डॉ. श्रीधर पवार -
भारतीय हिप-हॉप हा भारतीय तरुणाईत विकसित झालेला लोकप्रिय संगीत प्रकार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तेलुगू हिप-हॉप प्रख्यात झाले. भारतात तमिळ हिप-हॉप सर्वाधिक लोकप्रिय आहे तसेच कन्नड आणि मराठीसारख्या इतर अनेक भाषांत देखील आता लोकप्रिय होत आहे.
भारतामध्ये झपाट्याने वाढणारे हिप-हॉप अधिकाधिक लक्ष वेधून घेऊ लागले. मुंबईतसुद्धा इतर ठिकाणाप्रमाणे हिप-हॉप उदयास आले. मुंबईमधील किंवा इतर शहरांतील झोपडपट्टीतील किंवा समाजाच्या परीघावर असलेल्या तरुणांनी रॅप गायन सुरू केले.
भारतातील उपेक्षित जातीउत्पीडित दलितांची नवी पिढी स्वत:वर ठामपणे विश्वास ठेवत गीत / संगीत आणि कलेचा वापर करत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीचे उद्दिष्ट जातीय, वर्गीय भेदभाव संपविण्याचे असल्याचे ते मानत आहेत. स्वत्व व समष्टीच्या जाणिवेचे भान वर्तमानातील रॅपर गात आहेत. दलित रॅप हा भारताचा नवा म्युझिकल व्हॅन्गार्ड आहे. जातीय हिंसाचार आणि संस्थात्मक भेदभावाविरुद्ध संघटित होण्यासाठी दलित रॅप व हिप-हॉप साहाय्यभूत ठरले आहे.
‘No one can hope to make any effective mark upon his time and bring the aid that is worth bringing to great principles and struggling causes if he is not strong in his love and his hatred. I hate injustice, tyranny, pompousness and humbug, and my hatred embraces all those who are guilty of them. I want to tell my critics that I regard my feelings of hatred as a real force. They are only the reflex of the love I bear for the causes I believe in.
– Dr. B. R. Ambedkar in his Preface to ‘Ranade, Gandhi and Jinnah.’
“स्टेज हे माझ्या वितंडाचे स्थान आहे, ते माझे सैद्धांतिक रणांगण आहे जिथे मी माझ्या वेदना मांडतो आणि विचारतो की माझ्या लोकांवर झालेले सर्वव्यापी अत्याचार शतकानुशतके अदृश्य का ठेवण्यात आले?’
– अरिवू (रिवारसु कलाइनेसाँ) रॅपर
अबे चल बे हट बे देख
हम गिरेंगे १०० बार
उठेंगे फिर भी
दौडेंगे, भागेंगे, सोचेंगे, छीलेंगे,
बोलेंगे, भिड़ेंगे, लड़ेंगे
तुझ में दम है रोक के देख…
ये लम्बी तुम्हारी दीवारों पे
हमारी सोच बनेगी रे छेद…
– विपिन तातड/झुंड चित्रपटातील रॅप
‘हिप हॉप’ हा वर्तमानातील तरुणाईचा आवडता गायकीचा प्रसिद्ध प्रकार आहे. हिप हॉप गेल्या शतकाच्या शेवटी जागतिक युवा संस्कृतीचा साऊंडट्रॅक बनला आहे. प्रथमतः आफ्रिका व आफ्रिकन-अमेरिकन तरुणाईने स्वीकृत केलेला बंडखोरीचा हा गायन प्रकार आता सर्वत्र स्वीकारला गेला आहे. १९२०-३० च्या काळात ज्या प्रकारे जाझ गायकीचा प्रकार प्रसिद्ध होता तसाच ब्लॅक पँथरकालीन व १९७०-८० नंतर हिपहॉप किंवा रॅप हा गायकीचा प्रकार जोरकसपणे पुढे आला आहे.
डिस्को रॅप म्हणून ओळखल्या जाणार्या संगीत शैलीतून हिप-हॉप किंवा किंवा रॅपची निर्मिती झाली. साधारणतः १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस हिप-हॉप या लोकप्रिय संगीताची शैली आफ्रिकन अमेरिकन आणि ब्रॉन्क्समधील कॅरिबियन स्थलांतरितांत उगम पावली. हिप-हॉप मध्ये शैलीसापेक्ष लयबद्ध संगीतात (सामान्यतः ड्रम बीट्सच्या सोबत तयार केलेले असते) रॅपिंग, काव्यात्मक वाक्/भाषित याची लयबद्ध प्रस्तुती असते.
हिप-हॉप शैलीत वैशिष्ट्यरीत्या संगीत विकसित झाल्याने तरुणाईच्या संस्कृतीचा तो भाग बनला व जगाच्या व्यापक संस्कृतीचा एक उपसंस्कृती म्हणूनही अविभाज्य भाग बनला आहे. मुख्य चार शैलीत्मक घटकांद्वारे हिप-हॉप परिभाषित केला जातो, ज्यात पुढील चार मूलभूत घटकांचा समावेश होतो : मायकिंग/रॅपिंग (MCing/Rapping), डिजिंग (DJing/ scratching with turntables), पार्श्वभूमीवर ब्रेक डान्सिंग (break dancing), आणि ग्राफिटी कला (Graffiti Art) आहेत. हिप हॉप या लोकप्रिय संस्कृतीचा उगम झाला असला, तरी हिप हॉप संगीताची स्थापना प्रामुख्याने डिस्क जॉकी (डीजे) द्वारे साऊंड ट्रॅकच्या निर्मितीतून झाली. हिप-हॉपच्या सादरीकरणात डिजिंगची भूमिका बहुआयामी असते. हिप-हॉपमध्ये रॅप सोबत नृत्यासाठी उचित संगीताचा शोध घेणे, लोकप्रिय ट्रॅकचे वादन करणे या पार्श्वभूमीमागे बँड असणे, बँडमधील उपकरणांचा मेळ साधणे, बिट्स तयार करणे तसेच कमीतकमी संगीत इन्स्ट्रूमेंट ठेवून रॅप सुरू ठेवणे. असे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य डीजिंगद्वारे साधले जाते. एमसीस (MCs), एमसिज (Emcees), रॅपर्स (Rappers) जे गीतकार, गायक व कलाकार असतात.
१९७० च्या दशकातील मध्यापासून ते उत्तरार्धापर्यंत सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक ब्लॅक तरुणांनी हिप-हॉप या गायन प्रकारची सुरुवात केली. हिप-हॉपचे महत्त्वाचे अग्रणी प्रवर्तक कूल हर्क, आफ्रिका बंबाटा, ग्रँडमास्टर फ्लॅश आणि द फ्युरियस फाइव्ह हे होते. यूएसमध्ये औद्योगिकोत्तर नागरी हकांनंतरच्या काळात उद्भवलेली गरिबी, अंमली पदार्थ सवयी, पोलिसांची क्रूरता आणि इतर वांशिक आणि वर्गीय असमानता या विरुद्ध हिप-हॉप हा नूतन गायन प्रकार निर्माण झाला. नागरी हक चळवळ (सिव्हिल राईटस् मूव्हमेंट : CRM) आणि ब्लॅक फ्रीडम स्ट्रगल (BFS) दरम्यान विद्रोहाच्या अनेक कल्पना आणि विचारसरणीचे पेव फुटले. इंडस्ट्रीयल आणि पोस्ट-सिव्हिल राइट्स इंटिग्रेशनिस्ट पर्वात ब्लॅक युवकांनी विशेषतः मायकेल फ्रँटीच्या कॉम्पॅक्ट डिस्कवर स्टे ह्यूमन याने अमेरिकेमधील भांडवलशाही, साम्राज्यवाद यांच्यावर टीका करण्यासाठी रॅप आणि रेग-शैलीतील गीते लिहिली आणि गायली. वर्तमानात ब्लॅक युवक आपल्या रॅप मधून वंशवाद, जागतिकीकरण आणि भेदभाव, पूर्वग्रह यांचे विश्लेषण सादर करत आहेत.
भारतीय हिप–हॉप
भारतीय हिप-हॉप हा भारतीय तरुणाईत विकसित झालेला लोकप्रिय संगीत प्रकार आहे. देसज हिप-हॉप हा संगीत आणि संस्कृतीला बोहेमियाने दिलेला शब्द आहे. भारतीय हिप-हॉपची निर्मिती अनिवासी भारतीयांच्या प्रयत्नांनी सुरू झाली. प्रारंभिक रॅपर्सवर पाश्चात्त्य हिप-हॉपचा प्रभाव होता. तथापि, त्यांनी आपल्या रॅपला भारतीय स्पर्श दिला. त्यांचा विस्तार प्रामुख्याने क्लबमधून झाला, त्यांनी ‘इंडिपॉप’च्या रूपाने वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय आणि दक्षिण आशियाई देशांमधील जे शॉन, ऋषी रिच, पंजाबी एमसी, बोहेमिया आणि बॉम्बे रॉकर्स हे प्रमुख रॅपर्स म्हणून प्रसिद्ध झाले. युकेत स्थायिक असलेला भारतीय वंशाचा कलाकार अपाचे इंडियन (Apache Indian) हा हिप-हॉप गाणारा पहिला भारतीय समजला जातो. भारतात हिप-हॉपच्या आगमनाचे श्रेय ९० च्या दशकात नवी दिल्लीतील काही क्लब आणि डीजे यांना दिले जाते. तदनंतर बाबा सहगल याने रॅप संगीत प्रसिद्ध केले. २००० सालापर्यंत हिप-हॉपची व्याप्ती मुख्यत्वे भूमिगत स्वरूपाची होती व अतिशय विशिष्ट मोजक्या प्रेक्षकापर्यंत ते गायन मर्यादित होते. तथापि, २००० नंतर हिप-हॉप, दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या क्लब आणि स्ट्रीट कल्चरमध्ये अंतर्भूत होऊ लागले. भारतीय हिप-हॉपच्या सुरुवातीपैकी बंगाली भाषेतील चित्रपट गांडू ज्यात रॅपरची कथा सांगितली होती आणि पर्यायी रॉकसह रॅप मिसळणारा साउंडट्रॅक तयार केला होता. व्यावसायिक रॅप संगीताव्यतिरिक्त पुढील काळात समाजातील तळागाळात हिप-हॉपचे स्वरूप आकार घेऊ लागले. बर्याच उगवत्या रॅपर्समुळे हिप-हॉप क्षेत्रात लाट निर्माण झाली. रोल रिडा, नोएल सीन यांसारख्या कलाकारांनी आणि माचास विथ अॅटिट्यूड, हिप-हॉप तमिझा आणि स्ट्रीट अॅकॅडेमिक्स सारख्या गटांनी स्थानिक रॅप संगीतांच्या कक्षा विस्तारित केल्या.
बॉलिवूडद्वारे केलेल्या प्रमोशनमुळे, रॅप हा भारतीय तरुणांचा परवलीचा शब्द बनला. विशेषत: पंजाबी संगीत उद्योगात रॅप संगीताची विपुल वृद्धी झाली. या समुदायामध्ये हनी सिंग, बादशाह, इक्का, मांज म्युझिक आणि बोहेमिया यांसारख्या काही कलाकारांनी हिप-हॉप इंडस्ट्रीचे व्यापारीकरण घडवून आणले. सबब व्यापारीकरणाबाबत नकारात्मक भावना देखील निर्माण झाली. भारतात अनेक रॅपर्स आहेत जे हिंदी, पंजाबी, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बंगाली, ओरिया, भोजपुरी, खासी इत्यादी विविध भाषांमध्ये रॅप करतात. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तेलुगू हिप-हॉप प्रख्यात झाले. भारतात तमिळ हिप-हॉप सर्वाधिक लोकप्रिय आहे तसेच कन्नड आणि मराठीसारख्या इतर अनेक भाषांत देखील आता लोकप्रिय होत आहे.
प्रगतशील रॅपर्स इतर व्यावसायिक रॅपपासून वेगळे आहेत व ते प्रामुख्याने निषेध रॅप (प्रोटेस्ट) हिप-हॉप किंवा रॅप सादर करतात. अशा रॅप पैकी यंग प्रोझेप्टने (आता KRSNA) ‘हाऊ इज माय कंट्री’ रिलीज केले. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या भ्रष्टाचार विरोधात जो रॅप केला तो भारतीय विकासावर टिपणी करणारा ट्रॅक होता. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ च्या विरोधात भारतभर निदर्शने सुरू झाल्यानंतर निषेध हिप-हॉप पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला. जामिया मिलिया, अलीगढ (मुस्लिम युनिव्हर्सिटी) आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय या विद्यापीठामधील घटना आणि २०२० च्या दिल्ली दंगलीनंतर, देशभरातील अनेक रॅपर्स निषेधांमध्ये सामील झाले.
दलित रॅप : भारताचा नवा म्युझिकल व्हॅन्गार्ड
रॅप/हिप-हॉप संगीत चळवळ ९० च्या दशकात अधिक विस्तारली व विविध प्रकारचे रॅपर, नर्तक आणि असंख्य कलाकार निर्माण झाले. तत्कालीन अवकाशात मात्र त्यांच्या सर्जनशीलतेच्या आणि कल्पकतेच्या सादरीकरणाला संधी नव्हती. दरम्यान भारतामध्ये झपाट्याने वाढणारे हिप-हॉप अधिकाधिक लक्ष वेधून घेऊ लागले. मुंबईतसुद्धा इतर ठिकाणाप्रमाणे हिप-हॉप उदयास आले. मुंबईमधील किंवा इतर शहरांतील झोपडपट्टीतील किंवा समाजाच्या परीघावर असलेल्या तरुणांनी रॅप गायन सुरू केले.
मुंबईतील नावेद शेख एक अग्रभागी नाव आहे, ज्याला Naezy (rhymes with crazy) या संबोधनाने देखील ओळखले जाते. त्याच्या मते, “त्याच्या रॅपमधील कथन हे भारतीय वास्तवाबद्दल आहेत – राजकारण, सामाजिक समस्या, गुन्हे आणि अन्यायांबद्दल आहे, जे तुम्ही आजच्या पॉप संगीतात कधीही ऐकले नाहीत.” तथापि, २०२० च्या आसपास तमिळ रॅपर अरिवू उर्फ अरिवरासू कालेनेसन, आंबेडकरी कलाकार कडूबाई खरात आणि ओडिशाचे रॅपर दुले रॉकर उर्फ दुलेश्वर तांडी यांसारख्या कलाकारांनी नवीन प्रकारच्या गायिकेचे नवे दालन सुरू केले. आज देशभरात शेकडो रॅप करणारे संगीतकार आणि समूह आहेत, परंतु त्यांच्या सांस्कृतिक श्रमाला आवश्यक कौतुक आणि मोबदला मिळत नाही.
भारतातील उपेक्षित जातीउत्पीडित दलितांची नवी पिढी स्वत:वर ठामपणे विश्वास ठेवत गीत / संगीत आणि कलेचा वापर करत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीचे उद्दिष्ट जातीय, वर्गीय भेदभाव संपविण्याचे असल्याचे ते मानत आहेत. स्वत्व व समष्टीच्या जाणिवेचे भान वर्तमानातील रॅपर गात आहेत. दलित रॅप हा भारताचा नवा म्युझिकल व्हॅन्गार्ड आहे. जातीय हिंसाचार आणि संस्थात्मक भेदभावाविरुद्ध संघटित होण्यासाठी दलित रॅप व हिप-हॉप साहाय्यभूत ठरले आहे.
२०१६ नंतर दलित रॅप निर्णायक वळणबिंदू ठरला. जातीय हिंसाचार, संस्थात्मक भेदभाव आणि दलितविरोधी धोरणाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दलितांच्या एकत्र येण्याला सुरुवात झाली. रोहित वेमुलाच्या स्वत्यागाने दलित युवकांत नवीन चळवळ उभी राहिली. विद्यापीठांतून सर्वत्र विद्यार्थी एकत्र येत सत्तेला आव्हान देऊ लागले. भारतीय रॅप दृश्यांत दोन महत्त्वपूर्ण बदल त्याचवेळी घडले. पहिली म्हणजे २०१६ च्या आसपास पूर्वापार भूमिगत असलेले रॅपचे स्वरूप बदलून ते मुख्य प्रवाहात दृश्यमान / प्रविष्ट झाले व अधिक जोमाने गायले जाऊ लागले. रॅप संगीत व्हिडिओ अधिक वेगाने स्वतंत्रपणे तयार केले जाऊन वितरित झाले. तत्कालीन उपलब्ध झालेल्या डिजिटल माध्यमातून हे शक्य झाले होते. भारतांच्या प्रमुख महानगरांच्या पलीकडे जात रॅप शैलीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. २०१९ साली मुंबईबाहेर बॉलीवूड चित्रपट गली बॉय, आझादी रेकॉर्डस्, गली गँग, IncInk आणि कलमकार यांसारख्या नवीन रेकॉर्डच्या लॉन्चद्वारे गली रॅप लोकप्रिय झाले. त्याचसोबत वेब डॉक्युजरी, डिजिटल मीडियावर रॅपची पोहोच आणखी वाढली. २०१९ साली एमटीव्ही (MTV) ने भारतात पहिला रॅप रिअॅलिटी-टेलिव्हिजन शो, MTV Hustle प्रसिद्ध केला.
या शैलीच्या लोकप्रियतेत विपुल वाढ होऊनही, जातिविरोधी रॅप आणि मुख्य प्रवाहातील व्यावसायिक रॅप मध्ये मूलभूत फरक होता. गर्दी आणि ज्या ठिकाणी ते सादर केले जातात त्यामध्ये सुद्धा लक्षणीय फरक आहे. जातिविरोधी रॅप सहसा दलित स्थानावर / निषेध स्थळांवर सामूहिक कृतीसाठी जमाव जमवण्याच्या उद्देशाने रॅप सादर केले जातात तर बहुतांशी कमर्शियल रॅप मनोरंजनाच्या उद्देशाने क्लब आणि उत्सवांच्या ठिकाणी आपले प्रयोग करताना आढळतात.
हैदराबादमधील संशोधक विद्वान व विद्यार्थी नेता रोहित वेमुला यांची स्वहत्या आणि गुजरातमध्ये उना येथील अनेक तरुणांना चाबकाने मारत केलेली अवहेलना यांच्या परिणामी संतप्त तरुणांनी विविध विद्यापीठांतून संघर्ष सुरू केला व ज्याचा प्रभाव त्वरित पसरला. या पार्श्वभूमीवर जातीविरोधी रॅप ठळकपणे समोर आला आणि अल्पावधीतच उद्भवलेल्या व्यापक विद्यार्थी आंदोलनांनी नव्याने राजकारण करणार्या दलित तरुणांना नवी दिशा दिली. भाषण, वादविवाद व रॅप या बहुआयामी आविष्काराने जनमानसात व सामाजिक माध्यमातून चर्चा होऊ लागल्या. मुख्य प्रवाहातील रॅपर्ससाठी जो अवकाश प्राप्त होता त्या मंचावरून जातीवर चर्चा करणे दुर्मीळ होते. मात्र आंबेडकरी विचाराने प्रेरित रॅप समुदायाने जातिव्यवस्थेला उघडपणे संबोधित करण्यास आणि भारतातील सर्वांत खोलवर रुजलेल्या आणि विध्वंसक सामाजिक समस्येला कायमचे नष्ट करण्याचा विचार रॅपमधून विस्तारण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानाचे रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेत भारतातील दलितांची नवी पिढी जातिअंतासाठी संगीत आणि कलेचा वापर स्व-विश्वासाने करत आपल्या आविष्कारातून प्रतिबद्ध होताना दिसत आहे. शैक्षणिक संस्थांमधील जाती-आधारित भेदभावाचे प्रतिबिंब सुमीत सामोस सारख्या रॅपरच्या रॅपमध्ये आहे. अरिवू सारखे रॅपर मानवी हकांचे उल्लंघन आणि दक्षिण भारतातील स्थानिक संस्कृती यावर भाष्य करणारे रॅप सादर करत आहेत. ग्रामीण ओडिशातील जीवन आणि कामगार परिस्थितीबद्दल रॅप करणारे ड्युले रॉकर आहेत. ‘द कास्टलेस कलेक्टिव्ह’ आणि स्वदेशी सारखे समूह, भारतीय समाजातील विद्यमान जात आणि वर्ग संरचनांना निर्भयपणे आव्हान देणार्या नवीन पिढीत जागृती निर्माण करत आहेत. बहुसंख्य रॅपर्स आपल्या संगीतातून लोकांच्या दडपशाहीबद्दलचा क्रोध व्यक्त करताना त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक अनुभवांना सुद्धा प्रक्षेपित करत असतात.
जातीविरोधी विविध रॅपर्सच्या संगीतात आंबेडकर आणि त्यांची विचारधारा केंद्रस्थानी असली, तरी त्यांना एका संचात एकत्र जोडता येणार नाही. संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि आपल्या कला शैलीतून काय साध्य करायचे आहे या संदर्भातील त्यांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आहेत, त्याखेरीज त्यांचे स्वतःचे राजकारण आणि विचारधारातही भिन्नता आहे.
‘द कास्टलेस कलेक्टिव्ह’
जातीविरोधी रॅपर्सनी मिळून ‘द कास्टलेस कलेक्टिव्ह’ची स्थापना चेन्नई शहरात केली आहे. त्याचे स्वरूप एका अर्थाने सामाजिक-राजकीय जागृत रॅप (Specially Politically conscious rap : SPC) समूह आहे. कलेक्टिव्ह समूह हा खालच्या जातीतील एक डझनपेक्षा अधिक सदस्यांचा समावेश असलेला बँड होता. उत्तर चेन्नई शहराच्या आग्नेय भागातील सर्वांत गरीब असलेल्या जिथे बरेच लोक झोपडपट्टीत राहात तिथे या बँडचा उदय झाला. या बँडमध्ये मोठ्या प्रमाणात दलित आणि कामगार-वर्गातील तरुण होते. ही झोपडपट्टी गानाचे (‘गाना’ ही तमिळ संगीताची शैली आहे. मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ त्याच्या चरित्राची स्तुती करण्यासाठी सुरुवातीला या शैलीतील गाणी सुरू झाली. मात्र सध्या समाजसुधारणेसाठी वेगळ्या शैलीत ही गाणी विकसित झाली. या गाण्यासोबत जिवंत तालवाद्य, ट्रिपल पल्स बीट्समध्ये वेगवान धून ही या गाण्यांची वैशिष्ट्ये आहेत.) केंद्र आहे. गानामध्ये जिवंत तालवाद्य, बोलाचालीची, विनोदी भाषा आणि सखोल निरीक्षणे अंतर्भूत असतात. प्रारंभीच्या सदस्यांत त्यामध्ये प्रामुख्याने अरिवू (संस्थापक सदस्य) आणि सुमित सामोस होते. त्यांनी त्यांच्या रॅपमध्ये जातिभेदाबद्दल मते मांडली. जाति व्यवस्थेचे सुन्न करणारे परिणाम प्रथमच या रॅप मधून अभिव्यक्त झाले.
सुमित सामोस
Your forefathers kept us oppressed for years / Isn’t that why the quota is given to us? / don’t be so proud because you get all you want / Unlike our ancestors we won’t remain calm.
‘आमच्या पूर्वजांप्रमाणे, आम्ही शांत राहणार नाही!’ असा निर्धार सुमित सामोस सारखे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे रॅपर करत आहेत. सुमित हे चेन्नईमध्ये राहतात. २०१८ साली त्यांनी हिप-हॉप समूह ‘द कास्टलेस कलेक्टिव्ह’ मध्ये प्रवेश केला. त्यांच्या हिट सिंगल ‘कोटा’ (२०१८) या रॅपने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. सदर रॅपमध्ये भारताच्या जातिव्यवस्थेवर तीक्ष्ण टीका समाविष्ट असल्याने हे गाणे खूप व्हायरल झाले. खालच्या जातीतील दलितांना अपमानित करणार्याविरुद्ध लढत राहू, हा निर्धार नव्या दमाच्या रॅपर्समध्ये दिसतो. सुमीत यांचा रॅप ‘लढाई सिख ले’ (Keep Resisting) ह्या ट्रॅकमध्ये उच्च जातीच्या हिंदूंनी दलितांच्या केलेल्या हत्याकांडांची आठवण करून देतो : करमचेडू (१९८५), त्सुंदुरु (१९९१), बथनी टोला (१९९६) आणि लक्ष्मणपूर बाठे (१९९७) तसेच विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागलेल्या रोहितची आठवणही अधोरेखित केलेली आहे. ‘लढाई सिख ले’ च्या सुरुवातीच्या ओळी आहेत: ‘मी जन्मल्यापासून तू माझ्यावर गुन्हेगार असा शिका मारला आहेस. यामुळे चिडून मी तुम्हाला विचारले की शतकानुशतके हजारो जाती आहेत, माणसांमध्ये हे उच्च-नीच का आहेत? तुमच्याकडे उत्तरे नाहीत, पण तुम्ही गप्प बसता. कारण तुम्हीच दोषी आहात.”
सुमितचा जन्म १९ ऑक्टोबर १९९३ रोजी ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील तेंतुलीपदर गावातील दलित कुटुंबात झाला. तो तुरुक तसेच द-लिट बॉय (Da-Lit boy) या नावाने सुद्धा ओळखला जातो. त्यांनी भुवनेश्वर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून लॅटिन अमेरिकन लिटरेचर (स्पॅनिश) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ‘जेएनयू’मध्ये विद्यार्थी चळवळीत सक्रिय होत बिरसा आंबेडकर फुले विद्यार्थी संघटनेत सामील झाले. २०२१ मध्ये, त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून मॉडर्न एशियन स्टडीजमधील एमएस्सी प्रोग्रामसाठी नावनोंदणी केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या जातीच्या अनुभवांवर आधारित त्यांनी राऊंड टेबल इंडियासाठी एक माहितीपूर्ण लेख लिहिला. पँथर प्रकाशनाने त्यांच्या स्वचरित्रात्मक ‘अफेअर्स ऑफ कास्ट : ए यंग डायरी’ (Affairs of Caste : A Young Diary) हे पुस्तक जुलै २०२२ मध्ये प्रकाशित केले. या स्वकथनात थक करणारा त्यांचा जीवनप्रवास रेखाटला आहे.
शोषित आणि अत्याचारित जनतेची सामूहिक ओळख दर्शविण्यास शोषित जनतेसाठी विशेषतः तरुणांसाठी रॅप हे एक उत्तम माध्यम असू शकते, अशी सुमित सामोस याची धारणा आहे. सामोसला रॅप संगीत आवडत नव्हते व तत्पूर्वीच्या हनी सिंग आणि बादशाहा यांच्या रॅपने ते कधीही उत्तेजित झालेले नव्हते.
जातीयवादाच्या विरोधात त्यांनी लेख, भाषणे आणि वितंडवाद केले व ऐकले. मात्र, ते लांबलचक आणि कंटाळवाणे असत. सामान्य जनतेला व तरुणाईला सहज समजेल असे काहीतरी हवे असल्याची त्यांना जाणीव झाली व त्यातूनच त्यांनी रॅप संगीत गीत लिहिण्याचे ठरवले. अमेरिकेतील रॅपर जॉयनर लुकास (Joyner Lucas) यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. २०१२ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्पॅनिश शिकत असताना समोस हिपहॉप ऐकू लागला. विशेषतः यूएस रॅपर तुपॅक शकूर यांच्या रॅपने ते प्रभावित झाले. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणि समाजातील जातीच्या विध्वंसक परिणामांवर आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी रॅप रेकॉर्ड करून यूट्यूब (YouTube) वर अपलोड करणे सुरू केले. आतापर्यंत त्यांनी पॅरिस, मॉरिशस आणि देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये रॅपचे सादरीकरण केले आहे. ते रंगमंचावर आणि बाहेर फंकी, चमकदार रंगांचे कपडे घालतात. ते म्हणतात, हे एक प्रकारचे प्रतिपादन (assertion) आहे. “माझी (निम्न) जात असूनही मी समान आहे हे मला त्यातून दाखवायचे आहे.” सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माल्कम एक्स यांच्या विचाराने प्रेरित असल्याचे तर हिपहॉपच्या बाबतीत जॉयनर लुकास, चाइल्डिश गॅम्बिनो, केंड्रिक लामर आणि तुपॅक यांच्याकडून प्रेरित असल्याचे सुमित मानतो.
गिन्नी माही
गिन्नी माही सर्वांत तरुण (जन्म १९९८) हिप-हॉप गाणारी आहे. ती मूळची भारतीय पंजाबी लोकगीते, रॅप आणि हिप-हॉप गाणारी गायिका आहे. ती पंजाबमधील जालंधर येथे वास्तव्यास असते.
शाळेत असताना तिला जातिभेदाचा प्रत्यय आला. शाळेत तिच्यासोबतच्या मुलीकडून तिची जात विचारण्यात आली. जेव्हा तिने उत्तर दिले की ती अनुसूचित जातींपैकी आहे. तरीही तिचे वर्गमित्र जातीचा अधिक तपशील विचारू लागले. मग मात्र माहीने शेवटी सांगितले, “ती अशा एका समुदायाची आहे जो पूर्वी चमार म्हणून ओळखला जात होता, परंतु ती जात मानत नाही” असे तिने निक्षून सांगितले. हे ऐकून प्रत्युत्तरात तिची वर्गमैत्रीण म्हणाली, “अरे चमार बडे खतरनाक होते हैं, पंगा नहीं लेना चाहिये.” घरी आल्यावर माहीने ही घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली आणि ही गोष्ट त्यांच्या मित्रांमध्ये पसरली. एके दिवशी तिच्या वडिलांना एका गीतकाराचा फोन आला. त्यांनी ‘डेंजर चमार’ भोवती एक सशक्त गाणे लिहिले होते. अशा प्रकारे या गाण्याचा जन्म झाला. या गाण्याने तिने तिच्या जातीच्या चमार नावाशी निगडीत ‘अप्रियता’ दूर केलीच व उलट जातीला अधिक सशक्त आणि अभिमानाची गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला.
तिचे पहिले दोन अल्बम, गुराँ दी दिवानी आणि गुरुपूरब है कांशीवाले दा हे भक्तिगीतांचे होते. मात्र, तिला ख्याती मिळाली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्तुती गाण्याने. भारतीय संविधानाचे शिल्पकार आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त करणारे तिचे पहिले गाणे ‘फॅन बाबा साहेब दी’ हे जगप्रसिद्ध झाले. हे गाणे यू ट्यूबवर प्रचंड व्हायरल झाले. माही स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना तिची प्रेरणा मानते. जातीमुळे लोकांना होणार्या सामाजिक दडपशाहीबद्दल ती गाणी लिहिते. तथापि, तिची गाणी कुणालाही दुखावणार नाहीत याची सुद्धा ती खात्री करत असते.
तिने जर्मनीतील ग्लोबल मीडिया फोरम (GMF 2018) मध्ये आपली गायकी सादर केली होती. आसुडाच्या (flogging)) विरोधातील तिच्या रॅप गायकीची प्रचंड प्रशंसा करण्यात आली व त्यासाठी तिला समानता आणि स्वातंत्र्याचा ‘युवा आवाज’ म्हणून संबोधित करण्यात आले. माहीने भारताबाहेर कॅनडा, ग्रीस, इटली, जर्मनी आणि युनायटेड किंग्डममध्ये रॅप परफॉर्म केले आहे. २०१६ साली तिने एनडीटीव्हीवर दिल्लीतील बरखा दत्तसोबत पहिली मुलाखत दिली. त्यानंतर, २०१८ च्या ‘आजतक टीव्ही चॅनल’ वर नवी दिल्ली येथे आयोजित ‘साहित्य’ लाईव्ह संभाषण कार्यक्रमात भाग घेतला. भारतीय समाजातील महिलांच्या समानतेसाठी कटिबद्ध आवाज म्हणून तिचा उल्लेख होतो. २०१६ साली गुरकंवाल भारती उर्फ गिन्नी माहीने तिच्या आंबेडकरांना समर्पित ‘फॅन बाबा साहिब दी’ या गाण्यामुळे ती प्रथमच प्रकाशझोतात आली. तथापि, तिच्या ‘डेंजर चमार’ या रॅप ट्रॅकने गिनीला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. या गाण्यातून तिने आपली केवळ तिची ओळखच उघड केली नाही तर पंजाबमध्ये ‘धोकादायक’ समजल्या जाणार्या चमार समुदायाची संघर्षशील प्रतिमा देखील वेगळ्या प्रकारे प्रगट केली आहे. गाण्याच्या हूकप्रमाणे : कुर्बानी देना दर्दे नहीं, रहंदे है तय्यार, हैगे अस्ले तो वाद डेंजर चमार (खरे डेंजर चमार ते आहेत जे त्यागाची भीती बाळगत नाहीत).
रेकोइल चाफे
रेकोइल हे मूळचे कोकणातील दापोली येथील अंजुर्ले येथील रहिवासी आहेत व सध्या कल्याणला राहतात. त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. हिपहॉप क्षेत्रात रेकोइल चाफे जवळजवळ एक दशक अग्रेसर आहेत. समाजाच्या दैनंदिन संघर्षांना प्रतिबिंबित करणारा हिपहॉप हे रेकोइल चाफे यांच्या गायकीचे वैशिष्ट्य आहे. रेकोइल गीतकार आणि संगीतकार तसेच निर्माते सुद्धा आहेत. रेकोइल चाफे हे OG (OG चे दीर्घ-रूप ‘ओरिजनल गँगस्टर’ आहे. अशी व्यक्ती जी ‘जुन्या पाठशाळेचा’ आहे किंवा ज्याच्याकडे विपुल ज्ञान किंवा अनुभव आहे. असे OG बाबत इंटरनेटवर परिभाषित केले आहे.) गीतकार आणि संगीतकार म्हणून संबोधले जातात. त्यांच्या हिपहॉप संगीतात जिवंत अनुभव, अमूर्त आणि रूपकात्मक संकल्पना आणि अस्मितेचे प्रतिपादन हे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. ज्या समाजातून येतात त्याबाबतच्या समस्या ते संबोधित करतात. रॅप आणि लोकल म्युझिक डीजेचे ते कार्यक्रम करतात. त्यांच्या मते, हिपहॉप / रॅपला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपलब्ध नसतात तसेच कार्यक्रमाची व्याप्ती छोटेखानी अवकाशापुरती असते.
त्यांनी लहानपणी रॅप ऐकलं होते, विशेषतः तत्कालीन पंजाबी रॅप त्या वेळी प्रसिद्ध होते. त्या वेळच्या रॅपचे विषय पार्टीज, नशा, तरुणाईची बेफिकरी, मादकता किंवा मुलींना छेडणारी गाणी हेच होते. त्या काळात इंटरनेट नसल्यामुळे सायबर कॅफेमध्ये जाऊन ते रॅपविषयी रिसर्च करू लागले. दरम्यान त्यांची ओळख हिवाळे यांच्याशी झाली व त्यांना एक नवीन दालन उघड झाले. जसजसा ते मूळ आफ्रिकन अमेरिकन रॅप ऐकू लागले व समजवून घेऊ लागले तसे त्यांचा रॅपचा स्वभाव वेगळ्या पद्धतीने प्रवाहित होऊ लागला. पारंपरिक किंवा पॉप्युलर रॅपपेक्षा वेगळ्या दिशेने ते ‘कॉन्शस रॅप’ लिहू लागले. त्यांनी पहिल्यांदा ‘जयभीमवाले’ अल्बमसाठी रॅप लिहिले. त्या वेळी आपली कलाकृती सादर करण्यासाठी किंवा वितरणाची सोय नव्हती. तत्कालीन इंटरनेट किंवा यू ट्यूबवर सुद्धा रॅप सादरीकरण करण्यासाठी सोय नसल्याने ब्लू टूथद्वारे त्यांनी आपले रॅप पसरविले. वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये किंवा कार्यक्रमातून त्यांनी रॅपचे कार्यक्रम सुरू केले. त्यांनी अनेक भारतीय हिपहॉप साठी निर्मिती केली आहे. ग्रॅव्हिटी आणि शाह नियमाच्या सिम सिमसह फरहान खानचा गॉडफादर आणि १०० बार, किडशॉट आणि बरेच काही त्यांनी सादर केले आहे.
रेकोइल इन्स्टाग्रामवर देखील विपुल प्रमाणात सक्रिय आहेत. हिपहॉप क्षेत्रातील पहिल्या पिढीतील ते आहेत. तथापि, मुंबईच्या तळागाळातील हिप-हॉप मध्ये त्यांचा अधिक वावर आहे. जातीच्या आधारे कलाकार आणि त्यांच्या संगीताचे प्रवर्गीकरण करणे चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “मला असे वाटते की पुढे जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमच्यावर लादलेली ‘खालची’ जातीय ओळख नाकारणे आणि सकारात्मक ओळख स्वीकारणे आहे ज्याने तुम्ही स्वतःला सक्षम बनवता.” (TRT वर्ल्डला दिलेली मुलाखत). स्वत:ला आंबेडकरवादी बौद्ध म्हणून आपली ओळख अधोरेखित करण्यावर रेकोइल यांचा विश्वास आहे की समाजाने आपल्यावर लादलेले खालच्या जातीचे हे ओळखचिन्ह नाकारणे आवश्यक आहे. १९५५ मध्ये, भारताच्या संविधानाचे शिल्पकार आंबेडकर यांनी साठ दशलक्ष दलितांसह बौद्ध धर्म स्वीकारल्याने दलित स्वतःला आंबेडकरवादी बौद्ध म्हणून संबोधनावर भर देतात. तथापि, कोणत्याही प्रवर्गात समाविष्ट न होता संगीताकडे केवळ हिपहॉप म्हणून पाहिले पाहिजे व ते केवळ निषेधाचे संगीत (Protest Music) आहे असे ते मानतात व तदनुसार वैश्विक सार्वत्रिकतेच्या वारशावर दावा सांगतात.
अरिवू (रिवारसु कलाइनेसाँ)
अरिवू हा चेन्नई-स्थित ‘जात-विरोधी’ रॅपर आहे. मास्टर (२०२१) मधील ‘वाथी रेड’ या गाण्यासाठी आणि त्याच्या ‘एन्जॉय एन्जामी’ (यू ट्यूबवर ४८ कोटी लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे) या गाण्यासाठी तो अधिक ओळखला जातो. अरिवूच्या घरी टीव्ही आणि रेडिओ नव्हता. त्याच्या पालकांना त्याने फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे अशी इच्छा होती. तथापि, त्याचे पालक कम्युनिस्ट आणि आंबेडकरी मासिके मागवत जी अरिवूला देखील वाचायला मिळत. संगीतात त्याच्या प्रेरणा ड्रेक आणि बॉब मार्ले आहेत. अॅलेक्स हेलीची ‘रूट्स’ कादंबरी त्याला प्रेरणा देणारी असून कार्ल मार्क्स, डॉ. आंबेडकर आणि पेरियार यांना तो आपली साहित्यिक व राजकीय प्रेरणा मानतो.
अरिवू याच्या मते, जे काही कुटुंबात व समाजात परिवर्तन झाले आहे ते फार कष्टाने व संघर्षाने कमावलेले आहे. महाविद्यालयीन वर्षांमध्ये तो त्याच्या कवितेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर त्याला कळून आले त्याची जातीय अस्मिता लपवण्यासाठी त्याने घातलेला तो मुखवटा होता. मात्र, जी काही उन्नती झाली ती आपल्या कलेने झाल्याचे तो मानतो. त्याच्या सोबतीचे उच्चवर्णीय मित्र त्याच्या कवितेबद्दल प्रशंसा करत, त्याच्या कलेबद्दल त्याचा आदर करत, पण त्यामुळे त्यांची जातीबद्दलची मानसिकता बदलली मात्र नव्हती, असे त्याला वाटते. २०१८ मध्ये प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते पा रंजित आणि संगीतकार तेन्मा यांच्या नेतृत्वाखालील जातीविरोधी संगीतकारांचा समूह, द कास्टलेस कलेक्टिव्हचा सदस्य म्हणून त्याची निवड झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःची जातीय ओळख सांगण्याचा निर्णय घेतला, असे अरिवूने म्हटले आहे. या निर्णयामुळे माझ्या आवाजाला कलाकार म्हणून आकार दिला असेही अरिवूचे म्हणणे आहे. पुढील दोन वर्षांत, अरिवूला त्याच्या कामाची विपुल प्रसिद्धी आणि प्रशंसा दोन्ही मिळाले. २०१८ साली तमिळ चित्रपट निर्माते पा रंजित यांनी निर्माण केलेला व रजनीकांत अभिनीत प्रसिद्ध ‘काला’ चित्रपटात अरिवूने ‘उरीमाई मीटपोम’ गाणे लिहिले. हे गाणे गीतकार म्हणून त्याचे पहिले व्यावसायिक पदार्पण होते.
तथापि, वाडा चेन्नईच्या ‘मथिया सरायिला’ सोबत गायक म्हणून ते ‘द कास्टलेस कलेक्टिव्ह’शी जोडलेले राहिले. एरिवूने स्वतंत्र संगीतकार म्हणून थेरुकुरल अल्बम प्रसिद्ध केला. सदर गायकीत सर्वांसाठी समान हक आणि जातीचे उच्चाटन करण्याची त्यांची हाक हे त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे.
विपिन तातड
विपिन तातड (VIP) महाराष्ट्र, अमरावती येथील सिद्धार्थ नगर येथील रॅपर आहे. विपिन ‘रॅप टोली’ या नावाने त्याच्या सहकारी रॅपर्ससोबत सादरीकरण करतात. आंबेडकरवादी दृष्टिकोनातून तातड सध्याच्या सामाजिक-राजकीय समस्यांवर रॅप लिहितात. त्यांनी मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण केले. प्रथमतः त्यांनी कॅमेरा आणि व्हिडिओ एडिटिंगचे काम केले. २०१६ मध्ये, एका हौशी रॅपर मित्राने त्यांना व्हिडिओ शूट करण्याची विनंती केली, ज्यामुळे तातड यांची प्रथमच रॅप शैलीची ओळख झाली. त्यांनी संगीत व रॅप शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. पुढे त्यांना कळून चुकले की रॅपचे मूळ हे राजकीय स्वरूपात आहे. तोपर्यंत त्यांनी फक्त हनी सिंगसारख्या भारतीय रॅप कलाकारांनाच ऐकले होते. पण जेव्हा त्यांनी तुपाक शकूर सारख्या आंतरराष्ट्रीय रॅपरचा शोध घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागले की त्यांचे रॅप त्यांच्या भवतालाच्या वंश, गरिबी, असमानता या वास्तविकतेबद्दल आहे. त्यांना वाटते की, ‘आंबेडकर आमच्या पाठीशी उभे आहेत व आमचे नेतृत्व करत आहेत.’
‘रॅप टोली’ च्या यू ट्यूब (YouTube) चॅनेलचे ११ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत आणि काही रॅपना एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इंटरनेटने संगीत निर्मितीचे लोकशाहीकरण झाल्याने त्यांचे रॅप प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाले तरी त्यातून उपजीविका करणे कठीण आहे. आजच्या तरुण पिढीसोबत संवाद साधण्यासाठी रॅप हा उचित प्रकार असल्याचे तो मानतो व त्यामुळे तो रॅप लिहू लागला व थेट संवाद साधल्याने अनेक दर्शक मिळू लागले. कधीकधी त्यांच्या व्हिडिओला दीड हजारापर्यंत दर्शक मिळत असतात.
हरीश कांबळे
ग्रामीण अवकाशात रॅप लिहिणारे जे अपवादात्मक रॅपर आहेत त्या पैकी हरीश कांबळे आहेत. त्यांचा जन्म व त्यांची शिक्षण संस्था सुद्धा गावातच आहे. त्यांचे आजोबा आंबेडकरी विचाराचे होते व ते भीमगीते लिहीत. त्यांची भीम व बुद्धगायन पार्टी चालवत. सिद्धार्थ गायन पार्टी ते रॅप हा त्यांचा अनोखा प्रवास आहे.
प्रामुख्याने कन्नडमध्ये लिहिणारे हरीश कांबळे हे पहिले रॅपर आहेत. बिदर या महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर ते राहतात. सबब मराठी व कन्नड या दोन्ही भाषेत त्यांचा संचार असल्याने दोन्ही भाषेत रॅप सादर करतात. जातीयतेच्या झळा त्यांनी लहानपणी अनुभवल्या आहेत. शिक्षण घेत असताना आलेले जातिभेदाचे दाहक अनुभव त्यांनाही सहन करावे लागले. आडनाव कांबळे असल्याने थेट भेदभाव होत असे. एकदा शाळेतील तोंडी परीक्षेत त्यांना नाव विचारण्यात आले तेव्हा त्यांचे कांबळे नाव ऐकून ‘तुम्हाला परीक्षेची काय गरज, कोटा आहे’ अशी अवहेलना करत शेवटी कमी मार्क्स दिले. या अनुभवाने अस्वस्थ झालेल्या हरीशने ‘जाती’ हा रॅप लिहिला (आंबेडकर प्रेरणेचा तो कन्नड भाषेतील पहिला रॅप होता). हा व्हिडिओ फेसबुकवर प्रक्षेपित केला त्याच दिवशी १८०० लोकांनी पाहिला होता. बालपणी ते गावच्या मंदिरात जात मात्र एकदा सवर्ण जातीच्या मुलाने त्यांची कॉलर पकडून मंदिर प्रवेशापासून रोखले. अशा दाहक अनुभूतीतून त्यांनी जातिभेदा विरुद्ध आपल्या रॅप मधून क्ष-किरण टाकले आहेत. त्यांचा ‘महाड क्रांती’ हा व्हिडिओ सुप्रसिद्ध आहे. (८०० लोकांनी शेअर केला तर तीन हजारांपेक्षा अधिक कॉमेंट्स मिळाल्या.) त्यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती उपलब्ध आहे, पण त्यांच्या विचारपद्धतीने वर्तमानातील अंतर्विरोध समजून लिहिणे महत्त्वाचे आहे.
(सदर लेख लिहिताना रॅपर्स सुमित सामोस, रेकोइल चाफे, अरिवू, विपिन तातड आणि हरीश कांबळे यांच्याशी थेट चर्चेमुळे मदत झाली. सृजना निरंजनी श्रीधरने काही रॅपर्सचे संपर्क दिल्याने प्रत्यक्षात चर्चा करणे सोपे झाले. सृजना सोबत रॅप / हिपहॉप संगीत चळवळींबाबतची चर्चा लेख लिहिण्यास उपयुक्त ठरली.)
डॉ. श्रीधर पवार हे लेखक, कवी व डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.