चित्तरंजन चौरे -
सासरची संपत्ती हडपून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या लालसेपोटी पतीने मांत्रिकाच्या संगनमताने पत्नीवर अमानुष अत्याचार करण्याची घटना नागपूरपासून जवळच असलेल्या रनाळा या गावी उजेडात आली.
पती श्रीकांत कुंभलकर याने आपला मांत्रिक नातेवाईक मनीष वंजारी याच्या दरबारात पत्नीला बळजबरीने नेले. मांत्रिकाने अंगारा व पेढा खायला देताच पत्नी सुनंदाला (बदललेले नाव) चक्कर व गुंगी यायला लागली. मांत्रिकाच्या अंगात कालीमाता संचारली व सुनंदाला बाहेरची भूतबाधा लागल्याचं सांगून तिच्याशी अश्लील चाळे व अत्याचार सुरू झाले. ‘आईकडे अजिबात जायचं नाही, गेल्यास तुझ्या मुलाचा जीव जाईल,’ अशी भीती मांत्रिकाने घातली. मांत्रिकाच्या दरबारात वार्या सुरू झाल्या. अंगात कालीमाता आल्याचं भासवून मांत्रिक मनीष पतीसमोरच शिव्याशाप व अश्लील चाळे करायचा. अंगारे-धुपारे व गुंगीमुळे सुनंदाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. मुलीची प्रकृती बघून आईने नऊ तोळे सोनेही दिले. पण सुनंदाची दशा बघून आईला संशय आला. तिने मुलीची आस्थेने विचारपूस केली व सुनंदाने रडून-रडून सर्व आपबीती कथन केली व लागलीच मुलीला घेऊन यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून एफआयआर सादर केली.
ही वार्ता कानावर पडताच ‘महाअंनिस’चे राज्य सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी उत्तर नागपूर शाखेचे कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांना सोबत घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार सानप यांची भेट घेऊन या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली. शाखेच्या कार्यकर्त्या श्वेता पाटील यांना पीडितेच्या घरी पाठवून सहानुभूतिपूर्वक विचारपूस करून मदतीचे आश्वासन दिले.
मुख्य आरोपी मांत्रिक मनीष वंजारी व पीडितेचा पती श्रीकांत याच्यावर गु. क्र 442/21अंतर्गत नोंद करून जादूटोणाविरोधी कायदा कलम 3 द्वारे; तसेच कलम 377, 498ए, 323 354ए, 504, 506(2) व 34 अंतर्गत अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
–चित्तरंजन चौरे, कार्याध्यक्ष उत्तर नागपूर.