डॉ. शंतनु अभ्यंकर - 9822010349
विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत सुधारत होतो. जगाची रीती समजावून सांगणार्या कथा, परिकथा, पुराणकथा या पद्धतींत अशी सोय नाही.
सांगणारा कुणीही असो; आई, वडील, मित्र, शिक्षक, गुरू, मोठ्ठा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, प्राचीन ज्ञानवंत, कोणीही असो, कोणी सांगितलंय याला अजिबात महत्त्व देऊ नये; फक्त काय सांगितलंय याचाच विचार करायला हवा. विज्ञान नावाची युक्तीआपल्याला असं बजावत असते. आपल्या गुरूंनी सांगितलेलं सर्वच्या सर्व, सदासर्वदा बरोबरच धरून चाललं पाहिजे, असं विज्ञान मानत नाही.
पण असं जर तुम्ही मित्रांना सांगितलंत तर काही मित्र भडकतील. म्हणतील, “जर कोणीही चुकू शकते, असं ही युक्ती सांगते, तर त्याचा अर्थ इतके सगळे महान शास्त्रज्ञ मूर्ख म्हणायचे का? न्यूटन वेडा होता का?”
मध्येच कोणीतरी मैत्रीण पचकेल, “…आणि या सगळ्यांना मूर्ख आणि वेडे ठरवणारा तू स्वतःला फार शहाणा समजतोस असं दिसतंय!”
पण तुम्ही अजिबात वैतागू नका. त्यांना तुम्ही शांतपणे अणूच्या अंतरंगाच्या शोधाची गोष्ट सांगा. आपण पाहिलंय की जे. जे. थॉमसन यांच्या सांगण्यात त्यांच्या शिष्याने म्हणजे अर्नेस्ट रदरफर्ड यांनी सुधारणा केली. त्यांच्या सांगण्यात त्यांच्याच शिष्याने म्हणजे निल्स भोर यांनी नेमकेपणा आणला. अणूच्या अंतरंगाची बित्तंबातमी आपल्याला मिळाली आणि त्यावर आजचे इलेक्ट्रॉनिकचे, इंटरनेटचे माहितीयुग उभे आहे.
कल्पना करा की आपल्या गुरूचा शब्द तो अंतिम, असं समजून जर पुढे काही सुधारणा किंवा बदल नाकारले गेले असते तर…? पण विज्ञान नावाच्या युक्तीला हे मान्य नाही. चुका शोधून त्या मान्य करणं, त्या दुरुस्त करणं आणि हे सतत करत राहणं, म्हणजे विज्ञान.
‘कोणीही चुकू शकतं,’ याचा अर्थ आपण एकटेच शहाणे आणि बाकी सगळे मूर्ख असा नाहीच्चे मुळी. ‘कोणीही चुकू शकतं,’ याचा अर्थ पालक, शिक्षक, शास्त्रज्ञ, ज्ञानवंत यापैकी कुणालाही आदराने वागवू नका; सतत दुरुत्तरे करा असाही नाही. ‘कोणीही चुकू शकतं,’ याचा अर्थ एवढाच की उद्या ज्येष्ठांनी सांगितल्या विरुद्ध काही दिसून आले तर ज्येष्ठांनी सांगितलेली माहिती तपासून घ्यायला हवी. केवळ ती कोणा मोठ्या व्यक्तीने सांगितली आहे, हा माहिती बरोबर असल्याचा पुरावा असू शकत नाही.
पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते आहे, देवी नावाचा रोग विषाणूमुळे होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वी माहीत नव्हत्या. मग त्या काळातले गुरू, आपल्या शिष्यांना काय बरं शिकवत होते? पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, देवी कोपल्यामुळे देवीच्या रोगाची साथ येते… असंच तर शिकवत असणार. नव्हे, नव्हे, अस्संच तर शिकवत होते. जसे हे शोध लागत गेले तसे शिकवणारे बदलत गेले. याचा अर्थ पूर्वीचे गुरुजी मूर्ख किंवा वेडे होते असा होतो का? नाही. त्यांना जे ठाऊक होते तेच ते शिकवत होते, एवढाच त्याचा अर्थ.
आता तर देवीचा रोग विषाणूमुळे होतो हे आपण शोधून काढले आहे. त्या विरुद्ध लस तयार केली आहे. ती लस जगभर सगळ्या माणसांना दिली आहे. यामुळे आता देवी नावाचा रोग अस्तित्वातच नाहीये. देवीचा समूळ नायनाट झाल्यामुळे आता देवीची लस देणं बंद झालं आहे. असं असताना, आज जर कोणी देवीचा रोग देवीच्या कोपाने होतो असं सांगू लागला, तर तुम्ही काय म्हणाल? समजा तो म्हणाला की माझ्या पणजोबांनी तसं लिहून ठेवलं आहे. माझा माझ्या पणजोबांवर गाढा विश्वास आहे. तर तुम्ही काय म्हणाल? किंवा तो म्हणाला की कुठल्यातरी जुन्या पुस्तकात त्यांनी ते वाचलं आहे. हे पुस्तक खूप जुनं आहे, म्हणून ते खरं आहे. तर तुम्ही काय म्हणाल? कदाचित तो तुम्हाला विचारेल, “माझे पणजोबा काही वेडे होते का? पुस्तक लिहिणारा काय मूर्ख होता का? तू कोण आइनस्टाइन लागून गेला का?” तर तुम्ही काय म्हणाल?
तुम्ही अजिबात गडबडून जाऊ नका. पणजोबांना जे माहीत होतं ते त्यांनी सांगितलं. ग्रंथकारांना जे माहीत होतं ते त्यांनी लिहिलं. त्यांच्या कल्पना चुकीच्या होत्या हे आपण आज म्हणू शकतो. ते चूक असतील; पण ते मूर्खही नव्हते आणि वेडेही नव्हते. त्यांच्या काळी त्यांना तितपतच माहिती होती.
पण आजही आपण त्यांच्याच माहितीला चिकटून बसलो तर…? देवीच्या कोपाने देवीची साथ येते असं म्हणत बसलो तर…? पणजोबांवर गाढा विश्वास असल्यामुळे ते बरोबरच होते किंवा पुस्तक जुनं असल्यामुळे ते बरोबरच आहे, असं म्हणत बसलो तर…? तर आपण मात्र मूर्ख आणि वेडे ठरू!
चूक कोणीही करू शकतं. जुनी-जाणती माणसं चुकू शकतात, जुने-पुराणे ग्रंथ चुकू शकतात. चूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते.
लेखक संपर्क ः 98220 10349