सुभाष थोरात - 9869392157

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे कादंबरीकार, कथाकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. परंतु याबरोबरच त्यांनी वैचारिक आणि समीक्षणात्मक स्वरुपाचे लेखन विपुल केले आहे. मूलतः कवी असलेल्या कोत्तापल्ले यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. एक ‘मूडस’, ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि दुसरा ‘दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू‘ हा नुकताच प्रकाशित झाला आहे. आजच्या वर्तमानातील भयप्रद परिस्थितीचे वास्तव चित्रण त्यांच्या या नव्या ताज्या कवितासंग्रहामध्ये आहे. म्हणूनच ‘मेंदू लिंपून घ्यावा,’ असे उपरोधाने त्यांनी म्हटले आहे. या कवितासंग्रहाबरोबरच त्यांचे ‘संतांची स्वप्नदृष्टी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
बाराव्या शतकापासून सुरू झालेली संत चळवळ सोळाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. या पाच दशकांत वारकरी पंथात अनेक संत होऊन गेले. या संतांनी आत्मचरित्र; तसेच इतर संतांची चरित्रे लिहिली आहेत. संतांचे आत्मचरित्र आणि चरित्रातून येणार्या स्वप्नदृष्टीचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. सर्वसाधारणपणे संत अंधश्रद्धा मानत नाहीत; पण संतचरित्रातून येणारे चमत्कार काय आहेत, त्यांचा अर्थ कसा लावायचा, अशा मांडणीतून संत काय सांगू इच्छितात, याचा एक धांडोळा या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली किंवा रेड्यामुखी वेद वदवले अथवा तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, हे आपण कसं समजावून घेणार, यामागे नेमके सत्य काय आहे, असेल, अशी अनेक चमत्कारांची कोडी सोडवण्याचा प्रयत्न आणि त्यामागील वास्तव मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
संपूर्ण संत चळवळीचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. पहिले संत आणि वारकरी पंथाचे संस्थापक संत नामदेवांपासून ते थेट शेवटचे संत निळोबाराय यांच्यापर्यंत हा धावता आढावा घेतला आहे. यामध्ये आपल्याला माहीत नसलेले, फारसे प्रसिद्ध नसलेले संतही आहेत. एका अर्थाने समग्र संत चळवळीचा इतिहास या पुस्तकात मांडला गेला आहे त्यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण बनले आहे.
या पुस्तकाची पाच प्रकरणांत मांडणी केली आहे. सुरुवात ‘मध्ययुग ः सामाजिक स्थिती, गती’ आणि ‘नव्या संप्रदायाचा उदय‘ या प्रकरणापासून होते. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिक आध्यात्मिक अशा सर्व अंगांनी तत्कालीन समाजस्थिती, गतीचा वेध घेतला आहे.
बाराव्या शतकापासून हे प्रकरण सुरू होते. मध्ययुग आणि आणि आधुनिक युगाची सीमारेषा कोणती, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मध्ययुगात धर्माचे कसे प्राबल्य होते, धर्म जीवनाच्या केंद्रस्थानी कसा होता आणि निर्णयप्रक्रिया धर्माला अनुसरूनच कशी होत होती, याचा ऊहापोह केला आहे. अगदी राजालाही राजा होण्यासाठी धर्माच्या मान्यतेची गरज होती. कर्मकांडांचे प्राबल्य वाढून सामान्य माणसाचे जिणे वैदिक धर्माने असह्य करून ठेवले होते.
याबरोबरच मध्ययुगात बौद्ध आणि जैन धर्माचा जोर ओसरला होता. वैदिक धर्माला मोकळे रान मिळाले होते. जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा हा धर्म असल्यामुळे अर्थातच जातिव्यवस्था आणि स्त्रीदास्य अधिक कठोर आणि कडक झाले. मध्ययुगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिमांची आक्रमणे आणि मुस्लिम राजवटी स्थिर होणे. जातिव्यवस्थेचे समर्थन करणारी वैदिक धर्मव्यवस्था आणि मुस्लिम धर्मव्यवस्था यामध्ये समतेच्या मूल्याबाबत जमीन-अस्मानाचे अंतर होते. त्यांच्या समतावादी विचारांचा काहीएक परिणाम भारतीय जनमानसावर निश्चित झाला. यासंदर्भात भारतामध्ये महंमदाचे जहामर्द शिष्य असल्यामुळे समतेचे मूल्य भारतीयांना अधिक पटले, असे महात्मा फुले यांचे मत उदधृत केले आहे.
हे खरे असले तरी समतेचे मूल्य हे अवैदिक तत्त्वज्ञानाची परंपरा आहे. बुद्ध, चार्वाक, महावीर यांच्यापासून सुरू झालेल्या या परंपरेचा भारताच्या अवघ्या समाजजीवनावर एकेकाळी प्रभाव पडलेला आहे. अगदी वैदिक धर्मावर तिचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळेच वैदिक धर्माच्या अंतर्गतही समतेचे तत्त्वज्ञान मांडणारे अनेक पंथ उदयाला आलेले दिसतात. वारकरीही पंथाच्या तत्त्वज्ञानात त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. त्याचा ऊहापोह करताना डॉ. कोत्तापल्ले यांनी संतांच्या अभंगाचे दाखले दिले आहेत.
ते म्हणतात, शैव आणि वैष्णव यांचा एक समन्वय वारकरी संप्रदायामध्ये जसा दिसतो, तसा बौद्ध मताचा प्रभावही वारकरी संप्रदायावर थोड्या अंशाने का होईना दिसतो. ‘ज्ञानेश्वरी’ हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथाच्या प्रारंभी गणेश वंदनेमध्ये पुढील ओवी येते –
एके हाती दंतू
जो स्वभावता खंडितु
तो बौद्धमत संकेतु
वार्तिकाचा ॥
येथील बौद्धमत संकेत महत्त्वाचा नाही, असे म्हणता येईल काय? किंवा संत सोयराबाई ‘आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध’ असे म्हणतात, तेव्हा जनमानसाच्या स्मृतीमधील हे बुद्ध रुप आहे का?
पुढे ते म्हणतात, समाधी महिमा प्रकरणामध्येही संत ज्ञानेश्वरांनी श्री विठ्ठलाचा गौरव करताना त्यांना ‘शुद्धबुद्ध’ म्हटलेले आहे. याचा निर्देश संत नामदेव करतात.
संत तुकारामांच्या अभंगांमध्ये ही श्री विठ्ठलाच्या बौद्ध असल्याचा उल्लेख आला आहे. बौद्ध अवतार माझ्या या अदृष्टीे (मूळ शब्द पाहणे) आणखी एका ठिकाणी संत तुकारामांनी ‘शुद्धापासी शुद्धबुद्ध’ व्हावे असे म्हटले आहे. हे सांगून त्यांनी पुढे म्हटले आहे – तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनी बौद्ध मताच्या ‘वज्रसुची’चा अनुवाद केला हे गोष्ट सर्वमान्य आहे. त्यांनी एका अभंगांमध्ये ‘कलियुगी बौद्धरूप धरी हरी’ असा निसंदिग्ध उल्लेख केला आहे. याचा अर्थ असा की, संत ज्ञानेश्वर, संत बहिणाबाई अशा पाचशे ते पाचशे पन्नास वर्षांच्या काळात पंढरपूरचे श्री विठ्ठल हे बौद्ध अवतार आहेत, अशी सगळ्यांची पक्की धारणा आहे.
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी श्री विठ्ठल हा बुद्ध अवतार आहे, असे मत नोंदवले होते, हे लक्षात घ्यावे; शिवाय डॉ. भाऊ लोखंडे यांनी वारकरी संप्रदायावर बौद्ध मताचा कसा प्रभाव आहे, याविषयी स्वतंत्र प्रबंध लिहिला आहे,
असेही लेखकानी नमूद केले आहे.
वरील विवेचनाचा निष्कर्ष काढताना कोत्तापल्ले यांनी वारकरी संप्रदाय हा अशा विविध मतांचा समन्वय करणारा आहे. त्याच्या लोकप्रियतेचे रहस्य हेच तर नव्हे? त्यांचे हे मत बरोबर आहे. परंतु विविध मतांचा समन्वय कधी घडून येतो, यासाठी आपल्याला आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यायला यासंदर्भात डी. डी. कोसंबी यांनी गीतेमध्ये सर्व मतांचा समन्वय घडून आला आहे. याचे कारण त्या वेळेचा वर्ग समन्वय आहे, असे म्हटले आहे. म्हणजे जेव्हा वर्गसंघर्ष तीव्र नसतो, तेव्हा परस्परविरोधी मतांना सामावून घेण्याची प्रवृत्ती असते. अशा वेळी जे तत्त्वज्ञान पुढे येते हे सर्वांनाच आपले वाटते आणि अर्थात लोकप्रिय होते.
महानुभाव आणि वारकरी हे दोन संप्रदाय महाराष्ट्रात आगेमागे सुरू झाले. महानुभाव हे व्दैती तत्त्वज्ञान मानणारे आहेत, तर वारकरी हे अव्दैती तत्त्वज्ञान मानणारे आहेत. या दोन्ही संप्रदायांच्या तत्त्वज्ञानात व आचार धर्मात अंतर असले तरी उद्देश मात्र सारखाच आहे. सामान्यांना आणि अस्पृश्यांना, स्त्रियांना आत्मोन्नती करून घेता यावी, हाच त्यांचा प्रमुख उद्देश्य आहे. त्यामुळे दोन्ही संप्रदायांत अस्पृश्य आणि स्त्रिया यांचा प्रवेश झालेला दिसतो. या दोन्ही संप्रदायातील लेखकांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये विविध स्वरुपाचे ग्रंथ निर्माण झाले गद्य आणि पद्य या दोन्ही प्रकारांतील चरित्रग्रंथ निर्माण झाले. आत्मचरित्र हा लेखनप्रकार याच काळात उदयास आला. जाती आणि कोड जसे या संप्रदायांना महत्त्वाचे वाटत नाहीत, त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष वेगळी महत्त्वाचे वाटत नाही, निसर्गाची ही दोन रूपे आहेत. त्यामुळे स्त्रीला दुय्यम खाल्ले खायचे, असा प्रश्न आहे म्हणून मासिक पाळी निसर्गाचाच भाग आहे. त्यात पवित्र-अपवित्र असे काही असत नाही, असे महानुभाव यांना वाटते. यासंदर्भात संत चोखा मेळा आणि सोयराबाई यांचे ‘विटाळ चिंतन’ आणि सोवळे-ओवळे यासंबंधीचे चिंतन अत्यंत क्रांतिकारी आहे. बाराव्या शतकात चिंतन प्रकट होणे, ही कदाचित एकमेव गोष्ट असेल. जाती-कूळ नाकारणारा संत सोपानदेवांचा अभंग लेखकांनी येथे उध्दृत केला आहे. त्याचा शेवट असा आहे-
दुर्वास, वसिष्ठ, अगस्ती, गौतम
हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे?
व्यास आणि वाल्मिकी कोण कूळ त्यांचे ?
तैसेंचि आमचे सोपान म्हणे ॥
वरील संप्रदायांबरोबरच मध्ययुगामध्ये नाथ संप्रदायाचा प्रभाव भारतभर होता. यासंदर्भात लेखकाने रा. चिं. ढेरे यांचे मत उध्दृत केले आहे ’मध्ययुगामध्ये संपूर्ण भारतभर नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. नाथ संप्रदायही जनसामान्यांच्या आत्मिक उन्नतीचाच विचार करीत असे. परंतु पुढे नाथ संप्रदायामध्ये काही विकृती शिरल्या. असे असले तरी नाथ संप्रदायाच्या प्रभावातूनच महानुभाव, वारकरी, वीरशैव, दत्त हे संप्रदाय महाराष्ट्रात निर्माण झाले. भारतभर असलेल्या नाथ संप्रदायाच्या प्रभावातून महाराष्ट्रात जसे अनेक संप्रदाय निर्माण झाले, तसेच उत्तर भारतात संत कबीरांसारखे तत्त्वज्ञ महाकवी निर्माण झाले. संत तुकारामांवरही नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, असे दिसते.
आपण वर म्हटल्याप्रमाणे संतांनी लिहिलेली आत्मचरित्रे आणि संतांनी लिहिलेली इतर संतांची चरित्रे या माध्यमातून संत चळवळीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. आत्मचरित्रातून अथवा चरित्रातून त्या काळच्या सामाजिक स्थितीचा आणि ज्यांच्याबद्दल चरित्र आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून आले पाहिजे. परंतु संतांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून आणि चरित्रातून त्या काळच्या सामाजिक स्थितीचे स्पष्ट आकलन होत नाही. सत्य सूचक पद्धतीने होते, असा प्रश्न लेखकांनी उपस्थित केला आहे. हरी संत नामदेवांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या समकालीन त्यातील ताण-तणाव, मूल्यव्यवस्था इत्यादी बाबी येतात, ही जमेची बाजू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या आत्मचरित्रातून आणि त्यांनी लिहिलेल्या संतचरित्रामधून त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व लखलखीत प्रगट होत जाते.
संत नामदेवांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची चरित्रं लिहिली आहेत. या चरित्रातून चारी भावंडांची व्यक्तिमत्त्वे प्रकट झालेली आहेत. ही चारी भावंडे स्वतंत्र विचारांची आहेत आणि त्यांच्या विचारांना वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाची भक्कम बैठक आहे. तसेच संत जनाबाई, संत चोखा मेळा त्यांनी आपली आत्मनिवेदने लिहिली आहेत. संत चोखा मेळा यांचे चरित्र नामदेवांनी आणि संत एकनाथांनी लिहिलेले आहे; तसेच संत बहिणाबाईंनी तुकारामांचे चरित्र लिहिले आहे. ही सर्व आत्मचरित्रे आणि चरित्रे अभंगरुपाने आहेत. त्यासाठी आणि लेखकाने अनेक अभंग उध्दृत केले आहेत. त्यातून लेखकाचा संत चळवळीबद्दलचा प्रचंड व्यासंग दिसून येतो. संत एकनाथ, संत परिसा, भागवत, संत बहिणाबाई आणि संत निळोबाराय आणि ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे सोडली की, बाकी सगळे संत हे बहुजन, अस्पृश्य जातीतील आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे धर्म बहिष्कृत असल्यामुळे एका अर्थाने शूद्र आहेत. त्यामुळे जातिव्यवस्थेचा धर्मव्यवस्थेचा छळ त्रास या सर्वांना भोगावा लागला आहे.
संतांच्या चरित्र आणि आत्मचरित्रातून नोंदले गेलेले चमत्कार उदाहरणार्थ विठ्ठल जनाबाईंच्या घरी दळण दळतात. संत चोखा मेळा यांच्या घरी जाऊन जेवण करतात, खरे तर ही प्रकट आत्मचिंतने एका अर्थाने स्वप्नेच आहेत. त्यांना चमत्कार म्हणण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला जे व्हावेसे वाटते, त्याची ती प्रकट रूपे आहेत किंवा लेखकाने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या संबंधीच्या अद्भुत कथाचमत्कार, कथा निर्माण झालेल्या दिसतात. या त्यांच्या भक्तांनी पुढच्या काळात निर्माण केलेल्या असाव्यात. यासंदर्भात अनेक विचारवंतांची मते लेखकाने नोंदवली आहेत. या पुस्तकाचा सर्वांगीण परिचय करून देणे अवघडच आहे, इतकी अफाट माहिती पुस्तकामध्ये साठवली गेली आहे. त्यामुळे वाचकांनीच या ज्ञानसागरामध्ये उडी घेणे गरजेचे आहे.
या पुस्तकाचा शेवट करताना डॉ. कोत्तापल्ले यांनी म्हटले आहे. धर्ममान्य जातिरचनेविरुद्ध तिने निर्माण केलेल्या उच्च-नीच्च भावाविरुद्ध अकराव्या, बाराव्या शतकात महानुभाव वारकरी आणि वीरशैवांनी लढा सुरू केला, हा जवळजवळ सातशे- आठशे वर्षेसुरू राहिला. पण हा लढा संपून समतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. ती भारताला स्वातंत्र्य मिळून नव्या राज्यघटनेच्या स्वीकारानंतर; पण त्यासाठी इंग्रजांची राजवट यावी लागली. त्यांनी ब्राह्मणी सत्तेला नष्ट करून सार्वत्रिक शिक्षण सुरू केले. राजा राममोहन राय आणि महात्मा फुले यांनी कृतिशील संघर्ष सुरू केला. नवे प्रबोधनाचे युग सुरू झाले. विविध धर्मसंप्रदाय निर्माण झाले. धर्माचा पुनर्विचार सुरू झाला. मुख्य म्हणजे औद्योगिकीकरण सुरू झाले. त्यामुळे उत्पादन साधनांमध्ये बदल झाले. अर्थव्यवस्था बदलू लागली. त्यामुळे जाती आणि व्यवसाय यांचे नाते तुटून बहुजनांना विविध व्यवसाय करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य आंदोलनातून येथील लोकांना एक आत्मविश्वास आला. ते नव्या मुक्तीची स्वप्ने पाहू लागले, राज्यव्यवस्था ही बदलली. असे कितीतरी बदल झाले आणि संतांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली. संतांनी स्वप्ने पाहिली येथील भूमी संस्कारित केली.
परंतु अजूनही खूप वाट चालावयाची आहे. कर्मठ प्रवृत्ती संपल्या आहेत, असे नाही. म्हणून सर्वंकष समता आर्थिक क्षमतेसह अजूनही खूप दूर आहे. त्यासाठी तर संतांची स्वप्ने आपल्याजवळ आहेत.
पुस्तकाचे नांव ः संतांची स्वप्नसृष्टी
लेखक ः डॉ.नागनाथ कोत्तापल्ले
प्रकाशक ः पद्मगंधा प्रकाशन, एरंडवन पुणे
संपर्क ः 73508 39176
किंमत ः रू. 310/-