-

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, 24 एकरात पसरलेल्या 27 हजार विद्यार्थिसंख्या असलेल्या विस्तीर्ण आझम कॅम्पसमधील भव्य असेंब्ली हॉलच्या बाहेर कार्यकर्त्यांची उत्साही धावपळ चालू होती. कोणी नोंदणीसाठी खुर्ची, टेबल लावत होता, कोणी पुस्तकांचा स्टॉल लावण्यासाठी टेबलांची तजवीज करत होता; तर कोणी दाभोलकर, पानसरे यांची पोस्टर्स लावण्यासाठी दोर्यांची बांधाबांध करत होता. पुण्यातील कार्यकर्ते बाहेरगावाहून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, राहण्या-जेवण्याच्या व्यवस्थेच्या सूचना देत ‘कोविड प्रोटोकॉल’ पाळण्याची आठवण करून देत होते. असा सगळा माहोल उत्साहाने भारलेला होता. निमित्त होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीचे. दोन वर्षांचा कोविडचा खडतर काळ पार करत महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकमेकांना प्रत्यक्ष भेटत होते. साहजिकच गळाभेटी होत होत्या, जुन्या आठवणी उजळत होत्या, नवीन ओळखीचे धुमारे फुटत होते.
या उत्साही पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतून आलेले जवळजवळ 175 कार्यकर्ते त्या भव्य असेंब्ली हॉलमध्ये स्थानापन्न झाले व अधिवेशनाची कार्यवाही सुरू झाली. गेल्या दोन वर्षांत कोविडच्या हाहा:कारात आपले अनेक साथी, त्यांचे नातेवाईक आपल्यापासून हिरावले गेले. त्या सर्व दिवंगत साथींच्या स्मरणार्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पुणे जिल्ह्यातर्फे स्वागत केले व संयोजनासाठीच्या सूचना दिल्या.
यजमानांच्या स्वागतानंतर महाराष्ट्रातील विविध 21 जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या परिचयाचा कार्यक्रम पार पडला. अनेक कार्यकर्ते नव्याने ‘अंनिस’मध्ये सामील झाले होते व गेल्या दोन वर्षांत परस्परसंपर्क नसल्याने सर्वांनाच परिचय करून देण्याची व घेण्याची गरज भासत होती. त्यामुळे सर्वप्रथम साथी प्रशांत पोतदार, अण्णा कडलासकर, नीळकंठ जिरगे, विनोद वायंगणकर, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, प्रा. अशोक कदम, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, सम्राट हटकर, प्रा. प्रवीण देशमुख, मुंजाजी कांबळे, रामभाऊ डोंगरे, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर या राज्य कार्यकारी समितीच्या सदस्यांनी स्वत:चा संक्षिप्त परिचय करून दिला. त्यानंतर राज्यातून आलेल्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी परिचय करून देताना ‘अंनिस’च्या संपर्कात कसे आलो, काम करताना आलेले अनुभव यांचे कथन केले. हे कथन ऐकताना अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणीने उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे भरून येत होते. ते अनुभव हळुवारपणे टिपत आपली भावविवशता लपवतानाही ते दिसत होते. अशा या भावपूर्ण वातावरणात अधिवेशनाचे पहिले सत्र संपन्न झाले. एककेंद्री नेतृत्वाऐवजी सामूहिक नेतृत्व या संपूर्णत: नव्या स्वरुपात संघटनेची उभारणी, बांधणी होत असल्याने सामूहिक नेतृत्वाच्या संकल्पनेची स्पष्टता देणारे व त्या अनुषंगाने संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी/बाबी पाळावयाच्या व कोणत्या टाळावयाच्या याबाबतचे सविस्तर विवेचन कार्यकारी मंडळाचे सदस्य अण्णा कडलासकर यांनी केले.
त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे विविध विभाग कार्यरत आहेत, त्या विभागांच्या गेल्या दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेणारे व कामाचे पुढील नियोजन सांगणारे सत्र घेण्यात आले. त्या-त्या विभागाच्या समित्यांच्या वतीने त्या विभागातील प्रमुख कार्यकर्त्याने अहवाल सादर केला.
विभागवार रिपोर्टिंग
विविध उपक्रम विभाग :- वर्षभरात होणार्या विविध उपक्रमांचा आढावा तासगावचे फारूख गवंडी यांनी सादर केला. पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जनासारखा उपक्रम आता समाजाने व सरकारने स्वीकारला असल्याचे मत मांडले गेले; तर फटाकेमुक्ती, व्यसनाला बदनाम करूया, पर्यावरणपूर्वक होळी, संविधान बांधिलकी या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच ‘ग्रंथदिंडी’सारखा पुस्तकविक्रीचा उपक्रम राज्याच्या पातळीवर राबविणे गरजेचे असल्याचे मत आग्रहाने मांडले गेले.
वार्तापत्र व प्रकाशन विभाग : – या विभागाचा आढावा वार्तापत्रांचे संपादक राजीव देशपांडे यांनी सादर केला. यातील प्रबोधनात्मक पातळीवर; तसेच संघटनेचे संघर्ष, उपक्रम जनतेसमोर नेण्यात वार्तापत्र सतत आघाडीवर आहे, हे आवर्जून सांगितले. ‘अंनिवा’च्या 5 खंडांचे प्रकाशन; तसेच बाल साहित्याची 5 प्रकाशनेही या वर्षात प्रकाशित केलेली आहेत. यावेळी आगामी कार्यक्रमाचे नियोजनात शतकवीर व आधारस्तंभ यांचा सत्कार जानेवारी 2022 मध्ये घेण्याचा मानस असल्याचे व याबरोबरच बालसाहित्य लेखन कार्यशाळा, अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन घेण्याचा विचार असल्याचे वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केले. व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी अडचणीच्या काळातही वार्तापत्र तावून-सुलाखून निघाले असून सध्या 5000 वर्गणीदार आहेत; तसेच वार्तापत्राच्या वेबसाइटला 50 हजार जणांनी आजवर भेट दिली असल्याचे सांगितले. तसेच आजवरचे सर्व अंक डिजिटल करण्याचे काम चालू असल्याचे सांगितले व या सर्व वाटचालीत सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे सांगत त्यांनी सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
मानसिक आरोग्य विभाग :- ‘मानसमैत्री’ उपक्रमांतर्गत डॉ. हमीद दाभोलकर यांनी कामकाजाचा आढावा सादर केला. यात आपल्या मोफत हेल्पलाईनमार्फत 10 हजारांहून अधिक लोकांना मार्गदर्शन झाले असून त्याचा सर्वसामान्य जनतेला खूपच फायदा झाल्याचे अनेकांनी संपर्क साधून आवर्जून सांगितले आहे. हे काम महाराष्ट्राच्या विविध 12 जिल्ह्यांत विस्तारल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले व ‘मानसमित्रां’चे अभिनंदन केले. बुलढाण्याचे सिव्हिल सर्जन यांनी जिल्ह्यात ‘मानसमैत्री’ विभाग सुरू करण्यास अनुकुलता दर्शविली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यावेळी डॉ. अरुण बुरांडे यांनी भोर परिसरात डॉक्टर सहकार्यांच्या सहकार्याने कोरोना उपचार भोर येथील बस स्टँड परिसरात सुरू केले व त्यास उत्तम यश लाभले, याचे अनुभवकथन केले. यावेळी वंदना माने यांनीही आपले कोरोना काळातील ‘मानसमैत्री’ कामाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
युवा व विवेकवाहिनी विभाग :- याचे रिपोर्टिंग जगदीश संदानशिव यांनी केले. ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ या उपक्रमातून अनेक युवकांवर मानसोपचार करता आले, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यातीलच एक युवक पुढे कार्यकर्ता कसा झाला, याची चित्तथरारक आठवणही त्यांनी कथन केली. या विभागाचा अहवाल प्रा. अशोक कदम, बार्शी व जगदीश संदानशिव (डोंबिवली) यांनी सादर केला.
बुवाबाजी संघर्ष विभाग : – याचा आढावा प्रशांत पोतदार, अण्णा कडलासकर, भगवान रणदिवे, कमलाकर जमदाडे यांनी घेतला. ‘बुवाबाजी’ या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात आतापर्यंत 800 पेक्षा अधिक केसेस दाखल आहेत. या कायद्यासंदर्भात पोलिसांचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता ठामपणे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार यांनी प्रतिपादित केली. तसेच बुवाबाजीचे अनुभवकथनाची पुस्तिका आगामी काळात प्रकाशित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही सांगितले. यावेळी वंदना देवकर, भगवान रणदिवे, वंदना शिंदे, अरुण जाधव व कमलाकर जमदाडे यांनी त्यांच्याकडे आलेल्या बुवाबाजी तक्रारी सोडवतानाच्या रोमांचकारी अनुभवांचे कथन केले. बुवाबाजी संघर्षासाठी एक महाराष्ट्रव्यापी मध्यवर्ती टास्क फोर्स निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे अण्णा कडलासकर यांनी सांगितले. तसेच जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम सरकारने लवकरात लवकर करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली.
संघटनात्मक बांधणी: – डॉ. हमीद दाभोलकर, अण्णा कडलासकर, प्रवीण देशमुख, राहुल थोरात यांनी ‘अंनिस’ची संघटनात्मक वाटचाल कशी चालू आहे व कशी असावी, याची मांडणी केली व संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याची नितांत गरज असल्याचे विचार मांडले. यानंतर संघटनात्मक भूमिकेची स्पष्टता करताना संघटना ही सामूहिक नेतृत्वाचा स्वीकार करते, याचा स्पष्ट उल्लेख केला व यापुढे संघटनात्मक बांधणीवर आपला भर असेल, हा ठाम निर्धार व्यक्त केला.
‘नवीन संघटनात्मक संरचना’ यासंदर्भात राहुल थोरात यांनी तपशीलवार मांडणी केली व 12 विभागांची रचना विषद केली. यामध्ये किमान 5 ते कमाल 9 अशी सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. उपक्रम ठरविण्याचा अधिकार आपण विभागांना दिला आहे. ‘मध्यवर्ती’ने मदत करणे व समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे एवढी माफक अपेक्षा आहे, अशी मांडणी केली. यानंतर अण्णा कडलासकर यांनी कृतिशील धोरण समजून घेण्याची विनंती सर्वांना करून संघटनेतील कामामधून स्वत:चा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचे आवाहन केले.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी या पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेऊन यापुढे आपण सामूहिक नेतृत्वाची संकल्पना स्वीकारलेली आहे. ती वृद्धिंगत करूया व राज्य शासनाने ‘विवेक वाहिनी’ शाळा /कॉलेजमध्ये सुरू करण्यास अनुकुलता दर्शविली आहे. त्याचाही आपण उपयोग करून घेऊयात, असे सांगितले.
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी देत असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात प्रसिद्ध लेखक व डॉ. दाभोलकरांचे साहित्य हिंदीत अनुवादित करून प्रकाशित करण्याच्या कामी कळीची भूमिका पार पाडणारे कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर हा पुरस्कार प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्ते संतराम कराड (अंबाजोगाई) आणि वसंतराव टेंकाळे (लातूर) यांना प्रदान करण्यात आला.
सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता हा पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते उदयकुमार कुर्हाडे (येवला) यांना प्रदान करण्यात आला.
भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रबोधन पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव व ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे यांच्या हस्ते विनायक चव्हाण (इचलकरंजी) यांना प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुरस्कार मनीषाताई गुप्ते यांच्या हस्ते नागपूर ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विजयाताई श्रीखंडे यांना प्रदान करण्यात आला.
मुंबईच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रभाताई पुरोहित यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जीवन गौरव पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव व ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कारार्थींच्या वतीने व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये उदयकुमार कुर्हाडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र घराघरांत पोेचले तर घराघरांत विचारपरिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन केले. तसेच आपल्याला मिळालेल्या 10 हजार रुपये या पुरस्काराच्या रकमेत आणखी स्वत:च्या 10 हजार रुपयांची भर घालत त्यांनी ‘अंनिस’ वार्तापत्राला व्यक्तिगत देणगी म्हणून 20 हजार रुपये दिले.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य हिंदीत आणण्याचे काम माझे एकट्याचे नसून अनेकांच्या सहकार्याने ते हिंदीत आले आहे व त्याद्वारे अत्यंत प्रतिकुलतेतही केल्या जाणार्या या कामामुळे प्रतिस्पर्ध्यांनाही आपले विचार समजतील व परिवर्तनाचा विचार भारतात सर्वदूर पोचेल, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन केले.
सामाजिक कार्यकर्त्या मनीषा गुप्ते यांनी आपल्या मनोगतात आजकाल शिक्षणातून फक्त माहिती मिळते. पण वैज्ञानिक दृष्टिकोन मिळत नाही आणि हीच बाब छद्मविज्ञानाच्या वाढीस कारणीभूत आहे. त्यामुळे ‘अंनिस’ वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार- प्रसाराचे काम करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असं मला ठामपणे वाटते, असे प्रतिपादन केले.
मा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मार्गदर्शन करताना भारत उन्मादी, धर्मवादी राष्ट्र होणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली व विवेकी चिकित्सेला धारदार शस्त्राची उपमा देत धर्मांची ठोस, विधायक आणि कृतिशील चिकित्सा सुरू राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. ‘अंनिस’चे कार्य समाजात खोलवर रूजले असल्याने हे काम ‘अंनिस’ने केले पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अंनिवा’च्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी केले. सूत्रसंचालन ‘अंनिस’चे पुणे येथील कार्यकर्ते राहुल माने यांनी केले.
दुसर्या दिवशी सकाळपासून कालच्या दिवसात अपुरी राहिलेली विभागवार चर्चा पुढे चालू राहिली.
सांस्कृतिक विभाग:-या विभागाचा आढावा सुनील स्वामी यांनी मांडला. चळवळीचा विचार सर्वदूर पोेचवण्यासाठी सांस्कृतिक विभाग अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शाखेतही सांस्कृतिक विभाग सक्षम कसा होईल, यासाठीचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासंदर्भात गरजेचे म्हणून विशेष कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न आगामी काळात राहील, असे सांगितले.
जातनिर्मूलन व विवेकी जोडीदाराची निवड आणि आंतरजातीय विवाह विभाग :- या विभागाचा आढावा सातारचे शंकर कणसे यांनी घेतला. त्यांनी आंतरजातीय विवाहोत्तर समस्या सोडविण्यासाठी आधार केंद्र सुरू केल्याचे सांगितले व या संदर्भात 3 ते 4 ‘संवादशाळा’ घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा व आंतरजातीय विवाहासंदर्भातील नवीन वेबसाईट बनवून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे सांगितले.
या वर्षी ‘अंनिस’ने 5 प्रकरणे यशस्वीरित्या हाताळून पीडितांना न्याय मिळवून दिला. 1) उलवे, नवी मुंबई 2) मेढा, सातारा 3) परांडा, जिल्हा उस्मानाबाद 4) कोल्हापूर (जिल्ह्यातील दोन बहिणींवरील कौमार्य चाचणी प्रकरण), 5) कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली.
या वर्षी सातारा जिल्हा ‘अंनिस’ने 4 आंतरजातीय विवाह लावले आहेत.
सोशल मीडिया विभाग :- याचा आढावा राहुल माने (पुणे), गिराम (जालना), अमोल पाटील (इचलकरंजी), वाघेश साळुंखे (सांगली) यांनी मांडला. सोशल मीडिया हाताळणे यासंदर्भात विभागातर्फे नुकतेच एक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते. ‘अंनिस’चे नवीन फेसबुक पेज तयार करण्यात आले असून ‘म. अंनिस’चे ‘यू ट्यूब’ चॅनेल देखील तयार आहे, त्याचा प्रभावी वापर सुरू करायला हवा आणि ‘ट्विटर’ व ‘इनस्टाग्राम’ यांच्या माध्यमातून चळवळीचे काम अधिक जोमाने वाढवायचे आहे. मात्र अजून बर्याच कार्यकर्त्यांना सोशल मीडिया प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे देखील त्यांनी मत मांडले.
महिला विभाग :- याचा आढावा वंदना शिंदे (ठाणे), नीता सामंत (चाळीसगाव), सीमाताई पाटील (कोल्हापूर) यांनी मांडला. जानेवारी महिन्यात (सावित्रीबाई जयंती ते जिजाऊ जयंतीदरम्यान) महिलांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे व त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जटानिर्मूलन याकामी आव्हानात्मक काम करता येण्यासारखी स्थिती आहे. कुटुंबनियोजन यासंदर्भातील पुरुष शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ असूनही महिलांच्याच शस्त्रक्रिया अधिक होतात, हे वास्तव आहे. हे बदलण्यासाठी प्रबोधनात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
वैज्ञानिक जाणिवा विभाग :- याचा आढावा प्रकाश घादगिने (लातूर), व्ही. टी. जाधव (नाशिक), किरण जाधव (अंबरनाथ) यांनी मांडला. या उपक्रमास पूर्वीचा अनुभव / प्रतिसाद चांगलाच आहे, आता तो फक्त ‘कॅच’ करण्याची गरज आहे. असे प्रतिपादिले गेले. आगामी काळात शिक्षक शिबिरांसाठी प्रयत्न करण्यात येत असून ‘स्वयंअध्ययन’, ‘सत्यशोध परीक्षा’ प्रकल्प सुरूच राहतील. यासाठी सातत्याने प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
विभागनिहाय कामकाज व नियोजन चर्चा
1) विदर्भ :- नागपूर, वर्धा, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांतील कामाचा आढावा व पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत प्रामुख्याने रामभाऊ डोंगरे, विनोद बनसोड, विजयाताई श्रीखंडे, प्रा. प्रवीण देशमुख यांनी सहभाग घेतला.
2) मराठवाडा :- लातूर, नांदेड, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांतील कामाचा आढावा व पुढील नियोजनाबाबत प्रामुख्याने प्रकाश घादगिने, गिराम सर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, नीलकंठ जिरगे यांनी सहभाग घेतला.
3) मुंबई / कोकण : – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील कामाचा आढावा व पुढील नियोजनाबाबत प्रामुख्याने रेखा देशपांडे, गायकवाड, वंदना शिंदे, पालघरचे जतिन कदम, संदेश घोलप यांनी सहभाग घेतला.
वेळेअभावी पश्चिम – दक्षिण महाराष्ट्र, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेता आला नाही.
दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाने फारच महत्त्वाची कामगिरी बजावली. वंदनाताई शिंदे, अण्णा कडलासकर, राजू कोळी, आकाश पवार, विजय खरात, नागपूरच्या कार्यकर्त्या निकी, स्वामी सर, नितीन हांडे या सर्वांनी चळवळीची गाणी अतिशय जोषाने गात वातावरण सतत उत्साहाने भारलेले ठेवले.
तसेच वेळेअभावी कृतिशील कार्यक्रमाचे 4 ठराव जाहीर वाचन न करता, सर्वांना पर्सनल व ग्रुपवर पाठवून एकमताने मंजूर करण्यात आले. ते ठराव व हे ठराव करण्यामागची पार्श्वभूमी याच अंकात पुढे देण्यात आली आहे.
कार्यक्रम समारोपाच्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याबाबतची न्यायालयीन प्रक्रियेबाबत मुक्ता दाभोलकर यांनी थोडक्यात माहिती दिली.
शेवटी, आझम कॅम्पसचे प्रमुख पदाधिकारी, पुणे जिल्हाचे सर्व संयोजक कार्यकर्ते, भोजन व्यवस्था करणारे कर्मचार्यांना ‘स्टँडिंग ओव्हिएशन’ देऊन, टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यकारिणी बैठकीचे सूत्रसंचालन प्रशांत पोतदार, अण्णा कडलासकर व फारूख गवंडी यांनी केलं; तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल माने यांनी केले.
दोन दिवस अतिशय उत्साहात झालेल्या या राज्य कार्यकरिणीचा समारोप ‘हम होंगे कामयाब…’ या गीताने करण्यात आला.
– राज्य कार्यकारी समिती, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती