फारुक गवंडी -

‘बायकांत पुरुष लांबोडा’ हे आहे पुस्तकाचे नाव. आहे की नाही अफलातून? त्याच्या लेखकाचे नाव आहे, डॉ. शंतनू अभ्यंकर. हा आणखीच भन्नाट माणूस. विश्वकर्मा पब्लिकेशनने ऑक्टोबर २०२२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. शंतनू अभ्यंकर हे स्त्री रोग तज्ज्ञ असून, ते ललित लेखक, मार्मिक विज्ञान लेखक, रसाळ भाषांतरकार, खुसखुशीत ब्लॉगर, अभ्यासू वक्ता म्हणून ख्यातनाम आहेत. यापूर्वी त्यांची ‘पाळी मिळी गुपचिळी’, ‘आरोग्यवती भव-स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध’, ‘देवाघरची फुले’, ‘फादर टेरेसा’, ‘मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे’, ‘संभोग का सुखाचा’, ‘जादुई वास्तव’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञान सोप्या, रंजक, खुसखुशीत आणि लोकभाषेत पोहोचवण्याची त्यांची खासियत आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि प्रख्यात अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाबद्दल म्हटले आहे. “जसं संगीत श्रवणीय असतं, नाटक प्रेक्षणीय असतं, तसं डॉ. शंतनूंचं हे पुस्तक वाचनीय आहे.” खरंतर डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या सगळ्याच पुस्तकांना, लेखांना आगाशे सरांचे हे वाक्य तंतोतंत लागू होते.
पुस्तकाचे तीन भाग केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण, कोविड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञान विचार. यातील शीर्षके तर भन्नाट. लेखक लोकभाषेचा उपयोग विज्ञान विशेषतः शरीर विज्ञान समजून सांगणेसाठी करतात. उदा. आणि ग्रंथोपजीवी, बायकांत पुरुष लांबोडा, माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके, गोळीबिळी; औषधबिवषध, जमात जी. पी. ची, भाषा डॉक्टरांची, मन कामरंगी रंगले, हम साथ साथ है, आंबा पिकतो, रस गळतो, दुःख पाहता जवापाडे, सुख पर्वता एवढे. इत्यादी. रूढ अर्थाने हे लेखकाचे चरित्र नाही. पण हे चरित्र कम आधुनिक वैद्यकीय विज्ञान आहे. मनोगतातच डॉ. अभ्यंकर म्हणतात. आरोग्य ही जितकी वैयक्तिक बाब आहे, तितकीच ती सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुद्धा आहे. आरोग्य हीच संपत्ती हे जितकं खरं, तितकंच संपत्ती (सुबत्ता) हेच आरोग्य, हेही खरं. हे लक्षात घेऊनच यातील लिखाण उतरले आहे. यात आरोग्याचे हे ताणेबाणे उलगडून दाखवले आहेत.
लेखकाने होमिओपॅथी कॉलेजला डॉक्टर होण्यासाठी १९८० साली अॅडमिशन घेतले होते. पण ती एक अपरिहार्यता होती. याबाबत लेखक म्हणतात, या कॉलेजातले सगळेच एमबीबीएसच्या आळंदीला निघालेले होते आणि पोहोचले होते होमिओपॅथीच्या आळंदीला. त्यामुळे संधी हुकल्याची एक विषण्ण भावना सार्वजनिक मन व्यापून होती. काटेकोर विज्ञानवादी तयार झालेले लेखकाचे मन विज्ञान विसंगत वातावरणाशी विसंवादी सूर छेडू लागले आणि यातून सुरू झाला संघर्ष. तुकोबांच्या शब्दात “रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग, अंतर आणि बाह्यमना…” एका बाजूला काटेकोर शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची सवय. घरातील बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार. वाचलेलं आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान आणि दुसर्या बाजूला होमिओपॅथी अभ्यासक्रमातील विज्ञानाच्या नावावरील प्रचंड अतार्किक गोष्टी. शिक्षकांना प्रश्न विचारत, आधुनिक वैद्यक ज्ञानाशी ताडून बघण्यात पाच वर्षेहोमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेली. दुसरा पर्यायच नव्हता. या सगळ्या अभ्यासातून, चिंतनातून लेखकाने होमिओपॅथीबद्दल साधारण तीन निष्कर्ष काढले. एक होमिओपॅथी हे भ्रामक विज्ञान आहे. दोन होमिओपॅथी ही पॅथी फक्त अवैज्ञानिक नाही तर ती विज्ञानविरोधी आहे. तीन होमिओपॅथीचा जनक हानीमान यांचे व्यक्तिस्तोम माजवून त्यांचे दैवतीकरण करणारे आहे आणि व्यक्तिस्तोम आणि दैवतीकरण हे विज्ञान असू शकत नाही.
होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आणखी सखोल वैज्ञानिक ज्ञान घेण्याच्या लालसेने लेखकाने ICR या होमिओपॅथीच्या संशोधन संस्थेकडे परीक्षा दिली. पण तिथे अपयश आले. त्याचे कारण फक्त १०% प्रश्न होमिओपॅथीचे होते. मग B.Sc., M.Sc. करायचा निर्णय लेखकाने घेतला. मध्ये वेळ असल्याने लेखक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या शिबिरास उपस्थित राहिले. यात त्यांचे मन शांत झाले. परत येताना वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यांचे पूर्ण विचार बदलले. ती बातमी होती, सुप्रीम कोर्टाच्या एमबीबीएसच्या प्रवेशाबाबतच्या एका निवाड्याची. यापुढे देशभरातून पंधरा टक्के जागा या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेतून भरण्यात याव्यात असा आदेश कोर्टाने दिला होता. संपूर्ण पराभवाचे उट्टे काढण्याची हीच संधी समजून परीक्षा देण्याचा धाडसी निर्णय लेखकाने घेतला. बारावीनंतर पाच वर्षे होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असताना पुन्हा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षा देणे आणि यात यशस्वी झाल्यास पुन्हा नऊ वर्षे पाठीमागून नव्याने देणे हा फक्त धाडसी निर्णय नव्हता, तर नवे आधुनिक वैद्यकीय ज्ञानाची मिळवण्याची प्रचंड आस ही त्या पाठीमागील प्रेरणा होती. स्पर्धा परीक्षा देत असताना गंडे-दोरे, मंत्र-तंत्र, अंगारे धुपारे, पूजाअर्चा यांच्या वाटेस कधीही न जाता प्रचंड चिकाटी, प्रामाणिकपणा, विचाराशी बांधिलकी आणि श्रम या जोरावर लेखक यात यशस्वी झाले. बसून बसून चक्क पार्श्वभागावर फोड येणे आणि दोन भरभक्कम खुर्च्या मोडणे. लेखकाची अभ्यासाची ही रीत तर कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रचंड प्रेरणा देणारी आहे. पुढे पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन,हॉस्टेलमध्ये राहण्याचे दिवस हे हॉस्टेलमध्ये राहणार्या किंवा राहिलेल्या प्रत्येकाला त्यांच्या भूतकाळाची खुमासदार आठवण करून देणारे प्रकरण आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी ‘अंनिस’च्या वार्षिक २००८ च्या वार्तापत्रामध्ये आणि ‘अनुभव’च्या एप्रिल २००९ च्या अंकात ‘होमिओपॅथी ते अॅलोपॅथी’ नावाने वरील सर्व प्रवास मांडून होमिओपॅथीबाबत आपली भूमिका वैज्ञानिक तथ्यावर आधारित मांडली आणि हा वाद महाराष्ट्रात प्रचंड गाजला. होमिओपॅथी डॉक्टर बरोबरच काही सामाजिक क्षेत्रातील जवळपास २१ मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या. काही समर्थनार्थ होत्या, तर बर्याच विरोधात होत्या. या सर्वांची उत्तरे लेखकाने एकत्रितपणे दिली. उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि त्याला लेखकाकडून देण्यात आलेली उत्तरे, अशी चर्चा एखाद्या पॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन समृद्ध करणारी आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.
‘बायकांत पुरुष लांबोडा’ या लेखात स्त्रीरोगतज्ज्ञ पुरुष डॉक्टर म्हणून येणारे खुसखुशीत अनुभव मांडत असतानाच, पुरुषसत्ताक व्यवस्थेने दिलेल्या स्त्रियांच्या वेदना देखील तितक्याच संवेदनशीलपणे लेखक टिपतात. हर्बल म्हणजे नैसर्गिक आणि ते चांगलं. अॅलोपॅथी म्हणजे रासायनिक आणि ते वाईट, ही संकल्पना चुकीची आहे. कारण प्रत्येक औषध हे रसायनांचे मिश्रणच आहे. मग ते अॅलोपॅथी असो वा हर्बल. आजकाल अॅलोपॅथीला शिव्या घालायची फॅशन बोकाळली आहे. पण अॅलोपॅथीच्याच वापराने १९४७ मध्ये निव्वळ ३७ वर्षे असलेलं आपलं आयुर्मान आता तब्बल ६७ वर्षेझालं आहे आणि अॅलोपॅथी ही खर्या अर्थाने मानववंशाची पॅथी आहे. तिची तत्त्वे सर्व मानवास सर्व समप्रमाणात लागू होतात. अॅलोपॅथीचे असे कौतुक लेखक करीत असताना, अॅलोपॅथीमध्ये सारं काही ‘ऑल इज वेल’ आहे असं नाही. पण जे काही ‘वेल’ आहे त्याचं श्रेय तरी आपण अॅलोपॅथीच्या पदरात टाकायला हवं, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. होमिओपॅथी मॅग्नेटोथेरपी अशा पर्यायी उपचार पद्धतीमुळे माणसांना कधी कधी का बरे वाटते? याचा गोळीबिळी, औषधबिवषद यामध्ये डॉक्टर प्लॅसिबो आणि नोसीबो परिणामाबद्दल चर्चा करून पर्याय उपचार पद्धती प्रभावीपणे खोडून काढतात. दोन घडीचा डाव आता अनेक घड्यांचा होऊन, आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये माणूस दीर्घायुषी झाला आहे. कारण जगणं – मरणं यामध्ये आता एका श्वासाचं अंतर राहिलं नाही. मध्ये व्हेंटिलेटर, डायलेसिस, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, केमो, रेडिओ इ. आहेत आणि थकल्या वाकल्या अवयवासाठी अनेक आधार आहेत, असे सांगत आधुनिक विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतात.
एकही शब्द इंग्रजी न वापरता संपूर्ण संभाषण माय मराठीत करणे, हे किती अवघड आहे, याची आपण सहज कल्पना करू शकतो. उदा. शर्ट, पॅन्ट, इस्त्री, आइस्क्रीम इ. इंग्रजी शब्दांना लगेच पर्यायी मराठी शब्द सुचणे कठीणच. मग वैद्यकीय विषयावरील भाषण हे एकही शब्द इंग्रजी न वापरता मराठीत देणे हे किती महाकठीण असू शकेल? पण ही किमया लेखकाने साधली आहे आणि यातूनच मराठी भाषेत त्यांनी नवीन शब्द तयार करण्याचे देखील प्रयोग केले आहेत. उदा. दाबजन्य मूत्रविसर्जन, मूत्रपिंडाकृती तसराळे, स्वरयंत्रदर्शक, सदंत/ अदंत चिमटा, निर्जंतुक झगा, निर्मोजे होणे, काममंचक, उरोनलिका पात्र, जोडपे इत्यादी. हा शब्दांचा खेळ इथेच न थांबवता ते जसा दारूड्या तसा पॉर्न ऑडिटला ‘पोन्नरड्या’ हा नवीन शब्दप्रयोग करतात. आणि पॉर्न व्यसनापासून दूर राहून विवेकी जोडीदाराची निवड कशी करावी याचे मार्गदर्शन करतात.
कोविडने दिलेला धडा लक्षात ठेवण्यास सांगून दीर्घ काळापासून जीवाणू-विषाणूपासूनची लढाई फक्त वैद्यक, आधुनिक, विकसित होत जाणार्या विज्ञानामुळेच आपण जिंकत आल्याची ते जाणीव करून देतात आणि अशा युद्धाच्या आणीबाणीच्या वेळी पर्यायी उपचारपद्धती का उपयोगी नसतात? असा खडा सवाल लेखक विचारतात.
जगात मूर्खांची कमतरता नाही. सगळीकडे सारखेच मूर्ख आहेत. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये” असे म्हणत, चिल्लर चमत्कार ते आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून फसवणार्यांची संख्या सगळीकडे आहेच. पण लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी धडपडणारे विज्ञानाचे जगभरातील मोजक्या नम्र उपासकांना भेटण्याची संधी अमेरिकेत लेखकाला मिळाली. अमेरिकेतील ‘अंनिस’ च्या अधिवेशनातील हा वृत्तांत वाचला पाहिजेच असा आहे.
शेवटी या पुस्तकाचे सार लेखकाच्या शब्दात – Your eye doesn’t see what your mind doesn’t know. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विवेकवादी मन तयार झाले नाही, तर तुमचे उघडे डोळे देखील ते सत्य पाहू शकणार नाहीत. जे उघड सत्य आहे ते पाहता यावे, म्हणून जरूर वाचावे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे ‘बायकांत पुरुष लांबोडा’ हे पुस्तक…