मीना चव्हाण - 9764147483

शहीद कॉ. गोविंद पानसरेंचे लोकप्रिय पुस्तक

पाच वर्षांपूर्वी कॉ. गोविंद पानसरेंच्यावर सनातनी मारेकर्‍यांनी गोळ्या झाडल्या. 16 फेबु्रवारी रोजी सकाळी फिरायला जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. 20 फेबु्रवारी 2015 रोजी उपचारादरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले.

कॉ. उमा पानसरे यांनाही डोक्यात गोळ्या घातल्या होत्या; पण त्या वाचल्या. बर्‍या झाल्या आणि पुन्हा कामाला लागल्या.

चालतेबोलते विद्यापीठ

कॉ. गोविंद पानसरे म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ! या विद्यापीठाच्या विविध विभागात सतत नवनवे उपक्रम सुरू असत. कोल्हापूरचे कम्युनिस्ट पक्षाचे ऑफीस म्हणजे सर्व राजकीय आणि सामाजिक चळवळींचे केंद्र, अनेक अन्यायग्रस्त मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्यासाठी इथे येतात.

हजारो रुपये पगार घेऊन कायम नोकरीत असणार्‍या बँक कर्मचार्‍यांपासून रोज दहा घरची धुणी-भांडी करणार्‍या मोलकरणीपर्यंत, फेरीवाले, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, बालवाडी-अंगणवाडी सेविका अशा अनेक संघटना इथून चालतात. त्याशिवाय शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, युवक, महिला शेतकरी, शेतमजूर यांचे लढे इथून लढवले जातात.

देशभर गाजलेला टोलचा लढा, विश्वशांती यज्ञविरोधी आंदोलन, शंकराचार्यांच्या संविधान विरोधी बेताल बडबडी विरोधी मोर्चा, अशी अनेक यशस्वी आंदोलने कॉ. पानसरेंच्या नेतृत्वाखाली झाली.

प्रचंड हानी

कॉ. पानसरेंना मारून खुन्याने कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीची प्रचंड हानी केली. अशा खुन्यांचा बंदोबस्त करण्याचा मार्ग पुरोगाम्यांनी शोधणे आवश्यक आहे. त्याचवेळी माणूस मारून विचार संपत नाही, हेही प्रतिगाम्यांनी लक्षात ठेवावे. शहीद कॉ. पानसरेंचे विचार त्यांच्या व्याख्यानातून आणि लिखाणातून जनतेपर्यंत पोचले होते.

धर्मांधांना शह

कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम दंगली घडवून धृवीकरण करण्यासाठी जातीयवाद्यांनी फेसबुकवरून महामानवांच्या बदनामीचा मेसेज फिरवला आणि रात्री 11 वाजता नियोजनपूर्वक झुंडीने जाऊन मुस्लिम दुकाने, टपर्‍या व लहान व्यापार्‍यांवर हल्ले केले. लाखो रुपयांची लूट केली, नासधूस केली. भाई एन. डी. पाटील आणि कॉ. पानसरे यांनी लोकनिधी जमवला आणि पीडितांना नुकसान भरपाई दिली. ही त्यांच्या खुनापूर्वी सहा महिने आधी घडलेली घटना आहे.

हू किल्ड करकरे?’

ए.टी.एस. प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बाँबस्फोटाचा तपास केला, तेव्हा साध्वी प्रज्ञासिंग नावाच्या बाई, कर्नल पुरोहित व त्यांचे सहकारी सापडले. छापा टाकल्यावर देशातील अतिरेकी हिंदुत्ववादी पुढारी, लष्करातील कार्यकर्ते यांची नावे निष्पन्न झाली. पण हेमंत करकरे 26/11 च्या हल्ल्यात मारले गेले. त्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक ‘हू किल्ड करकरे?’ माजी आयपीएस अधिकारी शमशुद्दिन मुश्रीफ यांनी लिहिले. त्यांची व्याख्याने कॉ. पानसरे यांनी कोल्हापूरमध्ये ठेवली.

छत्रपती शिवाजी महाराज

1988 साली पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता?’ या नावाचे छत्रपत्री शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारे पुस्तक लिहिले. त्या काळात शिवाजी महाराजांची प्रतिमा-गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पद पातशहा आणि मुस्लिम द्वेष्टी अशी रंगवण्यात धर्मांध विद्वान यशस्वी ठरले होते. हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला.

कॉ. पानसरेंनी त्यांच्या छोटेखानी पुस्तकामधून खरा इतिहास समोर आणला. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी स्त्रियांना आदर दिला, शेतकर्‍यांसाठी कायदे केले, त्यांना दुष्काळात मदत केली, त्यांच्याबरोबर सर्व जातीचे हिंदू आणि मुस्लिम सरदार व सैनिक जबाबदारीच्या पदावर होते. या गोष्टी वाचकांना समजल्या. त्यांच्या हयातीत पुस्तकाच्या साठ हजार प्रती विकल्या गेल्या होत्या. या विषयावर शंभर व्याख्याने देण्याचा त्यांचा संकल्प होता, पैकी 82 व्याख्याने झाली होती.

संकल्प

त्यांच्या खुनानंतर प्राचार्य टी. एस. पाटील यांनी त्यांचा व्याख्यानांचा संकल्प पुरा केला; तर कार्यकर्त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या अक्षरश: लाखो प्रती महाराष्ट्रभर पोचवल्या.

विचार मरत नाहीत

माणूस मारला तरी विचार मारता आला नाही; उलट तो अधिक वेगाने सर्वत्र पसरला. आज मुस्लिम द्वेषाऐवजी ‘हिंदू-मुस्लिम एक है’ घोषणा व्यवहारात आली आहे.

श्रमिक प्रतिष्ठान, लोकवाङ्मय गृह, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांनी पुस्तकाच्या आवृत्त्या छापल्या. अनेक ठिकाणी पायरेटेड कॉपीजही सापडल्या. त्यावरून लोकप्रियता दिसते. ए.आय.एस.एफ.च्या कार्यकर्त्यांनी रिक्षाला माईक लावून गावोगाव जाऊन पुस्तक विक्री केली. सोशल मीडियावरून त्याची विक्री अजून सुरू आहे.

शिवाजी कोण होता?’ पुस्तक

पुस्तकास शुभेच्छा देताना 1988 साली मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी म्हटले आहे, “या पुस्तकाचा सर्वत्र प्रसार झाला पाहिजे. विशेषत: प्रतिगाम्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणापर्यंत ते पोचले पाहिजे. सर्व जातीयवादी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते व क्रियाशील कार्यकर्ते यांच्यापर्यंत जरी ते प्रारंभाला पोचले, तरी बराचसा कार्यभाग साधेल..” आज त्यांचे भाकित खरे ठरल्याचे दिसते.

1987 साली ‘आम्ही भारतीय लोक’ आंदोलनाच्या वतीने ‘शिवकालचे खरे अंतरंग’ या विषयावर कॉ. पानसरेंनी व्याख्यान दिले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाने त्याचे पुस्तकात रूपांतर करण्यात आले. पहिली आवृत्ती 1988 साली छापली आणि एक महिन्यात 3000 प्रती संपल्या.

सुरुवातीलाच वाचकांशी संवाद साधताना लेखकाने ‘लोकशाहीत राजाचे एवढे कौतुक का?’ असा प्रश्न उपस्थित करून त्याचे सविस्तर उत्तर, पुस्तक रुपाने दिले आहे.

महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘राज्य संस्थापक’ होते. त्यांनी नवे राज्य उभे केले. तसे राज्य उभे करणारे अजून काही राजे होऊन गेले; मग त्यांची नावे आज कोणी का घेत नाही?

आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा साडेतीनशे वर्षांपूर्वीची शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती; आता सरंजामशाही तर उपयोगी नाहीच, पण सध्या आहे तशी लोकशाहीही सामान्यांच्या उपयोगाची राहिली नाही, हा त्याचा अर्थ आहे.

आत्माहुतीच्या प्रेरणा

सहकार्‍यांमध्ये आत्माहुतीच्या प्रेरणा निर्माण झाल्या. पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून घेताना कामी आलेले शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे, औरंगजेबाच्या तावडीतून आग्य्राहून सुटका करून घेताना बिछान्यावर झोपलेले मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद अशी उदाहरणे दिसून येतात – याचे कारण काय?

याचे कारण महाराजांचे धोरण. लेखक म्हणतात “रयतेची कणव असलेला राजा होता. त्यांनी शेतकर्‍यांचे हित जपले. त्यांना बी-बियाणे, औतफाटा देऊन नवीन जमिनी कसायला प्रोत्साहन दिले. दुष्काळात सारा माफ केला. मन मागेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला.”

“स्त्रियांच्या अब्रूला हात घालणार्‍यांचे हात कलम केले. राज्यकारभारासाठी रयतेची भाषा असावी, म्हणून मराठी राजभाषा कोश तयार केला आणि शासनाची भाषा मराठी केली.

“शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असा आदेश सैन्याला दिला. त्यामुळे लुटालूट करणारे सैन्य, सरदार, वतनदार ही प्रतिमाच बदलली.”

“शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार वतनदार होते, विश्वासू चाकर होते. त्याचबरोबर मुस्लिम राजवटींमध्ये अनेक हिंदू सरदार होते, याची उदाहरणे लेखकांनी दिली आहेत. अकबराकडील सरदारात 22.5 टक्के तर औरंगजेबाकडे 31.6 टक्के हिंदू सरदार असल्याची आकडेवारी देऊन त्या कालच्या लढाया हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा नव्हत्या; सत्तेसाठी, संपत्तीसाठी दोन्ही बाजूने हिंदू-मुस्लिम सरदार, सैन्य लढत होते. सबब, त्यांच्या लढायांची वर्णने करून आज हिंदू-मुस्लिम झगडे लावणे चूक आहे,” हे लेखकांनी यशस्वीपणे ठसवले आहे.

“त्या काळची देवळे संपत्तीची केंद्रे होती. मुस्लिमांप्रमाणे हिंदू राजेसुद्धा देवळे लुटत,” हे सांगून लेखक आवाहन करतात. “मुस्लिम द्वेष करणार्‍यांनी, धर्मद्वेष स्वत:च्या नावावर खपवावा, शिवाजी महाराजांच्या नावावर नको.’ तसेच ‘मुुस्लिम धर्मियांनी तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजी महाराजांस ओळखू नये. इतिहास पाहावा. शिवाजी महाराजांचा द़ृष्टिकोन समजून घ्यावा, अन् मग काय ते ठरवावे.”

हे आवाहन ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचले. आपणही ते पोचवावे. यासाठी हे पुस्तक तीस रुपये छापील किमतीचे असले, तरी ते ए.आय.एस.एफ.ने सवलतीच्या दरात रुपये 20/- मध्ये उपलब्ध करून दिले आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]