अण्णा कडलासकर -
दि. 12 आणि 26 सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या राज्यव्यापी संघटना बांधणी संवाद शिबिरास राज्यभरातून 214 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. डॉ. हमीद दाभोलकर प्रास्ताविकात म्हणाले, संघटनेत आपण नव्या दमाने, प्रचंड वेगाने काम सुरू केले आहे; पण सर्वांनी किमान काय भान राखावे? एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून आपली मते, भूमिका दक्ष राहून मांडली जावी.
‘कार्यकर्ता म्हणून आपली आचारसंहिता काय आहे,’ यावर सातारच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी ठळक मुद्दे मांडले. भयमुक्त समाज हे ‘अंनिस’चे ध्येय आहे. आपण शोषक होऊ नये आणि इतरांचे शोषण होत असताना गप्प बसून न राहता शोषितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातील उच्चार, प्रचार, प्रसार आणि अंगीकार हे महत्त्वाचे टप्पे समजून घ्यावेत आणि कार्यकर्त्यांनी स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आपले वर्तन कुटुंबात आणि घराबाहेरही विवेकशील असावे. आपल्या राहणीतून आणि वागण्यातून साधेपणा, संवादी स्वर दिसायला हवा. वाद टाळावेत. आपण आपले विचार इतरांचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य करूनच मांडावेत. कधीही अभ्यास, वाचन, पुरावे असल्याशिवाय बोलू नये. संघटनेत ऊर्जा निर्माण करण्याचे काम परस्परसंवादाने होते. ज्येष्ठांचे अनुभवी विचार, तरुणाईचा कामाचा वेग आणि उत्साह यांचा सुरेख मेळ असेल, तर ती शाखा बहरते, असे विवेचन त्यांनी केले.
‘अंनिस कार्यकर्ता म्हणून आपल्या जबाबदार्या काय आहेत,’ यावर पुण्यातून ज्येष्ठ कार्यकर्तेश्रीपाल ललवाणी यांनी मार्गदर्शन केले. ‘महा. अंनिस’ची पंचसूत्री राबवताना घ्यायची काळजी, आपल्या कामाचे पूर्वनियोजन, कामाचे योग्य वितरण, कोण कार्यकर्ता कोणते काम करू शकेल, याचा अंदाज घेऊन त्याच्यावर जबाबदारी देणे, प्रत्येक कार्यकर्त्याने ‘अंनिस’ वार्तपत्राचे स्वतःहून वर्गणीदार व्हायचे आणि वर्षभरात किमान पाच तरी वर्गणीदार तयार करून आपल्या वैचारिक साहित्याचा प्रचार करणे, कार्यक्रम पार पडल्यानंतर वृत्तांकन करणे, ही कामे जबाबदारीने करावीत. आठवड्यातून किमान चार तास ‘अंनिस’च्या कामासाठी स्वतःहून जाणीवपूर्वक खर्च करण्याची तयारी ठेवावी. एकदा पद स्वीकारले की मला वेळच मिळत नाही, ही सबब सांगू नये, असे परखड; पण चळवळ जोमाने रुजण्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे मांडले.
‘आपली अंनिस जिल्हा कार्यकारिणी आणि शाखा कशी चालवावी,’ यावर लातूरचे प्रा. रमेश माने यांनी उत्कृष्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले. राज्य कार्यकारी समिती सदस्य ते शाखा सदस्य अशी ‘महा अंनिस’ची रचना काय आहे? ‘अंनिस’ सभासदांचे प्रकार किती आहेत? ‘अंनिस’ची शाखा कोण स्थापन करू शकतात? ‘अंनिस’मध्ये सहभागी होण्याचे किमान निकष काय आहेत? जबाबदार पदे कोणती आहेत? शाखा बैठक कशी घ्यावी? बैठकीपूर्वी आणि नंतर कोणती कामे करावीत? आपल्या जिल्हा आणि शाखांमध्ये कोणत्या नोंदी ठेवल्या जाणे जरुरीचे आहे? इत्यादी सर्व आवश्यक गोष्टींचे सखोल विवेचन केले.
12 सप्टेंबरच्या संवाद सत्राचे सूत्रसंचालन राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार आणि 26 सप्टेंबरचे सूत्रसंचालन राज्य प्रशिक्षण विभाग सदस्य अण्णा कडलासकर यांनी केले. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पुढील लिंक वर जाऊन आपण कधीही पाहू शकता. https://youtu.be/0MPbtWScCI.
–अण्णा कडलासकर