इंद्रजाल, सुवर्णप्राशन आणि पाथ थेरपी अशी ही फसवाफसवी

अनिल चव्हाण -

काहीतरी चमत्कार घडावा आणि आपल्या अडचणी दूर व्हाव्यात; आपल्याला सुख समृद्धी लाभावी; कष्टाविना धन मिळावे; असे मानवी मनाला वाटत असते. नेहमीच्या पाहाण्यात असलेल्या वस्तू आणि व्यक्ती असे काही करू शकत नाहीत, याचा अनुभव घेतलेला असतो. पण विचित्र नाव असलेल्या, परिचित नसलेल्या वस्तू आणि व्यक्ती यांच्याकडे काही चमत्कारिक शक्ती असावी असा समज असतो, तशी इच्छा असते, त्यातून फसव्या विज्ञानाला समाज बळी पडतो. इंद्रजालच काय पण कोणत्याही वनस्पती किंवा प्राण्याच्या अवशेषांमध्ये चमत्कार करण्याची शक्ती नसते. आपल्या समस्या प्रयत्नपूर्वक आपणच सोडवाव्या लागतात.

सुवर्णप्राशन करून लहान मुलांची बुद्धी वाढते अशा जाहिराती काही ठिकाणी सद्या सुरु आहेत. सुवर्णप्राशनाचे फायदे नक्की काय होतात याची अजुन शास्त्रीय तपासणी झाली नाही. तसेच ‘पाथ थेरपी’च्या नावाखाली माती, वाळू, गवत या रस्त्यावरून चालल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात; असे अशास्त्रीय उपचार सद्या सुरु आहेत. या लेखामध्ये इंद्रजाल, सुवर्णप्राशन आणि पाथ थेरपी या नव्या भ्रामक विज्ञानाची चिकित्सा केली आहे.

समाज चालतो समाजातील घटकांच्या कष्टामुळे, श्रमामुळे, कामामुळे, घामामुळे! कोणी रस्ते बांधतो, कोणी शेती पिकवतो, कोणी शाळा चालवतो, कुणी माल विकतो, कुणी ट्रक फिरवतो; प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करतो; आणि मगच आपले पोट भरतो. पण याला काही अपवाद असतात. कष्ट न करता आरामात कसे जगता येईल यासाठी ते प्रयत्न करतात.

यासाठी काही जण देवाधर्माच्या नावावर, चेटूक, भानामती, मंत्र-तंत्र, पूजा, दैवी शक्ती, स्वर्ग-नरक, आत्मा-परमात्मा यांच्या कथा सांगून लोकांना फसवतात. त्याला ‘बुवा’ म्हणतात. ही आध्यात्मिक बुवाबाजी झाली.

लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन ही बुवाबाजी चालत असते. पण काहीजण दैवी शक्तीचे नावच घेत नाहीत. अतिंद्रिय शक्तीचे नाव घेत नाहीत. ते सरळ सरळ विज्ञानाचेच नाव घेतात; आणि फसवतात. त्याला म्हणतात, फसवे विज्ञान किंवा सुडो सायन्स.

दैवी शक्तीबद्दल भक्तांच्या मनात आदर असतो, विश्वास असतो, श्रद्धा असते! तसाच विज्ञानाबद्दल सुद्धा विश्वास असतो! विज्ञानाबद्दलची तुटपुंजी का असेना, माहिती असते. पण अज्ञान जास्त असते. या गोष्टींचा फायदा घेऊन लोकांना फसवले जाते.

एका जाहिरातीमध्ये दोन लहान मुलांच्या आया एकमेकींशी गप्पा मारत आहेत. एक दुसरीला विचारते,”तू तुझ्या मुलाला कॅल्शियमसाठी काय देतेस?”

दुसरी आई पुन्हा पुन्हा सांगते,”मी दूध देते!” तरी पहिलीचा प्रश्न संपत नाही. ती म्हणते,”अगं कॅल्शियम पचण्यासाठी डी- व्हिटॅमिनची गरज असते. डी व्हिटॅमिन या डब्यात आहे! यातील पावडर दुधाबरोबर देत जा!”

कॅल्शियम पचण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज आहे, हे विज्ञान सांगते! त्यामुळे यावर झटकन विश्वास बसतो! पण आपल्या देशात डी व्हिटॅमिन विकत घेण्याची गरज नाही, ते आपल्या त्वचेखाली फुकट तयार होते. त्यासाठी रोज वीस मिनिटे उन्हात बसले की झाले!”

विज्ञानातील अर्धी माहिती वापरून माल खपवण्याची ही युक्ती म्हणजे फसव्या विज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. कोरोनावर औषध शोधण्याचा दावा एका योगी बाबांनी केला. त्यांना मीडियाने भरपूर प्रसिद्धी दिली; न देऊन करतो काय? प्रश्न जाहिरातींचा आहे! पण शासकीय पातळीवर त्याला प्रोत्साहन मिळाले नाही. कारण ही फसवाफसवी भारतात चालली, तरी देशाबाहेर चालणार नाही.

कोल्हापूर भागातील एका मठाधिपतींनी कोरोनावर औषध वाटायला सुरुवात केली. नागरिक एक लिटर पाणी घेऊन येत, त्यामध्ये या औषधाचे दोन थेंब टाकले जात. अनेक लोकप्रतिनिधींनी आणि इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये मतदारांना कोरोनावरचे हे दृश्य औषध कार्यकर्ते लावून वाटले. खेड्यापाड्यातून हे काम शासकीय कर्मचार्‍यांना मिळाले!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या लक्षात ही बाब आली. “हे औषध ड्रग अँड रेमेडीज अ‍ॅक्ट खाली तपासले आहे का?, या औषधाला मेडिकल असोसिएशनने मान्यता दिली आहे का?, या औषधाला शासनाने मान्यता दिली आहे का?”

असे प्रश्न असलेले पत्र प्रमुख शासकीय अधिकार्‍यांना पाठवल्याबरोबर, एकाच दिवसात औषध अदृश्य झाले आणि शासकीय कर्मचार्‍यांची या फसव्या विज्ञानातून सुटका झाली.

देशपातळीवर टाळ्या वाजवणे, थाळ्या वाजवणे, ‘गो करोना’ म्हणून ओरडणे, ढोल वाजवणे, अशा मर्कटचेष्टांना ध्वनी लहरींचे विज्ञान जोडण्यात आले. हा सुद्धा फसव्या विज्ञानाचाच प्रकार आहे.

इंद्रजालचे मायाजाल

धनप्राप्तीची इच्छा प्रत्येकाला असते. पण त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्यापेक्षा काही जवळचे मार्ग उपलब्ध आहेत का? हे काही लोक तपासत असतात. त्यातला एक सोपा मार्ग म्हणजे मनी प्लांट लावणे; घरात मनी प्लांट लावल्यास पैसा कमी पडत नाही! असे म्हटले जाते!

तसेच गोकर्णीचे रोप! गोकर्णीचे रोप गुरुवारी किंवा शुक्रवारी, उत्तर पूर्व दिशेला लावले, तर लक्ष्मी आणि धन घरी येते; असा समज आहे. उत्तर पूर्व दिशेला माता लक्ष्मी आणि कुबेराचे वसतिस्थान असल्याचे यातील हुषार आणि जाणकार मंडळी सांगतात. प्रत्यक्षात आपला लक्ष्मी आणि कुबेराशी संपर्क नसल्यामुळे खरे खोटे तपासणे अवघडच.

गोकर्णीचे रोप आणि मनी प्लांट जंगलात, शेतात आणि माळावर आपोआप उगवते. ही रोपे लावल्याने धनप्राप्ती झाल्याचा अनुभव कुठल्याही शेतकर्‍याच्या गाठी नाही. उलट अशा अनाहूत रोपामुळे शेतातल्या पिकाला मार बसतो, उत्पन्न कमी येते आणि वेळेवर लक्ष दिले नाही तर आहे ते शेत विकून सावकाराचं कर्ज भागवावं लागतं. म्हणून शेताच्या बांधावर मनी प्लांट किंवा गोकर्णीचा वेल उगवला तर शेतकरी तणाबरोबर उपटून टाकतो. ही रोपे शेताच्या कुठल्याही बांधावर आली तरी त्या बांधाच्या पूर्वेला एखादे शेत असते तर उत्तरेला दुसरे. दोघांनाही अनुभव एकच येतो; गोकर्णीची रोपे उत्तरेला असो की दक्षिणेला असोत, सरकार शेतमालाला योग्य भाव द्यायला तयार नसल्यामुळे, कितीही धान्य पिकले तरी शेती तोट्यातच येते. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली तर शेताच्या उत्तरेला कोणतेही रोप नसले तरी शेतकरी दोन घास सुखाने खाऊ शकेल. शेतकर्‍यांचा अनुभव आपण सर्वांनीच लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

नुकतीच वृत्तपत्रात एक बातमी होती, ‘इंद्रजाल विक्री प्रकरणी सातारा कराडमध्ये वन विभागाचे छापे!’

इंद्रजाल वनस्पतीचे खूपच गुण तथाकथित विद्वानांनी सांगितले आहेत. यू ट्यूबवरही आपल्याला ते वाचायला मिळतात. त्यातील काही माहिती पहा.

“वास्तुदोष दूर व्हावा; तसेच सकारात्मक ऊर्जा कायम राहावी; नकारात्मक ऊर्जा जवळ येऊ नये; यासाठी इंद्रजाल वनस्पती ही चमत्कारी शक्तीने युक्त असलेली वनस्पती मानण्यात येते! ही वनस्पती सर्वच प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी असते. नजरदोष, आर्थिक भरभराट, नजरबाधा, वास्तुदोष, संतती प्राप्ती, नजर लागणे किंवा आर्थिक चलन ठप्प झाले असल्यास या वनस्पतीची स्थापना करावी.

‘या वनस्पतीला फ्रेम करून मुख्य दरवाजाच्या आत भिंतीवर लावल्यास, वाईट शक्तीपासून संरक्षण होते. मानसिक शक्ती वाढते.

“ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. वाईट नजर आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी, ती त्वरित प्रभावाने कार्य करते. म्हणजे लगेच कार्य करते. वेळ लागत नाही.”

“काळ्या जादूपासून संरक्षण करते. या वनस्पतीत आध्यात्मिक शक्ती आहे. आजारपण, शत्रुत्व आणि व्यवसायाचे नुकसान टाळते. पूजेच्या घरात ठेवल्यास शक्ती आणखी वाढते. ही वनस्पती तंत्रशास्त्रातील श्रेष्ठ वनस्पती मानली जाते. जारण, मारण, मोहन, स्तंभन उच्चाटन, वशीकरण इत्यादी तंत्र कामासाठीही तिचा उपयोग होतो.

“ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा अडवते. चोरांपासून संरक्षण करते. सकारात्मक ऊर्जेला प्रवेश देते.”

म्हणजे इथं उपयोग द्वारपालाप्रमाणे होतो आहे.

“या वनस्पतीच्या वापराने यश मिळते. सुख-समृद्धी येते. बाहेरच्या बाधेपासून मुक्ती मिळते. पैशांची अडचण येत नाही. समाजात प्रतिष्ठा वाढते. ही वनस्पती अडचणी सोडवते. व्यवसायाला चालना देते. नि:संतानांना संतान देते. नवरा-बायकोची भांडणे मिटवते.

अर्थात, हे सर्व व्हायचे तर त्यासाठी पूजा करणे, मंत्र-तंत्र म्हणणे दक्षिणा देणे हे आलेच. किंबहुना, हेच जास्त महत्त्वाचे आहे.

“ही वनस्पती पूजाविधी करून, सिद्ध करून, स्थापित करावी. शुभ्र लाल कपड्यात गुंडाळून देवघरात ठेवावी. किंवा फ्रेम करून प्रवेशद्वारावर लावावी. म्हणजे नकारात्मक ऊर्जा अडवते. आणि चोरांपासून संरक्षण देते. सकारात्मक ऊर्जेला प्रवेश देते.

“उत्तर पूर्व दिशेला स्थापना केल्यास, यश समृद्धी मिळते. दक्षिण दिशेला स्थापन केल्यास, पैसा कमी पडत नाही.

“घरात स्थापना केली तर तुमच्याभोवती सुरक्षा कवच तयार करते. लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्याही संरक्षणासाठी तिची पूड ताईतामध्ये भरून गळ्यात धारण केली जाते. ही वनस्पती वही-पुस्तकात ठेवल्यास वाचन केलेले लक्षात राहते.

“गर्भपात होत असेल तर काळ्या कपड्यात तिची भुकटी घेऊन कंबरेभोवती गुंडाळावी.

“एवढेच नव्हे, तर हिची भुकटी शत्रूच्या घरावर किंवा शत्रूवर फेकली तर त्याचाही विचार बदलतो.

“या वनस्पतीची स्थापना करण्यासाठी, गुरुवार, शुक्रवार, नवरात्र, दिवाळी इत्यादी दिवस शुभ मानले जातात. रवि पुष्य नक्षत्रावर किंवा शुक्ल पक्षातील मंगळवारी अथवा शनिवारी त्या त्या ग्रहांच्या प्रभावाच्या काळामध्ये वनस्पती घरी आणावी.”

या वनस्पतीची इतकी माहिती आपण वाचली. पण गंमत अशी आहे की, ही वनस्पती नसून हा आहे प्राणी! खोल समुद्रात खडकावर वाढणारा हा प्राणी आहे! म्हणजे हा प्राणी आहे की वनस्पती आहे याचेही ज्ञान नसणारी मंडळी त्याला असंख्य गुण चिकटवून लोकांकडून पैसे उकळत आहेत.

या वनस्पती समजल्या जाणार्‍या प्राण्याला असंख्य गुण चिकटवले आहेत. ते आपण तपासले पाहिजेत. या वनस्पतीमुळे वास्तुदोष दूर होतो म्हणतात. एखाद्या फ्लॅटमध्ये पावसाळ्यात पाणी गळत असेल, तर हा वास्तुदोष अशा कितीतरी वनस्पती किंवा प्राणी फोटो फ्रेम करून लावले तरी बंद होईल काय?

ऊर्जेचे विविध प्रकार शालेय विद्यार्थ्यांना माहिती आहेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, अणुऊर्जा, प्रकाश ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा; या ऊर्जांचा वापर करूनच आजचे मानवी जीवन सुरू आहे. यापैकी एक ऊर्जा दुसर्‍या ऊर्जेमध्ये रूपांतरित सुद्धा करता येते. पण सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा असा काही प्रकार कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात शिकवला जात नाही. जगभरच्या विद्वानांना, संशोधकांना माहिती नसलेल्या या दोन ऊर्जा भारतातील तज्ज्ञांना ठाऊक आहेत. त्यांचे नोबेल पारितोषिक देऊन कौतुक केले पाहिजे.

नजर दोष, नजर बाधा, वाईट नजर, नजर लागणे म्हणजे काय?

नजरेसंबंधीचे सर्वदोष आणि आजार दूर करण्यासाठी आज गावोगाव नेत्रतज्ज्ञ म्हणजे आय स्पेशालिस्ट आहेत. त्यातील अनेक जण उच्चशिक्षित असून परदेशात जाऊन अभ्यास करून आलेल्यांची संख्या ही मोठी आहे. पण त्यांनाही माहिती नसलेल्या नजरे संबंधीच्या गोष्टी हे तथाकथित वास्तुदोष निवारक सांगत असतात.

आर्थिक चलन ठप्प झाले असल्यास ही वनस्पती उपयोगी आहे, ती कशी? हे समजत नाही! जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या शासनाच्या धोरणानंतर देशातील सर्वसामान्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे; अशावेळी त्यांचे आर्थिक चलन पुन्हा सुरू होणार असेल तर अर्थतज्ज्ञांनी सुद्धा याची माहिती घ्यावी.

या वनस्पतीचा उपयोग संतती प्राप्तीसाठी सुद्धा आहे. यापूर्वी आपण ‘आंबे खाऊन पोरं होतात’ असे छातीठोकपणे सांगणारे गृहस्थ पाहिले आहेत. त्यांचे म्हणणे मनावर घेऊन, लग्नाऐवजी आंबे खाणारे कोणी आढळले नाहीत. किंवा आंबे खाऊन पोरं होतात; म्हणून लग्न जुळेपर्यंत आंबे खाऊ नयेत; असे निर्बंध घातल्याचेही ऐकवात नाही.

पुराणातल्या भाकडकथांमध्ये आईच्या पोटाऐवजी वेगळ्याच ठिकाणाहून जन्म घेतलेली पात्रे आढळतात. अर्थात, पुराणे ही भटांची पोटे भरण्यासाठीच लिहिलेली असल्यामुळे, त्या कथांनुसार मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही अथवा एखादे डॉक्टरही तसा उपचार करण्याचा सल्ला देत नाहीत. पण ही वनस्पती संतती कशी प्राप्त करून देणार आहे, याचा काही खुलासा केला जात नाही. म्हणजे वनस्पती पाठीवर किंवा पोटावर बांधावी, गळ्यात बांधावी की पोटात घ्यावी?

ती बांधा कुठेही पण बांधण्यापूर्वी भरमसाठ दक्षिणा द्या म्हणजे झाले. त्याला म्हणतात वनस्पती सिद्ध करणे.

ही वनस्पती आजारपण टाळते; ते कसे?

आजारपण टाळायचे तर, जंतू आपल्यापासून दूर ठेवावे लागतात किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी लागते. त्यासाठी डॉक्टर टॉनिक देतात, फळे खायला सांगतात, लस देतात, मग ही वनस्पती नेमकी काय करते?

ही वनस्पती चोरापासून सुद्धा संरक्षण करते. असे काही संरक्षण होत असेल तर. बँकवाल्यांना ही माहिती कळू देता कामा नये. सध्या किमान ८-१० हजारात पहारेकर्‍याची नोकरी तरी मिळते, तीपण जाऊन बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.

“ही वनस्पती तंत्रशास्त्रातील श्रेष्ठ वनस्पती मानली जाते. जारण, मारण, मोहन, वशीकरण, इत्यादी तंत्र कामासाठी त्याचा उपयोग होतो. तिची भुकटी शत्रूच्या घरावर किंवा शत्रूवर फेकली तर त्याचाही विचार बदलतो!” युट्युबवर आलेली ही माहिती आपल्या संरक्षणमंत्र्यांना ठाऊक आहे काय? राफेलच्या चाकाखाली त्यांनी लिंबू चिरडले; आणि ‘पाचशे कोटीचे विमान पंधराशे कोटीला का घेतले?’ हा प्रश्न लोक विसरून गेले. इंद्रजालचे हे गुण त्यांना माहिती असते तर त्यांनी विमाने घेण्याऐवजी इंद्रजालची भुकटी मागवली असती. शत्रूवर जारण मारण केले असते किंवा शत्रूला वश तरी केले असते.

या वनस्पतीमुळे नवरा-बायकोची भांडणे मिटणार आहेत. समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे, म्हणजे सर्व अडचणींवर ही वनस्पती उपयोगी आहे. फक्त पूजा करणे, मंत्र-तंत्र म्हणणे आणि मुख्य म्हणजे दक्षिणा देणे; एवढाच काय तो त्रास.

आपल्याला मिळणार्‍या माहितीची थोडीशी जरी चिकित्सा केली तरी त्या मागील लबाडी लक्षात येते. या चिकित्सेलाच ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ म्हणतात. शासनाने वन्यजीवांच्या दुर्मीळ आणि नष्ट होत चाललेल्या प्रजातींमध्ये इंद्रजालचा समावेश केला आहे!

समुद्री परिसंस्था उच्च दर्जाची राहण्यासाठी या प्राण्याचे समुद्रात अस्तित्व महत्त्वाचे आहे, असे वनाधिकार्‍यांनी सांगितले आहे. अशावेळी या फसव्या विज्ञानापासून आणि फसव्या वैज्ञानिकांपासून इंद्रजाल प्राण्याला वाचवले पाहिजे.

सातारा वन विभागाच्या धाडीत इंद्रजाल जप्त

कोंडवे (सातारा) : सातारा शहरातील १६२ सदाशिव पेठमधील श्रीदत्त पूजा भांडारमध्ये सातारा वनविभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. सदर दुकानातून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी बनावट ग्राहक बनून धाड टाकली. यात इंद्रजाल अर्थात काळे कोरल (Anthozoa Hexacorollia) ह्या समुद्री प्राण्याचे अवशेष मिळून आले. त्याची ५९ इतकी संख्या आहे.

सदरचा मुद्देमाल वन अधिकार्‍यांनी आपल्या ताब्यात घेतला असून श्रीदत्त पूजा भंडारचे मालक संतोष लक्ष्मण घोणे यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४३,४४, ४८, ४९,५१ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलीय. जप्त इंद्रजाल मालाची किंमत अंदाजे चार लाख रुपये इतकी असल्याचे वनअधिकार्‍यांनी सांगितले. त्याच दुकानाची अधिक झडती घेतली असता, तेथे चंदनाचे तुकडे व मोरपीसेही सापडली. वनाधिकार्‍यांनी घेतलेल्या झडतीमध्ये या दुकानातून चंदनाचे ८० किलो तुकडे व ६०० मोरपिसेही जप्त करण्यात आली. ह्या वस्तू बाळगणे व विकणे वनकायद्याने गुन्हा आहे.

दरम्यान, तत्सम प्रकारचा मुद्देमाल कोणी बाळगत असेल अथवा विक्री करत असेल, तर त्याची खबर वनविभागास द्यावी, असे आवाहनही वनअधिकार्‍यांनी जनतेस केले आहे.

साभार दैनिक सकाळ

दि. ५ ऑक्टोबर २०२१

इंद्रजाल : एक समुद्री जीव

प्राणीशास्त्र क्षेत्रातील तज्ञ धनाजी केसरकर सर हेक्झाकोरालियाबद्दल बोलताना म्हणाले, “इंद्रजाल ही वनस्पती नसून हा वनस्पतीसदृश प्राणी आहे. तो सिलेंटेरेटा म्हणजे अंतरगुही संघाचा अ‍ॅकरीनोझोआ वर्गातील एक उपवर्ग आहे. हा उपवर्ग ‘झोअँथेरिया’ या नावानेही ओळखला जातो. या उपवर्गात, समुद्रपुष्पे, अश्म प्रवाळ, काळेपोवळे व पॅकिसेरिअँथस, यासारख्या अनेक प्राण्यांचा समावेश होतो. या उप वर्गातील बहुतेक प्राणी एकएकटे वा समूहाने राहणारे आहेत. त्याना शाखा नसतात. त्यांना आठ पेक्षा जास्त संस्पर्शिका म्हणजे ट्रॅक्टॅकल्स असतात. देहभित्तीपासून निघून आंत्रात गेलेले, उभे स्नायूमय पडदे असतात. त्यांना अरीय पडदे म्हणतात. अंत्राच्या म्हणजे आतड्याच्या भित्तीमध्ये दोन खोल खाचा असतात. प्रत्येकीला ग्रासिका-खाच म्हणजे सायफोनोग्लिफ म्हणतात. ती घसा व जठर यांच्यामधील भागावर असते. कंकाल तंत्र हे कोणत्याही स्वरूपात आढळते. या उपवर्गातील प्राण्यात खूपच विविधता आढळते. या त्याच्यामध्ये सुमारे ५००० जातींचा समावेश होतो. गुगलवर विकिपीडियाने त्यांचा आकडा ४३०० दिला आहे. या प्राण्यांची विभागणी सहा गणामध्ये केली जाते. १) अ‍ॅक्टिनिएरिया २) झोअँथोडीया ३) कोरॅलीमार्फेरीया ४) सेरीअँथेरिया ५) अँटीपॅथेरिया ६) मॅड्रेपोर्‍यारि. थोडक्यात म्हणजे या प्राण्यांचा सखोल अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यांना या प्राण्यांमध्ये कोणतेही दैवी किंवा चमत्कारिक शक्ती असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

सुवर्णप्राशनाने बुद्धी वाढेल..?

“एक महिन्यापासून सोळा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी सुवर्णप्राशन डोस… एक वर्षासाठी फक्त रुपये तीनशे मध्ये उपलब्ध आहे”. अशी जाहिरात वाचायला मिळाली.

ते जाहिरातीत म्हणतात,

१) ड्रॉप प्रत्येक महिन्यात पुष्य नक्षत्रावर द्यावा.

२) या डोसमुळे कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही.

सुवर्णप्राशनाचे फायदे त्यांनी सांगितले आहेत.

“या आयुर्वेदिक औषधामुळे मानवाच्या मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत राखला जातो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह योग्य स्थितीत व व्यवस्थितरित्या चालू झाल्यामुळे मानवाचे ताण-तणाव, उदासीनता, स्वभाव चिडचिडा होणे व निद्रानाश, यांसारख्या विकाराचा या औषधाने र्‍हास होतो.

“थोडक्यात, या औषधाने स्मरणशक्ती आणि बुद्धीमध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होते. अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी एकाग्रता वाढते. बालकांच्या आकलन शक्तीमध्ये वाढ होते. अशा प्रकारे हे औषध बालकांमध्ये ब्रेन टॉनिकचं काम करते.

पुढे सुवर्ण प्राशनमधील घटक औषधे व गुणधर्म कोणकोणते आहेत त्यांची माहिती दिलेली आहे.

१) अश्वगंधा : याचा उपयोग आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.

२) ब्राह्मी : त्यामुळे बुद्धी, प्रज्ञा व आयुष्य वाढवले जातात.

३) वज्र : यामुळे बालक अधिक बुद्धिमान बनतो.

४) शंखपुष्पी : शंखपुष्पी शीतल व बुद्धिवर्धक आहे. चेतातंतू व मज्जातंतूंच्या विकासासाठी हिचा उपयोग आहे. शंखपुष्पी हितकारी व गुणकारी आहे.

५) बेहडा : हे कफ, पित्त व कृमी स्वरंभ, रक्तरोग व कंड रोगासाठी लाभदायक आहे.

६) जटामासी : हे भूक आणि पचनशक्ती प्रणाली वाढवते आणि अपचन दूर करते.

७) मध : मध हा सारक आहे.

८) सुवर्णभस्म : हे शरीर धष्टपुष्ट आणि मजबूत बनवते. श्वासरोग, कफ, ज्वर आणि दस्त यावर लाभदायक. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

त्याखाली, एवढी माहिती कमी पडली म्हणून त्यांनी खाली टीप घालून, त्याची एकत्रित माहिती दिलेली आहे.

ते म्हणतात, “ही माहिती वेदिक ग्रंथाच्या आर्यभिषेक ग्रंथ संदर्भा नुसार आहे.”

या सुवर्णप्राशनाचे फायदे :

*रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पचनशक्ती सुधारते.

*शारीरिक व मानसिक बळ वाढविते.

*त्वचा नितळ होऊन कांती सुधारते.

*वाणीमध्ये मधुरता येऊन वाक्य स्पष्ट येते.

*मनाची एकाग्रता वाढून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होते.

काही डॉक्टर आपल्या रुग्णालयांमध्ये सुवर्णप्राशनाची सुविधा उपलब्ध करून देतात. पण अशी काही सुविधा आहे हे लोकांना कोण सांगणार? ते सांगण्यासाठी घराघरात सर्व्हे करत तरुणी फिरत असतात; त्यांचा पेहराव नर्स सारखा किंवा डॉक्टर सारखा असतो. म्हणजे अंगात पांढरा अ‍ॅप्रन ही गोष्ट महत्त्वाची.

हा डोस पुष्य नक्षत्रावर का घ्यायचा? शरीरात जाणारे औषध कधीतरी नक्षत्रानुसार काम करते का? मीठ पुष्य नक्षत्रावर खाल्ल्यामुळे खारट लागते ते इतर नक्षत्रावर गोड किंवा तिखट लागणार आहे का?

नक्षत्र म्हणजे काय?

आपल्याला ठाऊक आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण आपल्याला सूर्यच पृथ्वीभोवती फिरल्यासारखा वाटतो याला ‘भासमान भ्रमण’ म्हणतात.

सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गाचे २७ भाग केले आहेत. त्या प्रत्येकाला ‘नक्षत्र’ म्हणतात. ज्या वेळी सूर्य एका नक्षत्रात असतो त्या वेळी ते नक्षत्र लागले असे म्हणतात. सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे त्यावर औषधाचा परिणाम अवलंबून असेल का?

या औषधामुळे मानवाच्या मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत राखला जातो असे म्हणतात. प्रत्यक्षात मेंदूचा रक्तपुरवठा नेहमीच सुरळीत सुरू असतो, म्हणून तर आपण दैनंदिन व्यवहार व्यवस्थित करतो.

मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल साठले आणि रक्त वाहिनी लहान बनली, कडक बनली तर रक्तातील गुठळी त्यात अडकते. आणि काही क्षण रक्तपुरवठा खंडित होतो. अशावेळी व्यक्तीला पॅरालिसिसचा झटका येतो. अशी परिस्थिती व्यसनामुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा वृद्धापकाळामुळे निर्माण झालेली दिसते.

सुवर्ण प्राशन हे औषध शून्य ते सोळा वयोगटातील मुलांसाठी द्यावयाचे आहे. एवढ्या लहान वयात मेंदूच्या रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होत नाही. आणि ज्यांच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे त्या मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तीला हे औषध दिले जात नाही, त्यांना डॉक्टर रक्त पातळ होण्याची गोळी देतात.

या औषधाने स्मरणशक्ती, बुद्धी आणि एकाग्रता वाढते, आकलन शक्ती वाढते, हे तपासले कधी?

यातील कोणतीच गोष्ट कोणत्याच औषधाने होत नाही! त्यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी शालेय अभ्यासक्रम तयार केला आहे. पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. पुन्हा पुन्हा पुस्तके वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने स्वतः शोधली तर त्याच्या स्मरणात राहते! आकलन शक्ती म्हणजे समजून घेण्याची शक्ती वाढते. एकाग्रता सुद्धा कष्टसाध्य गोष्ट आहे. या गोष्टी औषधाने शक्य झाल्या असत्या तर शासनाने शिक्षणाचा एवढा मोठा पसारा उभा केला नसता.

बर्‍याच वेळा अशी वैद्यकीय माहिती सांगण्यासाठी अ‍ॅप्रन घालून तरुणी येतात. टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये सुद्धा वैद्यकीय माहिती सांगण्यासाठी अंगात अ‍ॅप्रन घातला जातो. पाहणार्‍याला वाटते हे कोणीतरी मोठे डॉक्टर आहेत. डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी असेही मार्ग वापरले जातात.

‘पाथ थेरपी’चा फसवा मार्ग

काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात बसवर बोर्ड लागले, ‘चला कुशिर्‍याला डोळ्यात औषध घालायला!’ हजारो लोकांनी डोळ्यांच्या विकारावर अशास्त्रीय आणि हानिकारक औषध डोळ्यात घालून घेतले. काही काळाने अनुभवानेच लोक शहाणे झाले आणि कुशिर्‍याचा धंदा बंद पडला. तोपर्यंत अशा हजारो रुग्णांच्या डोळ्यांचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही.

सोशल मीडियावरून अनेकजण आरोग्याच्या टिप्स देत असतात. त्या न तपासता त्यावर विश्वास ठेवणारे, आपण होऊन फसवणुकीला बळी पडतात. पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी विविध पावडर खाणारे लवकरच ब्लड प्रेशर कमी झाले म्हणून इस्पितळात भरती होतात.

सामाजिक प्रश्नाबद्दल मध्यमवर्ग उदासीन बनला आहे. सातार्‍यामधील नगरपालिकेने तयार केलेली ही बाग… नियोजनपूर्वक वाढवलेली रोपे, नयनरम्य हिरवागार परिसर, शांतता, स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी आहे. इथल्या कर्मचार्‍यांना त्याबद्दल शाबासकी दिलीच पाहिजे.

बागेत मध्यावर आपल्याला एक दीड दोनशे पावलांचा चालण्यासाठी गोलाकार मार्ग दिसेल. त्याला ‘ट्रीटमेंट पाथ’ नाव दिले आहे. ट्रीटमेंट पाथवर चालण्याचे फायदे फलकावर लिहिले आहेत.

) मॅग्नेटिक पाथ : उच्च शक्तीच्या चुंबकावर चालल्याने शरीरातील जैव विद्युतप्रवाह सुगम होऊन वेदनांपासून आराम मिळतो.

) ग्रास पाथ : चेतासंस्था अधिक सक्रिय होते! ऑप्टिक नर्व्ह र्क्रियाशील होते. फलस्वरूप दृष्टी सुधारते. रक्तदाब कमी होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.

) अ‍ॅक्युप्रेशर पाथ : खडीवरून चालल्याने शरीरातील १०८ ऊर्जा बिंदूवर दाब पडून ते क्रियाशील होतात. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी यामध्ये दिलासा मिळतो. स्थूलता कमी होण्यास मदत होते

) सी सँड पाथ : समुद्राच्या वाळूमधून चालल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया जलद होते.

) क्रिस्टल पाथ : विशिष्ट स्फटिकासारख्या लहान आकाराच्या दगडावरून चालताना ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा शोषली जाते व आराम अनुभव होतो.

) मड पाथ : माती शरीरातील विष शोषून घेते. शारीरिक व मानसिक शीतलतेचा अनुभव येतो.

) हायड्रो पाथ : कडुलिंबाची पाने टाकलेल्या पाण्यामधून चालल्याने शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन स्फूर्ती मिळते.

फलकाखाली सूचना दिली आहे. ‘कृपया ट्रीटमेंट पाथवर चालणे १४ वर्षांच्या आतील मुलांना अपायकारक होऊ शकते, तरी पालकांनी याची खबरदारी घ्यावी.’

फलक वाचल्यावर मी बागेत फिरायला आलेल्या नागरिकांशी बोललो.

“वेदनांपासून आराम मिळाल्याची काही नोंद आहे का?’ असे शेजारी बसलेल्या एका नागरिकांना विचारले तेव्हा ते म्हणाले “हो! आम्ही सुरुवातीला नोंदी केल्या आहेत; त्याच्या वह्या केंद्रामध्ये आहेत.”

लगेच शेजार्‍यांनी खुलासा केला. “नोंदी आहेत, पण त्या भेट देणार्‍या नागरिकांच्या!”

“वेदना होत होती आणि त्याला आराम मिळाला किंवा नाही यासंबंधीच्या नोंदी नाहीत.”

“म्हणजे रक्तदाब, दृष्टी सुधारणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, स्थूलता कमी होणे, विषारी द्रव्य बाहेर टाकणे, विष शोषून घेणे, सकारात्मक ऊर्जा, शारीरिक व मानसिक थकवा दूर होणे यातील एकही गोष्ट इतक्या वर्षांत कोणीही तपासलेली नाही.” मी शेरा मारला.

एका अवैज्ञानिक ईश्वरीय विश्वविद्यालयाशी सहयोग करून ही बाग उभारल्याचे समजले. पालिकेचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी तसेच गावातील बागेला भेट देणारे नागरिक यातील कुणालाच ही माहिती तपासावे, असे वाटले नाही. सातारा जिल्हा हा वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असेल, पण मुख्य म्हणजे तो कर्मवीरांचा जिल्हा आहे! सगळ्या महाराष्ट्राला सत्यशोधकी विचाराने साक्षर करण्याचा विडा उचलणार्‍या कर्मवीरांचे मुख्य स्थान! त्यांच्या सत्यशोधकी विचारांनी, चिकित्सकपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानी चालणार्‍या शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या अवैज्ञानिक फलकांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे.

सुडो सायन्स वाढण्याची कारणे

हे सुडो सायन्सचे प्रकार का वाढताहेत याचाही विचार केला पाहिजे. जागतिक बँकेच्या अटीनुसार जागतिकीकरणानंतर भारत सरकारने शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रातून आपले अंग काढून घेतले, जबाबदारी झटकून टाकली; तिथे बाजारीकरण झाले. बाजाराचा नियम म्हणजे, नफा मिळवा; जास्तीत जास्त नफा मिळवा; जमेल त्या मार्गाने नफा मिळवा! त्यामुळे फसव्या जाहिरातींना ऊत आला.

इस्पितळ उभारायचे तर पेशंट बरा करण्यापेक्षा बँकेचे व्याज भागवणे महत्त्वाचे आहे. त्या दिशेनेच तपासण्या आणि उपचार करावे लागतात.

दुसर्‍या बाजूला जागतिकीकरणाने जीवघेणी स्पर्धा वाढवली. सर्वसामान्यांचे जीवन हलाखीचे बनवले. त्यांना चांगले शिक्षण आणि प्रामाणिक वैद्यकीय सेवा मिळणे अवघड बनले. चौसष्ट हजार शाळांचे खाजगीकरण करण्यासंबंधीचा विचार शासनाने बोलून दाखवला आहे. सामान्य माणसाने करायचे काय? अशा सैरभैर झालेल्या ग्राहकांची शिकार करायला शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र टपलेले आहे. म्हणून या फसव्या विज्ञानाविरोधात लोकजागृती करत असतानाच शासकीय धोरणाविरोधात संघर्ष सुद्धा उभा केला पाहिजे!

सरकार सर्वसामान्यांसाठी काही योजना जाहीर करते; पण सरकारी योजनांमधून भ्रष्टाचार कसा चालतो याचे ढळढळीत दाखले कॅगने, म्हणजे शासकीय ऑडिटरने दिले आहेत. लोकांना शासनाने आयुष्मान भारत योजनेतून लाखो रुपये ऑपरेशनसाठी दिले, पण ते लोकांपर्यंत पोहोचलेत का? कॅगने म्हटले आहे की, त्यामधील साडेसात लाख लोकांचा मोबाईल नंबर एकच आहे.

जगभर आजारी लोकांना वाचवण्यासाठी उपचार केले जातात, हे आपल्याला ठाऊक आहे. पण आपला देश इतका पुढे गेला आहे की इथे अठ्ठ्याऐंशी हजार मुडद्यांवर डॉक्टरने उपचार केले. म्हणजे मेलेल्या माणसावर उपचार करून लाखो रुपये हडपण्यात आले. एवढा प्रचंड भ्रष्टाचार एकटी दुकटी व्यक्ती सत्ताधार्‍यांच्या मदतीशिवाय करू शकत नाही. त्यामुळे याची चौकशी सुद्धा होत नाही. म्हणजे सर्वसामान्यांसाठी योजनांची मागणी करावी लागेल; आणि त्याच्या अंमलबजावणीवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. महात्मा जोतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी केलेली मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या पाच मूलभूत गरजा भागवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत; हे ठणकावून सांगावे लागेल.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जोडून घ्यावे लागेल. सुडो सायन्स विरोधातली लढाई अवघड आहे, पण अशक्य नाही.

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]