सरीता सदाशिव पवार -
मी जन्मतःच घेतलंय बाळकडू
व्यक्त होण्याचं
तरी तुम्ही घालू पाहताय माझ्यावर
व्यक्त होण्याचीच मर्यादा ॥1॥
तुम्हाला नसेल माहीत कदाचित
माझ्या जन्माच्या आकांतातच
मला गवसलं होतं
माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ॥2॥
माझ्या जन्मानंतरचे माझे असंबद्ध हुंकार ऐकून
अनेकांच्या मनात रुजून आले होते
आनंदाचे कोंब
माझ्या बोबड्या बोलण्याचीही
घेतली जायची प्रत्येकाकडून शब्दागणिक नोंद ॥3॥
…आणि आता तुम्ही म्हणताय
‘तुझा प्रत्येक शब्द तपासला जाईल
आमच्याच मर्जीनुसार लिहिलं जाईल
तुझं प्रत्येक अक्षर न अक्षर…’ ॥4॥
पण तुम्हाला माहीत नाहीय
तुमच्या संकुचित जगण्यातूनच
अधोरेखित होऊ लागले आहेत
माझ्या प्रत्येक शब्दांमागील अर्थ ॥5॥
आता माझ्या कोर्या कॅनव्हासवरील बिंदू-बिंदूंमधून
लख्ख उजळून निघाल्या आहेत
तुमच्या मनातील प्रश्नरेषा ॥6॥
मला कळून चुकले आहेतच
तुमच्या मनातील
इथल्या धर्मभेदाचे, जातभेदाचे प्रश्न
आणि निव्वळ माणूस म्हणून
जगू पाहणार्या प्रत्येकाला
संपविण्याचा तुमचा इरादाही ॥7॥
पण क्रौर्याची वस्त्रे पांघरून
अंत्ययात्रेत सामील होणार्यांना
होत नसतेच कधी जाणीव
आपण आपल्याच अंत्ययात्रेत
सामील झाल्याची ॥8॥
तुमच्या क्रौर्याची अभिलाषा अशी की
संस्कृतीच्या नावाखाली
तुम्ही बाईला बसवून ठेवता
मर्यादेच्या सीमेवर ॥9॥
घराचा धारण म्हणून ठाम उभी राहणारी व्यक्तीच
मानता तुम्ही पवित्र-अपवित्र
आणि मग,
घर कोसळायला वेळ लागत नाही
हे लक्षात येत नाही तुमच्या ॥10॥
पण आता हे ध्यानात ठेवाच तुम्ही
जेव्हा एकेक घर कोसळत असतं ना
तेव्हा अख्खा समाजच कोसळत असतो
आणि
तुम्ही उपस्थित करता एकेक प्रश्न
तेव्हा आम्ही अनेक उत्तरं शोधत असतो
तेव्हा आता
पांघरु नका तुम्ही ही कट्टर सनातनी झूल
आणि पाहू नका स्वप्न
आम्हालाही त्या झुलीच्या मायेखाली घेण्याचं…. ॥11॥
–सरीता सदाशिव पवार
अद्वैत, समर्थ कॉलनी मु. पो. वरवडे – फणसवाडी, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग पिन – 426602
मोबाईल नं 9604655844, 9403296694