एक संवाद : सामाजिक सुधारणांचा जनकल्याणी राजा शाहू महाराजांसोबत

नरेंद्र लांजेवार - 9422180451

महाराज, खरं तर जनसत्ता आणि राजसत्ता या स्वत:च्या ऐषोरामासाठी, नातेवाईकांच्या उद्धारासाठी वापरायची असते. सर्व राजे हे तसेच करीत आणि वागत असत. परंतु राजे, तुम्ही या सर्वांमधून वेगळे होता. फक्त सामाजिक सुधारणांसाठीच तुम्ही या सत्तेचा वापर केला. तुम्ही बालविवाह करणार्‍या मुलामुलींचे वय वाढविले, आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा कायदा केला, पुनर्विवाहाला परवानगी देणारा कायदा केला. जातपंचायतीमार्फत होणार्‍या काडीमोडला (घटस्फोट) विरोध करून घटस्फोटाचा अधिकृत कायदा केला. स्त्रीला क्रूरपणे वागविण्याच्या विरोधात दंड ठोकला. खरं तर कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा तुम्ही शंभर वर्षांपूर्वी या राज्याला दिला. जोगतीणविरोधी कायदा केला, बलुतेदारी रद्द केली.

राजमान्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज

“आज तुमच्याशी संवाद साधताना सर्वप्रथम तुम्हाला मनोभावे वंदन करतो. आमच्या देशात अनेक समाज सुधारक, राजे-महाराजे झालेत; पण तुमच्यासारखा दूरदृष्टीचा कर्ता समाजसुधारक लोकराजा महाराष्ट्रात झाला, याचा मला रास्त अभिमान वाटतो. तुमच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाकडे बघितल्यावर शेतीत राबणार्‍या माझ्या पणजोबांसारखेच तुम्ही दिसता, असेच राहून राहून वाटते.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात अनेक वर्षे राजे, महाराजे आणि परकीयांची सत्ता राहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात लहान-मोठी 562 संस्थाने होती. या संस्थानिकांनी आपल्या रयतेचे फक्त आणि फक्त सेवा करून घेण्यासाठी वापर केला. सम्राट अशोकानंतर लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज, तुम्हीच फक्त लोकहित बघणारे, रयतेच्या ‘मन की बात’ समजणारे, रयतेच्या हृदयात घर केलेले राजे ठरलात.

कोणत्याही राजघराण्याची परंपरा न लाभलेले आपण दत्तकपुत्र म्हणून कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हाती घेतला. लोककल्याणकारी, समतावादी राज्य कसे असू शकते, याचा आदर्श नमुना जगासमोर उभा करून दाखविला.

जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाडगे यांचे आपण थोरले पुत्र. आपले बालपणीचे नाव यशवंतराव ऊर्फ बाबासाहेब. आपला जन्म 26 जून, 1874 रोजी कोल्हापूर नगरीत झाला. पुढे 17 मार्च 1884 मध्ये वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी कोल्हापूर घराण्याच्या गादीचे आपण दत्तक वारस म्हणून राजसत्तारूढ होऊन कारभार हाती घेतला.

आपण चांगल्या शिक्षणासाठी राजकोट आणि धारवाड येथे जाऊन गुणवत्ता प्राप्त केली. तुम्हाला फ्रेजर नावाचे चांगले गुरू धारवाडला मिळाले. राज्यकारभार हाती घेताच फ्रेजर या गुरूसोबत तुम्ही संपूर्ण भारताची शैक्षणिक पाहणी केली. या पाहणीत तुमच्या लक्षात आले की, आपल्या देशातील दारिद्र्याला धर्मव्यवस्था आणि शिक्षणाचा अभाव हेच कारणीभूत आहे. संपूर्ण देश फिरून लोकांच्या गरजा, त्यांची दुःखं आणि परिस्थिती यांची माहिती करून घेतल्यावर मागासवर्गीयांना आणि बहुजनांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे जाणून प्राथमिक शिक्षणाची मोफत व सक्तीचे सोय तुम्ही सर्वप्रथम खेड्यापाड्यांतून केली. माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी ठिकठिकाणी वसतिगृहे सुरू केलीत. आपण अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून कायदे केलेत. मागास समाजातील नवशिक्षितांना दरबारात नोकर्‍या मिळाव्यात म्हणून नोकरीतील 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. स्त्रीविषयक सुधारणांच्या बाबतीत तुम्ही विशेष लक्ष घातले. बालविवाहाची वयोमर्यादा वाढविली. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. हिंदू-जैन विवाहांना मान्यता दिली. नोंदणी विवाहांना प्रोत्साहन दिले. देवाला सोडलेला मुरळ्या व जोगतीण यांची अनिष्ट प्रथा बंद केली. लोकोपयोगी एकामागून एक कायदे मंजूर करून तुम्ही कसोशीने अंमलबजावणी केली.

आबासाहेब… तुम्ही प्लेग व दुष्काळ यावरसुद्धा मोठी उपाययोजना केली. फासेपारध्यांना गुन्हेगारी जमात म्हणून इंग्रज वागणूक देत, त्या फासेपारधी बांधवांना तुम्ही मुख्य प्रवाहात आणले. जन्मावरून ठरविलेली सामाजिक उच्च-नीचता नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलली.

राजे, आपण संगीतापासून ते मल्लविद्येपर्यंत विविध कलाप्रकारांना उत्तेजन दिले. शेती उत्पादनासाठी पाटबंधारे बांधले, शेततळ्यांची निर्मिती केली. सहकारी पतसंस्था काढल्या, कृषितंत्रज्ञानाला उत्तेजन दिले. अनेक क्रांतिकारकांना आर्थिक मदत केली. असे हे तुमचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, हे आजही जाणून घेणे फार मोठे औचित्यपूर्ण आहे.

महाराज, तुम्ही नेहमी म्हणत, देशातील दारिद्य्र, अज्ञान, अशिक्षितपणा या सर्वांच्या मुळाशी येथील धार्मिक विचार हा कारणीभूत आहे आणि या धार्मिक विचारांतून अस्पृश्यता जोपासली गेली आहे. समाजाला यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, या विचाराने प्रेरित होऊन आपण आपल्या संस्थानामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या जातीय समुदायांच्या लोकांसाठी सर्वप्रथम शाळा सुरू केल्या. यामध्ये प्रामुख्याने मराठा, जैन, लिंगायत, वीरशैव, सारस्वत, मुस्लिम, दैवज्ञ, पांचाळ, शिंपी, कायस्थ प्रभू, ढोर, चांभार, ब्राह्मण, सुतार, नाभिक, सोमवंशी, आर्य क्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातींसाठी 20 पेक्षा जास्त बोर्डिंग तुम्ही उभारली. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात तुम्ही 1918 साली केली. सुरुवातीला 27 शाळा कोल्हापूर संस्थानात उभारल्यात व अवघ्या पाच वर्षांत 429 शाळांपर्यंत तुम्ही मजल मारली. अस्पृश्यांच्या मुलांना इतर मुलांसारखेच सरकारी शाळेत दाखल करून घ्यावे, यासाठी त्याकाळी तुम्ही 19 शाळा मागासवर्गीयांसाठी सुरू केल्यात. प्राथमिक व मोफत शिक्षण सक्तीचा कायदा करणारे आपण जगातील पहिले राजे ठरलात. मोफत पुस्तकपेढी योजना सुरू करून विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन तुम्ही दिले. तुमच्या या कार्यासमोर कर्णाचे दातृत्व सुद्धा फिके पडणारे आहे. तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात जी अमूल्य अशी गुंतवणूक केली, त्याचे फळ आज आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक समतेमध्ये दिसते आहे. तुम्ही शैक्षणिक शाळा-कॉलेजेस काढली, तांत्रिक शाळा आणि शेतकी शाळा सुद्धा काढल्या. तुम्ही शिक्षणावर त्या काळात दहा टक्क्यांपेक्षा जास्त खर्च केला आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत, त्यांना दंड सुद्धा आकारला. महाराज, तुम्ही शिक्षण शक्तीचे व मोफत दिले; आम्ही शिक्षणाचे बाजारीकरण केले. शिक्षणावरची आमची गुंतवणूक कमी-कमी होत ती तीन टक्क्यांपेक्षाही खाली आली आहे.

महाराज, आपण अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला. अस्पृश्यता निर्मूलनाशिवाय देशात सामाजिक सुधारणा होणार नाहीत व सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय देशाला मिळणार्‍या स्वातंत्र्याचा लाभ बहुजनांना मिळणार नाही. स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरणार नाही, हा तुमचा विशाल दृष्टिकोन तेव्हाही फारच महत्त्वपूर्ण होता. मागासवर्गीय समाजातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेतून शिकून आल्याबद्दल तुम्ही त्यांचा शोध घेत-घेत त्यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये गेला. त्यांचा जंगी सत्कार कोल्हापूरला घडवून आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कार्याला सहकार्य आणि प्रोत्साहन दिले.

राजे, तुमचे कोल्हापूर संस्थान आकाराने तसे लहान. या संस्थानाचे उत्पन्नही मर्यादित, तरीही तुम्ही व्यवहारी दूरदृष्टीचे असल्याने आपल्या संस्थानाचा शैक्षणिक व सामाजिक कायापालट करून आपली नाममुद्रा संपूर्ण देशभर उमटवली. बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न तुम्ही पाहिले आणि त्यामुळेच तुम्ही मराठी माणसाचे प्रबोधनकार झाला.

महाराज, राजदंड ही शोभेची वस्तू नसून सेवेचे साधन आहे, ही तुमची जीवननिष्ठा होती. आमूलाग्र समाजसुधारणा, समताधिष्ठित समाजरचना आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना या ध्येयाने तुम्ही प्रेरित होता. ही प्रेरणा अर्थातच महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून आपण अंगीकारली होती.

आबासाहेब… आपण जातिवंत कलाप्रेमी! शिल्पकला, चित्रकला, गायन, वादन, शास्त्रीय संगीत, रंगभूमी, सिनेसृष्टी, वाचन-लेखन, मल्लविद्या इत्यादीसाठी आपण भरीव योगदान दिले. उत्तर हिंदुस्थानी गायकी गाणार्‍या अल्लादियाखाँ साहेबांना तुम्ही आपल्या दरबारामध्ये गायक नेमले. विविध कलांना आधार, आश्रय आणि आसरा दिला. तुम्ही गुणीजनांचे चाहते होते, गुणी जनांना उत्तेजन देत. तुम्ही अनेक शाहिरांना व शाहिरांच्या फडांना उदारहस्ते आर्थिक मदत केली. तुम्हीच मराठी रंगभूमीला ‘बालगंधर्व’ मिळवून दिले. तुमच्या सहवासानेच भाऊराव पाटील यांच्यासारखे रयत शिक्षण संस्था ऊभारणारे ‘कर्मवीर’ महाराष्ट्राला मिळाले.

राजे, आपण फासेपारधी जमातीला गुन्हेगारी जमातीतून मुक्त केलं आणि विविध रोजगार त्यांना उपलब्ध करून दिले. प्लेगच्या महामारीत तुम्ही प्रचंड असं काम केलं. प्लेगचा संसर्गजन्य रोगी शोधून आणणार्‍यांना त्या काळात तुम्ही पाच ते पंधरा रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले. प्लेगची लस घेणार्‍याला आठ आणे बक्षीस आणि तीन दिवसांची पूर्ण पगारी सुट्टी सुद्धा तुम्ही दिली. सध्याच्या कोरोनाच्या काळात तुमच्या आरोग्यविषयक नियोजनाची आम्हाला तीव्रतेने आठवण येते.

शाहू महाराज, तुम्ही राज्यात गावोगावी स्वस्त धान्य दुकाने सुरू केली. आवश्यक धान्याची तुम्ही मोठ्या प्रमाणावर आयात केली. पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी जुनी तलाव दुरुस्त केले, दुष्काळाच्या काळात रोजगारासाठी रस्ते व पुलांची दुरुस्ती करून एक प्रकारची रोजगार हमी योजनाच सुरू केली. तुम्ही जनतेला दुष्काळी भत्ता दिला. दुष्काळाच्या कामात आई-वडील जिथे काम करत असतील, तिथे लहान मुलांची संगोपन केंद्र सुरू केलीत. दुष्काळात हजारो अन्नछत्रं व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या. भुकेकंगाल लोकांसाठी अन्नछत्र सुरू केले. म्हातारे, आंधळे, पांगळे यांना मोफत शिधावाटप केला. असे अनेक कामं तुम्ही केलीत. शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रयोग केले. शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज दिले, शेतकर्‍यांना कृषी शिक्षणासाठी भव्य अशी कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले. जनतेला चांगली सेवा मिळावी म्हणून गावचा पाटील, पटवारी, तलाठी यांच्यासाठी कार्यशाळा घेतल्या. किती-किती अभिनव आणि लोकोपयोगी कामे तुम्ही केली, याची गणतीच होऊ शकत नाही.

महाराज, खरं तर जनसत्ता आणि राजसत्ता या स्वत:च्या ऐषोरामासाठी, नातेवाईकांच्या उद्धारासाठी वापरायची असते. सर्व राजे हे तसेच करीत आणि वागत असत. परंतु राजे, तुम्ही या सर्वांमधून वेगळे होता. फक्त सामाजिक सुधारणांसाठीच तुम्ही या सत्तेचा वापर केला. तुम्ही बालविवाह करणार्‍या मुला-मुलींचे वय वाढविले, आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा कायदा केला, पुनर्विवाहाला परवानगी देणारा कायदा केला. जातपंचायतीमार्फत होणार्‍या काडीमोडला (घटस्फोट) विरोध करून घटस्फोटाचा अधिकृत कायदा केला. स्त्रीला क्रूरपणे वागविण्याच्या विरोधात दंड ठोकला. खरं तर कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा तुम्ही शंभर वर्षांपूर्वी या राज्याला दिला. जोगतीणविरोधी कायदा केला, बलुतेदारी रद्द केली, विविध जातींसाठी वसतिगृहे, मुलींसाठी मोफत शिक्षण, त्यांच्या निवास -भोजनाची व्यवस्था आणि मुलींना विविध शिष्यवृत्तीसुद्धा सुरू केल्या.

राजे, तुम्ही सर्व देवस्थानांच्या वार्षिक उत्पन्नातून शिक्षणावर खर्च करणारा देवस्थान वटहुकूम काढला. कोल्हापूर संस्थानात चार हजारांपेक्षा जास्त देवस्थानं होती आणि देवस्थानांचा वार्षिक खर्च जाऊन या संस्थानांजवळ दरवर्षी 40 ते 50 हजार रुपये देवस्थानाजवळ शिल्लक राहत. ते सर्व पैसे ग्रामसुधारणेसाठी आणि शिक्षणासाठी खर्च करावयास भाग पाडणारे वटहुकूम तुम्ही काढून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुध्दा केली. आज देवस्थानाच्या बाबतीत असा विचार कोणी मांडला तर त्याला देशद्रोही म्हणून ‘ट्रोल’ केले जाईल.

महाराज, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 26 जुलै 1902 साली राज्याच्या सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षणाचा कायदा तुम्ही करून एका मोठ्या क्रांतिकारी कामाची सुरुवात केली. या तुमच्या एका निर्णयामुळे तत्कालीन नोकरव्यवस्थेचा काय तिळपापड झाला असेल, याची कल्पना केल्या जात नाही.

राजे, गंगाराम कांबळेसारख्या महार जातीच्या माणसाला आपण स्वतः चहाचे हॉटेल टाकून दिले आणि तिथे मित्रपरिवारासह चहापानाला तुम्ही नेहमी जात. जातिनिर्मूलनाची खर्‍या अर्थाने ही कृतिशील चळवळ तुम्ही उभारली. तुमचे अंगरक्षक, तुमच्या गाडीचा ड्रायव्हर; तसेच कचेरीमध्ये व घरी काम करणार्‍या अनेक व्यक्ती तुम्ही अस्पृश्य जातीतील नियुक्त केल्या होत्या. महात्मा फुलेंचा सत्यधर्म तुम्ही खर्‍या अर्थाने पुढे चालविला. भारतात ज्या-ज्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा होत, त्यांना तुमचा सक्रिय सहभाग असायचा आणि हीच बाब येथील वैदिकांना मान्य नव्हती. ते तुम्हाला राजा मानत नव्हते. तुमच्यासाठी वैदिक मंत्र म्हटले जात नव्हते. तसाही ब्राह्मणशाहीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही विरोधच केला होता. ‘वेदोक्त प्रकरणा’मुळे तुमच्या आयुष्यातील वैचारिक उंची तमाम बहुजनांना दिसली. तुम्ही बहुजन समाजालाच धार्मिक शिक्षण देण्यासाठी वैदिक शाळा सुरू केल्या आणि क्षात्रजगद्गुरू पीठ निर्माण करून धर्मचिकित्सेचा आग्रह धरला. धर्मात अधिकाधिक सामाजिक सुधारणा हव्यात आणि धर्म अधिक समाजाभिमुख व्हावा, ही तुमची सर्वधर्मियांसाठी वैदिक शाळा सुरू करण्यामागची भूमिका होती.

राजे, आपण 28 वर्षांच्या राज्यकारभारात, आयुष्याच्या अवघ्या 48 वर्षांत इतक्या सुधारणा केल्यात की, त्या सुधारणांचा आधार घेऊनच भारतीय संविधानाची पायाभरणी झाली. तुमच्या अनेक योजना, उपक्रम, कल्पनांना संविधानात मानाचे स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले.

आबासाहेब, सामाजिक सुधारणांचा आग्रह धरत असताना धर्मसत्तेच्या विरोधात बोलावेच लागते. धर्मसत्तेला धक्का बसतो आहे, असे लक्षात आले की धर्ममार्तंड लोक हे प्रतिहल्ले करणारच. तुमच्यावर सुद्धा असे जीवघेणे हल्ले झालेत, पण तुम्ही सुटलात. परंतु तुमच्याच विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालविणार्‍या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची मात्र धर्ममार्तंडांनी तुमच्याच कोल्हापूर नगरीत हत्या घडवून आणली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत शाहू महाराज, आपल्या अनेक सामाजिक सुधारणांकडे आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा तुमच्या विचारांपासून कोसोदूर आमचे अनेक कायदे फक्त कागदोपत्रीच स्वीकारल्याची जाणीव होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांनंतर सुद्धा आमच्या समाजात स्त्रियांचे धार्मिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक शोषण होत आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या वाढतेच आहे. दलितांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. जातपंचायती अजूनही तोंड बाहेर काढतच आहेत. अजूनही पारध्यांना गुन्हेगारी जमात म्हणूनच वागणूक दिली जात आहे. शेतकर्‍यांची आत्महत्या कोणीच गांभीर्याने घेत नाही. बेरोजगारी वाढत आहे. नवरोजगारनिर्मितीमध्ये राज्यकर्तेअपयशी ठरत आहेत. छद्मविज्ञानाच्या सहाय्याने नवी अंधश्रद्धा वाढत आहे. शिक्षणावरचा खर्च अजूनही नगण्यच आहे आणि आमच्या धार्मिक संस्था, देवस्थान सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षणावर खर्च करीत नाहीत.

शाहू महाराज, आज तुम्ही आमच्या लोकसभेत असते तर कदाचित देशातील शाळांच्या वर्गखोल्या आणि सुसज्ज हॉस्पिटलची संख्या खर्‍या अर्थाने वाढलेली दिसली असती. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित तुम्ही विविध कौशल्यांवर आधारित विवेकी शिक्षण देणारी विद्यापीठे उभे करून समाजाचे खर्‍या अर्थाने शैक्षणिक प्रबोधन करून धर्मनिरपेक्ष विवेकी समाज निर्माण केला असता, म्हणून शाहू महाराज, आम्हाला तुमची आठवण पदोपदी होत असते आणि ती का होऊ नये?

कारण महाराज, तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीत जी सामाजिक समता पेरली आहे, त्यातून उतराई होणे कोणालाच आता आणि पुढेही होणे शक्य नाही….हेच खरे. म्हणून राजे, तुमच्या कार्यकर्तृत्वाला

मानाचा मुजरा…

तुमच्या विचारांचा चाहता…”

लेखक संपर्क : 9422180451


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]