ह.भ.प. देवदत्त दिगंबर परुळेकर - 9422055221
भक्तराज पुंडलिकाला भेटायला स्वतः परमात्मा आला. पुंडलिकराय विठ्ठलाची भक्ती करत होते काय? पुंडलिकाने देवाचा धावा केला होता काय? नाही! यज्ञ-याग, विधी, जप-तप असे काही पुंडलिक करीत होता काय? नाही! मग असे काय घडले, पुंडलिकाने असे काय केले की विठ्ठल त्याला भेटायला स्वतःहून आला?
तुकाराम महाराज सांगतात –
मायबापे केवळ काशी। तेणे न वजावे तीर्थासी ॥
पुंडलिके काय केले । परब्रह्म उभे ठेले ॥
तैसा होई सावधान। हृदयी धरी नारायण ॥
तुका म्हणे मायबापे। अवघी देवाची स्वरुपे ॥
आई-वडील म्हणजे शुद्ध काशी होत. जो मनुष्य आईवडिलांच्या सहवासात असेल, त्यानं काशीची तीर्थयात्रा केल्यासारखं होतं; त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. अशा वेळी पुंडलिकानं काय केलं, ते ध्यानात घ्यावं. तो आईवडिलांची सेवा करणं थांबवून देवाकडं धावला नाही. त्यानं देवालाच उभं राहायला लावलं, तेव्हा प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणं सावध राहावं. ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं; पण त्याला प्राप्त करण्यासाठी आई-वडिलांची सेवा करणं थांबवू नये. कारण आई-वडील म्हणजे पूर्णांशानं ईश्वराचं स्वरूप होत. तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की, आई-वडिलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय.
पुंडलिक केवळ आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता. त्याने दुसर्या कोणत्या देवाचे भजन, पूजन केले, तरीही परब्रह्म त्याला भेटायला धावून आले. यामध्ये भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा आदर्श वारकरी संप्रदायाने शिरसावंद्य मानला आहे, हे स्पष्ट होते-
मातृ देवो भव । पितृ देवो भव ।
हा तो आदर्श होय. कोणत्याही देवापेक्षा आपले आई व वडील हेच सर्वांत पहिले पूजनीय श्रद्धास्थान होत.
ज्ञानेश्वर माउली म्हणतात –
सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें ।
तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ॥ ज्ञा. 17/207 ॥
सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असे जे माता-पितर त्यांच्या सेवेसाठी आपल्या देहाची कुरवंडी करावी, असे माउलींचे सांगणे आहे.
संत एकनाथ म्हणतात –
मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं ॥
मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचें पुण्य इहलोकीं ॥
मातापितयांची करीत जो सेवा । एका जनार्दनीं देवा वरिष्ठ तो ॥
आई-वडिलांची सेवा करणारा देवापेक्षा श्रेष्ठ होय, हे नाथबाबांचे सांगणे आहे. आजच्या काळात या आदर्शाची भारतीय समाजाला पुन्हा एकदा आठवण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या पित्याने दिलेले वचन सत्य करण्यासाठी हसत चौदा वर्षेवनवास स्वीकारणारा राजपुत्र रामचंद्र हा आपला आदर्श आहे. आपल्या वृद्ध, अंध आई-वडिलांना कावडीत घालून काशीयात्रा करायला निघालेला श्रावण आपला आदर्श आहे. आज एकत्र कुटुंबपद्धती नाहीशी होऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा समाजाने स्वीकार केला आहे. मनुष्याचे आयुष्यमानही वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीचा व सन्मानाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. आई-वडील जिवंत असताना त्यांची कोणतीही काळजी घ्यायची नाही आणि ते मेल्यावर श्राद्धविधी, समाराधना करायच्या या ढोंगीपणावर तुकाराम महाराजांनी ताशेरे ओढले आहेत-
भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥
हे तों चाळवाचाळवी । केलें आपणचि जेवी ॥
निर्गुण-निराकाराची उपासना ही फार दूरची गोष्ट आहे, म्हणून वारकरी संतांनी सगुण साकाराच्या भक्तीचा सोपा मार्ग सांगितला.
निर्जीव दगडाच्या, धातूच्या मूर्तीत देव पाहून त्याची भक्ती करून देव पावतो काय?
तुकडोजी महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे –
मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव ।
देवा अशानं भेटायचा नाही रे !
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ॥
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या–चांदीचा देव त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ॥
देव आपल्या भावनेत आहे. आई-वडिलांच्या रुपात जिताजागता सगुण साकार देव घरात आहे, तर त्याची सेवा पहिल्यांदा करा.
पुंडलिकाला भेटायला देव आले, ते त्याचे पाहुणे म्हणून. ज्ञानेश्वर माउली म्हणतात –
बापरखुमादेवीवरु शाहाणे । विठ्ठलु पाहुणे पुंडलिक ॥
आता आपण जसे पाहुण्यांचे स्वागत करतो, त्यांना ‘या, बसा,’ असे म्हणतो, त्यांना आदराने बसायला आसन देतो. त्यांचा पाहुणचार करतो, तसे काही पुंडलिकाने करायला हवे होते की नाही? बरे! हा पाहुणा कोणी सामान्य की काय? तो हा देवांचाही देव, असा हा पाहुणा; पण पुंडलिकाने काय केले पाहा. तुकाराम महाराज रागावून पुंडलिकाला विचारतात –
का रे पुंड्या मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥
ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट ॥
पुंडलिकाने देवाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक वीट मागे भिरकावली व म्हणाला, “मी माझ्या आई-वडिलांची सेवा करतो आहे. त्यांना झोप लागली आहे. उगा त्या विटेवर उभा राहा!”
पुंडलिक हा भक्तराज आहे, असे वर्णन संतांनी केले आहे. संत जनाबाई म्हणतात –
पुंडलिक भक्त बळी । विठो आणिला भूतळी ॥
तर तुकाराम महाराज म्हणतात –
पुंडलिका महा भक्तराज थोर । सर्व सुरवर येती भेटी ॥
पुंडलिकाच्या भक्तीला भुलून विठ्ठल त्याला भेटायला आला. नामदेवराय म्हणतात –
पुंडलिके बरवे केले । कैसे भक्तीने गोविले ॥
एकनाथ महाराज म्हणतात –
पुंडलिके उभा केला । भक्त भावाचा अंकिला ॥
पुंडलिक अशी कोणती भक्ती करत होता? पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. आई-वडिलांची सेवा ही भक्ती केव्हा होईल? आपण काय करतो, यापेक्षा कसे करतो, याला जास्त महत्त्व आहे आणि हे कसे करणे आपल्या मनातील भावनांवर अवलंबून आहे. भक्तीमध्ये शरीराने केलेल्या कृतीपेक्षा मनातील भावनेला जास्त महत्त्व आहे.
चोखोबा म्हणतात –
भावाचा भुकेला, भावाचा भुकेला । भावाचा भुकेला विठू माझा ॥
भक्तीचे हे वर्म जाणल्याने ते म्हणतात –
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥
आपण निष्काम अंतःकरणाने कोणतेही कर्म करतो, तेव्हा ते कर्म त्या सर्वात्मक ईश्वराची भक्तीच होय. ज्ञानेश्वर माउली म्हणतात –
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ ज्ञा. 18/917 ॥
कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आकांक्षा सोडून केलेले स्वकर्म हे सुंदर फूलच होय. अशा फुलांची माला करून त्या सर्वात्मक ईश्वराला अर्पण केल्याने तो संतोष पावतो.
पुंडलिकरायांची आई-वडिलांची सेवा ही अहंकाररहित आहे. तशीच ती सेवा करताना त्यांना कोणत्याही फलाची आकांक्षा नाही. हा निष्काम कर्मयोगरुपी भक्तीचा आदर्श वारकरी संतांनी स्वीकारला आहे. तो त्यांनी आचरणात आणला आहे. आपला प्रपंच सोडून, कर्तव्यकर्म सोडून, नित्यकर्म सोडून भजन-पूजन करावे, असे कोणत्याही वारकरी संताने सांगितले नाही.
पुंडलिकाने आपल्या माता-पित्यांच्या सेवेत काही खंड पडू दिला नाही; उलट त्यांनी देवालाच एका विटेवर उभा राहायला सांगितले. देव तसे उभे राहिले. देवांनी प्रसन्न होऊन पुंडलिकाला वारंवार विनंती केली की, काहीतरी वरदान माग. पण निरिच्छ पुंडलिकाला स्वतःसाठी काही मागायचे नव्हतेच. देवांनी फारच आग्रह केला, तेव्हा त्यांनी जे मागितले ते समाजाचे दुःख कमी व्हावे, म्हणूनच. सर्व संतांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. संत जनाबाई म्हणतात –
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥
भुक्ति–मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥
उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥
संत एकनाथ महाराज म्हणतात –
धन्य–धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥
तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥
भोळेभाळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥
एका जनार्दनीं देऊनी वर । राहें विटेवर मग उभा ॥
एकापरीने विचार करता पुंडलिक हा तुमच्या-आमच्यासारख्या स्खलनशील सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे. तो चुका करतो, अपराध करतो. त्याबद्दल पश्चात्ताप होऊन तो आपल्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न करतो. जीवनाची चुकलेली वाट सोडून पुन्हा योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करतो. संत त्याचे अपराध पोटात घालून त्याला योग्य मार्ग दाखवतात. त्या मार्गावरून चालताना तो आपल्या सर्वांचा आदर्श बनतो. संतांचा धर्ममार्ग असा साधा-सोपा, सरळ आहे.
लेखक संपर्क ः 94220 55221