कोल्हापुरात शहीद कॉ. पानसरे यांचा पाचवा स्मृतिदिन!

प्रा. मीना चव्हाण - 9764147483

20 फेबु्रवारी, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूरमधील उपक्रम

16 फेबु्रवारी 2015 रोजी सकाळी फिरायला गेले असता कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. 20 फेब्रुवारी रोजी त्यांचे दु:खद निधन झाले. यावेळी कॉ. उमा पानसरे यांनाही डोक्यात दोन गोळ्या घातल्या होत्या. त्या वाचल्या. तेव्हापासून कोल्हापूरचे पुरोगामी कार्यकर्ते खुन्यांना पकडा, या मागणीसाठी सतत आंदोलने करत आहेत. पोलिसांनी काही आरोपींना पकडलं आहे; पण ते मास्टर माईंडपर्यंत पोचत नाहीत.

सनातनी आरोपीच्या वकिलाने ‘मॉर्निंगला जात जा’ असा धमकीवजा उद्धट सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्याला उत्तर म्हणून दरमहा वीस तारखेस ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला जातो. गुरुवारी, 20 फेबु्रवारी रोजी सकाळी कॉ. पानसरेंच्या घरापासून वॉक काढण्यात आला. यावेळी कॉ. पानसरेंच्या स्मृतींना अभिवादन करताना महा. अंनिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, “सरकारने पानसरे, दाभोलकर या विवेकवाद्यांच्या खुनांचा तपास गांभीर्याने केला नाही. राज्यकर्ते अकार्यक्षम ठरले. म्हणून कार्यकर्ते न्याय मिळेपर्यंत लढत राहतील.”

दुपारी 12 वाजता ‘मारेकर्‍यांना मोका लाावा,’ अशी मागणी घेऊन डाव्या आघाडीचे कार्यकर्ते गृह राज्यमंत्र्यांना भेटले. या खटल्यातील संशयित आरोपी उद्योगपतीकडे लेथवर काम करत होता. त्याचवेळी त्याने पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे, अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आहेत. त्या धर्मांध सनातनी संघटनेचे साधक कधीही लॉजवर राहत नाहीत, ते इतर साधकांच्या घरी राहतात, अशीही बातमी आहे. कोल्हापूरमध्ये हे खुनी आरोपी ज्याच्या घरी राहिले, तो व त्याला नोकरी देणारा साधक, उद्योगपती यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

राजस्थानमधील बिष्णोई टोळीने किणी टोल नाक्यावर चकमक केली म्हणून त्याच्यावर ‘मोका’ लावला आहे, त्यापेक्षाही मोठे गुन्हे करणार्‍या या बारा आरोपींवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पानसरेंच्या खुनातील 14 वर्षांच्या साक्षीदारास संशयित वकिलाने धमक्या दिल्या होत्या. ती तक्रार पोलीस ठाण्यात केली होती; पण अद्याप त्याला अटक नाही. मास्टरमाईंड असलेल्या प्रमुखासही अटक नाही, याचा उल्लेख करून सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी डाव्या कार्यकर्त्यांनी केली. गेल्या वर्षी बिंदू चौकामध्ये खुन्यांना पकडा, या मागणीसाठी धरणे धरून कार्यकर्ते बसले होते. त्यांना गृह राज्यमंत्र्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. आता त्यांनी स्वत:च्याच मागणीची पूर्तता करावी, अशी विनंती करण्यात आली. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी, “कॉ. पानसरेंच्या खुनाचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असून राज्यात 47 पथकांकडून शोध सुरू आहे. तपास यंत्रणेने केलेल्या कामाचा दर आठ दिवसांनी यापुढे आढावा घेतला जाणार आहे. मारेकर्‍यांचे फोटो, माहिती पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यांच्या संदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांना द्यावी, त्याची तात्काळ दखल घेतली जाईल,” असे आश्वासन दिले.

राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी पाच वाजता श्रमिक प्रतिष्ठानतर्फे पानसरे स्मृती जागर सभा झाली. त्यामध्ये महात्मा गांधी फौंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे आवाहन केले. “देशातील विचारवंत बुद्धिवंतांचे खून होऊन पाच वर्षे उलटली, तरी खुन्यांचा शोध लागत नाही. मारेकर्‍यांना शिक्षा होत नाही. सरकार बदलले तरी तपास पुढे सरकत नाही. मारेकर्‍यांना राजकीय संरक्षण मिळणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या कठीण कालखंडात सर्व प्रकारच्या बेड्या तोडून टाकू आणि नवा निर्भय समाज बनवण्याची लढाई करू,” असे आवाहन त्यांनी केले.

यही तो वक्त है, सूरज तेरे निकलने का – जावेद अख्तर

आज देश असंतोषाच्या वाटेवरून जात आहे. नागरिकत्व कायद्याच्या आडून भारतीय संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, एकतेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. या अंधारल्या वातावरणात नवी पिढी ही आशेचा किरण आहे. भारतीयांच्या रक्तात लोकशाही भिनली आहे. ती आता पुन्हा क्रांती करेल… ‘गुलिस्ता के फूल कभी एकरंगी नहीं होते… कियारत नहीं नाम लेती ढलने का… यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का..’ असा आशावाद ज्येष्ठ कवी व विवेकी विचारवंत जावेद अख्तर यांनी जागवला. हजारो वर्षांपासून या देशातील विविध जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यात द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. नागरिकत्वाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी पंधरा प्रकारचे पुरावे मागितले जातात. देशातील कोट्यवधी लोकांच्याकडे जन्म तारखेचाही दाखला नाही. तीस कोटी गरीब निरक्षर नागरिकांची रोजच्या पोटा-पाण्याची लढाई सुरू असते, ते हे पुरावे आणणार कोठून?

गेल्या पाच वर्षांत देशात आर्थिक समस्या, बेरोजगारीविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. 2004 पर्यंत भारताची गणना पहिल्या पाच आर्थिक महासत्तेत व्हायची. आता गेल्या पाच वर्षांत ती घसरून चाळिसाव्या स्थानावर झाली आहे. बेरोजगारीत तीन टक्क्यांनी भर पडली आहे. ग्रामीण नागरिकांच्या दारिद्य्र आणि कर्जात वाढ झाली आहे. देशभरातील 36 विद्यापीठांतील तरुण अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर नवी पिढी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधी आंदोलन करत आहे. आपणही विवेकाचा जाग, एकतेचे बळ एकवटूया. नव्या लढाईस सिद्ध होऊन देशासमोरील या समस्येवर मात करूया. मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि ‘आरएसएस’ विचारधारा जातीयवादावर पोचली आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान नाही. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात या संघटना इंग्रजी शासकांच्या बाजूने होत्या. गांधीजींच्या चले जाव चळवळीत सारा देश सामील झाला. विविध प्रांतातील सरकारांनी राजीनामे दिले. मात्र सिंध आणि बंगालमधील सरकार इंग्रजांचे हस्तक असल्यासारखे काम करत होते. कारण या दोन्ही ठिकाणी मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेचे सरकार होते. जातीयवाद गरळ ओकणार्‍या ‘आरएसएस’ आणि ‘एमआयएम’सारख्या संघटना समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतात. त्यांना संपूर्ण समाजाचा ठेका कोणी दिला?

‘देशातील नागरिकांनी वेळीच जातीयवाद्यांचा धोका ओळखून नव्या लढाईला सिद्ध व्हावे,’ असेही आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मेघा पानसरे यांनी केले. सूत्रसंचालन रसिया पडळकर यांनी केले. आभार प्रदर्शन एस. बी. पाटील यांनी केले.