नरेंद्रभाई

अरविंद गुप्ता -

बुद्धाने सांगितले, “समाजात नेहमी जीवन आणि मृत्यू यामधील शक्तींचा संघर्ष चालूच असतो. आपण कोणत्या बाजूचे आहोत, यांची निवड आपल्याला करावी लागते.गांधी मारेकर्‍याच्या गोळीने मारले गेले, मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) बंदूकधार्‍याच्या. त्याचप्रमाणे नरेंद्रभाई! पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र चिरकाल टिकेल.

माझ्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर नरेंद्रभाई होते. ते ‘आयुका’त डॉ. जयंत नारळीकरांना भेटायला यायचे. त्या दोघांनी मिळून फलज्योतिषावरील लोकांच्या विश्वासाला डळमळीत करणार्‍या एका चाचणीचे आयोजन केले होते. अनेक ज्योतिषांना त्यांनी मानसिक विकलांग असलेल्या व ठीकठाक असलेल्या मुलांच्या जन्मकुंडल्या दिल्या होत्या. ज्योतिषांना कोणती मुले मानसिक विकलांग आहेत व कोणती मुले सामान्य आहेत, याची माहिती नव्हती. त्या जन्मकुंडल्यांच्या आधारे त्या मुलांपैकी कोण मुले मानसिक विकलांग आहेत व कोण सामान्य आहेत, हे दाखवून द्यायचे होते. ज्योतिषांची भाकिते मोठ्या प्रमाणावर चुकीचीच निघाली होती.

नरेंद्रभाईंची ‘आयुका’मध्ये जेव्हा कधी फेरी व्हायची, तेव्हा ते हमखास आमच्या बाल विज्ञान केंद्रात डोकावायचेच. आम्ही करत असलेल्या विज्ञानप्रसाराच्या कामाबद्दल ते चांगलेच अवगत होते आणि त्याबद्दल त्यांना कौतुकही होते. ‘आयुका’कडे एक फिरते तारांगण होते. ते तारांगण घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दुर्गम खेड्यापाड्यांवर त्या तारांगणाचे कार्यक्रम करत असे.

माझी आणि नरेंद्रभाईंची जवळीक वाढण्याला एक योगायोग कारणीभूत ठरला. 2006 मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. यशपाल 80 वर्षांचे झाले. त्या निमित्ताने प्रा. माशेलकर यांनी यशपाल यांच्या गौरवार्थ भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थे (आयएनएसए) तर्फे दिल्लीतील ‘आयएनएसए’च्या प्रांगणात तीन दिवसांचा एक कार्यक्रम आयोजित केला. प्रा. माशेलकर त्यावेळेस ‘आयएनएसए’चे अध्यक्ष होते. त्या कार्यक्रमासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञ व कार्यकर्ते एकत्र आले होते. योगायोगाने माझी आणि नरेंद्रभाईची राहण्याची व्यवस्था आयोजकांनी ‘त्या’ तीन दिवसांसाठी एकाच खोलीत केली होती. दररोज रात्री आम्ही उशिरापर्यंत विविध विषयांवर गप्पा मारत असू. त्यांना पिंपरी-चिंचवडला साने गुरुजी बाल ग्रंथालय उभे करायचे होते. त्यासाठी ते महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायला गेले. त्यांना बघताच आयुक्त खुर्चीवरून उठले आणि त्यांच्या पाया पडायला लागले आणि म्हणाले, “मी विद्यार्थी असताना नरेंद्रभाईंनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो.”

सकाळी मी जागा होण्याच्या आधीच नरेंद्रभाई उठलेले असायचे आणि त्यांचा व्यायाम चालू झालेला असायचा. अत्यंत शिस्तबद्ध असलेल्या नरेंद्रभाईंनी आपले आयुष्य सामाजिक न्याय आणि पुरोगामी सुधारणांसाठी वेचले. त्यांचे एक मोठे भाऊ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तर दुसरे भाऊ श्रीपाद दाभोलकर जैविक शेतीतील तज्ज्ञ होते. पुरोगामी दाभोलकर कुटुंबाचा महाराष्ट्राच्या विकासात मोठा वाटा आहे.

2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी म्हटले आहे, “कोणी लिहिलेले वाचले म्हणून, कोणी सांगितले म्हणून, विश्वास नको ठेवूस. तुझ्या विवेकाला पटले तरच मान्य कर.”

मला वाटते, हाच बुद्धाचा संदेश नरेंद्रभाई लोकांना प्रश्न विचारायला उद्युक्त करत पुढे नेत होते. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा, जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे आहे आणि जे विवेक आणि पुराव्यावर आधारित आहे, त्यावरच विश्वास ठेवा.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. राज्याला सामाजिक सुधारणांचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय प्रजासत्ताकाला आकार देण्यात प्रभावशील असलेल्या 21 भारतीयांच्या विचारप्रक्रियेचे चित्रण रामचंद्र गुहा आपल्या ‘मेकर्स ऑफ इंडिया’मध्ये करतात. या 21 जणांपैकी जोतिबा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, ताराबाई शिंदे आणि हमीद दलवाई हे एकाच शहरातून आलेले आहेत. ते आहे – पुणे. ही एखाद्या शहरासाठी अनन्यसाधारण संख्या आहे. नरेंद्रभाई याच मालिकेतील सामाजिक सुधारक आहेत. बुद्धाने सांगितले, “समाजात नेहमीच जीवन आणि मृत्यू यामधील शक्तींचा संघर्ष चालूच असतो. आपण कोणत्या बाजूचे आहोत, यांची निवड आपल्याला करावी लागते.” गांधी मारेकर्‍याच्या गोळीने मारले गेले, मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) बंदूकधार्‍याच्या त्याचप्रमाणे नरेंद्रभाई. पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र चिरकाल टिकेल.

(अरविंद गुप्ता – पुण्याच्या ‘आयुका’मध्ये प्राध्यापक, तेथील बाल विज्ञान केंद्राचे प्रमुख; तर विज्ञान खेळणी निर्मितीतील तज्ज्ञ संशोधक. विज्ञान खेळण्यांच्या सहाय्याने लहान मुलांच्यात विज्ञानप्रसार करत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी सतत कार्यरत. 2018 साली पद्मश्री पुरस्कार.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]