-

दाभोलकरांचे विचार समाजात रुजवणे गरजेचे – अरविंद जगताप
दाभोलकरांचे विचार समाजात रुजवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लेखणीचा फाँट कमी होऊ देऊ नये. अशा प्रदर्शनातून नवे दाभोलकर उभे रहावेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व नाटककार अरविंद जगताप यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर व एमजीएम विद्यापीठ आयोजित तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले व फ्रेंड्स ऑफ दाभोलकर, परिवर्तन ट्रस्ट निर्मित कसोटी विवेकाची हे नरेंद्र दाभोलकरांविषयी चित्र शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी दि. ९ मार्च रोजी अरविंद जगताप यांच्या हस्ते पार पडले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम अध्यक्षस्थानी होते. एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, डॉ. शाम महाजन, डॉ. आनंद निकाळजे, प्रा. शिव कदम, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, अजय भवलकर आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशेष सहकार्य या प्रदर्शनास लाभले आहे.
या वेळी जगताप म्हणाले की, गांधी आणि दाभोलकर दोघांचीही हत्या झाली. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. उलट त्यांचे विचार समाजात जास्त प्रमाणात पेरले गेले. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी. मात्र, आता विचारांची लढाई म्हणजे शत्रुत्व निर्माण करण्यासारखे आहे. दाभोलकरांचा धर्माला विरोध नव्हता, तर अंधश्रद्धेला विरोध होता, हे कित्येक लोकांना माहीतच नाही.

अध्यक्षीय भाषणात कदम म्हणाले की, दाभोलकरांसोबतच समविचारी लोकांची हत्या झाली. यामागे जो विचार आहे, तो आज बळावत चालचा आहे. त्यामुळे धर्म, अधर्म, पाप, पुण्याच्या बाहेर पडणे गरजेचे आहे. दरम्यान, एमजीएम क्रिकेट स्टेडियम बिल्डिंगमधील कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये १५ मार्चपर्यंत सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले होते.
प्रदर्शनाच्या संयोजनासाठी यशवंत चव्हाण प्रतिष्ठानचे निलेश राऊत आणि सुबोध जाधव, अंनिसचे डॉ. श्याम महाजन, व्यंकट भोसले, लक्ष्मण जांभळीकर, शंकर बोर्डे, आरसुड सर, अॅड.संजय गवाणे, निता सामंत, प्रा. प्रवीण देशमुख, गणेश चिंचोले यांनी मदत केली.