नाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम

डॉ. टी. आर. गोराणे - 9403551345

तंत्र- मंत्र, विधी, पूजा-पाठ करून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याच्या बहाण्याने, संशयित आरोपी श्री 1008 महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा आश्रम, इंदिरानगर, नाशिक) याने सातपूर (जि. नाशिक) येथील मिठाई दुकानदाराला तब्बल अकरा लाख रुपयांना गंडा घातला.

या पीडित व्यक्तीने पसार झालेल्या या भोंदूविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र पोलिसांनी केवळ फसवणुकीचे कलम लावून गुन्हा दाखल केला आणि पीडितांची बोळवण केली. वास्तविक, या भोंदू बुवाने दैवी तंत्र-मंत्र, पूजा, पाठ संबंधितांना करण्यास सांगून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याचे आमिष दाखवले होते. तसे त्यांनी पोलिसांना सांगितलेही होते; मात्र पोलिसांनी केवळ फसवणुकीचं कलम लावून गुन्हा दाखल केला.

ही बातमी ‘अंनिस’चे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना समजली. त्यांनी नाशिकमधील आपल्या इतर कार्यकर्त्यांना कळविली. त्याप्रमाणे डॉ. ठकसेन गोराणे, महेंद्र दातरंगे हे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. के. काळे यांची भेट घेऊन दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत माहिती करून घेतली. पूजापाठ करून सोने प्राप्ती करून देतो, असे तक्रारीत नमूद असतानाही जादूटोणाविरोधी कायदा कलम का लागू शकले नाही, अशी शंका त्यांनी पोलिसांकडे उपस्थित केली. मात्र याबाबत आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटावे असे सांगण्यात आले. मात्र त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात उपस्थित नव्हते, म्हणून परत फिरावे लागले. पुन्हा तीन तासांनी डॉ. गोराणे पोलीस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांनी पोलिसांना देण्यासाठी एक विनंती पत्र लिहून सोबत ठेवले होते. या पत्राचा आशय थोडक्यात असा होता…

या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्यातील योग्य त्या कलमांचा वापर करावा, पसार भोंदू बुवाचा तातडीने शोध घ्यावा आणि त्याचे इतरही काळे कारनामे उजेडात आणावेत, म्हणजे त्याने आणखी कुणा-कुणाला, कशा प्रकारे फसवले, हे स्पष्ट होईल. तसेच अशा प्रकारची फसवणूक होण्यापासून लोकांचेही प्रबोधन होईल. लोक सावध होतील; तसेच जादूटोणाविरोधी कायद्याची जरब निर्माण होईल. या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. के. काळे यांना हे पत्र देण्यात आले. त्यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा करून या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचे कोणकोणते कलम लावता येईल, असे ठरवतो.

मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी प्रकरणाचा पाठपुरावा चालूच ठेवला. दोन दिवसांनी या गुन्ह्यांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावले आहे, असे पोलिसांनी कळविले.

दरम्यानच्या काळात नाशिकमधील काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी नाशिकमधील ‘अंनिस’चे कार्यकर्तेकृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, प्रा. डॉ. सुरेश घोडेराव, समीर शिंदे यांच्यासह बडेबाबा आश्रमास भेट दिली. आश्रमातील चीजवस्तूंची पाहणी केली. भोंदू बुवाचे काही काळे कारनामे हाती लागतात का, यासाठी प्रयत्न केले, चौकशी केली; मात्र भोंदूबाबा पसार असल्याने त्याबाबत विशेष माहिती देण्यास कोणी पुढे आले नाही.

पसार झालेल्या या भोंदू बाबाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, त्याला तातडीने अटक करावी आणि त्याने आतापर्यंत कुणा-कुणाला, किती व कशा प्रकारे फसवले आहे, याबाबत माहिती मिळवून ती जाहीर करावी, यासाठी नाशिक ‘अंनिस’चे कार्यकर्तेसातपूर पोलीस ठाण्याच्या संपर्कात आहेत. भोंदू बाबाची अधिक माहिती घेण्यासाठी कार्यकर्तेइंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी भोंदूबाबा खूप लबाड असल्याचे सांगितले व पोलिसांनी चार वेळा वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक केली असल्याचे समजले. मात्र कायद्याचे योग्य कलम लागले गेले नसल्याने तो प्रत्येक वेळी सहिसलामत सुटला. यावेळी मात्र कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जादूटोणाविरोधी कायद्याची कलमं लागली गेली.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]