मुक्ता दाभोलकर -
विद्याताई गेल्यावर महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांना, मला स्वतःला देखील आपल्या जवळचं कोणीतरी गेलं, आपण काहीतरी गमावलं, असं वाटलं. गौरी देशपांडेंच्या लेखनातून जशी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांच्या मनात स्वतःची नव्याने ओळख करून घेण्याची इच्छा निर्माण झाली; तसेच बाई म्हणून घडताना आणि जगताना आलेल्या अनुभवांकडे डोळसपणे बघण्याची प्रेरणा विद्याताईंनी असंख्य मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण केली. स्वतःच्या लिंगभेदविषयक जाणिवा पारखण्याचा प्रवास सुरू करण्यासाठी जसे त्यांनी अनेक स्त्री-पुरुषांना प्रवृत्त केले; तसेच हा प्रवास चालू असताना, त्या रस्त्यावरील टक्के-टोणपे खाताना, आव्हानांना सामोरे जाताना, विचारांच्या विजयाचे छोटे-मोठे आनंद साजरे करताना ‘विद्याताई आहेत’ ही भावना अनेकांना आधार देणारी होती.
1993-94 साली सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विचारवेध संमेलनात मी विद्याताईंना प्रथम भेटले. त्यापूर्वी त्यांना बघितले होते, त्यांचे भाषण ऐकले होते व मी ‘मिळून सार्याजणी’ची वाचकही झालेली होते. हे संमेलन चालू असताना एकदा आम्ही चहा प्यायला बाहेर गेलो, तेव्हा चहाच्या टपरीतील बाक भरलेले असल्याने बसायला जागा नव्हती. विद्याताईंना बघून त्यांचे एक परिचित उठले व त्यांनी विद्याताईंना बसण्याची विनंती केली. पुढे ते म्हणाले की, ‘पण तुम्हाला पुरुषांनी उठून जागा दिलेली चालत असेल तर…!’ यावर विद्याताई प्रसन्न हसत म्हणाल्या की, ‘आम्हाला पुरुषांनी दिलेला चहापण चालतो.’ समोरच्या व्यक्तीची कृती ही स्त्रीदाक्षिण्याच्या साचेबद्ध कल्पनेपोटी झालेली आहे, असे मानून ते वागणे झिडकारणे हेदेखील विचाराला धरून असलेले वर्तन आहे, असे या ठिकाणी म्हणता आले असते; पण उठून जागा देणे ही प्रेमादर व्यक्त करण्याची एक लिंगभावनिरपेक्ष कृती आहे, अशा रीतीने ते वागणे समजावून घेऊन, ‘आम्ही स्त्री-पुरुष मैत्रभाव महत्त्वाचा मानतो,’ हा विचार समोरच्यापर्यंत पोचवणे हे देखील लिंगभाव समानतेच्या विचाराला पुढे नेणारे वर्तनच होते. विद्याताईंनी ज्या उत्स्फूर्तपणे या दुसर्या प्रतिसादाची निवड केली, त्याची नोंद माझ्यासारख्या स्त्रीवादी विचारांची नव्याने ओळख झालेल्या मुलीच्या मनावर झाली. व्यक्तिमत्त्वातील संवादी सूर तुम्हाला विचारांची कास न सोडता माणसे जोडायला मदत करतो आणि हा संवादी सूर विद्याताईंच्या व्यक्तिमत्त्वात फार सहजपणे आविष्कारित होत असे. उंच, गोर्या, ताठ बांध्याच्या विद्याताईंचे बाह्य व्यक्तिमत्त्व व हास्य आकर्षक होते, म्हणून त्यांच्याशी इतके बाया-पुरुष जोडले जात असत, असे म्हणणे हे मला त्यांना बाईपणाच्या साचेबद्ध प्रतिमेत बसविण्यासारखे वाटते. लिंगभाव समानतेच्या विचाराला पुढे नेणार्या संवादी अभिव्यक्तीची नस विद्याताईंना सापडली होती. आज त्यासाठी आपण भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता असे शब्द वापरतो.
पुरोगामी विचारसरणीची व्यक्ती म्हणून घडण्याच्या त्यांच्या स्वतःच्या प्रवासातील प्रमुख टप्पे स्पष्ट करणारे लेखन विद्याताईंनी वेळोवेळी केलेले आहे. कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर स्वतःच्या व्यक्ती म्हणून विकसित होण्याच्या प्रक्रियेबद्दल आस्था असलेल्या प्रत्येकाने हे लेखन जरूर वाचायला हवे. मध्यमवर्गातील प्रत्येक मध्यमवयीन स्त्रीसाठी तर या लिखाणाचे वाचन अनिवार्य केले पाहिजे, असे मला वाटते. अंतरंगातील ठसठस कमी करण्यासाठी स्वतःचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपण्याच्या निकडीला प्राधान्य देण्याची आठवण हे लेखन करून देते. तब्बल पस्तिशीनंतर म्हणजे जेव्हा आयुष्यातील युवावस्था हे नामाभिधान ल्यायलेला कालखंड संपतो, त्यानंतर विद्याताईंच्या जीवनातील बदलाच्या प्रक्रियेने गती घेतली. या प्रक्रियेचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे की, ‘मी दुसर्यांदा वयात आले, एकदा शारीरिक पातळीवर आणि पुन्हा एकदा वैचारिक पातळीवर’; ‘स्त्री मासिकातल्या कामामुळे एकेक प्रकाशकिरण माझे डोके नांगरायला लागला.’ आज्ञाधारकता, पारंपरिकता यांनी बनलेली मनाची टणक भूमी भेदून प्रश्नांचे कोंब वर यायला लागले.’ (मराठी मध्यमवर्गीय मुशीत वाढलेल्या अनेक स्त्री-पुरुषांना आज्ञाधारकता हा गुण आहे की नाही, याविषयी विचार करण्यास विद्याताईंनी प्रवृत्त केले आहे.) ‘माझ्या मूळच्या भावनाशील स्वभावाला आवर घालून मी विचाराचा काठ पकडला. हा बदल मला जाणीवपूर्वक स्वतःमध्ये घडवावा लागला.’ लोकमान्य टिळकांचे सहकारी असलेले न. चिं. केळकर हे विद्याताईंचे आजोबा होते. त्यांचा भाऊ व पती यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक होती. रामभाऊ म्हाळगींनी शब्द टाकला म्हणून विद्याताई जनसंघाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्याबद्दल त्या म्हणतात की, ‘तेव्हा पराभवाचे दुःख झालेच; पण आज मात्र मनापासून वाटते की मी मरता-मरता वाचले.’ या सगळ्या वातावरणात वयाच्या पस्तिशीपर्यंतचा कालखंड घालवलेल्या विद्याताई सांगतात की ‘आज मी 180 अंशांमध्ये फिरून ठामपणे डावीकडे उभी आहे.’
‘स्त्री’ मासिकाच्या अनुभवातून पत्रकारितेशी नाळ जुळलेल्या विद्याताईंनी ‘मिळून सार्याजणी’ हे मासिक सुरू केले. ‘मिळून सार्याजणी’ हे शब्द आज मराठी सांस्कृतिक विश्वाचा भाग झाले आहेत. ज्या काळात मराठीतील किर्लोस्कर, स्त्री, हंस इ. मासिके बंद पडत होती, तेव्हा पैशाचं कोणतंही पाठबळ नसताना विद्याताईंनी हे धाडस केलं. ‘स्त्री’ मासिकाच्या संपादनाचा अनुभव विद्याताईंच्या गाठीशी होता; त्याच्या पलिकडे जाऊन स्त्रियांच्या एकजुटीचा सांगावा सांगणारं मासिक त्यांना सुरू करायचं होतं. स्त्रियांना त्यांचे जगणे मांडण्यासाठी माध्यमांमध्ये अवकाश नसतो, तो अवकाश निर्माण करणे हा मासिक सुरू करण्यामागील प्रमुख हेतू होता. समाजात अनेक पुल्लिंगी शब्द हे स्त्रियांचा निर्देश करण्यासाठीदेखील सर्रास वापरले जातात (उदा. चेअरमन) मग सार्याजणी या स्त्रीलिंगी शब्दांशी पुरुषांनीदेखील स्वतःला जोडायला काय हरकत आहे? परंतु कालांतराने या चळवळीतील पुरुषांचा सहभाग अधिक अधोरेखित करण्यासाठी ‘मिळून सार्याजणी’ मासिकाच्या मुखपृष्ठावरची ‘स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक’ ही ओळ बदलून ती ‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा, यासाठी’ अशी करण्यात आली. ग्रामीण व शहरी महिलांच्यात पूल बांधणे हेदेखील या मासिकाचे उद्दिष्ट होते. त्यामुळे मध्यमवर्गीय परिघाबाहेरील ग्रामीण महिलांनी मासिक वाचावं आणि त्यात लिहावं, यासाठीचे ‘झुंजुमुंजु’सारखा विभाग त्यात होता. महाराष्ट्र अंनिसचे मिलिंद जोशी यांनी वर्षभर त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कथा सांगणारे सदर चालवले होते. कुटुंबातील नाती, अर्थार्जन, पोशाख अशा किती तरी विषयांवर ‘मिळून सार्याजणीं’मधून बाया लिहित्या झाल्या. विद्याताई म्हणत, “मी विचारवंत नाही; मी एक कार्यकर्ता आणि संपादक आहे. वेगवेगळे सांस्कृतिक संचित घेऊन येणार्या स्त्री-पुरुष सर्वांनी स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलावं, स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीच्या संदर्भात त्या अनुभवांचा अर्थ शोधावा व मांडावा, यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्या सातत्याने करत राहिल्या. विद्याताई गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले जे वाचले, त्यातून लक्षात आले की, महाराष्ट्रातील तीन पिढ्यांतील व्यक्तींशी विद्याताईंनी असा संवाद साधलेला आहे. गेल्या सहा-सात वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सक्रिय झालेल्या व धडाकेबाजपणे जटानिर्मूलनाचे काम करणार्या नंदिनी जाधव सांगत होत्या की, विद्याताई जायच्या तीन-चार महिने आधी त्यांनी नंदिनीशी चार तास गप्पा मारून तिचे काम समजावून घेतले. ‘मिळून सार्याजाणी’साठी लेख मिळवणे एवढाच त्यांचा उद्देश असता, तर त्यांनी नंदिनीसोबत एवढा वेळ घालविण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु त्यांच्यातला कार्यकर्ता आणि संपादक एकमेकांना पूरक असल्याने नवीन कार्यकर्त्यांना घडवणे आणि त्या अनुभवातून स्वतः घडणे यासाठी त्यांनी स्वतःचा भरपूर वेळ दिला आहे. कामाच्या अनुभवातून स्वतः माणूस म्हणून समृद्ध होण्याबद्दल त्या म्हणतात की, ‘माझ्या कामानं मला खूप शिकवलं, समजावलं आणि वाढवलंही.’ मला वाटतं, ही कृतज्ञतेची जाणीव आणि मनमोकळी अभिव्यक्ती हा स्त्रीत्वाशी जोडलेला लोभस गुण आहे. असे स्त्रीत्व, जे स्त्री-पुरुष दोघांच्या व्यक्तिमत्त्वात असावे.
महिलांवरील अत्याचारांसंदर्भात प्रत्यक्ष काम करणारी संस्था नारी समता मंच, गावोगावचे महिलागट म्हणजे सखी मंडळ, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, अक्षरस्पर्श ग्रंथालय आणि ज्याला विद्याताई सहावं बोट म्हणायच्या, तो पुरुषभानाविषयी काम करणारा ‘पुरुष उवाच’ हा गट असा विद्याताईंनी उभारलेल्या सामाजिक कार्याच्या ‘पैस’ परिवाराचा विस्तार आहे. या पलिकडे जाऊन विद्याताई महाराष्ट्र अंनिस, नर्मदा बचाओ आंदोलन अशा अनेक कामांशी जोडलेल्या राहिल्या. अंनिसने पुकारलेल्या शनि शिंगणापूरच्या सत्याग्रहात त्या तुरुंगातदेखील जाऊन आल्या. काही देवस्थानांमध्ये महिलांना मंदिरप्रवेश नाकारला जातो. त्याविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन, महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या बाजूने निकाल लागल्याने महाराष्ट्रात महिलांच्या मंदिरप्रवेशावर असलेले निर्बंध संपले. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी उपयोगी पडेल असे ‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग’ यंत्र महाराष्ट्रातील प्रत्येक सोनोग्राफी मशीनला लावावे, यासाठीदेखील विद्याताईंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असे त्यासाठी काम करणार्या गिरीश लाड यांनी सांगितले. महाराष्ट्र फौंडेशनने 2015 साली त्यांना दिलेला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या हजर राहू शकल्या नाहीत, तेव्हा जाणवले की विद्याताई आता आजारी पडताहेत, थकताहेत. त्यांनतर काही कामानिमित्त त्यांना फोन केला व त्यांनी उचलला नाही म्हणून (त्या लँडलाईन वापरायच्या व त्यांचा मोबाईलचा वापर अगदी मर्यादित होता) गीतालीताईंना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, तेव्हा कळले की, त्या कामानिमित्त कुठल्या तरी गावाला गेल्या होत्या! स्त्रीप्रश्नावर भूमिका घेऊन परिवर्तनाचे प्रयत्न करणार्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्या शेवटपर्यंत प्रवास करत, कार्यरत राहिल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रत्येक स्मृतिदिनाला त्या आवर्जून हजर असायच्या. माणसे मान्यताप्राप्त झाली की, एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी किंवा वक्ता म्हणून बोलावले तरच हजर राहतात किंवा स्वतःचे भाषण असेल, तेवढ्या वेळेपुरतीच उपस्थित राहतात. परंतु विद्याताईंच्या बाबतचे माझे निरीक्षण असे आहे की, स्वतःच्या कार्यक्रमाव्यतिरिक्तही त्या थांबायच्या, कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. मला वाटते हा देखील त्यांच्यातील स्त्रीत्वाचा आविष्कार आहे! स्वतः केंद्रस्थानी नसलेल्या ठिकाणी सहजपणे मिसळणे, त्यासाठी वेळ ठेवणे हे स्त्रीत्व प्रत्येक स्त्री-पुरुषात असायला हवे.
त्यांच्या एका लेखात विद्याताई म्हणतात की, लौकिकार्थाने किती अन्यायग्रस्त स्त्रियांना आम्हाला न्याय मिळवून देता आला, हे सांगणे कठीण आहे. पण अनेकींच्या मनात माणूस म्हणून जगण्याची जाणीव जागी करणं, ‘बाईचा जन्म म्हणून न व्हावे उदास,’ हे लक्षात ठेवत जगणे, या दृष्टीने मानसिकतेत थोडासा बदल नक्की घडून आला. स्त्रीप्रश्नासंदर्भात स्वतः काय करू शकू, हे विद्याताईंना नेमके उमगले होते आणि ते काम त्यांनी आजन्म निष्ठेने आणि आनंदाने केले.