सचिन करगणे -
अंनिसच्या कार्यशाळा या माणसाला माणूस म्हणून उन्नत करणार्या – प्रा. डॉ. बाबुराव गुरव
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यशाळा या माणसाला माणूस म्हणून अधिक उन्नत करणार्या असतात. भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, मानवता, शोधकबुद्धी विकसित करण्यासाठी प्रबोधन घडवणार्या असतात, असे प्रतिपादन जेष्ठ लेखक, पुरोगामी, विद्रोही नेते प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ही कार्यशाळा पी. व्ही. पी. कॉलेज, कवठेमहांकाळ येथे अंनिस शाखा कवठेमहांकाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन सत्रात टोल आणि गायरान जमीन लढ्याचे नेते भाई दिगंबर कांबळे, प्रा. दादासाहेब ढेरे, बाबुराव जाधव, प्रा. बाळासाहेब बेंडे-पाटील, डॉ. संजय नेटवे, डॉ. संतोष कुंभारकर, डॉ. नरेंद्र माळी, प्रा. सुनील तोरणे, प्रा. विनोद कांबळे उपस्थित होते.
संत आणि समाजसुधारकांचे अनेक दाखले देऊन अंनिस हा वारसा पुढे चालवत असलेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि सध्याच्या द्वेषाच्या विषारी वातावरणात अंनिस ने जोमाने हा वारसा विरोधाला न जुमानता पुढे नेला पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त केली.
दिवसभर तीन सत्रात चाललेल्या कार्यशाळेत पहिल्या सत्रात “चला अंनिस समजून घेऊया” या विषयावर राज्य कार्यकारी समिती सदस्य फारूक गवंडी यांनी मांडणी केली. दुसरे सत्र “चमत्कार आणि बुवाबाजी” या विषयावर सातारा येथील राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोद्दार यांनी सहप्रयोग चमत्कार करीत मांडणी केली. तिसर्या सत्रामध्ये राज्य कार्यकारणी सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी “वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद” या विषयाची मांडणी केली.
प्रशिक्षण कार्यशाळेबाबतची भूमिका फारुख गवंडी यांनी मांडली तर स्वागत आणि प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष सचिन करगणे यांनी केले. आभार तालुका सचिव भगवान सोनंद यांनी मानले.
– सचिन करगणे, कवठेमहांकाळ