-
वार्षिक अंकातील शबरीमला लेख आवडला
वार्षिक अंक 2019 मधील डॉ. प्रमोद दुर्गा व राहुल थोरात यांचा ‘स्त्री सन्मानाचा लढा शबरीमला’ हा लेख वाचला व एका बैठकीतच तो वाचून संपवला. केरळमधील अय्यप्पा मंदिर पूर्वीपासून परिचित होतेच; परंतु अलिकडे महिला प्रवेश बंदी व न्यायालयातील प्रक्रिया मुळे जास्तच परिचित झाले.
हे मंदिर सर्व महिलांसाठी खुले करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही गेले 1 वर्ष झाले; परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी न्यायालयीन प्रकियेनुसार झाली नाही. कायदे आणि नियम ही न्यायालयीन कक्षेत येणारी बाब आहे की, मठ मंदिराच्या मर्जीनुसार चालणारी बाब आहे, हेच कळत नाही. स्त्री-पुरुष समानतेचा डंका पिटणार्या आपल्या देशात अशी विषमता योग्य नाही. खरे तर हा मुद्दा भावनिक होता. म्हणून तर न्यायालयाकडे गेला होता. अशा सर्व स्फोटक परिस्थितीत आपले अंनिसचे सहकारी डॉ. दुर्गा व थोरात यांनी जागेवर जाऊन तेथील काही अपरिचित चालीरीती म्हणजे बाण खेचण्याची परंपरा, नदीत कपड्याचे विसर्जन व त्याचे नंतर बाजारीकरण, काळा ड्रेस कोड, अय्यप्पा यांच्या वेगवेगळ्या जन्मकथा, भात भरवण्याच्या प्रथेवेळी स्त्रियांना प्रवेश इत्यादी गोष्टींचा भांडाफोड अतिशय खुलासेवार झाला आहे व ही लढाई किती पूर्वीपासून आहे, हे डॉ. दाभोलकरांच्या भाषेत ही लढाई दशकाची नाही, तर ती शतकाची आहे, याची प्रचिती दिली. सर्वच लेखकांचे स्तंभ वाचनीय झाले आहेत. सर्व अंकच वाचनीय व सुबक झाला आहे. धन्यवाद! अशाच माहितीपूर्ण लेखांची मेजवानी प्रत्येक अंकात आपल्याकडून घडेल, ही सदिच्छा!
–संजय एस. कोले, इचलकरंजी
कणकदुर्गाचा संघर्ष भावला
नोव्हेंबर-डिसेंबर 2019 चा वार्षिक अंक वाचला तो खूपच वाचनीय व आकर्षक झाला आहे. पानापानातून प्रबोधन होत आहे. त्यातल्या त्यात डॉ. प्रमोद दुर्गा आणि राहुल थोरात यांचा ‘स्त्री सन्मानाचा लढा : शबरीमला’ स्पेशल रिपोर्ताज हा खासच जमला आहे. त्यातल्या त्यात बिंदूपेक्षा मंदिर प्रवेशानंतर कुटुंब आणि समाजाने छळ केल्यानंतरही न डगमगणारी कणकदुर्गा फारच भावली, तिला सलाम! कणकदुर्गा ज्या परिस्थितीत जीवन कंठीत आहे, ते पाहून तर मन हेलावते. एकविसाव्या शतकात मध्ययुगीन मानसिकता जोपासणे आधुुनिक भारताला परवडणारे नाही. चार्वाक, बसवण्णा, फुले, शाहू आंबेडकर, पेरियार यांच्यावेळी असलेली दशकाची लढाई शतकांची लढाई होऊन गेली तरी आपल्यासारखे कार्यकर्ते आशावादी आहेत. खरोखरच आपल्या चिकाटीला सलाम! शतकाची लढाई संपता संपत नाही; उलट त्यांच्याच हातात सत्ता पुन:पुन्हा जाऊन उलटे चक्र फिरेल की काय याची भीती मला वारंवार जाणवत आहे. तरीही आशावाद जिवंत आहेच. परत एकदा आपल्या सर्वांना (आशावादी अंनिस टीमला) सस्नेह आदरपूर्वक सलाम!
– नागरगोजे बाबू हौसेराव, औरंगाबाद