अनिल चव्हाण - 9422855151

कोरोनाने शिक्षण क्षेत्रापुढे अभूतपूर्व आव्हान उभे केले आहे.
पेपर तपासणे :
जूनपासून नवीन वर्ष सुरू होते. त्यापूर्वी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. ते दिल्यानंतर मे महिन्याची सुट्टी सुरू होते. यावर्षी अजून निकाल तयार नाहीत. दहावी, बारावीचे पेपर तपासायचे राहिलेत. ही कामे लवकरात लवकर संपवून शाळा सुरू होतील, तेव्हा नवीच आव्हाने वाट पाहणार आहेत.
नव्या समस्या :
कोरोनावर लस मिळेपर्यंत, तीन फुटांचे शारीरिक अंतर ठेवणे, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे हे नियम आहेतच. हे नियम पाळायचे तर पुरेसे बेसीन बसवावे लागतील. तीन फूट अंतर ठेवून मुलांना बसण्यासाठी, पुरेसे बेंच आणि मोठ्या वर्ग खोल्या लागतील.
दूरच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी बस, रिक्षा किंवा व्हॅनने शाळेत जातात. तीन फूट शारीरिक अंतर राखायचे तर आजच्या चार ते पाचपट वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. त्याशिवाय पुरेसे विद्यार्थी मिळवणे, अभ्यासक्रम वेळेवर सुरू करणे, या नेहमीच्या समस्या आहेत.
शिक्षक भरती बंद असल्याने काही शाळांतून काही विषयांना तज्ज्ञ शिक्षक नाहीत. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक भूगोलाचे, तर भाषेचे शिक्षक गणिताचे अध्यापन करत आहेत. अशा अनेक समस्यांवर उपाय शोधावे लागणार आहेत.
उपाय आहे :
परिसरात शाळा :
या समस्यांवर म्हटले तर सोपा उपाय आहे. तो म्हणजे परिसरातील शाळांमध्ये प्रवेश घेणे. मुले चालत शाळेत आली पाहिजेत. वाहतुकीचा मोठा प्रश्न यामुळे मिटेल.
शहराच्या एका भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडला, तर तो भाग सील करावा लागतो. शाळा परिसरात असेल, तर फारसा प्रश्न येणार नाही. पण शहराच्या विविध भागातून विद्यार्थी येत असतील, तर एखादा भाग सील करून भागणार नाही. एका भागातले विद्यार्थी जितक्या शाळात आहेत, त्या शाळा आणि त्या प्रत्येक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा परिसर म्हणजे सर्व शहरच सील करावे लागेल.
म्हणून परिसरातील शाळेत प्रवेश घेणे याला पर्याय नाही.
अडचणी :
परिसरातील शाळेत प्रवेश घेण्यामध्ये खूप अडचणी आहेत. सर्व शाळांचा दर्जा समान समजला जात नाही, राज्य आणि केंद्र शाळांचा अभ्यासक्रम भिन्न आहे. सर्व शाळांत सोयी समान नाहीत. ऐच्छिक विषयात भिन्नता आहे.
माध्यमे :
मातृभाषा, इंग्रजी आणि सेमीइंग्लिश अशी भिन्न आहेत. आपल्या मुलाचे भविष्य घडवायचे तर त्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळाले पाहिजे, असा समज झाल्याने, खेड्यापाड्यांपर्यंत इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्या.
कोरोनानंतर युरोप, अमेरिकेचे काय होणार आहे, त्याचा अंदाज नाही. त्यांचे काहीही झाले तरी, तिथल्या भारतीयांचे काय होणार आहे, याचा अंदाज वर्षभरात येईल. त्यानुसार इथल्या इंग्रजी मीडियमवर परिणाम होईल.
पुन्हा मातृभाषेतून शिक्षणाकडे कल वाढला तर पुढच्या पिढीचे तरी भले होईल. सध्या तरी दोन मीडियमचा विचार केला पाहिजे.
प्रत्येक शाळेचे एक वैशिष्ट्य आहे. एकेका क्षेत्रात त्यांनी वेगळेपण जोपासले आहे. कुठे जास्त गुण, तर कुठे खेळाला महत्त्व. इंग्लिश मीडियम शाळांची फी समान नाही. पण कोरोनावर मात करायची असेल तर यातून मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही.
मार्ग : सर्वांना समान व समान गुणवत्तेचे शिक्षण द्यायचे ठरवले तर मार्ग निघू शकतो.
शाळांचे गट : सर्वांना समान शिक्षण द्यायचे नसेल, तर आज समान अभ्यासक्रम असणार्या शाळांचा विचार एकत्र करावा. शाळांचे गट मीडियमनुसार दोन केले, तरी चालण्यासारखे आहे.
समान विद्यार्थी :
परिसरातील विद्यार्थी एकत्र करून विभागवार वाटावेत. आज काही शाळांत भरमसाठ मुले आहेत, तर काही शाळांतील शिक्षकांना लालूच दाखवून, सवलती, वह्या, युनिफॉर्म देऊन, वाहतुकीची सोय करून मुले गोळा करावी लागतात.
शिक्षकांची विभागणी :
आज शिक्षक संस्था व शाळांना जोडल्या आहेत. त्यांचे पगार मूल शाळेतून काढून, अध्यापनासाठी यावर्षी परिसरात जबाबदारी द्यावी लागेल.
अध्यापन पध्दती :
जुन्या अध्यापन पध्दतीत विद्यार्थीकेंद्रित बदल होत आहेत. सध्याच्या समस्या विचारात घेऊन अध्ययन-अध्यापनाचे स्वरूप बदलावे. ज्ञानरचनावाद, गृहपाठ, स्वाध्याय, प्रकल्प पध्दत यांचा अवलंब करावा. मुलांना घरी करता येतील, असे सोपे प्रयोग सुचवावेत.
तज्ज्ञांनी शिक्षणात स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्पांचा समावेश केला आहे. पण त्याला कॉपी व शुध्दलेखनाचे स्वरूप आले आहे; मूलतत्त्व कधीच गायब झाले आहे. पुन्हा मूल स्वरूप प्राप्त करून देऊन त्यात वाढ करावी.
घरच्या अभ्यासावर भर दिला तर जबाबदारीची जाणीव वाढेल. पण प्रामाणिकपणा आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षेपेक्षा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर भर द्यावा.
किमान एक वर्ष सर्वांना परिसरातील शाळेत प्रवेश अनिवार्य करावा :
या उपायाने वाहतुकीचा प्रश्न मिटेल. शाळा परिसराशी जोडल्याने शाळा बंद ठेवण्याचे प्रसंग किमान येतील. दूरच्या घटनेसाठी शाळा बंद राहणार नाही. अफवांचे प्रमाण कमी होईल.
सुविधा :
शाळा परिसरात भरवण्यासाठी पुरेशा इमारती, बेंच इ. सुविधा उभ्या कराव्या लागतील. शाळा शिफ्टने भरवल्यास सध्या उपलब्ध असलेली साधने पुरतील वा खाजगी इमारती भाड्याने घ्याव्या लागतील.
आज व्यवस्थापन खाजगी संस्था करताहेत. शासनाने केंद्रिभूत व्यवस्थापन केले, तर सर्व विषयाना पुरेसे शिक्षक मिळतील. शिक्षक, विद्यार्थी व विषय यांची विभागणी समान होईल. काही अपवाद करायचे असतील तरी मूलतत्त्व वरील ठेवावे.
यामधील अडचण म्हणजे खाजगी संस्था. वर्षभर त्यांना बाजूला ठेवावे. व्यवस्थापन शासनाने ताब्यात घ्यावे. चालकांनी नफ्यापेक्षा संकट मोठे मानावे.
आधुनिक साधने :
टीव्ही, मोबाईल यांचा वापर शिक्षणात सुरू झाला आहे. त्यांचा वापर पूरक साधने म्हणून होतो आहे. मुलांच्या डोळ्यांची क्षमता विचारात घेऊन त्यांचा वापर वाढवता येईल.
शिक्षकाची गरज :
पण मोबाईल, टीव्ही शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत. सर्व मुलांची कुवत समान असत नाही. पाठ्यक्रमातील काही मुद्दे विस्ताराने समजवावे लागतात. मुलाला काही वेळा भावनिक आधाराची गरज असते. यासाठी शिक्षकच हवा. त्याशिवाय स्मार्ट फोन आणि टीव्ही सर्वांकडे नाहीत. या माध्यमावर भर देणे म्हणजे गरिबांचे शिक्षण बंद करणे होय.
‘खाउजा’ धोरण :
खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) धोरणाचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रांना भोगावे लागत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
ज्ञानाचे पावित्र्य लोप पावून, ज्ञान ही विक्रीची गोष्ट बनली आहे, नफा मिळवण्याची गोष्ट बनली आहे. ही दिशा बदलली तरच सुधारणा करता येतील. कोरोनाच्या निमित्ताने ते शक्य करावे लागेल.
अडचणीच्या काळात सार्वजनिक क्षेत्रच उपयोगी पडले, यावरून तरी धडा घ्यावा.
मोठे आव्हान :
शिक्षकांवर एका मोठ्या कर्तव्याला जागण्याचे आव्हान या काळात तयार झाले आहे. प्रत्येक विषयात अध्यापनाची उद्दिष्टे असतात. विषयाची माहिती देणे, माहितीचा वापर करणे, कौशल्य व आवड विकसित करणे; याबरोबर दृष्टिकोन विकसित करण्याचाही उल्लेख आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन, गणिती दृष्टिकोन, भौगोलिक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन इत्यादी विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळातील घटना पाहता ही जबाबदारी वाढलेली दिसते.
वाढत्या अंधश्रध्दा :
कोरोनावर महामृत्युंजय मंत्र, गोमय आणि गोमूत्र, होमहवन असे आचरट उपाय सुचवण्याचा ‘बेजबाबदारपणा’ जबाबदार पदावरील व्यक्तीकडून झाला. लॉकडाऊन उठल्याबरोबर अध्यात्माचे ठेकेदार लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी सरसावतील. सत्संग, मेळावे, प्रवचने यातून स्वर्ग आणि मोक्षाचे पास वाटण्याची स्पर्धा लागेल.
नव्या परिस्थितीत नव्या अंधश्रध्दांना ऊत येईल. त्याचवेळी समाजाला श्रध्दांची मानसिक गरज आहे. याचे भान ठेवून ती वारकरी संतांचे विचार सांगून भागवावी लागेल. या कोलाहलात वैज्ञानिक दृष्टिकोन टिकवणे हे आव्हान असेल.
बंधुभाव :
‘मरकज’च्या निमित्ताने अल्पसंख्याकांना टार्गेट करून धार्मिक द्वेष पसरवण्यात आला. इतिहासाचे विकृतिकरण तर सुरूच आहे. कोणताही आधार नसताना पुराणकथांना इतिहास म्हणून पुढे आणले जात आहे.
धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही संविधानाने कर्तव्ये सांगितली आहेत. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. अशा वेळी मुलांच्यात योग्य दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी वाढली आहे. शिक्षक ती पार पाडतीलच.
सर्व शाळांवर केंद्रीय शासकीय व्यवस्थापन, भौगोलिक विभागानुसार विद्यार्थी व शिक्षकांचे वाटप; शक्यतो समान शिक्षण, परिसरातच शाळेची उपलब्धता, ज्ञानरचनावाद, प्रकल्प पध्दत, स्वयंअध्यन, स्वाध्याय अशा मार्गांनी कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करता येईल.