माधव बावगे - 9404870435
“मुरुड येथे एकमेकांची भावकी असलेला कुंभार समाज मोठा आहे. आतापर्यंत गुण्या-गोविंदाने राहत असलेला हा समाज बलभीम पंढरी जाडकर ऊर्फ बल्लू महाराज, बाळूमामा मंदिर, मुरुड यांच्या अनधिकृत मंदिरात बुधवार, रविवार, अमावस्ये दिवशी दरबार भरवून करणी, भानामती, जादूटोणा, भुताटकी यांसह सर्वच असाध्य रोगावर उपचार करण्याचा दावा करीत आहे.”
“मुरुड येथील एका एकवीस वर्षीय सुशिक्षित नवविवाहित मुलीला मधुकर कुंभार याने तिच्यावर जादूटोणा, करणी केली आहे; एवढेच नाही, तर तिच्या नवर्यालाही मधुकर कुंभार याने जादूटोणा, करणी केली आहे, असा लोकांमध्ये गैरसमज पसरवून माझ्याविरुद्ध लोकमानस निर्माण केला. ही चर्चा आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये पसरवली गेली. त्यामुळे संपूर्ण कुंभारवाडा खूप दहशतीखाली आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे.”
“बल्लू महाराज हा, ‘मी तुमची करणी, भानामती, जादुटोणा दुरुस्त करतो. त्यांना कोणी करणी, भानामती केली आहे, हेही मी त्यांचे नावे काढून देतो,’ असे भासवून परिसरातील पीडित, वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत असलेल्या तरुण, वृद्ध, महिला पुरुष अशा सामान्य लोकांची फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करतो, मानसिक शोषण करतो.”
“हे सर्व बल्लू महाराज याच्या बुवाबाजी व दरबार भरवून दिलेल्या सल्ल्यामुळे होते आहे, तेव्हा बल्लू महाराज याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी व माझा जीव वाचवावा, ही नम्र विनंती.”
अशा आशयाचे निवेदन फिर्यादी मधुकर पंढरी कुंभार यांनी मुरुड पोलीस ठाण्यात देऊन ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांना प्रत्यक्ष भेटून देऊन सविस्तर माहितीचे निवेदन दिले.
‘महाराष्ट्र अंनिस’च्या लातूर जिल्हा शाखेकडे याअगोदरही बल्लु महाराज याच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने एक सविस्तर निवेदन तयार केले. राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, फिर्यादी मधुकर कुंभार, सर्जेराव रेवणकर यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदन सादर केले; तसेच भोंदू बल्लू महाराज हा बाळूमामा मंदिरात अनधिकृत दरबार भरवून भुताटकी, करणी, भानामती, जादूटोणा याच्या नावाखाली रुग्णावर भंडारा फेकून, मंत्र-तंत्राचा दावा करून अमानवीय प्रकारे उपचार करीत असल्याचे पीडित रुग्णाची व्हिडिओ क्लिप सादर करून लोकांची कशा पद्धतीने फसवणूक केले जाते, हे विषद केले. तेव्हा वरील सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करून भोंदू बाबा बल्लू महाराज याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3 (1), (2) अंतर्गत गु.र.न. 125/20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ‘महा. अंनिस’ची टीम, यात राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, प्रधान सचिव सुधीर भोसले, बाबा हालकुडे, रामकुमार रायवाडीकर, दिलीप जाधव, गजानन धपाटे यांनी प्रत्यक्ष मुरुड येथे पोलीस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक गोमारे, सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली.
– माधव बावगे, राज्य प्रधान सचिव, महा. अंनिस