प्रभाकर नानावटी -
मागील शतकातील नवीन पिढीला आपल्या धर्मविचारांतील दोष ठळकपणे दिसू लागले. जातिभेदावर आधारलेली समाजरचना व काही जातींवर सतत होत असलेला अन्याय यांच्या जाणिवेमुळे ही पिढी अस्वस्थ होऊ लागली. स्त्रियांवर धर्माने टाकलेल्या जाचक बंधनांमुळे समस्त स्त्रीवर्गावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव होऊ लागल्याने सुशिक्षित चिडून उठले. धर्मातील विचित्र परंपरा आणि प्रचलित रुढींचा, चाली-रीतींचा पुनर्विचार करणे अगत्याचे ठरले.
त्यांच्यासमोर सामाजिक सुधारणांचा एक मोठा पट उघडलेला होता. जातीची बंधनं शिथिल करणे, स्त्रीवर्गावरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे, स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणे, बालविवाह, जरठ विवाह, केशवपन प्रथा मोडीत काढण्यासाठी स्त्रीवर्गाची मानसिकता बदलणे, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करण्याइतपत त्यांच्यात धैर्य गोळा करणे, प्रायश्चित्त, बहिष्कार अशा शिक्षांना न जुमानणे, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणे इत्यादी सुधारणांची सुरुवात याच काळात झाली. या सुधारणा एका रात्रीत झाल्या नाहीत, हेही तितकेच खरे.
“एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक बदल घडून आले. वसाहतवादाने या परिवर्तनाला चालना दिली. नवी उत्पादन पद्धत येथे सुरू झाली. वाफेवर व विजेवर चालणारी छोटी-मोठी यंत्रे, कापसाच्या गिरण्या, गाड्या, तारायंत्र यांच्या आगमनामुळे आपल्या समाजातील उच्चभ्रूंना आधुनिक विज्ञानाची ओळख झाली. रोगराई व साथी पश्चिमी औषधोपचार पद्धतीमुळे आटोक्यात आणता येतात, हे कळाले. निसर्गावर नियंत्रण मिळवून त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग करून घेता येतो, हे लक्षात आले. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हे बदल फारच झपाट्याने घडून आले. सैन्य, शस्त्रास्त्रे, शिस्तबद्ध प्रशासन, उंच इमारती, धरणे, रस्ते या गोष्टींमुळे माणूस काय करू शकतो, हे सुशिक्षितांना कळाले. आध्यात्मिक व धार्मिक ग्रंथांमधील ज्ञानापेक्षा निराळे ज्ञान व विज्ञान असू शकते आणि ते संपादन केले तर त्याचा व्यवहारात वापर करता येतो, हे येथील वरिष्ठ जातींच्या लक्षात आले. इंग्रजी शिक्षणाचा भर होता, समाजशास्त्र, इतिहास व साहित्यावर; त्यामुळे समाजात स्थित्यंतर कसे होते, त्याचे काय नियम असतात, याचे ज्ञान झाले. समाजातील अभिजन वर्गाने पुढाकार घेतला तर समाजपरिवर्तनास योग्य वळण देता येऊ शकते, यावर नव्या पिढीचा विश्वास बसला. तत्त्वज्ञान, युरोपचा इतिहास व राजकारणाच्या अभ्यासामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य यांसारखी नवी सामाजिक मूल्ये व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुशिक्षित वर्गास परिचय झाला. ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी केलेल्या टीकेमुळे हिंदू धर्मातील वाईट व अमानुष चाली-रीती व समजुती, यावर प्रकाश पडला. काही समाजघटकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून हिंदू धर्मास जबरदस्त धक्का दिल्यामुळे हिंदू धर्मास टिकून राहायचे असेल तर त्यात काही सुधारणा कराव्या लागतील, याची जाणीव उच्चवर्णीयांना झाली.”
– राजेंद्र व्होरा
महाराष्ट्रातील समाजसुधारणेत मराठी संतांचे योगदान मान्य करूनही गेल्या शंभर-दीडशे वर्षांत न्यायमूर्ती रानडे, आगरकर, महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून सुरुवात झालेल्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांचा आढावा घेतल्यास (हिंदू) धर्मचिकित्सा, स्त्रीशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, ऐहिकता इत्यादींवर भर देत सुधारणा केल्या गेल्या, हे प्रकर्षाने जाणवते. एकोणिसाव्या शतकातील सुधारणावाद्यांचे आपापसांतील मतभेद हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील सुधारणांना प्राधान्यक्रम मिळावा, याबद्दल होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आधी समाजसुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य, याबद्दल सुधारकांच्यात मतभेद होते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी समाजव्यवस्था चांगली नसल्यास स्वातंत्र्याचा योग्य प्रकारे उपभोग घेणे शक्य होणार नाही, असे मत मांडले जात होते. विवेक, बुद्धिनिष्ठता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत सुधारणा हवी, यावर त्या काळच्या सुधारणावाद्यांचा भर होता.
या समाजसुधारकांमध्ये सामान्यपणे मवाळ आणि जहाल असे दोन भाग करणे शक्य आहे. न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्यांना शांततापूर्ण तडजोड करत सुधारणा घडवून आणायच्या होत्या. भावनाप्रधानता हा समाजाचा गुणविशेष असल्यामुळे बुद्धीला, विवेकाला आणि विचारांना आव्हान देणे तितकेसे सोपे नसते. सामाजिक बदल हे संथगतीने होत असतात आणि त्या गतीलासुद्धा अडवणार्या महाभागांची संख्या कमी नसते, हे जाणून घेऊनच संथगतीने, समाजाच्या कलाकलाने जात सुधारणा करणे त्यांना अपेक्षित होते. रानडे, गोपाळकृष्ण गोखले या मवाळ सुधारकांच्या तुलनेत सुधारणा ताबडतोब व्हाव्यात, यावर भर देणारे आगरकर, जोतिबा फुले, रघुनाथ कर्वे यांना जहाल सुधारणावादी असे म्हणता येईल.
कुठल्याही प्रकारच्या सुधारणेला विरोध करणार्यांमध्ये परंपराकेंद्री जीवनपद्धतीला कवटाळून बसलेले सनातनी धार्मिक त्या काळीही मोठ्या प्रमाणात होते. कदाचित त्यांनाही काही रुढी-परंपरा जाचक वाटल्या असतीलही; मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना धार्मिक आधार हवा होता. सुधारणांना धार्मिक आधार सापडल्यास त्यांची ना नसे. अशा प्रकारच्या सुधारणा पद्धतीमध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचे नाव घेता येईल. त्यांच्या मते, सर्वसामान्यांशी सुधारणांबद्दल संवाद साधताना परंपरेच्या अखंडतेची जपणूक निकडीची ठरते. त्यामुळे सुधारणावाद्यांना धर्मशास्त्रांच्या सहाय्याने नवीन अर्थ शोधून जाचक रुढी-परंपरांना धर्माचा आधार नाही, असे सिद्ध करावे लागत होते.
त्याचप्रमाणे जातीसंस्थांची स्थापना करून आपापल्या जातीतील जाचक रुढींवर हल्ला करत सुधारणा करण्याकडे काही शिक्षितांचा कल होता. त्यामुळे त्या काळात जाती सुधारणा संस्था मोठ्या प्रमाणात उभारल्या. या जाती सुधारणा संस्थांमध्ये त्या- त्या जातीच्या काही रुढी-परंपरांची चिकित्साही झाली असेल. जातीच्या पुढार्यांची संमती मिळाल्यानंतर रुढीमध्ये काही प्रमाणात शिथिलताही आली असेल; मात्र नंतरच्या काळात या जातीसंस्था आपापल्या जातीची अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करू लागल्या व समाजसुधारणेच्या मूळ उद्देशापासून दूर जाऊ लागल्या.
माणसातील विवेकशीलता आणि सदसद्विवेकबुद्धी असलेल्या नवशिक्षित ‘बंडखोरा’ना आवाहन करत सामाजिक सुधारणा करण्याचे प्रयत्न काही सुधारक करत होते. गोपाळ गणेश आगरकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, लोकहितवादी, जोतिराव फुले इत्यादींना समानतेच्या पायावर उभ्या असलेल्या प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडवून समता व बुद्धिप्रामाण्यवाद यास अनुसरून समाजव्यवस्था हवी होती.
सामाजिक सुधारणांची आणखी एक पद्धत म्हणजे कायदे-नियम करण्याची; मात्र ही पद्धत धर्म व/वा जातीतील रुढी जपणार्या धुरिणांच्या वा शासन यंत्रणेच्या दबावामुळे राबवली जाते. जनसामान्यांच्या व्यापक कल्याणासाठी शासन यंत्रणेकडून अधिकार गाजवण्याच्या या प्रकारामुळे जनतेवर बंधनं घातल्यासारखी वाटत असतात. कायदे-नियमांच्या अंमलबजावणीत बलप्रयोगाला पर्याय नसतो. परकीय सत्ता असताना तर त्याचे स्वरूप फारच क्रूरपणाचे असते. त्यामुळे अशा प्रकारच्या पद्धतीतून समाजसुधारणा करण्याचे बहुतेक शिक्षितांनी त्या काळी टाळले असावे.
बुवाबाजी
बुवाबाजीला पोषक अशी धारणा समाजात त्या काळीसुद्धा दृढ होती. ती म्हणजे साक्षात्काराने मिळणार्या सत्याच्या प्राप्तीसाठी आध्यात्मिक पूर्वतयारी लागते; म्हणजेच नुसत्या व्यक्तिगत प्रयत्नांनी नव्हे, तर साक्षात्कारी पुरुषाच्या अनुग्रहाने अंतिम सत्य प्राप्त होते. अशा आग्रहासाठी गुरूंच्या पायाशी पूर्णपणे लीन झाले पाहिजे, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे. गुरू ज्या श्रद्धेची पारख करेल, त्या कसोटीला उतरले पाहिजे.
बुवाबाजीला आळा घालायचा असल्यास चमत्कार करणार्या लुच्च्या बुवांची भोंदूगिरी उघड करणे गरजेचे होते, असे समाजसुधारकांना वाटते. मुख्य म्हणजे बुवाबाजीस पोषक अशी आपली धार्मिक बैठक बदलल्याशिवाय बुवाबाजी कमी होणार नाही, याची कल्पना त्या काळच्या सुधारकांना होती. ‘आपले धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, कोणत्याही व्यक्तीमध्ये देवाचा अंश असत नाही, जगात चमत्कार घडू शकत नाहीत आणि कोणाच्याही आशीर्वादाने आयुष्य उजळून निघत नाही,’ हे सत्य लोकांसमोर मांडणारे सुधारकही त्या काळी होते. सुरतचे दुर्गाराम मंछीराम व मुंबईचे दादोबा पांडुरंग (तर्खडकर) यांनी पुढाकार घेऊन २२ जून १८४४ रोजी ‘मानवधर्म सभा’ ही संस्था स्थापन करून बुवाबाजीच्या विरोधात ते जनमत तयार करू लागले. या सभेच्या सदस्यांनी शास्त्री-पंडितांना उघडउघड आव्हान दिले. चमत्कार करणार्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यास सांगितले. जे यशस्वी ठरतील, त्यांना २७ रुपयांचे बक्षीसही घोषित केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजच्या ‘चमत्काराला आव्हान’ या घोषणेचा पाया त्या काळी घातलेला होता.
त्या काळचे एक समाजसुधारक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी, ‘बाबांची कर्मे मी पाहिली तर उच्चार करवत नाही. कोणी व्यभिचारी, कोणी चोर, कोणी लबाड. त्यांचे चित्त सर्वकाळ लोकांस लुटण्याकडे असते. ते साधू नव्हेत; ते भोंदू आहेत. स्नानसंध्याशील साधू असला, म्हणजे मग तो तर दगडाप्रमाणे समजावयाचा. त्याने हे जग नाशवंत आहे, असे ठरविलेले असते. या जगात आपला उपयोग होऊ नये, हा त्याचा धर्म असतो. साधू म्हणजे आळशी, निरुपयोगी, अज्ञानी पशूसारखे मूर्ख असतात. कोणी संध्याकाळपर्यंत जप करतात, कोणी महिन्यात पंधरा दिवस उपवास करतात. एक-दोन पुस्तके जन्मभर वाचत राहतात. गोणीभर दगड पुढे मांडून त्याची पूजा करण्यात अर्धा दिवस घालवतात. ‘अमुक एक बुवा थोर साधू आहेत,’ असे ते म्हणतात, तेव्हा आपण जर विचारले की, ‘ते काय करतात?’ तर आपल्याला सांगितले जाते की किती थोर! कोठे जावयाचे नाही, यावयाचे नाही; नेहमी तोंडाने जप चालू. दुपारपर्यंत स्नानसंध्या; मग भागवत इत्यादी. कोणाशी बोलत नाहीत. ठिकठिकाणी धुन्या लावून बाबा बसले आहेत. कपाळी शेंदराचे पट्टे लावून मांत्रिक लोक भोळ्या लोकांस आपल्या कपटजालात अडकवण्याची वाट पाहत आहेत. अवधूत, सिद्ध, योगी आपल्या तपस्येचे ‘देव्हारे’ माजवून अंगारा देण्याकरिता आपल्या मठात बसले आहेत. किमयागार, जादूगार, मूठ मारणारे यांच्या टोळ्या ठिकठिकाणी भेटतात. रोग दूर करणारे, पुत्रकामेच्छा तृप्त करणारे, साधू-संत आढळतात. गुरुपदेश करणारे, स्वर्गाचा मार्ग दाखवणारे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे रामदासी सापडतील,’ असा उल्लेख केला आहे.
वरील वर्णनावरून त्या काळी बुवाबाजी किती बोकाळली असेल, याची कल्पना येते. त्या काळातील लोकहितवादी, दादोबा पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले या सर्वांनीच धर्मसुधारणेचा आग्रह धरला. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धांचा विचार हिंदू धर्माच्या संदर्भात झाला. अंधविश्वास, वेडगळ समजुतींना धर्माचे अधिष्ठान असते, म्हणून अंधश्रद्धा घालवायच्या असतील तर प्रथम धर्मात सुधारणा घडवून आणावी लागेल, याची पूर्ण कल्पना त्यांना होती. अंधश्रद्धा अधांतरी टांगलेल्या नसतात. त्यांना धर्मग्रंथांचा, पुराणांचा किंवा धार्मिक कर्मकांडांचा पाया असतो. या पायाला आपण जोपर्यंत हात लावीत नाही, तोपर्यंत अंधश्रद्धा नाहीशा करणे कठीण असते.
तसेच जेव्हा चाली-रीती, रुढी, अंधविश्वास यावर हल्ला होतो, तेव्हा धर्मावर हल्ला करत आहे, असा त्यांचा अर्थ लावला जातो. सनातन्यांकडून सुधारकांवर ‘हिंदू धर्माचे विरोधक’ किंवा ‘नास्तिक’ असा शिक्का मारला जातो, जनसामान्यांच्या भावना दुखविणारे असा आरोप केला जातो. या कोंडीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग त्या काळच्या सुधारकांनी दाखवला – तो होता धर्मसुधारणा करण्याचा, मूर्तिपूजा, कर्मकांड यांना फाटा देऊन उच्च धर्माकडे वाटचाल करणारा.
धर्मचिकित्सा
श्रद्धाळू, भक्तिप्रवण सामाजिक मनासाठी ‘सर्वव्यापी परमेश्वर’ ही संकल्पना सर्व जगभर रुजलेली आहे. निसर्ग आणि मानव याबद्दलचा विचार करताना, मानवी बुद्धीला बरे-वाईट, नीती-अनीती याबद्दलच्या कल्पना ठरवताना काही मोजपट्ट्या तयार झाल्या. या मोजपट्ट्यांच्या आधारे स्वतःची जीवनविषयक आचारसंहिता ठरवली गेली. याच आचारसंहितेला पुढील काळात धर्माचे अधिष्ठान मिळाले. त्यातूनच धर्मग्रंथ तयार झाले व पिढ्यान्पिढ्या त्यांचे पालन करण्यात आले.
इतर धर्मांप्रमाणे हिंदू धर्माला एकच एक असा धर्मग्रंथ नाही. धर्माप्रमाणे आचरण करावे, अशी शिफारस आहे; मात्र बंधनं नाहीत. शिफारशीचे पालन केले नाही म्हणून शिक्षा नाही. सुरुवातीला ‘सहिष्णू’ म्हणत नावाजलेल्या या धर्माने नंतरच्या काळात जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था रुजवली. समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ असे घटक तयार झाले. काही समाजघटक इतर घटकांना कस्पटासमान लेखू लागले. रुढी-परंपरेच्या जंजाळामुळे या धर्माची स्वतंत्र विचार करण्याची कुवत हरवून बसली. आपले हितसंबंध जपण्यासाठी उच्चवर्णीय समाजाच्या मोठ्या घटकाला अंधारात ठेवून शोषण करू लागले. एकोणिसाव्या शतकात याचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हिंदू धर्मातील लवचिकता हळूहळू नाहीशी झाली व रुढी-परंपरा कट्टर कायद्याप्रमाणे बंधनकारक ठरू लागल्या.
परधर्मात सरकारी हस्तक्षेप होऊ नये, या धोरणामुळे कायदा करून धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा करण्यास फार विलंब लागला. सनातन्यांची हाकाटी एकूणच समाजसुधारणेला अडसर ठरली. याचा फायदा त्या काळच्या बुवा-महाराजांनी घेतला. गुजरातमधील एका पंथाचा धर्मगुरू यदुनाथ महाराज धर्माच्या नावाखाली समाजबांधवांचे अनन्वित छळ करत होता. हा छळ सहन न झाल्यामुळे एका बांधवाने न्यायालयात तक्रार केली. तक्रार करणार्याने व साक्षीदाराने महाराजांच्या ‘लीलां’चे केलेले वर्णन वाचून आज सुद्धा अंगावर शहारे येतील. यदुनाथ महाराजाच्या वकिलांनी मात्र, ‘न्यायव्यवस्थेला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही,’ असा वाद घातला. परंतु न्यायालयाने, ‘जी बाब नैतिकतेला धरून नाही, ती धर्मसंमत होऊ शकत नाही,’ हा निर्णय घेऊन खटला निकाली काढला. (महाराजा लायेबल केस)
याच काळात पाश्चात्य शिक्षण मिळू लागले, तरुण विचार करू लागले. समाजातील पारंपरिक धर्मरुढींच्या विरोधात आवाज उठवू लागले. नवसुशिक्षित हिंदू धर्मवचनांचा, परंपरांचा, रुढी, चाली-रीतींचा पुनर्विचार करू लागले, नीतिनियमांच्या कालबाह्यतेविषयी प्रश्न विचारू लागले. मात्र रुढीप्रिय असलेल्या समाजाला स्थितीपालटाची इच्छा नसते. त्यामुळे बदल करू पाहणार्यांकडे आकसाने पाहिले गेले, हिणवले गेले. साध्या-साध्या गोष्टींवरून त्यांचा पाणउतारा होऊ लागला. काय करावे, हे सांगण्यापेक्षा काय- काय करू नये, हे सांगण्यातच हिंदू धर्ममार्तंडांनी सारी शक्ती एकवटली आणि खर्ची घातली. ‘पसायदाना’सारख्या एकेकाळी मानवतावादी विचार असलेल्या या धर्मामध्ये त्याप्रमाणे आचरण करण्याची कुवत हरवून बसली. सामूहिक सामाजिक विचारांपेक्षा व्यक्तिगत पातळीवरील विचारांना प्राधान्य देण्यात धन्यता मानली. ऐहिकतेपेक्षा पारमार्थिक आचार-विचारांना अग्रक्रम देण्यात येऊ लागला. दैवी चमत्कार व अतींद्रिय शक्तीवर विश्वास ठेवू लागले. पूजा-अर्चा, होमहवन, नवस, पशुबळी इत्यादींचे स्तोम वाढले. मृत्यूनंतरच्या मोक्षाचा विचार अधिक केला गेला. त्यानुसार परंपरांची मांडणी करण्यात आली.
समाजसुधारणा की राजकीय स्वातंत्र्य, या वादावादीच्या संदर्भात न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले विधान लक्षात ठेवण्यासारखे आहे. ‘राजकीय विकास, समाजाची बंधनातून मुक्तता आणि सांस्कृतिक प्रबोधन या सार्यांचाच मार्ग धार्मिक सुधारणांमधूनच जात असतो. राजकीय हक्कांची पातळी खालच्या स्तरावर असेल तर समाजव्यवस्थासुद्धा त्याच पातळीवर असेल. राजकीय अधिकारांचा योग्य वापर करण्यासाठी समाजव्यवस्था बुद्धिनिष्ठ व न्याय्य हवी. समाजव्यवस्था सदोष असल्यास चांगली अर्थव्यवस्था लाभणार नाही. धार्मिक आदर्श निकृष्ट आणि खालच्या दर्जाचे असल्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी होणे शक्य होणार नाही. अशा प्रकारे परस्परावलंबन हा निसर्गनियम आहे, म्हणून सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी धार्मिक सुधारणांची कास धरणे अगत्याचे ठरते.’
अशा विचारांचा परिचय झालेल्या त्या काळच्या नवीन पिढीला आपल्या धर्मविचारातील दोष ठळकपणे दिसू लागले. जातिभेदावर आधारलेली समाजरचना व काही जातींवर सतत होत असलेला अन्याय यांच्या जाणिवेमुळे ही पिढी अस्वस्थ होऊ लागली. स्त्रियांवर धर्माने टाकलेल्या जाचक बंधनांमुळे समस्त स्त्रीवर्गावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव होऊ लागल्याने सुशिक्षित चिडून उठले. धर्मातील विचित्र परंपरा आणि प्रचलित रुढींचा, चाली-रीतींचा पुनर्विचार करणे अगत्याचे ठरले.
त्यांच्यासमोर सामाजिक सुधारणांचा एक मोठा पट उघडलेला होता. जातीची बंधनं शिथिल करणे, स्त्रीवर्गावरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे, स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणे, बालविवाह, जरठ विवाह, केशवपन प्रथा मोडीत काढण्यासाठी स्त्रीवर्गाची मानसिकता बदलणे, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करण्याइतपत त्यांच्यात धैर्य गोळा करणे, प्रायश्चित, बहिष्कार अशा शिक्षांना न जुमानणे, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणे इत्यादी सुधारणांची सुरुवात याच काळात झाली. या सुधारणा एका रात्रीत झाल्या नाहीत, हेही तितकेच खरे. विचारमंथन, प्रबोधन, कृती असा क्रमही त्यात नव्हता. काही वेळा तर पहिल्यांदा कृती झाली, नंतर विचार व त्यावरून वादविवाद झाले. अनेक वेळा चारचौघांपासून लपून-छपून कृती करण्यात आल्या. जातिभेदाला कंटाळून त्या काळी अनेकांनी धर्मांतरही केले. (व काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.) ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरासाठी पुढाकार घेत होते. या बदललेल्या धर्मातही सापत्न वागणूक मिळाल्यामुळे धड ना इकडे, धड ना तिकडे अशी अवस्था काहींनी ओढून घेतली.
बंगाल, महाराष्ट्रामधील हिंदूंनी धर्माच्या विरोधात उघडउघड बंड करून ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक समाज, परमहंस सभा यांसारख्या संस्था उभ्या केल्या. त्या काळचे दादोबा पांडुरंग तर्खडकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आदी समाजसुधारकांनी हिंदू धर्मातच राहून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या सुशिक्षितांना अभिप्रेत असलेल्या सुधारणांसाठी आर्य समाज, प्रार्थना समाज प्रयत्न करत होते. आर्य समाजातील प्रमुख आर्य धर्माला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे व पंचवीस कलमी – दहा कलमी विचारांना नको तेवढे महत्त्व देत असल्यामुळे महाराष्ट्रात या संस्थांचा फारसा प्रभाव पडला नाही. एकेश्वरावर भर देणारा प्रार्थना समाज उच्चभ्रूंची संस्था, असे वाटल्यामुळे त्याची पाळेमुळे देव-देवतांच्या पसार्यावर नितांत श्रद्धा असलेल्या जनसामान्यांत रुजली नाहीत. चांगला मानव घडविण्याचे मूलतत्त्व असलेली ‘थिऑसॉफी’ ही चळवळ सुशिक्षितांना काही काळ आकर्षित करू शकली. मात्र तिचे संस्थापक कर्नल ऑल्कॉट, मादाम ब्लाव्हट्स्की यांचा विक्षिप्तपणा व त्यातील गूढतेमुळे ही चळवळसुद्धा उच्चभ्रू मंडळींपलीकडे जाऊ शकली नाही. ‘प्लँचेट’सारखे प्रयोग करण्यातच यातील मंडळींचे धर्मविरोधी बंड होते. अशाप्रकारे एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मविषयक सुधारणावादी चळवळींना व्यवस्थित व भरपूर यश मिळाले नाही, हे मान्य करायला हवे. त्यामुळे खर्या अर्थाने हिंदू धर्मचिकित्सा झालीच नाही, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
स्त्रीशिक्षण, स्त्रीसुधारणा आणि स्त्रीमुक्ती
शिक्षणाचा अभाव हे सर्व दुःखांचे मूळ आहे, हे ध्यानी आलेल्या समाजात स्त्रिया आणि तथाकथित कनिष्ठ जातींना, शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अशिक्षितांवर वर्चस्व गाजवणे सहज शक्य होते, हा विचार त्या काळी मूळ धरू लागला. जोतिबा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’ने बहुजनांचे शिक्षण, स्त्रीशिक्षण यावर भर दिला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या स्त्रीमुक्ती चळवळीने सामंजस्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे स्त्रीसुधारणा फार झपाट्याने होत गेल्या, असे म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारकांनी हे वेळीच ओळखल्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही त्वरित मिळाला. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या मुली मिशनर्यांनी सुरू केलेल्या गर्ल्स स्कूलमध्ये शिकत होत्या. त्यांची मुलगी त्या काळी ‘सातासमुद्रापलिकडे’ गेली. गेल्या दोनशे वर्षांत महाराष्ट्रीयन स्त्री आणि समविचारी पुरुषांच्या सहकार्याने परंपरानिष्ठ पुरुषांच्या नाकावर टिच्चून तिने यश मिळवले.
पुरुषप्रधान समाजाकडून अवहेलना, अवमानही घडले. मुळात स्त्रियांबद्दलचा धर्मग्रंथातील मजकूरही तितकाच तिरस्करणीय होता. ‘स्त्रिया स्वभावतः व्यभिचारिणी व स्नेहशून्य असून त्यांचे चित्त चंचल असते.’ (दक्षस्मृती अध्याय ९) वा ‘स्त्रियांमध्ये (पुरुषांपेक्षा) आठपट अधिक कामवासना असते, उद्योग सहापट असतो, लाज चारपट असते व आहार दुप्पट असतो.’ (बृहत्पराशर संहिता अध्याय ५) आदी. अशा प्रकारची विधानं वाचून परंपरावादी पुरुष स्त्रियांची टिंगल-टवाळी करत होते. मात्र पाश्चात्य शिक्षणाचा लाभ उठविणार्या युवकांना अशा प्रकारची विधानं पटणे शक्य नव्हते. स्त्रीवर्गाच्या स्थितीत बदल होण्याची निकड त्यांना वाटू लागली.
शिक्षणासाठी शाळा उघडण्यात आल्या. मुंबई शहरात १८२४ मध्ये मुलींची शाळा उघडली. पुढील पाच वर्षांत आणखी नऊ शाळा उघडल्या. चारशे मुलींनी नावे नोंदविली. १८३१ मध्ये अहमदनगर येथे दोन शाळा सुरू केल्या. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रेव्ह. सोराबजी व त्यांच्या पत्नी फ्रान्सिना, माणिकजी खरसेटजी, मगनभाई करमचंद इत्यादींच्या पुढाकारामुळे पुणे, अहमदाबाद, मुंबई अशा शहरांत मुलींच्या शिक्षणाची सोय झाली. १८५४ मध्ये पश्चिम भारतात एक लाख मुलं तीन हजार शाळांतून शिकत होती. त्यात मुलींची संख्या फक्त साडेतीन हजार! त्यांच्यासाठी फक्त ६५ शाळा! या सर्व शाळा प्राथमिक शिक्षण देणार्या होत्या. त्या मुली फक्त जुजबी शिक्षण घेऊन घरी बसणार्या नव्हत्या. त्यांच्या पालकांनाही स्त्रीशिक्षणाचे महत्त्व पटू लागल्यानंतर आपल्या मुलींना घरीच शिक्षण देऊ लागले. काही जण इतरांच्या मदतीने त्यांना शिक्षित करू लागले. १८७५च्या मे महिन्यात बेळगावचे एक पोस्ट मास्तर एस. खरसेटजी यांनी १८५७ मध्ये स्थापन झालेल्या व मॅट्रिकची परीक्षा घेणार्या मुंबई विद्यापीठाला पत्र लिहून त्यांची मुलगी मॅट्रिक परीक्षेला बसू शकते का, अशी विचारणा केली. तोपर्यंत मुली मॅट्रिकच्या परीक्षेला बसू शकतात, याचा विचारही विद्यापीठाला शिवला नव्हता. सहा वर्षांनंतर या संबंधात कायदा पारित केला व मुलींना मॅट्रिक परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. या तरतुदीचा लाभ नंतरच्या अनेक मुलींनी घेतला. त्या मॅट्रिकपर्यंत न थांबता पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी मागू लागल्या. रेव्ह. सोराबजींची कन्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये १८८८ मध्ये शिकून तिने पदवी मिळवली. तीनशे विद्यार्थ्यांमध्ये ती एकमेव विद्यार्थिनी होती. पुरुष विद्यार्थ्यांकडून तिने किती टोमणे ऐकले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.
फुले दंपती, जगन्नाथ शंकरशेठ, सोराबजी दंपती इत्यादींच्या प्रयत्नांमुळे स्त्रीशिक्षणाला चालना मिळाली १८८८ मधील पहिली पदवीधारक महिला कार्नेलिया सोराबजी, सर्व विद्यार्थ्यांत प्रथम येणारी महिला मिस रूबेन, जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत पाठ्यवृत्ती मिळवणारी सीता आजगावकर (१९०५), सुलभा पणांदीकर (१९२१) आदी महिलांनी पुरुषांच्या शिक्षणाच्या मक्तेदारीला धक्के दिले. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी घेतलेले कष्ट सर्वश्रुत आहेत. कार्नेलिया तर ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवून कायद्याची परीक्षा पास झाली. तिला परीक्षेला बसण्यास परवानगी दिली. परंतु मुलांबरोबर वर्गात बसू दिले गेले नाही. खाजगीत अभ्यास करून ती परीक्षा उत्तीर्ण झाली. वकिलीचा व्यवसाय करण्यासाठीसुद्धा तिला झगडावे लागले.
धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नांमुळे महिलांसाठी वेगळे विद्यापीठ स्थापन झाले. १८९१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ९ टक्के होते. महिलांमध्ये ते अवघे अर्धा टक्के! १९५१ मध्ये अनुक्रमे ३६ व १३ टक्के झाले. फक्त मुलींसाठी व फक्त मुलांसाठी अशा शाळा त्या काळी कमी होत्या. त्यामुळे इतर शाळांमध्ये सहशिक्षणाची सोय असणे हा सुद्धा एका अर्थाने सुधारणांचा विषय होता. सहशिक्षणामुळेच आपली कर्तबगारी दाखवण्याची संधी स्त्रियांना मिळाली. शिक्षकी पेशा, वैद्यकीय व्यवसाय, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांतील पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली. या सर्व स्त्रिया स्वतःच्या कर्तबगारीतून मिळवत्या झाल्या, तरीसुद्धा अजूनही कित्येक कुटुंबांत मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था आहे. ‘काय करावयाचे मुलींनी इतके शिकून,’ हा प्रश्न अजूनही विचारला जातो. शिक्षणामुळे नवरे मिळवण्यात अडचणी येतात, असे गृहीतच धरले जाते. मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च न करणार्यांची संख्याही कमी नाही.
स्पृश्यास्पृश्यता आणि स्त्रियांची दुःस्थिती या बाबतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी स्त्रीशिक्षणाचा आग्रह, संमती वयाचा कायदा, विधवा विवाह-पुनर्विवाह यांना उत्तेजन, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह यात शिथिलता इत्यादी सुधारणा त्या काळी घडून आल्या. त्या फक्त उच्चवर्णीयांपुरत्याच सीमित होत्या का, हा प्रश्न आता विचारावासा वाटतो. महात्मा जोतिबा फुले, त्यांचा सत्यशोधक समाज आणि काही प्रमाणात त्यांच्या सहकार्यांनी व त्याचे विचार मानणार्या अनुयायांनी केलेले कार्य यांनी निद्रिस्त समाजाला पुढे नेण्यास हातभार लावला. समाजघटकांच्या बदललेल्या मानसिकतेत समाजाचे प्रबोधन उतरल्याशिवाय हे शक्य नसते. काळाच्या फार पुढे धावणार्या ‘सुधारक’कार आगरकर, संततिनियमनाचे आग्रह धरणारे र. धों. कर्वे यांच्या नशिबी त्या काळात अवहेलनाच आली. मुलींसाठी शाळा उघडणार्या सावित्रीबाई फुलेंना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
बाल-कन्या हत्या, स्त्रीशिक्षण बंदी, बालविवाह, विधवा विवाहास बंदी, बहुपत्नीत्वास मान्यता, जरठविवाहास संमती, विधवांचे विद्रुपीकरण अशा अन्यायकारक प्रथा त्या काळी सर्रास पाळल्या जात होत्या. स्त्रियांना नवरानिवडीचे स्वातंत्र्य नव्हते. मुलगी ‘ऋतुमती’ होण्याच्या अगोदर लग्न करून देणे अगत्याचे मानले होते. मुलीला शिकवायचे तर नाहीच; उलट घरकामात ती प्रवीण झाली की तिला ‘उजवून’ टाकण्याची घाई केली जात होती. १८७३ च्या ‘ज्ञानोदय’च्या एका अंकात असा उल्लेख आहे की, ‘त्या वर्षी तीन आठवड्यांत पुण्यात साडेसातशे विवाह झाले, त्यातील बहुतेक वधूंचे वय आठ वर्षांच्या आसपास होते.’ पुरुषांचे सरासरी वयोमान पाहता मुली पतिनिधनानंतर बरीच वर्षे जगत होत्या. त्यामुळे विधवांचे प्रमाण लक्षणीयरीत्या मोठे होते. लोकहितवादींनी पानसेे नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीच्या एकत्र कुटुंबातील विधवांची मोजदाद केल्यानंतर त्या घरात ५७ विधवा होत्या, हे आढळले.
पाश्चात्य विज्ञाननिष्ठ विचारांचे शिक्षण घेतलेल्यांना असल्या आचार-विचारांचे, रुढी-परंपरांचे पुनर्परीक्षण करावेसे वाटले, यात नवल काही नाही. १८३७ च्या ‘दर्पण’ या पत्रिकेत बालविधवांच्या दुराचाराची कारणमीमांसा करताना स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यांच्यावरील बंदी अनिष्ट व अयोग्य असल्याचे मत मांडले होते.
फार पूर्वीच्या काळी जयसिंग राजाने पुनर्विवाहाचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या आईनेच इतरांच्या सांगण्यावरून त्यात मोडता घातला. परशुराम पटवर्धन यांची कन्या अवघी चार वर्षांची असतानाच विधवा झाली. सर्व शास्त्री-पंडितांची संमती मिळवून तिच्या पुनर्विवाहाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या काळच्या राज्यकर्त्यांनी; एकाने केले म्हणजे सर्वच करतील, हे कारण पुढे करून विवाह होऊ दिला नाही. बालविवाहांना धर्मसंमती, कर्मठ रुढी-प्रथा आणि लढायांमुळे होणारा पुरुषांचा अकाली मृत्यू यामुळे समाजात विधवांची संख्या अधिक असावी.
विधवा विवाहास बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रिया नावडत्या पतीला विष घालून मारतील आणि आवडत्या पुरुषाबरोबर लग्न लावतील. खरेतर हा विचारच अनेक अपाय करणारा ठरेल, याची कल्पना त्या काळी आली नव्हती. या उपायांतून अनाचार वाढले, भ्रूणहत्या वाढल्या. यावर उपाय म्हणून समाजाने विधवांना अलंकारादी आभूषणांपासून वंचित ठेवले. त्यांना विद्रुप केले, व्रत-नवस, सोवळे-ओवळे, पूजा-पाठ यांच्यात अडकून ठेवले. हे अजब तर्कशास्त्र सुशिक्षितांना पटणारे नव्हते. त्यामुळे त्या काळी काही तुरळक विधवा विवाह झाले. मात्र १८७० मध्ये शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या याविषयीच्या वादविवादात ‘त्रैवर्णिका’त पुनर्विवाह निषिद्ध ठरविला गेला. सनातन्यांचा विधवा विवाहाला व स्त्रीशिक्षणाला असलेला हा विरोध अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होता.
कोणत्याही सामाजिक सुधारणा असामान्य धैर्य असल्याशिवाय होत नाहीत, हेही तितकेच खरे. एकोणिसाव्या शतकात दोन प्रसिद्ध झालेल्या घटनांतील विधवांची शोकांतिका झाली. पहिली घटना, मुंबई-पुण्यातील स्मॉल कॉज कोर्टाचे जज मोरोबा कान्होबा विजयकर (१८१३-१८७१) पुण्यातील ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळी’चे उपाध्यक्ष होते. मोरोबांची कन्या विधवा होती. तिलासुद्धा ते पुनर्विवाह करण्यासाठी राजी करू शकले नाहीत. मोरोबांच्या आईला असले ‘थेर’ पसंत नव्हते. पित्याचा अत्याग्रह, त्याला असलेला आजीचा तीव्र विरोध या पेचात सापडलेल्या त्या मुलीने विहिरीत उडी टाकून प्राण दिले. मोरोबांच्या पहिल्या पत्नीनेही आत्महत्या केली होती. कित्येक वर्षे विधुरावस्थेत काढल्यानंतर त्यांनी पुनर्विवाहासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. ५७ वर्षे वयाच्या या विधुरानी २१ वर्षांच्या एका विधवेशी लग्नही केले. मूठभर सुधारकांनी या जोडप्यांची प्रशंसा केली; मात्र आप्तेष्टांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. १८ फेब्रुवारी १८७१ रोजी पहाटे गळ्याशी गळा बांधलेल्या अवस्थेत या जोडप्याचा मृतदेह विहिरीत आढळला. पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी धजेना. कसेतरी करून ते निभावले. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आत्महत्या म्हणून निकाल दिला.
दुसर्या घटनेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह करण्यास ते राजी झाले, तेव्हा ते विधवा विवाह करतील, असे अनेक सुधारकांना वाटत होते. परंतु त्यांना आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाण्याचे धैर्य झाले नाही. परंपरेला मानणार्यांच्या इच्छेला मान देऊन स्वतःच ‘कर्तेसुधारक’ होण्याचा मान घालविला. इतिहास अजूनही त्यांना ‘बोलते सुधारक’ म्हणूनच ओळखतो. पितृप्रेमापोटी आपल्याविरुद्धची सारी टीका हयातभर त्यांनी सहन केली, तरीही सुधारकांना प्रोत्साहन देण्यात; प्रसंगी प्रत्यक्ष सहभागी होण्यात चुकारपणा त्यांनी केला नाही.
त्या काळी सर्व विधवांचे शोकांतच झाले, असेही नाही. यासाठी गुजराती असलेले शेठ माधवदास नावाच्या रेशमी कापडाच्या श्रीमंत व्यापार्याने केलेल्या विधवा विवाहाच्या प्रयत्नांकडे पाहता येईल. एकोणिसाव्या शतकात सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता स्वतःचा विधवा विवाह तर यशस्वी करून दाखविलाच; परंतु पन्नासहून अधिक विवाह घडवून सुद्धा आणले.
आगरकरांच्या ‘सुधारक’मध्ये (२८ जुलै १८८९) ‘त्यांचा जाहीर सत्कार करावा,’ अशा आशयाचे पत्र छापून आले होते. शेठ माधवदास यांच्या आधुनिक विचारांचे एक छोटेसे पुस्तक गुजरातीत व इंग्रजीत छापून आले होते. त्यात धनकुँवर नावाच्या विधवेच्या लग्नाची कथा लिहिलेली होती. अंगावर शहारे आणणार्या तत्कालीन प्रसंगाबद्दल वाचताना त्या काळातील समाजसुधारकांच्या धैर्याचे असामान्यत्व लक्षात येते. त्या लोकांनी किती खस्ता खाल्ल्या, किती अपमानास्पद वागणुकीचा सामना केला, याची आपण आज कल्पनासुद्दा करू शकत नाही. शेठ माधवदास यांच्या Story of Widow Marriage या पुस्तकाचे भाषांतर आगरकरांनी ‘एका विधवाविवाहाची गोष्ट’ असे ‘सुधारक’मध्ये प्रसिद्ध केले. मोरोबा कान्होबांच्या शोकांतिकेमुळे विधवा विवाहाच्या चळवळीला बसलेला फटका शेठ माधवदास यांच्या यशस्वी पुनर्विवाहामुळे काहीसा क्षीण झाला. चळवळीने जोर धरला. समाजमन विधवा विवाहासाठी तयार होत असल्याचे ते लक्षण होते.
सामाजिक सुधारणांमध्ये गुंतागुंत वाढत होती. सुशिक्षित कित्येक वेळा नाउमेदही होत होते. कायदे असूनसुद्धा नसल्यासारखे वाटत होते. त्या काळचा ‘दादाजी रखमाबाई वाद’ याची सुधारक व सनातन मानसिकतेतील वाद म्हणून इतिहासात नोंद झाली. त्याची हकिकतही मजेशीर आहे.
डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांनी १८७१ मध्ये पुनर्विवाह केला. प्रथम पत्नीपासून झालेल्या आपल्या मुलीचा विवाह त्यांनी दादाजी नावाच्या एका तरुणाशी लावून त्याला घरजावई केला. रखमाबाई शिकलेल्या होत्या. त्यांचे नवर्याशी अजिबात पटेना. ‘रखमाबाई आपली कायदेशीर पत्नी असल्याने तिने आपल्या स्वतंत्र बिर्हाडी यावे’, असा तगादा दादाजीने लावला. रखमाबाई तयार होईना. पत्नीचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी कोर्टात खटला भरला. ‘एखाद्या मुक्या प्राण्याप्रमाणे बायकोवर हक्क सांगणे हे रानटीपणाचे लक्षण आहे’, असा खालच्या कोर्टाने रखमाबाईच्या बाजूने निकाल दिला. दादाजीने अपील केल्यानंतर वरच्या कोर्टाने निकाल फिरवून हिंदू कायद्यानुसार स्त्रीवर पुरुषाचा हक्क आहे, असा निकाल देत रखमाबाईने महिनाभर नवर्याकडे जावे किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा, असा निकाल दिला. रखमाबाईने तुरुंगवास भोगणे पसंत करत आपला निर्धार कळवला. दादाजी-रखमाबाईच्या वादावर इंग्रजी, मराठी, गुजराती वृत्तपत्रांत उलटसुलट मते उमटत राहिली. रखमाबाईसाठी निधी गोळा करण्यात आला. तुरुंगवास पत्करण्याचा रखमाबाईचा निर्धार समजल्यानंतर हिंदू कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणार्या सनातन्यांनी एक पाऊल मागे घेऊन तडजोड केली. नवर्याला दोन हजार रुपये दिल्यास तो पत्नीपणाचा हक्क सोडण्यास तयार झाला. नंतर रखमाबाई इंग्लंडला जाऊन एम. डी. झाल्या. वैद्यकी पेशा करणार्या आद्य महिला डॉक्टर म्हणून नंतरचे आयुष्य त्यांनी काढले.
एक मात्र खरे की सामाजिक सुधारणेसाठी जे काही उपाय करायचे, ते सर्व हे सुधारक करत होते. प्रतिज्ञापत्रक काढणे, वाद-विवाद करणे, नियतकालिकांमधून स्वतःच्या नावानिशी व काही वेळा निनावी लेख लिहिणे इत्यादी गोष्टी सुरूच होत्या. १८९०च्या सुमारास सुधारकांनी एक पत्रक काढले. त्यावर गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, हरी नारायण आपटे, गोपाळराव जोशी, वामन शिवराम आपटे इत्यादींसह ४१ सह्या होत्या. पत्रिका अशी होती –
आम्ही खाली सही करणार अशी शपथ करतो की,
१. आम्ही आपल्या मुलींचा विवाह चौदा वर्षांचे आत करणार नाही.
२. त्याचप्रमाणे मुलाचे लग्न वीस वर्षांचे होईपर्यंत करणार नाही.
३. स्वतःचे पुन्हा लग्न करणे झाल्यास सोळा वर्षांच्या आतील मुलीशी करणार नाही.
४. मुलांचा हुंडा किंवा मुलीचे पैसे घेणार नाही.
५. दारू पिणार नाही.
६. तीस वर्षांच्या आतील आमच्या ताब्यातील नवीन विधवेचे वपन करू देणार नाही.
७. आमच्या प्राप्तीच्या निदान एक–वीसांश प्राप्ती आमच्याप्रमाणे शपथ घेणार्या मंडळींच्या सार्वजनिक कामाकडे देत जाऊ.
येणेप्रमाणे सत्यास स्मरून शपथ घेतली आहे. याप्रमाणे आमच्या हातून न घडल्यास मंडळीच्या नियमाप्रमाणे जो निर्णय
होईल, तो कबूल करून ते देतील ती शिक्षा भोगण्यास आम्ही कबूल आहोत.
तारीख ९ नोव्हेंबर १८९० (रविवार)
अशा प्रकारची पत्रकं त्या काळात नक्कीच निघत असतील व सह्याही होत असतील. मात्र पत्रकावर सही केलेल्या सर्वांनी आपले वर्तन त्याप्रमाणे ठेवलेले नसेल. कृती आणि उक्तीत फरक नक्कीच होत असावा.
स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न पुरुषांबरोबर स्त्रियांनीसुद्धा केले. शिक्षणाचा लाभ झालेल्या स्त्रिया अशा चळवळींमध्ये सहभाग घेऊ लागल्या. पुरुषवर्गही त्यांचे कौतुक करू लागला. १८९० मध्ये संमती वयाच्या विधेयकाचा मसुदा वादग्रस्त ठरला. त्या विधेयकाच्या बाजूने व विरोधात मोठ्या प्रमाणात सभा झाल्या. बारा वर्षांच्या आतील पत्नीशी पतीने समागम केल्यास त्याला काळ्या पाण्याची अथवा दहा वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेची त्यात तरतूद होती. (बिचार्या) पतींना अशी शिक्षा देणे म्हणजे वैधव्य प्राप्त करून घेणे, अशी अनेक स्त्रियांची समजूत झाली. पंडिता रमाबाई, कार्नेलिया, काशीबाई कानिटकर या महिला पुढाकार घेऊन सभा घेत होत्या. संमती वयाच्या विधेयकास पाठिंबा देण्याच्या निमित्ताने केलेल्या ठरावावर जमलेल्या स्त्रियांमध्ये काही जणी सह्या करत होत्या, तर काही ‘तिकडे विचारल्याशिवाय सही करणार नाही,’ असे म्हणत होत्या. सुधारणांना पाठिंबा दिला नाही, तरी ती झाल्यास लाभार्थी मात्र सारखेच असतात.
समाज घडविण्यात साहित्य व नाटक लिहिणार्या लेखकांनीसुद्धा वाटा उचलला होता. ह. ना. आपटे यांच्या कादंबर्या, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘शारदा’ (१८९९) सारख्या नाटकांनी समाज सुधारणेत भर घातली. याउलट सुधारकांची चेष्टा करणारी नाटके विनोदनिर्मिती करून लोकप्रिय ठरली. परिणामाच्या दृष्टीने ती सुमारच होती. कट्टर सुधारणावादी बाबा पदमनजी यांनी लिहिलेली ‘यमुना पर्यटन’ कादंबरी हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरुपण करणारी होती.
सुधारक होणे म्हणजे आम समाजाच्या रोषास कारणीभूत ठरणे, असाच त्या वेळी प्रकार होता. सामाजिक सुधारणांचे महत्त्व केवळ सुधारकांनाच होते, असे नसून बहुतांश सनातन्यांनाही होते. सुधारकांना अपेक्षित असलेली सुधारणांची गती मात्र सनातन्यांना मंजूर नव्हती. पुरोगामी सुधारकांना एका ‘रात्रीत’ बदल घडावा, अशी अपेक्षा होती. मात्र सनातन्यांना अशी क्रांती नकोशी होती. त्यांना ती हळूहळू व्हावीशी वाटत होती. मात्र पुरोगामी सामाजिक अन्याय तसेच सुरू ठेवण्याच्या विरोधात होते. त्यामुळे सुधारक व सनातन्यांमध्ये एक प्रकारे स्पर्धा होत राहिली.
शंभर वर्षांपूर्वी विवाहप्रसंगी मुलींचे वय काय असावे, यासाठी किती वादंग माजला होता, याची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. वधूचे किमान वय दहावरून बारा, बारावरून चौदा, चौदावरून सोळा व सोळावरून अठरा करण्यासाठी आपल्या समाजाने कित्येक वर्षे घेतली. दर वेळी कुठल्या तरी शास्त्रातील मुद्द्यांवर आधारित खुसपट काढून आकांडतांडव करण्यात आले. स्त्रीशिक्षणातून पुनर्विवाह, विधवा विवाह, संमती विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, घटस्फोटाचे स्वातंत्र्य आणि मुक्तजीवन संधी अशा पायर्या गाठत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने हा प्रवास झाला आहे. शास्त्रकारांनी स्त्रीला पुरुषवासना शमविणारी उपभोग्य वस्तू आणि म्हणून सर्व पापांचे मूळ मानले. त्यांनी तिला व्यभिचारी, स्वैराचारी, खोटारडी, मोहात पाडणारी असे म्हटले. त्यासाठी ‘मनुस्मृति’, ‘दक्षस्मृति’, ‘महाभारत’, ‘भागवतपुराण’, ‘ब्रृहत्पराशरसंहिता’ यांसारख्या जुन्या धर्मग्रंथांचा आधार घेतला. वैचारिक प्रबोधनाशिवाय सुधारणा टिकणार नाहीत, म्हणून १८८२ मध्ये पंडिता रमाबाईंनी ‘स्त्रीधर्म’ हे पुस्तक प्रकाशित केले. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहिले.
पूर्वीच्या काळी प्रत्येक जातीचे लोक आपापले रोटी-बेटी व्यवहार व धर्माचरण पाळत होते. मात्र समाजाची प्रगती होत गेल्यावर नोकरी करू लागले, वेगवेगळे व्यवसाय करू लागले, सार्वजनिक वाहनांचा वापर करू लागले. त्यामुळे आपापल्या जातीची बंधने पाळणे अवघड होऊ लागले. पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे नवे विचार शिकू लागले. शहरे वाढू लागली. नोकरीपेशाच्या निमित्ताने मुंबईसारख्या बहुजातीय, बहुधर्मीय शहरांत आपापल्या जातीची बंधनं पाळणे दुस्तर होऊ लागले. या सर्वांमुळे मागील शतकातील सुधारकांचे म्हणणे सर्वसामान्यांना पटू लागले. जातिभेद, धर्मभेद मानवनिर्मित आहेत, हे सुधारकांचे विधान पटू लागले. तरीसुद्धा सुरुवातीला धर्ममार्तंडांनी बहिष्कार, प्रायश्चित्त असे प्रकार वापरले. आंतरजातीय विवाहात आता नवलाई राहिली नाही. मात्र आंतरधर्मीय विवाहासंबंधी अजूनही कुचराई होत आहे. १९२७ मध्ये डॉ. भांडारकर यांची नात, मालिनी पणंदीकर यांनी गुलाब खान यांच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता म्हणे!
ज्या धर्मात रुढींचा पुनर्विचार होत नाही, समानतेच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांना छेद देणार्या रुढी त्याज्य ठरविल्या जात नाहीत, तो धर्म समाजातील काही घटकांवर अन्याय करतच असतो. मग त्याविरुद्ध बंड करून उठणे हे एकच शस्त्र अन्याय होणार्यांकडे राहते. दलितांच्या स्थितीत सुधारणा व्हावी तेवढी झाली नाही, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांसह हिंदू धर्म सोडावासा वाटला. डॉ. आंबेडकरांचे म्हणणे हिंदूंनी कधीच पुरेसे गंभीरपणे घेतले नाही. कित्येक समाजसुधारकांनी हिंदू धर्मातील स्त्रीवर्गाला, वंचित व दलित वर्गाला मिळणार्या कनिष्ठ स्थानांचा पुनर्विचार करून सुधारणावादी चळवळी केल्या. रुढीप्रिय समाजघटकाकडून या सार्यांचा जो मानसिक छळ झाला, तो या सार्यांनी सहनही केला. कारण हे बदल केल्याशिवाय तरणोपाय नाही, अशीच या सार्यांची धारणा होती. या सुधारणापर्वात सुधारकांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत बदलांचा आग्रह धरला, म्हणूनच आजचा समाज त्याची फळं चाखत आहे. अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. तो एका रात्रीत कापता येणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सुधारणांची बीजे एकोणिसाव्या शतकात पेरली गेली, याचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन
सामाजिक प्रगती करावयाची असेल, तर धार्मिक बाबतीत सुधारणा करण्यावाचून गत्यंतर नाही, हे उमगलेल्या नवशिक्षितांना, स्त्रियांना; तसेच ब्राह्मणेतरांना शिक्षण मिळावयाचे असेल तर समाजातील कर्मठपणा गेला पाहिजे, हे उमगले होते. कर्मकांडांची पकड ढिली झाली पाहिजे, हेही पटले असावे. आपल्या समाजाला विज्ञानाधिष्ठित पाश्चात्य समाजरचनेची ओळख होणे अगत्याचे आहे, हे समजल्याने या दृष्टीने ते प्रयत्न करू लागले. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला तर कर्मकांडांचे महत्त्व आपोआपच कमी होईल, हेही त्यांना पटले असावे. निदान नवशिक्षितांमध्ये तरी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारी जीवनशैली रुजावी, यासाठी प्रयत्न करणारे काही युवक एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आढळतात.
त्या काळी हळूहळू विज्ञानप्रसार होत गेला, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यात हयगय झाली. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार म्हणजे प्रत्येक विधान, प्रत्येक रुढी-परंपरा शास्त्रीय कसोटीवर तपासून घेऊन मगच त्यांचा स्वीकार करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनशैलीवर प्रभाव टाकतो. कारण त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची एक वेगळीच दृष्टी मिळते, जी न्याय-अन्यायाच्या तर्कनिष्ठ कसोट्या पुरवते. गेल्या दीडशे वर्षांत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार्यांची संख्या वाढलेली असली, तरी तो समाजाचा स्थायीभाव झाला नाही. प्रबोधनाचा हा आविष्कार वास्तवात उतरला नाही. शिक्षणप्रसार वाढत गेला तरी वैज्ञानिक दृष्टिकोन पचवता आला नाही.
मृत्यूनंतरच्या सुखासाठी भौतिक सुखापासून वंचित राहण्याची मानसिकता समाजात कित्येक पिढ्या होती. त्यामुळे पाश्चात्य नवविचारांतील ऐहिकतेची ओळख झाली, तरी तसे वर्तन करणे अनेकांना जमले नाही. एक मात्र खरे की, विज्ञानाची ओळख झाल्यानंतर दैवी प्रकोपामुळे महापूर, दुष्काळ इत्यादी होत नाहीत, हे लक्षात येऊ लागले. नवशिक्षितांच्या तोंडी अध्यात्मविद्या आणि धर्म कारणमीमांसेऐवजी ‘सृष्टीज्ञान’, ‘प्रयोगशाळा’, ‘नैसर्गिक आपत्ती’ असले शब्दप्रयोग येऊ लागले. न्याय-वेदांताच्या चर्चेऐवजी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल इत्यादी विषयांतील निसर्गनियमांची ओळख करून घेण्यात, त्याविषयी चर्चा करण्यात गोडी वाटू लागली. आपले पारंपरिक ज्ञान व हे नवे विज्ञान यांची तुलना होऊन व्यवहारोपयोगी ज्ञानात आपण मागासलेले आहोत, याची कल्पना येऊ लागली. आपल्या समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे आणि ही माहिती कळल्यास विज्ञानाचे युग आपल्याकडेही अवतरू शकेल, असा विश्वास वाटू लागला.
शिक्षणप्रसारासाठी शिक्षण संस्थांची वाढ होऊ लागली. याच काळात विज्ञानप्रसाराचीही चळवळ मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी सुरू झाली. शिक्षण संस्थांबरोबरच इंजिनिअर्स इन्स्टिट्यूशन (१८२३), बॉम्बे मेडिकल स्कूल (१८२६). ग्रँट मेडिकल कॉलेज (१८४५), ससून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट (१८४७), स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी (१८४८), ज्ञानप्रसारक सभा (१८४९), बुद्धिवर्धक हिंदू सभा (१८५१), बॉम्बे ब्रँच ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी (१८३१), बॉम्बे जिऑग्राफिकल सोसायटी (१८३४), बॉम्बे मेडिकल अँड सोशल सोसायटी (१८३५), बॉम्बे अॅग्री-हॉर्टिकल्चर सोसायटी (१८४०) … अशा कित्येक संस्था-संघटना सुरू झाल्या. निसर्ग निरीक्षण आणि अभ्यास यातून विज्ञानाचे दर्शन होऊ लागले. निसर्गनियमांचे ज्ञान करून घेणे आणि निसर्गनियमानुसार चालणार्या जगात वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या समजुतींना परमेश्वरी इच्छा, प्रसाद वा प्रकोप न मानता त्यामागील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे, एवढाच वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवू पाहणार्यांचा मर्यादित उद्देश होता. वेधशाळा स्थापन करून एकेका प्रदेशात निसर्ग विविध ऋतूत कसा नेमाने वागतो, हे जाणणे, भविष्यात तो कसा वागू शकेल, याचे अंदाज बांधणे, तापमान, पर्जन्यमान, वादळे, समुद्राकाठी असल्यास भरती-ओहोटीची वेळ इत्यादींची नोंद ठेवणे हा त्या काळी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग होता. त्या काळी मुंबई, अलिबाग, पुणे येथील वेधशाळांमध्ये फारशी उपकरणे नसताना वर्षानुवर्षे नोंदी ठेवल्या गेल्या. (मुंबईतील पर्जन्यवृष्टीचा अंदाज बांधता येत नसल्यामुळे लहरी निसर्ग कसा वागू शकतो, याचा फायदा जुगार खेळणारे ‘बरसात का सट्टा’वर पैसे लावत होते.) निसर्गविषयक, हवामानविषयक, पशु-पक्षीविषयक नाना प्रकारच्या नोंदी ठेवणे हा विज्ञानप्रेमींचा छंद होता. त्यातूनच समविचारी तरुणांची मंडळं (क्लब्स) स्थापन झाली. यातून एक पैसाही मिळत नाही, हे माहीत असूनसुद्धा तो गोळा करणार्यांबद्दलचा आदरभाव अधिकच वाढतो, याचा अभिमान वाटू लागला.
मुंबई हे १८७० पर्यंत प्रगतीचे केंद्र बनले होते. येथील संस्थांमध्ये शोधनिबंध वाचले जात. अशाच एका शोधनिबंधाचा विषय होता, Diet of the Natives…. प्रत्येकाच्या आहार सवयीमागे काही निश्चित सूत्रे आहेत. परंतु सर्व शिक्षित शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षण करतीलच, याची खात्री नसते. त्या शोधनिबंधात मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये एकही शाकाहारी ब्राह्मण नव्हता, असे नमूद केले होते. कारण प्रेत शिवणे, प्रेत फाडणे वगैरे शस्त्रक्रियेची कामे या सोवळ्या-ओवळ्यांना निषिद्ध होत्या. इंग्रजी शिकलेले शाकाहारी ब्राह्मण पहिल्या टर्ममध्येच पळून जात होते. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या सात-आठ वर्षांत डिग्री घेणार्यांत एकही शाकाहारी नव्हता. आहार-आचारातील वैचित्र्यांमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला किती परिश्रम पडले असतील, हे दाखवण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे.
इतर कोणीतरी मुद्दाम उल्लेख केल्याशिवाय आपल्याला जडलेल्या कित्येक अनिष्ट सवयी आपल्या लक्षात येत नाहीत. समाजात रुजलेल्या अनिष्ट प्रवृत्तीची प्रथा आणि परंपरा यांच्या दबावाखाली कित्येकदा समाजातील अनिष्ट बाबी आपल्या ध्यानातसुद्धा येत नाहीत. परदेशातील अभ्यासकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीतील चांगल्या गोष्टींबद्दल गौरवोद्गार काढत असतानाच अर्वाचीन समाजातील गुण-दोषांकडे बोट दाखवत होते. जरी त्यात त्यांचे हितसंबंध गुंतले असले, तरी वास्तव नाकारता येत नव्हते. ब्रिटिशांच्या मनात कोणतेही व कितीही मतलबी हेतू असले, तरी इंग्रजी शिक्षणाचा आपल्याला नक्कीच फायदा झाला, हे मान्य करावे लागेल. त्यातूनच विज्ञानप्रसार होत राहिला. वैज्ञानिक दृष्टिकोन बाणवणारे हळूहळू वाढूही लागले. त्यामुळे हा दृष्टिकोन लाभलेल्यांनी अंधश्रद्धा आणि जुने अपसमज त्याज्य मानावयास सुरुवात केली. नरबळी देण्याचा प्रकार संपुष्टात आला, सतीची चाल कायद्याने बंद केली. या कृत्यामागील अमानुषता पटल्यामुळेच समाज त्यापासून परावृत्त झाला. परंतु इतर उपद्रवी/ अनुपद्रवी अंधश्रद्धांपासून सामान्य समाजाला परावृत्त कसे करायचे, हा खरा प्रश्न होता.
लोकभ्रमाचे स्वरूप घेऊन अस्तित्वात असलेल्या अंधश्रद्धा हळूहळू नाहीशा होत आहेत, हेही तितकेच खरे. शहरीकरणामुळेसुद्धा अनेक अंधश्रद्धा गळून पडल्या, हेही मान्य करावे लागेल. भारद्वाज नावाचा तपकिरी रंगाच्या पंखांचा पक्षी परीक्षेच्या आधी दिसला की ते शुभसूचक मानले जाई. चिंचेच्या वा पिंपळाच्या झाडाखालून जाताना जांभई देण्यासाठी तोंड उघडू नये, हा असाच एक आदेश होता. कारण तोंड उघडले तर या वृक्षांवर टपून बसलेला ‘मुंजा’ तोंडावाटे शरीरात शिरू शकतो. या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या. कारण हे पशू, पक्षी, झाडेच शहरवासीयांना दिसेनाशी झाली.
शुभाशुभ कल्पना आणि शकुन-अपशकुन यांच्याबद्दलच्या कल्पना यांची वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेल्या समाजात रेलचेल असते. ‘एखादी घटना एखाद्याच्या बाबतीत जशी घडली, त्याच परिस्थितीत दुसरा एखादा सापडल्यास ती घटना अगदी जशीच्या तशी घडण्याची अपेक्षा करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.’ या कसोटीवर अनेक लोकभ्रम, समज-समजुती उतरल्या नाहीत, तर त्या त्याज्य मानण्याचे धारिष्ट्य वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीकडे असते.
कसोटीवर न उतरलेल्या म्हणूनच जनमानसातून पळून गेलेल्या कितीतरी लोकभ्रमांची यादी करता येईल, ‘तीन तिघाडे, काम बिघाडे’ अशी एक म्हण प्रचलित होती. एकदा कोठेतरी तीनजण गेले तेव्हा काम फत्ते झाले नसेलही; पण ‘काकतालीय न्याया’च्या या एका उदाहरणावरून नियम थोडाच सिद्ध होणार? तरीही तिघेजण निघाले तर त्यापैकी एखादा आपल्या खिशात छोटासा दगड ठेवून चारजण मोहिमेला निघाल्याचे मानसिक समाधान मिळवत असे. यशापयशाची खात्री जितकी कमी, तितकी शकुनशरणता अधिक, असा पूर्वीचा जमाना होता, घरात आरसा फुटणे, निरांजन विझणे (ही प्रतिमा मराठी/हिंदी चित्रपटांतसुद्धा अनेकदा दाखविली गेली आहे.) हे अशुभसूचक. शकुनापशकुनाचा परमावधी म्हणजे उजवा वा डावा डोळा लवणे. या कल्पना समाजात कशा रुजत गेल्या हे कळावयास मार्ग नाही; पण त्यांचे स्मरण होताच आपल्याला आता हसूच येईल. – तुळईखाली झोपू नये (विकार होतो)
– पानातील खीर खाल्लीच पाहिजे (अन्यथा मातृवियोग)
– नोट वा नाणे बेचकीत धरू नये (द्रव्यनाश होतो)
– केरसुणी म्हणजे लक्ष्मी; तिला पाय लावू नये (धननाश होतो)
– कारल्याच्या मांडवाखालून जाऊ नये (संततीला ते अशुभ !)
– धनत्रयोदशीला धने विकू नयेत (दारिद्य्र येते)
– तिन्हीसांजेला केर काढू नये (लक्ष्मी कोपते)
– डाव्या हाताने जेवू नये (मृत्युयोग!)
– घराबाहेर जाताना ‘जातो’ म्हणू नये
(काम होत नाही, ‘येतो’ म्हणावे!)
– शनिवारी हजामत करू नये
– बुधवारी प्रयाण करू नये
– घराच्या उंबर्यावर शिंकू नये
– विहीर, घराचा दरवाजा अमुक दिशेलाच हवे
अशा किती म्हणून अपसमजुती सांगता येतील? प्रत्येक वयस्कर व्यक्ती या यादीत भर घालू शकेल. आजच्या पिढीला यापैकी एखादी तरी माहीत असण्याची शक्यता आहे का? आगरकरांच्या बुद्धिप्रामाण्याचे निकष सर्वांना आचरता येतील, असे नाही; पण विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणारे समज यांना अंधश्रद्धाच मानले पाहिजे.
एकोणिसाव्या शतकात समाजात पुष्कळ अंधश्रद्धा होत्या. काही सामान्य अंधश्रद्धा याप्रमाणे होत्या:
– ग्रहणकाळात अन्न शिजवायचे नाही आणि खायचे नाही.
– ऋतुमती असताना स्त्रियांनी कशाला शिवायचे नाही.
– फलज्योतिष.
– देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राण्याचा बळी देणे.
– नवरात्रात अष्टमीला अंगात येणे.
– पंचपक्वान्नाचे बोडण करून ते गायीस खाऊ घालणे.
– दृष्ट लागणे, नजर लागणे/दृष्ट काढणे.
– शितळादेवीच्या प्रकोपाने देवीचा (small pox) रोग होणे.
– गळ्यात किंवा हातात गंडे बांधून स्वतःचे संरक्षण करणे…
या आणि अशा स्वरुपाच्या अंधश्रद्धांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते की, या अंधश्रद्धा चालू ठेवून काही व्यक्तींचा फायदा होत असतो. याशिवाय हे लक्षात येते की, काही अंधश्रद्धा कालाबरोबर नाहीशा होतात आणि (वास्तुशास्त्र, आध्यात्मिक बुवाबाजी, छद्मविज्ञान इत्यादीसारख्या) काही नवीन जन्माला येतात.
पाश्चात्य विचारांची ओळख होऊन विज्ञाननिष्ठेचे रोपटे लावले गेले व विज्ञानप्रसारामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणार्यांच्या संख्येत वाढ झाली; मात्र ते पुरेसे नाहीत, हेही तितकेच खरे.
एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणांचा आढावा घेत असताना बहुतेक सुधारणा मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या ठिकाणीच व उच्च वर्णीयांतच झाल्यात की काय, असा प्रश्न विचारावासा वाटतो. शहरातील या सुधारणा ग्रामीण महाराष्ट्रात झिरपण्यात विलंब लागला, हेही तितकेच खरे. (आदिवासी पाड्यात तर या सुधारणांचा मागमूसही नसेल.) ग्रामीण भागात व बहुजन समाजात या सुधारणा रुजविण्यासाठी नंतरच्या काळात अनेकांनी प्रयत्न केले व स्वातंत्र्योत्तर काळात या सुधारणा वेगाने वाढू लागल्या.
समाजसुधारणा करण्याच्या संदर्भात थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी जे मार्ग सुचवले आहेत, ते उपयुक्त वाटतात. आगरकर म्हणतात – “अविचारी व अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिता त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडीगोडी लावून, सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती. खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे.” त्या काळाची ही गरज ओळखून समाजसुधारकांनी प्रयत्न केले म्हणून आज आपण त्याची फळे चाखत आहोत.
शतकानुशतकाच्या समजुती अज्ञानामुळे अधिकच दृढ होतात. वरचेवर त्या अधिक घट्ट बनण्यासारखे आयुष्यात अपयशाचे प्रसंग येतात. हे वास्तव लक्षात घेऊनच समाजसुधारणांचे कार्य होऊ शकेल, याची कल्पना त्या काळच्या सुधारकांना होती व आजसुद्धा त्याची गरज आहे, असे म्हणण्यास वाव आहे.
लेखक संपर्क:९५०३३ ३४८९५
संदर्भ:
१) कालमीमांसा – अरुण टिकेकर
२) समाज सुधारक आणि अंधश्रद्धा – संपादक स. मा. गर्गे
३) अंधश्रद्धा : एक विवेकनिष्ठ विवेचन – यज्ञेश्वर निगळे
४) समाज, विज्ञान आणि संस्कृती- स. मा. गर्गे