅलिसिस) होऊ शकतो
12)केस ः तंबाखू सेवनाने केसांची चकाकी कमी होऊन करडे बनतात.
थोडक्यात काय, तर नखशिखांत परिणाम होतो. याशिवाय 40 वर्षे वयापुढील 20 टक्के मृत्यू तंबाखूने होतात. आयुष्यभर धूम्रपान करणार्यांपैकी 50 टक्के लोक तंबाखूच्या दुष्परिणामानेच मरतात. तंबाखूजन्य पदार्थाची व्यसनी व्यक्ती जीवनातील सरासरी 14 वर्षे गमावते. गुटख्याची एक पुडी 20 मिनिटांनी, तर एक सिगारेट 11 मिनिटांनी माणसाचे आयुष्य कमी करते. अलिकडे अमेरिकेत लोकप्रिय होत चाललेली ‘ई-सिगारेट’मुळे तिची वाफ फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसाची हानी होत असल्याची लक्षणे दिसून आली आहेत.
2016-17 च्या पाहणी अहवालानुसार भारतात दरवर्षी 13 लाख व्यक्तींचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. दर 16 सेकंदाला एक मुलगा म्हणजे एक मिनिटाला 4 मुले तंबाखू खायला शिकतात.
व्यसनांची कारणे ः
पौगंडावस्था म्हणजे बालपण व तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंतचा कालावधी. या वयात स्वातंत्र्याची, स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव व्हायला सुरुवात होते. समवयस्कांचा प्रभाव, भन्नाट नवीन कल्पना, काही वेगळे करून पाहण्याची उत्सुकता वाढते. जाहिरातींचा प्रभाव, मोठ्या मित्रांचे किंवा घरातील, समाजातील वडिलधार्यांचे अनुकरण, गैरसमज (परीक्षाकाळात झोप जाण्यासाठी तंबाखू खावे) यामुळे व्यसनाचा पहिला अनुभव घेतला जातो.
भारतात सर्वांत जास्त तरुण वर्ग राहतो.
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या 2018 चा अहवाल भारताची पुढील वस्तुस्थिती दाखवतो.
वयोगट तंबाखूचे व्यसन करणारे टक्केवारी
(एकूण लोकसंख्येच्या)
13 ते 17 126.0 दशलक्ष 9%
30 ते 69 560.1 दशलक्ष 42%
तंबाखूमुळे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराने मृत्यू होणार्या तरूणांची आकडेवारी इतरांपेक्षा जास्त आहे ती पुढीलप्रमाणे.
वयोगट टक्केवारी
33 ते 44 26%
45 ते 59 25%
60 ते 69 19%
70 पेक्षा जास्त 10%
हे वास्तव खूपच भयानक आहे, म्हणून मित्रांनो आपण विचार करा.
व्यसन सोडण्यासाठी ः तंबाखूचे व्यसन आहे हे लोक मान्य करतच नाहीत; तर ते स्वीकारतात तंबाखू सुटत नाही, हा नकारात्मक विचार मनातून काढून टाकणे.
व्यसन सोडण्याचा निश्चय करून तारीख ठरवून जाहीर करणे. त्या दिवशी काही झाले तरी तंबाखू, गुटखा खाणारच नाही, हा निर्धार कायम ठेवणे.
तंबाखू नियंत्रणासंदर्भातील सध्याच्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा आग्रह धरणे.
तंबाखू नजरेसमोर ठेवू नका (समोर दिसले की आठवते) तलफ झाल्यास स्वत:ला व्यस्त ठेवा. टी.व्ही. पाहणे, संगीत ऐकणे, विनोदी वाचन, बागकाम आदी कामे करा. दीर्घ श्वसनाचा व्यायाम साधारण 3 ते 4 मिनिटं करत राहा. 1 पेला पाणी प्या, बडीशेप, वेलची, लवंग, चॉकलेट खा, निकोटिन गम (मेडिकलमध्ये मिळते) खा. कुटुंबीय निर्व्यसनी मित्रांचा आधार घ्या. सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे तंबाखू मिळेना किंवा महाग मिळतेय. हीच संधी आहे तंबाखू सोडण्याची त्या संधीचे सोने करा.
आपण ‘ई-जमान्या’त आहोत म्हणून सांगेन की, मनाच्या ‘हार्ड डिस्क’वरून व्यसन ‘डिलीट’ करा. आधुनिकतेच्या संपर्क क्षेत्रात मानवता, समानता, समता, बंधुता वाढीस न्या; मग शांतता, आनंद आपोआपच मिळेल.
आपण काय करू शकतो – तंबाखूमुळे शासनाला महसूल मिळतो, हे जरी खरे असले तरी त्यातून होणार्या आजारांवरचा खर्च जास्त आहे. आपण स्वत: व्यसन करणार नाही व इतरांना व्यसन सोडण्यास प्रवृत्त करणे व तरुणांना तसे करण्यापासून परावृत्त करणे. जनजागृती करून दुष्परिणामांची जाणीव करून देणे (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रयत्न करतातच) व्यसनमुक्ती संस्थांची मदत घेणे. विविध सामाजिक संघटनांनी सरकारवर दबाव टाकणे.
तंबाखू नियंत्रणसंदर्भातील सध्याच्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा आग्रह धरणे.
शासनाची जिल्हा पातळीवर असणारी तंबाखू नियंत्रण समिती अधिक क्रियाशील व कार्यप्रवण करण्यासाठी समाजमाध्यमातून आवाज उठवणे. (या समितीची मीटिंग फक्त उरकण्याचा भाग झालाय, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.) शालेय अभ्यासक्रमात 32 दातांची निगा राखण्याची; तसेच तंबाखूजन्य पदार्थाने होणार्या आजारांचा समावेश केल्यास Prevention is better than cure असे होऊ शकेल.
तरुणाईला व्यसनांपासून वाचवणे गरजेचे आहे. आजचा तरुण शोधतोय तंबाखू, गुटख्याच्या पुडीत, सिगारेटच्या पाकिटात, हरवलेला भूतकाळ, हातातून निसटत चाललेला वर्तमानकाळ व शून्य भविष्यकाळ.
तरुणांनो, निसर्गाने आपल्याला आयुष्य जगण्यासाठी दिलंय; पण तुम्ही व्यसनात अडकलाय म्हणून म्हणतो-
जवानी को अपनी धुआँ ना बना तू, नशे में हंसी जिंदगी ना गँवा तू
साँसो की गिनती है बहुतही थोडी, साँसो को अपनी यू ना लुटा तू
नशे से किसी को मिला है ना कुछ भी, बिना बात इसमें ना खुद को जला तू
छोडे तू इसको कोशीश है खुद की, कोशीश को तेरी सफलता दे तू।
आपलं चांगलं जीवन जगताना त्याचा दर्जा राखूया, व्यसनांपासून निर्व्यसनाचा मार्ग चालण्यासाठी मनापासून बदल अपेक्षित आहे. व्यसनाचा अंधार जाऊन आयुष्याची नवीन पहाट होईल, यावर विश्वास ठेवा. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याची आठवण ठेवा.
विवेकाचा आवाज बुलंद करत देऊया नारा. व्यसनमुक्त युवक घडवण्याचा प्रयत्न सारा.