प्रभाकर नानावटी -
प्रो. हरी मोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील ‘भगवान की चर्चा’ या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर अं. नि. वार्तापत्राच्या वाचकांसाठी देत आहे. या पुस्तकातील लेख १९५० च्या दशकात लिहिलेले असले, तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.
‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापीठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते. मैथिली भाषेतील सौंदर्य फुलवून सांगणार्या त्यांच्या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
त्या दिवशी खट्टर काका कुठले तरी सरबत पीत बसलेले होते. मला बघताच म्हणाले, “ये, ये, तू पण पी. खरंच लज्जतदार सरबत आहे. तिखट व गोड. तुला नक्की आवडेल.”
“काका, तुमच्या बोलण्यातच एवढा तिखटपणा असतो की हे सरबत त्यापुढे काहीच नाही.”
“अरे, माझ्या बोलण्यात तिखटपणाच जास्त असतो, हे मान्य. ज्यांना तिखटपणाची सवय नसते, ते पचन करू शकत नाही. मी तरी त्याला काय करणार? सवयीचा परिणाम. परंतु एक बाहेर – एक आत असले बोलणे मला आवडत नाही. रोखठोक व स्पष्ट बोलणार. म्हणूनच माझ्यावर ‘नास्तिक’ शिका पडला आहे.
“काका, खरं सांगा. आपण भगवंताला मानता की नाही?”
काका हसतच म्हणाले, “खरं सांगू का, मुळात भगवंतच मला त्याचा म्हणून मानत नाही. मी तर त्याला माझ्या मावसोबा म्हणून मानायला तयार आहे.”
“काय काका, नेहमीसारखी चेष्टा करता की काय?”
“अरे, गौतम ऋषींनी देवाला कुमार बनविला, उपनिषदांनी त्याला कोळीष्टक बांधणारा कोळी करून टाकला. वेदांनी तर त्याला जादूगार बनविले. एवढ्यावरच हे थांबत नाही. म्हणून मी त्याला माझ्या मावशीचा नवरा असेच मानतो.”
“काय हे, भगवंताचीसुद्धा चेष्टा?”
“अरे, सूरदासाने तर भतिभावाने त्याची इतकी चेष्टा केली आहे की मी त्याच्यापुढे काहीच नाही.”
“परंतु तो तुमच्या मावशीचा नवरा…?”
“इथे बघ, भाग्यलक्ष्मी व दरिद्रलक्ष्मी या सख्ख्या बहिणी-बहिणी. भगवंत भाग्यलक्ष्मीचा नवरा व मी दरिद्रलक्ष्मीचा मुलगा. तूच आता नातं ओळख. खुद्द भगवंतांनीच सांगितले आहे की जो कुणी माझी भक्ती करेल त्याचा मी.”
“खट्टर काका, हे काय सर्व गोष्टींची चेष्टा करता? जर भगवंत नसता तर ही सृष्टी कशी काय निर्माण झाली असती? म्हणूनच भगवंताला ‘निर्मिक’ म्हणतात.”
“त्यात विशेष काय ती नेहमीप्रमाणे झाली असती. या गावात तसे हजारो ‘निर्मिक’ आहेतच की.”
“काका, तुम्ही तर अगदीच दुसरे टोक गाठत आहात. माझ्या विचारण्याचा रोख असा होता की, सगळ्यात पहिल्या प्रथम या सृष्टीची निर्मिती करणारा कुणीतरी असलाच पाहिजे, एवढे तरी मान्य करायलाच हवे.”
“मान्य करायला माझी काही हरकत नाही. परंतु एक सोडून दुसरी फांदी पकडल्यास तुझ्या डोक्यावर या काठीचा प्रसाद मिळेल.”
“ठीक, मी माझ्या अगोदरच्या मुद्याला चिकटून असेन.”
“जर भगवंतांनीच हे सगळे केले असल्यास मग आपण सगळे त्याच्या हातातील बाहुलेच झालो की. तो जसा नाचवेल तसे आपण नाचायचे.”
“अगदी बरोबर…”
“जर तसे असल्यास साधू आणि चोर यांच्यात काही फरक असणार की नाही?”
“साधू चांगले कर्म करत असल्यामुळे तो उत्तम व चोर वाईट कर्म करत असल्यामुळे अधम.”
“खबरदार… आताच तू म्हणत होतास की जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेप्रमाणे. तोच भगवंत साधूच्या हातात माळ व चोराच्या हातात बनावट चावी देतो. तसे असल्यास साधू उत्तम व चोर अधम का? जी काही तक्रार करायची ती भगवंताकडे कर.”
“अहो काका, तुम्ही मला एवढ्या पेचात पकडता की त्यातून बाहेर पडण्यास रस्ताच सापडत नाही. काही का असेना, भगवंताची माया अपरंपार आहे. त्याला कुठलीही गोष्ट अशक्यातली नाही. त्याला काय हवे ते तो करू शकतो.”
“तसे असल्यास मी एक प्रश्न विचारतो. भगवंत आत्महत्या करू शकतो का? विष पिऊन किंवा फासावर लटकून मरू शकतो का?”
“काका, तुमच्या डोक्यात असले विचार येतातच कसे? भगवंताला आत्महत्या करावीशी का वाटेल? गीतेतील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे यदा यदाही धर्मस्य… जेव्हा जेव्हा पृथ्वीवरील अधर्म वाढेल तेव्हा तो आपणहून अवतार घेतो.”
“भगवंताच्या मते अधर्म म्हणजे नेमके कोणते ज्यामुळे तो अवतार घेतो?”
“अधर्म म्हणजे हिंसाचार आणि दुष्टाचार.”
खट्टरकाका हसत हसतच म्हणाले, “या गोष्टी भगवंताला पसंत नाहीत…?”
“अजिबात पसंत नाहीत.”
“एकदा तू म्हणतोस की या विश्वाचा रक्षणकर्ता तो आहे, तो सर्वव्यापी आहे. नंतर तूच म्हणतोस की जेव्हा जेव्हा धर्माचे नुकसान होते तेव्हा हा भगवंत अवतार ग्रहण करून पृथ्वीवर येतो. हा तुझा भगवंत समदर्शी आहे, समानता मानतो. भेदाभेद करत नाही, भक्तवत्सलही आहे असे तूच काही वेळा पूर्वी म्हणत होतास. एकीकडे अद्वैतवादाची भाषा करतोस व दुसर्याच क्षणी पाप-पुण्यावरून भेद करतोस. मला वाटते, तू पूर्णपणे जंजाळात फसत चालला आहेस.”
माझ्या उतरलेल्या चेहर्याकडे बघत काका म्हणू लागले, “एकच काय ते धरून ठेव. एखादी वेश्या धंदा करत असते, तेव्हा ती स्वयंप्रेरणेने करते की भगवंताच्या प्रेरणेने? जर भगवंताच्या प्रेरणेने करत असल्यास तिला अशा आडमार्गावर नेल्याबद्दल भगवंतच दोषी ठरेल. ती स्वतःच्या प्रेरणेने करत असल्यास तुझा भगवंत रक्षणकर्ताही नाही व सर्वव्यापीसुद्धा नाही.”
“खट्टर काका, यावर मी काय बोलणार? या दोन्हीत एकावर फुली मारणे योग्य ठरणार नाही. भगवंताच्या इच्छेविना जगातील एक पानही हलत नाही. आणि व्यभिचाराचा दोष भगवंताच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही.”
“हे बघ, मला माझी काठी उगारण्यास भाग पाडू नकोस. एकाच गोष्टीला चिकटून रहा. जगातली प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनुसारच होत असते ना?”
“अगदी बरोबर.”
“बरं, आता मी तुला या काठीने मारू लागल्यास ती पण भगवंताचीच इच्छा असे म्हणता येईल का?”
“…………”
मी काही बोलत नाही हे बघून काका म्हणाले, “अरे बोलत का नाहीस? जगातील प्रत्येक घटना भगवंताच्या इच्छेनुसारच होत असल्यास जगात रोज घडणारे हत्या, खून, मारामारी, बलात्कार या सगळ्यांचा दोष त्याच्या माथीच मारायला हवा.”
“काका. भगवान हा दयाळू आहे. गजेंद्रमोक्षातील गजराजावर संकट कोसळल्यावर स्वतः सुदर्शनचक्राने हल्ला चढवून त्याला वाचविला. द्रौपदीचे भर सभेत वस्त्रहरण होऊ नये म्हणून तिला अखंडपणे साड्या पुरवणारा भगवंतच होता. पूतना राक्षसीण विष पाजत असली, तरी तिच्यावर राग न धरता तिला मातेसमान वर्तणूक दिली. असे त्याच्या दयाळूपणाचे हजारो उदाहरण देता येईल. काका मला एवढेच माहीत आहे की, भगवंत करुणामयी व सर्वशक्तिमान आहे.”
“असेच काही तरी असावे, हे क्षणभर मान्य करू या. असे असल्यास या जगातील दुःखं का संपत नाहीत? याची फक्त दोन कारणं असू शकतील. एक, भगवंताच्या मनात दुःख दूर व्हावेत अशी इच्छाच नसेल. दोन, त्याला इच्छा आहे परंतु तो त्यासाठी काहीही करू शकत नाही. जर त्याच्या मनात इच्छाच नसल्यास तो क्रूर आहे. जर दूर करू शकत नसल्यास तो असमर्थ आहे. त्यामुळे तो करुणामयी व सर्वशक्तिमान असे तू कसे काय म्हणू शकतोस?”
“खट्टर काका, तुम्ही अशा प्रकारच्या शंका उपस्थित करू लागल्यास कट्टर आस्तिकाचे मनसुद्धा दोलायमान होऊ लागेल. तुम्हीच सांगा की भगवंत आहे की नाही?”
खट्टरकाका हसतच म्हणाले, “अवश्य आहे. फक्त त्याने निर्माण केलेली ही सृष्टी बघून स्वतःचे मन तो रिझवत असेल किंवा आपणच त्याची निर्मिती करून आपापली मनं रिझवत असू.”
“अहो काका, तुम्ही भगवंत ही फक्त एक कल्पना आहे असेच मानता की काय?”
सुपारीचा तुकडा तोंडात टाकत टाकत काका म्हणाले, “नाही रे, वास्तवात भगवंत जगात असतात. भगवंत म्हणजे ज्यांचे भाग्य खुललेले असेल ते. भाग्य नसल्यास भगवंत नाही. मातीशिवाय कुंभार मडकं तयार करू शकत नाही तसेच भाग्य नसल्यास भगवंत काहीही करू शकत नाही. ज्याच्याजवळ जास्त भाग्य तितकाच मोठा भगवान. ज्यांच्याजवळ हे भाग्य नाही ते सर्व अभाग्यवान वा अभगवान. त्यांना या सृष्टीशी काही देणंघेणं नाही.”
“अहो काका, भांगेच्या नशेत तुम्ही भगवंतालासुद्धा न सोडता हवेत तरंगत आहात. आपण आपला दुष्ट तर्क सोडायला तयार नाही.”
“अरे क्षुद्र पामरा, माझे वाडवडील तर्क आणि विनोद या दोन्ही गोष्टीत पारंगत होते, हे तू विसरलास की काय? त्यामुळे तर्क व विनोद हे दोन्ही आमचे जन्मसिद्ध अधिकार आहेत. आमच्याच एका पूर्वजाने एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, जो कोमल काव्यकलेत स्वतःचे कौशल्य दाखवू शकतो, तो नकीच तर्काची कठोर भाषेचा प्रयोग करून आपल्या पांडित्याचा परिचयही देऊ शकतो. गंमत म्हणजे याच तर्कबुद्धीच्या जोरावर प्रत्यक्ष भगवंतालाच त्यांनी आव्हान दिले व म्हणाला, भगवंता, इतका तू गर्व करू नकोस की माझे अस्तित्व पूर्णपणे तुझ्या आधीन आहे. आमच्यासारख्या बुद्धिवंताच्या घोळक्यात तुझे अस्तित्व आमच्याच आधीन असते, हे विसरू नकोस. भुरट्या चोरासारखा चेहरा लपवून का राहतोस? सामर्थ्य असेल तर समोरासमोर येऊन प्रकट होऊन आपल्या अस्तित्वाचा पुरावा का देत नाहीस? केवळ ऐकीव गोष्टीवरून तुझे अस्तित्व सिद्ध होत नाही. कदाचित ते अरण्यरुदनही असू शकेल.”
“काही का असेना, तास-दोन तास भगवंताबद्दल (बाष्कळ) चर्चा केली तरी कोटी कोटी अपराधांना भगवंत क्षमा करतो यावर आस्तिकांची श्रद्धा असते. कदाचित माझे काही अपराध या तुमच्या भगवंतानी नकीच माफ केले असावेत.”
तितक्यात समोरून पंडितजी दिसले. गंगेत स्नान करून उघड्या अंगाने, तोंडाने काही तरी पुटपुटत नदीवरून परत येत होते.
पापो पाप कर्मा पापामा पापसंभवः
त्राहि मां पुंडरीकाक्ष सर्वपापहरो हरीः
हा श्लोक काकांच्या कानी पडला. “पंडितजी, हे काय म्हणत आहात? या हीन भावनेमुळेच आमच्यासारख्यांचे व्यक्तिमत्त्व कुंठित झाले आहे. त्याऐवजी
पुण्योडहं पुण्यकर्माडहं पुण्यात्मा पुण्यसंभवः
प्रसीद पुंडरीकाक्ष सर्वपुण्यमयो हरीः
हा श्लोक का म्हणत नाही? भगवंतासमोर स्वतःला पापी म्हणून घोषित करता व त्याच्याकडून अभयही मागता. भगवंत धर्मात्मांचा रक्षण करतो की पाप्यांचा? आणि खरोखरच तुम्ही स्वतःला पापी का समजता? जर सगळे तुम्हाला पापी म्हणू लागले तर तुम्हाला ते सहन होईल का? भगवंतापाशी खोटे का बोलता?”
पंडितजी थोडेसे घाबरतच म्हणाले, “तुमच्यासमोर काही मंत्र वा श्लोक म्हणणेसुद्धा फार कठीण होत आहे. दीनबंधू दीनानाथ नेहमीच दीनता दाखवतो.”
“पंडितजी, दीनांचा कुणी बंधू नसतो. हा दैन्यभाव सोडून द्या व थोडासा कणखरपणा दाखवा.”
मी म्हणालो, “खट्टरकाका शरणागती हा एक परम धर्म आहे.”
खट्टरकाका म्हणाले, “धर्म म्हणजे नेमके काय हे तुला माहीत आहे का?”
“धर्माविषयी आपल्यासारख्यांच्या समोर मी काय बोलणार? फक्त मला एवढे माहीत आहे की महापुरुषांनी आखून दिलेल्या मार्गावरून जाणे, हा धर्म आहे.”
“तुला जितके सरळ व साधे वाटते तेवढे ते सोपे नाही. भगवान महावीराचा अहिंसा परमो धर्मः हा मार्ग होता. रामभक्त हनुमानाचा मार्ग शठे शाठ्यम् समाचरेत् हा होता. दोन्ही महापुरुष पूजनीय आहेत. आपण कुठल्या मार्गावरून जायचे व कुठला मार्ग सोडून द्यायचा?”
मी म्हणालो, “खट्टरकाका, दया ही परमो धर्मः असे सांगितले जाते. सर्व जीवावर दया दाखविणे हाच धर्म आहे.”
खट्टर काका म्हणाले, “मला जरा नीटपणे समजावून सांग. माझे अंथरूण ढेकणांनी भरलेले आहे. मग त्यांना रात्र न् रात्र माझे रक्त पिण्यास सोडून देऊ का? माझ्या पोटात जंत आहेत. त्यांना मारण्यासाठी औषध घ्यायचे नाही का? डासांना मारण्यासाठी फ्लिटचा फवारा मारायचे की नाही? घरात साप आल्यास त्याला तसेच सोडून देऊ का? आपण सर्व जिवावर दया दाखवित बसल्यास आपण आपला जीव गमावून बसू.”
“मग हिंसेशिवाय जिवंत राहू शकत नाही का?”
काका म्हणाले, “निसर्गाचा नियमच आहे की जीवो जीवस्य भक्षंं… लहान माशाला मोठा मासा खाणार. त्या माशाला आणखी मोठा मासा खाणार. हा मत्स्यन्याय संपूर्ण जगात चालतो. घोड्यांनी गवताशी दोस्ती केल्यास खाणार काय? भक्ष्य-भक्षकामध्ये प्रेम कसे काय असू शकते?”
मी गप्प बसलेलो बघून काका पुढे सांगू लागले, “या जगात ज्या जीवाला भक्षण करण्याचे सामर्थ्य आहे तोच जीव टिकतो. अहिंसेचा अर्थ कुणाचे तरी भक्ष्य होणे हेच असेल तर सगळ्यात जास्त अहिंसक असलेल्या गांडुळासारखे रहायला हवे. हे गांडूळ कुणाची काही बिघडवत नाही. कुणीही यावं व त्याला पायाखाली तुडवून टाकावं. माझा तरी अशा अहिंसेवर अजिबात विश्वास नाही.”
मी म्हणालो,”काका, जरी सगळ्या प्राणीमात्रांवर दया दाखविणे शक्य होत नसल्यास निदान मनुष्यप्राण्यावर तरी दया दाखवली पाहिजे.”
“सगळे मनुष्य दयेस पात्र असतात का? समजा, आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी शत्रू आपल्या हद्दीत घुसले आहेत. त्यांच्यावर काय दया दाखवायची का? अगदी आदरपूर्वक स्वागत करायचे का? सरबत, पान-सुपारी देऊन त्यांना खूष करायचे का? तुमचा गळा कापण्यासाठी आलेल्यांना आलिंगन द्यायचे का?”
“त्यांना प्रेमाने जिंकायचे.”
“हेच मला कळत नाही. समजा, एखादा दहशतवादी तुमच्या घरात घुसला आहे. मग त्याला काय पंख्याने वारा घालायचे? गुलाबपाणी शिंपडून अत्तर लावून आगत स्वागत करायचे? त्याची आरती ओवाळायची? त्याच्या गळ्यात हार घालायचे? काय करायचे?”
“शत्रूचे हृदय परिवर्तन करायला हवे.”
“तोच पहिल्यांदा तुमच्यात परिवर्तन करेल. बघता बघता बाँब उडवून तुमचे तुकडे तुकडे करेल. गाजर-काकडीसारखे तुम्हाला कापून ठेवेल. घरातल्या पोरीबाळींवर हात टाकेल. त्याला काय बागेत हिंडवून आणायचे का? अहिंसेचा पुजारी म्हणून पूजा करत बसणार का? प्रेम कीर्तन करत बसणार का?”
पंडितजी मध्येच म्हणाले, “मनुस्मृतीत धर्माची दहा लक्षणं सांगितली आहेत.
धृति क्षमा दमोस्तेयं शौचमिंद्रियनिग्रहः
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्”
खट्टर काका हसतच म्हणाले, “पंडितजी, हा पळपुट्यांचा धर्म असून ज्याच्या हातून काही होत नाही, त्यांच्यासाठीचा हा धर्म आहे. दुर्बलांना अशा धर्माची गरज भासते. नाजूक प्रकृती असलेल्यांसाठी हातपाय न हलवण्यासाठी हे निमित्त लागते. परंतु जे सबल आहेत त्यांना अशा धर्माची गरज भासत नाही. पांडवांनी जर धैर्य दाखविले नसते तर महाभारत युद्धच झालं नसतं. प्रभू रामचंद्रांनी रावणाला क्षमा करायचे ठरवले असते तर लंकादहन झालं नसतं.”
मी विचारले, “मग धर्मांची स्थापना का झाली?”
“अरे वत्सा, हाताखालच्या कष्टकर्यांना तू धैर्य धर; अर्धपोटी राहिलास तरी त्याच्यात समाधान मानून घे; कुणी मारलं-बिरलं तरी शांत रहा; मनाचा तोल बिघडून घेऊ नकोस; कशाचीही आशा धरू नकोस; चोरी करू नकोस; खोटं बोलू नकोस; मन लावून दिलेलं काम कर; जीभ व इतर इंद्रियांवर नियंत्रण ठेव; हुशारीने व समजून उमजून काम कर; मार मिळाला तरी राग मानू नकोस… अशा प्रकारे शारीरिक श्रम करून जगणार्यांना शिक्षण देण्यासाठी हे धर्म अवतरले आहेत. धर्माच्या दहा लक्षणांचा मर्म असे आहे. हे सर्व धर्म, अजाण मुलं, महिला व वंचितांसाठी बनवलेले आहेत. जे सामर्थ्यवान असतात त्यांचा धर्म अगदी वेगळाच असतो. महाभारताच्या शांतिपर्वातच लिहून ठेवले आहे की अन्यो धर्मः समर्थानामं निर्बलानातू चापरः
“सामर्थ्यवानांचा धर्म तरी कोणता?” मी.
“ज्यामुळे त्याची इच्छापूर्ती होती तो. मग ते बंदुकीच्या जोरावर असो की बाँबवर्षाव करून असो. सामान्य व्यक्ती जेव्हा एखाद्याचा खून करते, तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. परंतु युद्धात सैनिक शेकडोंनी माणसं मारतात तेव्हा त्यांना वीरचक्र प्रदान केले जाते. त्यामुळेच असे म्हटलेले आहे की समूहे नास्ति पातकम्… पाण्याच्या तांब्याला कावळ्याने शिवल्यास ते अशुद्ध होते. परंतु गंगेत शेकडो कावळ्यांनी अंघोळ केल्यास गंगा अशुद्ध होत नाही.”
पंडितजी म्हणाले,”व्यासांनीच परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् असे म्हटले आहे.
मी म्हणालो,”खट्टर काका, जे दुसर्यावर उपकार करतात वा दुसर्याची पीडा दूर करतात ते पुण्य व दुसर्यांना पीडा देतात ते पाप हे आम्हाला अगदी लहानपणापासून शिकविले जाते.”
काका म्हणाले, “हे विधानच दुराचाराला पुष्टी देणारे आहे. दुसर्याची पीडा दूर करणे हेच धर्म असेल तर कामपीडित स्त्रीला संतुष्ट करणे हेसुद्धा धर्माचरणच होईल.”
पंडितजी म्हणाले, “हा कसला वितंडवाद?”
“मी काय माझं पदरचं सांगत आहे का? कुमारिलभट्ट यांनीच ‘श्लोकवार्तिक’ या त्यांच्या ग्रंथात ‘उपकारालाच धर्म म्हणायचे ठरविल्यास गुरुपत्नीगमन करणारासुद्धा धार्मिक ठरेल’, असे लिहून ठेवले आहे. या सर्व शंका-समाधानाबद्दल तुम्ही कधीच विचार करणार नाही. त्याऐवजी मला दोष देत बसता.”
“खट्टर काका, याबद्दलचे तुमचे विचार काय आहेत?” मी.
काका हसतच म्हणाले, “अरे, माझे विचार कधी तरी निश्चित स्वरूपात असतात का? ते नेहमीच बदलत असतात. तरीसुद्धा माझाच एक सिद्धांत आहे. माझ्यापासून एखादी उपकाराची कृती घडल्यास ते पुण्य व माझ्यामुळे दुसर्यांना कष्ट होत असल्यास ते पाप…”
माझ्याकडे बघत ते म्हणाले, “हे बघ, परमार्थाचे चक्र स्वार्थाच्या रस्त्यावरूनच जात असतो. दान काय उगीचच केले जात नाही. काही वेळा प्रसिद्धीसाठी, काही वेळा स्वर्गात पोचण्यासाठी. यात कुठला ना कुठला स्वार्थ असतोच. स्वार्थाचे तेल संपले की परमार्थाचा दिवा विझूनच जातो.”
“परंतु जप-जाप्य करणारे इतके कष्ट का घेतात?” मी.
“अरे, काही लोकांची अकल फार विचित्र असते. त्यांना असे वाटते की शरीराला जितके जास्त कष्ट दिले की तेवढे जास्त धर्म पदरी पडतो. त्यामुळे काही जण चंद्रायन व्रत करतील, काही जण पंचाग्नी साधन करतील, काही जण तर एका पायावर तासन्तास उभे राहून तपस्या केल्यासारखे करतील. काही जण जंगलात जातील, काही जण काटेरी खिळ्यांच्या शय्येवर झोपतील, काही जण मौनीबाबा होतील. इतर काही जण दूर्वांच्या वा बेलाच्या पानाचे रस पिऊन आयुष्य काढतील.”
पंडितजी म्हणाले,”अहो, हे सर्व साधनेचे प्रकार आहेत.”
“कसली साधना घेऊन बसला आहात पंडितजी? हे साधना नव्हेत तर साध्य आहेत. नाम, दाल वा काम तृप्तीसाठी.”
“परंतु निवृत्ती मार्ग सगळ्यात वरचा आहे.” पंडितजी.
“निवृत्तीमार्ग हतबलांसाठी. जे निष्क्रिय आहेत ते नैष्कर्म्यवादाचा पदर पकडतात. जे निराश आहेत ते उदासीनतेचे नाट्य वठवतात. जे निष्कांचन आहेत ते कांचनाची निर्भत्सना करतात. त्याग व वैराग्याच्या गोष्टी लाचारांच्या तोंडी शोभून दिसतात.”
“संतोषः परम सुखम्.” पंडितजी.
खट्टर काका म्हणाले, “या फक्त सांगोवांगीच्या गोष्टी आहेत. भरल्यापोटी तत्त्वज्ञान सांगायला कुणाचे काय जाते? त्यांची प्रशंसा करणारेही भरपूर जण असतात. परंतु आपल्या कठीण प्रसंगी ते त्यांचे खरे स्वरूप उघड करतात.”
“खट्टर काका, ब्रह्मचर्याबद्दल तुमचे काय मत आहे?” मी.
काका हसतच म्हणाले, “ब्रह्मचर्याचा अर्थ ब्रह्मासारखी चर्या. ब्रह्म नपुंसक आहे. त्यामुळे ब्रह्मचर्यचा अर्थनपुंसकवत् आचरण.”
पंडितजी म्हणाले,”तुम्ही तर सगळ्याच गोष्टींचा विपर्यास करत आहात. ब्रह्मचर्य म्हणजे वीर्यरक्षा! मरणं वीर्यपातेन; जीवनं वीर्य धारणात्!
काका म्हणाले,”माझ्या मते, जीवनं वीर्यपातेन! मरणं वीर्यधारणात्व! सगळ्या पुरुषांचे वीर्य वीर्यपेढीत संग्रह करून ठेवू लागल्यास ही सृष्टी कशी होणार? वीर्यपातातूनच जीवांची निर्मिती होते.
“मग काय ब्रह्मचारी असणे मूर्खपणाचे आहे की काय?” पंडितजी.
काका हसतच म्हणाले, “ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे ते वेगळ्या अर्थाने ब्रह्मचारी होऊ शकतात. त्यांच्या मते, ब्रह्मचा अर्थ स्वच्छंद, त्या अर्थाने ब्रह्मचारी म्हणजे स्वच्छंदाचारी. जसे संन्यासी म्हणजे सम्यक प्रकारचा न्यास करणारा. याच कारणामुळे ही मंडळी सामाजिक बंधनं तोडून टाकतात. काही जण तर कपडेसुद्धा न घालता दिगंबर वा ‘नागबाबा’ होतात. आपल्यासारखे घर-गृहस्थी करणारे मात्र गृहस्वामी होऊन बैलासारखे जू खांद्यावर घेऊन आयुष्य काढत असतात. परंतु हे बैरागी गोस्वामी होऊन, गावात देवाला सोडलेल्या वळूसारखे स्वच्छंदी जीवन जगत असतात.”
“हे सर्व योग साधना करतात की! ते सगळे व्यर्थ समजायचे की काय?” पंडितजी.
खट्टर काका नशेत असल्यासारखे बोलू लागले, “मग ऐका. सगळ्या योगाचा उद्देश फक्त भोगच असतो. काहींना असे वाटते की नाक दाबून धरल्यामुळे स्वर्गाची दारं उघडली जातात. इथे कुंडलिनी योग केल्यास तेथील कुंडलिनी अप्सरा मिळेल. जे स्त्रीला नरकाची खाण समजतात तेच स्त्रीभोगासाठी स्वर्गात जाण्यासाठी आतुर असतात. रंभेच्या भोगाची आशा धरून नवस बोलतात. तिलोत्तमा मिळावी म्हणून तिळावर पाणी सोडतात. स्वर्गाचे दार हे भ्रम आहे असे लोकांना कळल्यास पूजा-पुरस्काराच्या या खोट्या नाटकावर कायमचा पडदा पडेल. चंद्रमुखी मिळत नाही असे कळल्यावर गोमुखीसुद्धा यांना चालते. षोडशी मिळत नाही हे कळल्यास एकादशी का नाकारतील?”
“अहा, काय उपमा अलंकारांची उधळण चालली आहे!” मी.
खट्टर काका म्हणाले, “यात केवळ उपमा-अलंकार नाहीत. यथार्थसुद्धा आहेत. वारांगनेला आपण वारांगना नाही, असे कळू लागल्यास स्वर्गातील देवांगना, म्हणून ती राहू शकेल. अगदी मोठमोठे महात्मासुद्धा पुण्यक्षय झाल्यानंतर मर्त्यलोकात जन्म घेतात. परंतु रंभा, ऊर्वशी, मेनका, तिलोत्तमा आदी अप्सरा चिरयौवनाचे वरदान लाभल्यासारखे सुखात लोळत असतात. कुठल्या तरी कुलवधूला असले भाग्य मिळाल्याचे ऐकिवात आहे का?”
“अहो काका, कुठे कुलवधू व कुठे वेश्या?”
काका म्हणाले, “जितकं अंतर एक वाटीभर पाणी व बारा महिने वाहणारी गंगा नदीत आहे तितकेच अंतर या दोघीत आहे. एकीला क्षुद्र समजायचे व दुसरीला उदात्त मूर्ती. जे शरीर फक्त एकाच व्यक्तीसाठी उपयोगात येते ते कसलं शरीर? अनेकांच्या उपयोगी येणारे शरीरच खरे शरीर.
परोपकारार्थमिदं शरीरम् किंवा परोपकाराय सतां विभूत
पंडितजी म्हणाले,”वेश्या तर शरीरसुखासाठी पैसे मोजून घेते.”
काका म्हणाले, “वेश्या तर काही निश्चित वर्षे पैसे घेते. परंतु भार्या आजीवन घेत असते. जिला कायम भरावे लागते तीच भार्या. फरक एवढाच की भार्या फक्त एकाला सुख देते तर वेश्या अनेकांना. भागवत पुराणातसुद्धा हे लिहिले आहे. एका पतीशी संसर्ग होत असल्यास पतिव्रता; दोघांशी असल्यास कुलटा; तिघांशी असल्यास घर्षिणी; चार जणांशी असल्यास पुंश्चली; पाच – सहा जणांशी असल्यास वेश्या; सात-आठ असल्यास पुंगी व त्यापेक्षा जास्त असल्यास महावेश्या!
दारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्”
पंडितजी म्हणाले,”अहो वेश्या तर नरकगामिनी असते.
“मग जरा धर्मशास्त्र पडताळून पहा. गृहिणी आजीवन पतिसेवा करत असल्यास ती वैकुंठाला जाईल. एकदा जरी तिच्या हातून चूक घडल्यास यमदूत तिच्या मागे लागतील (ब्रह्मवैवर्त). वेश्या मात्र हसत खेळत बोलून आपले सर्व काही समर्पित करत असल्यास ती विष्णुलोकात पोचेल (भविष्यपुराण, उत्तरपर्व ४/१११)
भगवान विष्णूसुद्धा वेश्यांवर प्रसन्न आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मुक्तीचा मार्ग अगदी सोपा करून ठेवला आहे. कदाचित, त्यामुळेच स्वर्गलोकात वेश्यांचा भरणा जास्त आहे. फक्त एकच अडचण आहे. स्वर्गात गेल्यास धर्मभ्रष्ट होण्याची शक्यता जास्त.”
हे ऐकून पंडितजी जास्त चिडून म्हणाले, “अहो, तुम्ही तर उलटी गंगा वाहात आहात. स्वर्गात गेल्यास धर्मभ्रष्ट कसे होईल? काहीतरीच…”
काका म्हणाले, “बघा पंडितजी, समजा तुमचे सर्व पूर्वज स्वर्गात गेलेले आहेत व आपणही स्वर्गात जाणार आहात. परंतु भोगण्यासाठी अप्सरा त्याच आहेत. रंभा, ऊर्वशी, मेनका, तिलोत्तमा… युगानुयुगे त्याच स्वर्गवासीयांची तृप्ती करत आहेत. जणू काही आपण भैरवी क्षेत्रीच गेल्यासारखे. त्यामुळेच तेथे गेले की धर्मभ्रष्ट होतात असे मला वाटते.”
पंडितजी म्हणाले,”काय हे, नेहमीच तुम्ही सर्व गोष्टींची थट्टा-मस्करी करता? सतीधर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म दुसरा कुठलाही नाही.”
काका हसत हसत म्हणाले, “पंडितजी, सतीधर्मापेक्षा अधिक प्रबल असा निसर्ग धर्म आहे. या निसर्ग धर्मामुळे संपूर्ण सृष्टीचे व्यवहार शक्य होत आहेत. विवाह हे तुम्ही आम्ही ठरवलेले कृत्रिम बंधन आहे. बंधनं घालताही येतात व तोडताही येतात. काहींच्या मते तर एकपत्नीची प्रथा पूर्वीच्या काळी नव्हतीसुद्धा!”
पंडितजी म्हणाले,”म्हणजे… पातिव्रत्य ईश्वरीय आज्ञा नाही का?”
“पुराणातील काही गोष्टी वाचताना असे प्रश्न विचारावासा वाटतो की जर ईश्वरीय आज्ञा असती तर तो स्वतः भगवान स्त्रीचे पातिव्रत्यभंग कसे काय करू शकतो?”
पंडितजी म्हणाले,”तो तर पुराणातला पौराणिक ईश्वर आहे. मी निर्गुण, निराकार ब्रह्माबद्दल बोलत आहे.”
काकांना हसू आवरेना. ते म्हणाले, “पंडितजी, निराकार ब्रह्माला याच्यात का ओढता? एकांतातील स्त्री-पुरुषांच्यामध्ये घुसून त्यांना कळू न देता मजा बघत बसणार्याला येथे का आणता?”
पंडितजींचा राग अनावर झाला. “तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्माला शिव्या देता. ईश्वरीय आज्ञा नसती तर पातिव्रत्य धर्माचा उदय कसा काय झाला?”
काका म्हणाले,”हे पाहा, लोकायत दर्शनात असे म्हटले आहे की दुर्बल असलेल्या चलाख पतींनी आपल्या पत्नींना सुस्वरूपी व तारुण्याने मुसमुसणार्यांपासून दूर ठेवण्यासाठी पातिव्रत्य धर्माची स्थापना केली. स्वतःचा गळा व आपल्या पत्नीचे स्तन त्यांच्या मुठीत सापडू नये म्हणून धर्माचा हा एवढा फापटपसारा वाढवला आहे.”
“तुम्हाला नेहमीच सर्व गोष्टींमध्ये खोचच दिसते.”
काका म्हणाले, “अगदी बरोबर. परंतु पंडितजी, ज्याला तुम्ही पातिव्रत्य म्हणता ते खर्या अर्थाने व्यभिचारच आहे.”
पंडितजी थोड्याशा रागानेच म्हणाले, “तुम्ही तर कबीरांच्या अगदी विरुद्ध टोकाची भूमिका घेत आहात.”
“पंडितजी, तुम्हीच जरा विचार करून बघा. व्यभिचाराचा अर्थ सामान्य नियमांना अपवाद. सामान्य नियम कशाला म्हणतात? व्यापक नियमांना. आता बघा, सृष्टीचे व्यापक नियम काय आहे? नर व मादी यांच्या संयोगातून गर्भ तयार करणे. यासाठी एवढे शंख फुंकण्याची, शहनाई वादनाची गरज काय होती? कपाळाला कुंकू लावणे, गळ्यात मंगळसूत्र बांधणे या अवडंबराची गरज काय होती? स्त्रीला एवढा नट्टा-पट्टा करण्याची गरज काय होती?”
“…..” पंडितजी काही बोलू शकले नाहीत.
खट्टर काकाच पुढे म्हणाले, “प्राणिमात्रांना मैथुनाचे स्वातंत्र्य असते. फक्त मनुष्य प्राणीच या नैसर्गिक नियमाचे उल्लंघन करून स्त्रीला चार भिंतीत कोंडून ठेवतो. म्हणूनच मी पातिव्रत्य धर्माला अपवाद समजतो व त्याला व्यभिचार म्हणतो.”
पंडितजी कंटाळले होते. कुठले तरी दुसरे सूक्त म्हणत ते तेथून निघून गेले.
मी म्हणालो, “खट्टर काका, धन्य आहे तुमची. बाकी काही का असेना, तुमच्या प्रतिवादामुळे सतीधर्माला नकीच धका बसेल.”
“अरे, माझ्यासारख्या अर्ध्या-कच्च्याच्या बोलण्यातून सतीधर्माला कसला धका बसणार? ऋषी-मुनी व स्मृतिकार व्यभिचाराचे इतके जाहीर समर्थन करतात की त्यामुळे सतीधर्माला कधीच धका बसला नाही.”
“काका, काय सांगता? स्मृतीत कुठे व्यभिचाराचे समर्थन केले आहे?”
“हे बघ, स्मृतीतच लिहिले आहे की न स्त्री दुष्यति जारेण. (जार कर्मामुळे स्त्री दूषित होत नाही.) रजसा शुद्धते नारी (रजःस्रावानंतर स्त्री शुद्ध होते.)
अर्थात, शूद्र स्त्रीच्या पोटात गर्भ वाढत असला, तरी तिचा त्याग करू नये. पुन्हा पुष्पवती झाल्यानंतर ती सोन्यासारखी शुद्ध व निर्मळ होते. कामिनी व कांचन सूर्य-चंद्राच्या किरणांइतके शुद्ध असतात. ज्या प्रकारे ढगामधून पडणार्या पावसात दोष नसतो, ज्या प्रकारे हवेतील धुलिकणांचा दोष नसतो, त्याप्रमाणे स्त्रिया, मुलं व वृद्धांना कुठलाही दोष लागत नाही. परंतु गंमत अशी आहे की सामाजिक परिस्थितीनुसार श्रुती-स्मृतीतही शुद्धतेची व्याख्या बदलत गेली.”
मी म्हणालो,”खट्टर काका, तुमचा स्वर्गावर विश्वास आहे की नाही?”
खट्टर काका म्हणाले,”जरी एखादा तरी स्वर्गाहून परत येऊन स्वर्ग आहे असे सांगितल्यास माझा त्यावर विश्वास बसला असता. आजपर्यंत एकही जण परत आला नाही व जे त्यावर विश्वास ठेवतात, ते तेथे कधीच गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानावर मी विश्वास का ठेवावा?”
“काका, यात तथ्य नसल्यास इतकी वर्षे ते टिकले कसे?”
“अरे, पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या शय्यासुखांनी तृप्ती मिळत नाही. तहान भागत नाही. जीवन मर्यादित असते. शरीरातील शक्ती अल्प असते. काही वर्षांनंतर वृद्धत्व येणार हे नकी. तोपर्यंत सगळा खेळ संपत आलेला असतो. परंतु शय्यासुखाची आशा व त्याची तहान कमी होत नाही. त्यामुळे आकाशपुष्पांची कल्पना लढवत असतात. मनातील मांडे खात असतात. मृत्यूनंतर आपण अशा जागी जावे की रोज पंचपवान्ने मिळतील, शेजसुखासाठी अप्सरा असतील. पाहिजे तितके सोमरसपान होऊ शकेल. अगदी सासर्याच्या घरी गेल्यासारखे होईल. त्याच्या आदरातिथ्यापेक्षा हजारपट. सासर्याच्या घरीएकाच स्त्रीवर सोळा आणे अधिकार गाजवता येतात. परंतु स्वर्गात सोळा हजार स्वरूपसुंदरींवर अधिकार सांगता येतो. त्याशिवाय त्या सर्व अक्षय यौवना. तुम्हाला अडविण्यासाठी तिथे कुणी मेव्हणा-सासरा नसणार. इतकी मजा आणखी कुठे मिळणार?”
मी म्हणालो,”काका, तुम्ही सगळ्याच गोष्टी थट्टा मस्करीवर नेता. खरं सांगा, खरोखरच धर्म हा प्रकार काय आहे?”
काका म्हणाले, “अरे, मुण्डे मुण्डे मतिर्भिन्ना. कोण म्हणतो आत्मा रक्षण करतो. कणादचे वेगळे मत आहे. जेमिनीची परिभाषा वेगळी.”
“काका, आपण कुणाचे मत ग्राह्य धरता?”
“मी सर्वांचीच मते ग्राह्य धरतो. फक्त त्यांच्यावर माझे भाष्य असते. ज्यामुळे आत्मरक्षा मिळेल, शरीर धारण शक्य होईल, जास्तीत जास्त आनंद मिळेल, सृष्टीचा प्रवाह अव्याहत चालत राहील तोच खरा धर्म.”
“परंतु अनेक धार्मिकांचे मत आहे की सर्वांत मोठा धर्म सत्यधर्म आहे.”
काका म्हणाले,”हे मात्र असत्य आहे. समज, कुणी तरी तलवार घेऊन तुझ्या मागे तुला काटण्यासाठी धावत आल्यास तू कुठेतरी लपून बसशील. मग मी काय त्याला खरं खरं सांगावं की काय? हे काय सत्यरक्षा धर्म की प्राणरक्षा?”
“मग शाश्वत धर्म कुठला असतो, हेच मला कळेनासे झाले आहे.”
खट्टर काका म्हणाले,”मोठमोठ्यांच्याही समजण्याच्या पलीकडे आहे. म्हणूनच असे सांगितले जाते की, त्या गुहेत प्रत्यक्ष प्रवेश केल्याशिवाय धर्माचे मर्म कळणार नाही.”
माझ्या प्रश्नार्थक चेहर्याकडे बघत ते म्हणाले, “कुठल्या गहन विचारात तू पडला आहेस? असा कुठलाही धर्म नाही की तो सदा सर्वकाळ लागू होईल. देश-काल-पात्र यांच्या अनुसार धर्म बदलत असतो. सर्व धर्म सापेक्ष आहेत. त्या काळची अवस्था व परिस्थितीवर त्या निर्भर असतात. निरपेक्ष व एकमेव असा धर्म नावाची वस्तू जगातच नाही. महाभारतातील शांतिपर्वातच हे लिहून ठेवले आहे.”
“मग इतके धर्मशास्त्र का लिहिले गेले?”
“ज्यांनी अकल गहाण ठेवली आहे त्याच्यासाठी हे धर्मशास्त्र लिहिलेले आहेत. जे बुद्धिमान आहेत ते स्वतः आपापले मार्ग शोधून काढतात.” असे म्हणत खट्टर काका निघून गेले.
– प्रभाकर नानावटी
***
डिस्क्लेमर : हा लेख कुणाच्याही भावना दुखवण्यासाठी लिहिलेला नसून धर्माच्या संबंधातील एक (गमतीशीर) विचार एवढाच त्यामागचा हेतू आहे, याची कृपया नोंद घ्यावी.