कोकण सड्यांचे वास्तव

अपर्णा वाटवे -

कोकणचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या माणसांनी सड्यावरील पर्यावरणाशी जुळवून घेत जगण्याची कला आत्मसात केली आहे. जांभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगड भेगाभेगांतून पावसाचे पाणी धरून ठेवतो आणि तेच पाणी जिवंत झर्‍याच्या रुपाने सड्याच्या कडेने पाझरते. हे समजावून घेऊन लोकांनी इथे विहीर खणायचे, पाण्याची कुंडे तयार करायचे, पाट काढायचे शास्त्र निर्माण केले. म्हणूनच आज सड्यांवरील बावी/विहिरी, झरे यांना बारमाही पाणी असते. हे करत असताना मूळच्या निसर्गाला फार बाधा पोचली नाही, हे महत्त्वाचे. काही ठिकाणी सड्यांवर पावसाळी शेती होते. सड्याचा दुसरा महत्त्वाचा उपयोग गुरे चारण्यासाठी. दसरादिवाळीनंतर सड्यांवर कमरेइतके उंच गवत वाढते. गुरांसाठी हा चारा बराच काळ पुरतो. बहुतेक वेळा पशुपालक धनगर समाजाची वस्ती सड्यावर असते. कोकणातील मानवी संस्कृती ही निसर्गसंस्कृती आहे, ती सड्याच्या मातीमध्ये रुजलेली आहे. इथल्या परिसराचा विचार करताना मानव आणि निसर्ग हे वेगळे करणे शक्यच नाही. कारण दोघांचेही भवितव्य एकमेकांच्यावर अवलंबून आहे.

‘मेली ठेचेवर ठेच,’ असे म्हणत एसटी सड्यावर आली. मराठी वाचणार्‍या, ऐकणार्‍यांना पु. ल. देशपांडे यांच्या ‘म्हैस’ कथेतील हे वाक्य लगेचच ओळखू येईल. पण त्यातील सडा म्हणजे नक्की काय, हे कळायला मात्र कोकण-सह्याद्रीची वाट धरावी लागते. मैलोगणती पसरलेले विस्तीर्ण जांभा दगडाचे पठार म्हणजे सडे. इथली प्रसिद्ध तांबडी माती या जांभ्याचीच देणगी! ‘सह्याद्री’च्या माथ्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत आणि कोकणपट्टीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तीर्ण सडे आहेत. आज जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ‘यूनेस्को’ने नोंदलेले कास पठार आणि पाचगणीचे ‘टेबललांड’ हे सडेच आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठाले सडे आहेतच; पण त्यापुढेही गोवा, कर्नाटक, केरळपर्यंत सडे आहेत.

साधारणत: 4-5 कोटी वर्षांपूर्वी सडे तयार झाले असावेत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मूळच्या बेसाल्ट दगडाची धूप होऊन त्याचे रुपांतर लोह आणि अ‍ॅल्युमिनियम भरपूर असणार्‍या जांभा दगडात झाले. त्यावरील जीवसृष्टी उत्क्रांत होत गेली. माणसाचा वावर सड्यावर चालू झाला. तो काही हजार वर्षांपूर्वीचा असावा. सिंधुदुर्गात कोळशी सड्याच्या पोटात सापडलेल्या गुहेत अश्मयुगीन मानवाच्या वस्तीच्या खुणा सापडल्या आहेत.

खरं तर सड्यावर राहाणे फार सोपे नाही. पण काही सजीवांना ते जमून गेले. मातीच्या अभावामुळे, जंगलात आढळणार्‍या बारमाही वनस्पती येथे आढळत नाहीत. क्वचित एखादे चिवट झुडूप दगडाच्या भेगेत तग धरून राहते. परंतु पावसाळ्यात सड्यावरील खळग्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे याच पृष्ठभागांचे उथळ पाणथळीच्या प्रदेशांमध्ये रूपांतर होते. यात कमळासारख्या जलवनस्पतीही वाढतात. पावसाळ्याच्या शेवटी पठारावर लाखो पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी व जांभळी फुले फुलतात. हा ‘रंगोत्सव’ खरे तर असतो परागीभवन करणार्‍या कीटकांसाठी. तर्‍हतर्‍हेच्या माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे या फुलांना भेट देतात आणि बीजनिर्मितीला मदत करतात. हे कीटक आजूबाजूच्या फळबागा, भाजीपाला, कडधान्यांच्या पिकालाही बीजनिर्मितीत मदत करत असावेत. पावसाळा संपला की बहुतेक वनस्पती सुकून जातात. त्यांच्या बिया मातीत पडून राहतात, वार्‍यावर उडू लागतात आणि सडा कोरडाठाक पडतो, तो पुढच्या पावसापर्यंत. पण अगदी भर उन्हाळ्याच्या दिवसांतही तापल्या दगडामधून सापसुरळीची लगबग चालू असते. गर्द वृक्षराजीच्या छत्राखाली, भैरोबा, बामणदेव, जाखादेवी स्थानाजवळ चिमुकले पक्षी किलबिलत असतात. शेवाळे, लायकेन, बुरशी, मॉस, नेचे आणि सपुष्प वनस्पतींची जैव-विविधता सड्यांवर दिसते. यातील अनेक प्रजाती पश्चिम घाट आणि कोकणातच उत्क्रांत झाल्या असाव्यात. कारण त्या इतरत्र दिसत नाहीत. अशा अंदाजे 150 प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद आतापर्यंत झाली आहे.

कोकणचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या माणसांनी सड्यावरील पर्यावरणाशी जुळवून घेत जगण्याची कला आत्मसात केली आहे. जांभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगड भेगाभेगांतून पावसाचे पाणी धरून ठेवतो आणि तेच पाणी जिवंत झर्‍याच्या रुपाने सड्याच्या कडेने पाझरते. हे समजावून घेऊन लोकांनी इथे विहीर खणायचे, पाण्याची कुंडे तयार करायचे, पाट काढायचे शास्त्र निर्माण केले. म्हणूनच आज सड्यांवरील बावी/विहिरी, झरे यांना बारमाही पाणी असते. आमराया, सुपारीबागा, काजू, नारळ सड्याच्या किनारीने वाढवले जातात. पाट, वहाळ, पर्‍हे यांची सोय करून लोकांनी सडे नांदते केले आहेत. हे करत असताना मूळच्या निसर्गाला फार बाधा पोचली नाही, हे महत्त्वाचे. काही ठिकाणी सड्यांवर पावसाळी शेती होते. सड्याचा दुसरा महत्त्वाचा उपयोग गुरे चारण्यासाठी. दसरा-दिवाळीनंतर सड्यांवर कमरेइतके उंच गवत वाढते. गुरांसाठी हा चारा बराच काळ पुरतो. बहुतेक वेळा पशुपालक धनगर समाजाची वस्ती सड्यावर असते. कोकणातील मानवी संस्कृती ही निसर्गसंस्कृती आहे, ती सड्याच्या मातीमध्ये रुजलेली आहे. इथल्या परिसराचा विचार करताना मानव आणि निसर्ग हे वेगळे करणे शक्यच नाही. कारण दोघांचेही भवितव्य एकमेकांच्यावर अवलंबून आहे.

कोकणच्या विकासाचे वारे जेव्हा वाहू लागले, तेव्हा मात्र या निसर्गसंस्कृतीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. कोकणचे दारिद्र्य, उपेक्षित जीवन, निसर्गाचे लहरीपण यावर खूप चर्चा झाली. इथला निसर्ग हा जणू माणसाच्या विकासातील अडथळा आहे, असा काहीसा समज इथल्या नेत्यांचा झाला असावा. इतरत्र जसे धरणे बांधा, पाणी आडवा- पाणी जिरवा, शेती सुधारा प्रकल्प झाले, तसे कोकणात होऊ शकत नव्हते. याचे कारण इथली भूरुपे; विशेषत: सडे इतर कुठल्याही प्रदेशातील भूरुपांहून निराळे आहेत, हे समजून न घेता इथला विकास कसा असावा, हे ठरवणे शक्य नाही.

आजही सड्यांवरच्या जीवसृष्टीबद्दल सरकारदरबारी पूर्ण अनास्था आहे. कोकणातील सरसकट सगळ्या सड्यांची नोंद पडीक जमीन -पोट खराब म्हणून – wasteland म्हणून सरकारी नकाशात केली गेली आहे. इथले दुर्मिळ जीव, माणसांच्या शेतजमिनी, वस्त्या सार्‍या दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. हे खरे सड्याचे दुर्दैव. Wasteland हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला तो ब्रिटिश काळात. वहिवाटीखाली, शेतीखाली नसलेली जमीन म्हणजे wasteland. पुढे त्यातील जंगले वेगळी काढली गेली आणि बाकीच्या wasteland चे रूप पालटून त्यांना उत्पादनाखाली आणायचा सरकारने चंग बांधला तो आजपर्यंत. रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस. सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून wasteland चे नकाशे तयार झाले आणि त्या कवडीमोलाने विकास प्रकल्पासाठी खुल्या झाल्या. एन्रॉन, जैतापूर ही त्याचीच उदाहरणे. आता नाणारसह सोळा गावांना भेडसावणारी रिफायनरी ही देखील अशाच wasteland समजल्या गेलेल्या सड्यावर डोळा ठेवून आहे. या प्रत्येक ठिकाणी स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला. याचे राजकारणही झाले. विरोध करणारे व समर्थक यांच्या पक्षानुसार सरकारची भूमिका बदलत गेली. पण यातले मूलभूत प्रश्न तसेच राहिले. – सडे खरोखर wasteland आहेत का? सड्यांच्या निसर्गावर आधारित असलेल्या उपजीविकांचे, माणसांचे मेगा प्रकल्पासाठी शिरकाण करणे योग्य होईल का? त्यातून स्थानिकांचा विकास साध्य होईल का? याचे उत्तर मिळवायला आभाळातून केलेला सर्व्हे पुरणार नाही, तर जमिनीवरील परिस्थितीचा अभ्यास हवा. सड्यांवर आत्ता काय आहे, लोक त्याचा वापर कसा करतात, कुठल्या पर्यावरणीय सेवा सड्यांकडून मिळतात, याचा अभ्यास अत्यावश्यक आहे. नाहीतर विकासाच्या भ्रमात शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांच्या उपजीविकेसाठी लागत असलेले अधिवासच नष्ट होतील.

सडा आणि त्यावरील जीवसंस्कृती – मानवासहित- हा माझा अभ्यासाचा विषय आहे. यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग पर्यावरण संरक्षण, संवर्धन यासाठी कसा करता येईल, असा प्रयत्न 2012 पासून चालू आहे. मी आणि माझ्यासारखे अनेक सडे अभ्यासक ‘रॉक ओउटक्रॉप नेटवर्क’ (RON) – या नावाखाली एकत्र येऊन संघटितपणे सड्यांचा अभ्यास करत आहोत. अनेक समविचारी मित्रमंडळांसोबत सडे आणि त्याबद्दलचे लोकविज्ञान याबद्दल माहिती गोळा होत गेली, यात काही शास्त्रज्ञ तर काही उत्साही नागरिक. या सगळ्यांना एकमेकांशी जोडणे, संवाद घडवून आणणे, त्यातून नवे मार्ग शोधणे यावर आमचा भर आहे.

कोकणात सड्यांवर कातळशिल्पे सापडली आहेत, अनेक नवीन वनस्पती, प्राणी यांची नोंद झाली आहे. कोकणातील संस्था, अध्यापक, विद्यार्थी सडे वाचविण्यासाठी आपापल्या भागात काम करत आहेत. या अभ्यासासाठी लागेल तिथे शास्त्रीय मदत पुरवणे, निरनिराळी धोरणे, कायदे यांचा वापर करून संरक्षणासाठी काय मार्ग अवलंबिता येईल, याचा विचार करणे यासाठी ठजछ चे सदस्य झटत असतात. सोशल नेटवर्कचा प्रभावी वापर करून एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच तयार झाला आहे. त्यात विचारांची, माहितीची देवाणघेवाण होत राहते. कोकणात संरक्षण फक्त सड्यांपर्यंत मर्यादित नाही. एकूणच, इथल्या निसर्गाधारित समाजाचे भवितव्य, शाश्वत विकासाची दिशा यांच्या जपणुकीसाठी काय करता येईल, यावरही व्यापक विचारांची गरज भासत आहे.

आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून रत्नागिरी जिल्ह्यातील 11 जागा या जैवविविधता वारसास्थळ म्हणून नोंदवाव्यात, असा विचार पुढे आला आहे. त्याचा प्रस्ताव बनविण्याचे काम चालू आहे. या जागा, मानव आणि निसर्ग यांच्या अतूट नात्याचा वारसा दाखविणार्‍या आहेत, म्हणून त्या पुढच्या पिढीपर्यंत टिकाव्यात, जगासमोर याव्यात, असा प्रयत्न चालू आहे. इतरत्रही अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचा शोध चालू आहे. या निमित्ताने होणार्‍या देवाणघेवाणीतून अनेक उत्साही तरुण-तरुणी कोकणप्रेमी यांच्याशी ओळख होत आहे आणि नवनव्या प्रयोगांची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रालाच काय, तर देशाला दिशा देण्याचे काम कोकणच्या भूमीने कायमच केले आहे. आज इथली तरुणाई निसर्गाधारित विकासाची नवी दिशा दाखवत आहे.

सडा हा जसा उपेक्षित अधिवास राहिला, तसेच गवताळ माळ, पाणथळ जागा हे देखील अधिवास उपेक्षित आहेत. यांना देखील wasteland म्हटले गेले आहे. या अधिवासावर काम करणार्‍या संस्था, व्यक्ती यांच्याबरोबरही संवाद चालू आहे. एकूण, सगळ्यांचा भर हा भारतीय भूभागाचा विचार पर्यावरणीय दृष्टीने करून एक वस्तुनिष्ठ नकाशा तयार व्हावा, यावर आहे. हा नकाशा लोकविज्ञान, स्थानिक माहिती यावरही आधारित असेल असा विचार आम्ही मांडत आहोत. शाश्वत विकासाची दिशा त्यावरून ठरू शकेल. भारताच्या एक पंचमांश भूभागाला निरुपयोगी ठरवणार्‍या वसाहतवादी मनोभूमिकेचा तोच खरा शेवट असेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]