डॉ. अतिश दाभोलकर -
डॉ. अतिश दाभोलकर हे सैद्धांतिक भौतिक–शास्त्रज्ञ असून अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरॅटिकल फिजिक्स (आय सी टी पी) या संस्थेचे ते संचालक आहेत. स्ट्रिंग थियरी, कृष्णविवरे, पुंजकीय गुरुत्व हे त्यांच्या अभ्यासाचे व संशोधनाचे विषय आहेत.
२०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा पारित व्हावा यासाठी प्रयत्न चालू असताना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी डॉ. अतिश त्यांच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून तीन आठवडे भारतात आले होते. कायदा मंजुरीला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः एक वेबसाइट तयार केली. या वेबसाईटच्या माध्यमातून तीन हजार वैज्ञानिक आणि जवळपास एक लाख नागरिकांनी या कायद्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला. नुकतेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २०२३ च्या वार्षिक विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरील त्यांचे चिंतन श्रोत्यांसमोर मांडले.
(जानेवारी २०२४ अंकापासून पुढे…)
ज्याने कोणीही विज्ञानावर काम केलेलं असेल त्याला विज्ञानातून आपण काही एक वैश्विक व सर्वंकष सत्य प्राप्त करून घेतलेलं आहे याविषयी शंका ठेवणं खरोखरच अशक्य आहे. उदाहरणार्थ, दगड जर आपण खाली टाकला तर तो न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच खाली पडेल हे आपल्याला माहीत आहे. दगड फेकला तर त्याचा अन्वस्तीय गतिमार्ग (पॅरॅबोलिक ट्रॅजेक्टरी) कसा असेल किंवा रॉकेटचा भ्रमणमार्ग कसा असेल अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपण न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम व कलनशास्त्राचे गणित (कॅल्क्युलस) वापरून शोधू शकतो. तो विचार आपण मुंबईत केला काय, लातूरला केला काय किंवा लंडनमध्ये केला काय, या सर्व ठिकाणी दगड त्याच रितीने न्यूटनच्या त्याच नियमाने जाणार याविषयी कुणाच्या मनामध्ये शंका असण्याची खरंतर अजिबात गरज नाही. त्यामुळे वैज्ञानिक विचारपद्धतीवर केला जाणारा हा हल्ला अनेक पातळींवर हास्यास्पद वाटू शकेल असा आहे. या भूमिकेतील मिथ्य काय आहे हे बघायच्या आधी आपण त्यातलं तथ्य काय आहे ते समजावून घेऊ.
विज्ञानावर होणार्या या तिन्ही हल्ल्यांमागच्या प्रेरणा मी समजू शकतो. वसाहतवादाचा विरोध ही एक त्यामागची महत्त्वाची प्रेरणा आहे ज्यावर उत्तर वसाहतवादी विचार आधारित आहे. दुसरी प्रेरणा नवगांधीवादी किंवा हिंदुत्ववादी स्वदेशी भूमिकेतून येणारी आहे.
ही गोष्ट खरी आहे की गेल्या काही शतकांत इतिहासाचे अतिशय युरोपकेंद्रित लिखाण झाले आहे. त्यामुळे जसे काही युरोप सोडून इतरत्र कुठे विज्ञान निर्माणच झाले नाही आणि ही काही फक्त युरोपची जगाला फार मोठी देणगी आहे अशी भूमिका मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे. आक्रमक युरोपचा असा दुरभिमान बाळगणारा युरोशोव्हिनिझम वसाहतवादाच्या काळामध्ये आणि अजूनही अस्तित्वात आहे याविषयी कोणाच्याच मनामध्ये शंका नाही. पूर्वी वसाहती वर्चस्वाखालील जे भारतासारखे देश होते त्यांचा अभिमान आणि त्यांची आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मसन्मान यावर हल्ला करणारा हा युरोकेंद्रित विचार काही प्रमाणात वंशद्वेषी सुद्धा आहे. त्यामुळे आपण युरोपकेन्द्रित किंवा युरोपियन दुरभिमान बाळगणार्या वक्तव्यांची नोंद निश्चित घेतली पाहिजे आणि त्याचा प्रतिवाद केला पाहिजे.
खर्या अर्थाची ‘स्वदेशी’ भूमिका आपण निश्चितच घेऊ शकतो. भारतामध्ये ब्रह्मगुप्त, माधवाचार्य यांसारख्या गणितज्ञांनी गणितामध्ये किंवा कलनशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे जे योगदान केलेले होते ते बर्याच वेळा आपल्याला माहीत नसते. उदा. माधवाचार्यांनी न्यूटन आणि लायबनिट्झ यांच्या दोनशे वर्षे आधी कलनशास्त्रातील काही महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढल्या होत्या. आणि हे आपल्याला माहिती सुद्धा नसते. यातून सिद्ध हेच होतं की, युरोपियन वसाहतवादाचा एक मोठा नारा जो गेली अनेक वर्षे वाजतोय, त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या परंपरांपासून कदाचित वंचित झालो असू.
परंतु त्याचं उत्तर हे नाही की, त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळामध्ये आमच्याकडे विमाने होती. युरोपकेंद्रित विचारामुळे भारताचे किंवा युरोपबाहेरील लोकांचे योगदान पूर्ण नाकारण्याची जी भूमिका आहे त्याची एक प्रतिक्रिया म्हणून ‘आमच्याकडे सगळेच होते’ असे म्हणण्याचा एक दुसरा प्रकार झालेला आहे. अशा प्रकारची दुरभिमानी दुसर्या टोकाची भूमिका घेणे हे स्वीकारार्ह नाही आणि त्याचा आपण त्या रितीने प्रतिवाद केला पाहिजे.
त्याचप्रमाणे आशिष नंदींचे हे विधान आहे की science is no less determined by culture and society than any other human effort. आता एका पातळीवर हे म्हणणे खरे आहे. उदाहरणार्थ, वैज्ञानिक संशोधनाला किती संसाधने मिळतील त्यात कुणाला सहभाग घेता येईल, तुम्ही जर उच्चवर्णीय असाल तर तुम्हाला विज्ञान शिकण्याची जास्त संधी मिळेल इ. टीका कोणीही मान्य करू शकेल. पण त्यामुळे वैज्ञानिक सत्यच नाकरण्याची जी एक टोकाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामागे काही तथ्य आहे असं मला दिसत नाही.
आयुर्वेदामध्ये मानवी शरीराचे पित्त वृत्ती किंवा वात वृत्ती अशा ढोबळ वर्गीकरणावर आधारित काही आकलन होते व जडी-बुटी वापरून निरीक्षणांवर आधारित केलेले उपचार होते त्यातील काही गोष्टी ग्राह्यही आहेत. मात्र, आता आपण पेशींपर्यंत जाऊन जनुकांपर्यंत जाऊन जेवढ्या सखोलपणे मानवी शरीर समजावून घेऊ शकलो आहोत. त्यामुळे ज्या आधारावर आता आधुनिक विज्ञान उभे आहे व पारंपरिक उपचार पद्धती त्या दोन्हीमध्ये काहीच फरक नाही असं म्हणणे हे अतिशयोक्तीचे आहे.
या नव-गांधीवादी विचारांचे पडसाद आपल्याला महात्मा गांधींच्या विचारातही आढळतात. गांधींनी एकदा जेव्हा बिहारमध्ये भूकंप झाला, तेव्हा गांभीर्याने असं विधान केलं होतं की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये अस्पृश्यतेचे जे एक अघोरी पाप आहे, त्याची शिक्षा म्हणून हा भूकंप झाला. रविंद्रनाथ टागोरांसारख्या विचारवंतांनी एवढ्या मोठ्या नेत्याच्या या विधानाला मोठा आक्षेप घेतला होता. एक वैज्ञानिक म्हणून मी असं म्हणेन की, गांधींविषयी मला कितीही आदर असला, तरी हे विधान आपण स्वीकारू शकत नाही. कारण विज्ञानातील ज्या काही घटना आहेत त्या मानवी मूल्यांशी निगडित आहेत असं मानून जर आपण त्यांचे स्पष्टीकरण द्यायचे ठरवले तर आपण फार मोठ्या वैचारिक गफलतीमध्ये सापडू.
परंतु गांधींना जी एक सर्वोदयाबद्दल अतूट आस्था होती, त्या भूमिकेतून आपण जर विचार केला तर या विचारातील तथ्य असे आहे की, विज्ञान ही एक अभिजनांची मक्तेदारी आहे असे मानता कामा नये. कुठल्या तरी उच्चभ्रू वैज्ञानिक संस्थेमधील संचालकच फक्त आपल्याला विज्ञानाविषयी सांगू शकतात आणि त्यामुळे सामान्य माणसाला त्यामध्ये सहभाग घेण्याची शक्यताच नाही. अशा रितीने जर विज्ञान लोकांसमोर आले तर त्यातून एक नवीन ब्राह्मणवाद निर्माण होईल. त्याचा आपण विरोध केला पाहिजे.
त्यामुळे उत्तर आधुनिकवादी, नवगांधीवादी व हिंदुत्ववादी भूमिकांमागील प्रेरणा जरी मी समजू शकलो, तरी त्यातील तथ्य थोडेच आहे आणि मिथ्य अमाप असे दिसून येते. हे खरे आहे की, बर्याच वेळा वैज्ञानिक संसाधनांची उपलब्धता व त्यामुळे विज्ञानाची निर्मिती सामाजिक व आर्थिक हितसंबंधांनी निश्चित होते. याविषयी आपण निश्चितच सजग राहिले पाहिजे. या भूमिकेशी अंनिसचे सगळे कार्यकर्ते किंवा सहकारी सहमत होतील. ही काही उघड तथ्ये स्वीकारार्ह आहेत. पण माझ्या मते, या विचारधारेच्या पाठीराख्यांनी त्यावर आधारित एक मोठे मिथ्य उभे केलेले आहे. विज्ञान म्हणजे आमच्या सामान्य माणसाच्या विचारपद्धतीवर किंवा वसाहतीतील लोकांच्या विचारपद्धतीवर युरोपियन वसाहतवाद्यांनी केलेला एक हल्ला आहे, असा खोटा अभिनिवेश ठेवणारी ती एक भूमिका आहे. काही प्रतिष्ठित विद्यापीठातील प्राध्यापकांनी मोठे-मोठे, जड शब्द वापरून लोकांना घाबरवून टाकणारे एक आभासी तत्त्वज्ञान त्याच्याभोवती उभे केले आहे. त्याला आपण अजिबात बळी पडता कामा नये.
कारण, या तिन्ही विचारप्रवाहात एक महत्त्वाची वैचारिक गफलत आहे. यावरील उघड आणि स्वीकारार्ह निरीक्षणांपासून ते एक असा मोठा आक्रमक निष्कर्ष काढतात की विज्ञानाची जी वास्तवाविषयीची सत्ये आहेत तीसुद्धा सगळी उच्चभ्रू आणि अभिजन लोकांच्या मक्तेदारीतून निर्माण झालेली आहेत. त्यामुळे वैज्ञानिक सत्य म्हणून काही अस्तित्वातच नाही. यांच्या मते, विज्ञान हे कोणतेही वस्तुनिष्ठ सत्य नाही तर केवळ एक सामाजिक मक्तेदारीने निर्माण केलेली संरचना आहे. अशा प्रकारची जी आक्रस्ताळी भूमिका या विचारप्रवाहांनी घेतलेली आहे त्याला कोणत्याच प्रकारचा आधार नाही. उच्चभ्रू आणि अभिजनांची मक्तेदारी असणारी, एक सत्यविहीन सामाजिक संरचना म्हणजे विज्ञान ही विज्ञानाची योग्य ओळख नाही किंवा युरोपीय दुरभिमानाला उत्तर म्हणून वैदिक दुरभिमान बाळगून हिंदुत्ववादी भूमिकेतून नवविज्ञानाकडे दुर्लक्ष केले तर त्यातून आपण केवळ एक मोठी आत्मवंचना करून घेत आहोत. त्याचप्रमाणे नव-गांधीवादी भूमिकेतून पददलितांविषयी किंवा आदिवासी रीतिरिवाजांविषयी खोटी आस्था दाखवून नवविज्ञानाला विरोध करणारी भूमिका घेतली तर अंतिमतः आपण एका मोठ्या जनप्रवाहाला विज्ञानाच्या सामर्थ्यशाली वैश्विक वारशापासून वंचित ठेवत आहोत.
मी असे म्हणेन, या ज्या तीन टीका वैज्ञानिक दृष्टिकोनावर होत आहेत त्याची अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या रितीने दखल घेतली पाहिजे. त्यातील तथ्य काय आहे ते समजावून घेतले पाहिजे. जे थोडसे तथ्य आहे ते तथ्य मान्य करायला आपल्याला काहीच हरकत नाही. पण त्यापासून जो एक भरमसाठ आणि अतिशयोक्ती करणारा निष्कर्ष काढला जातोय त्याचा आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे. आपल्या वैचारिक स्पष्टतेसाठी या गोष्टीची गरज आहे.
आता शेवटचा एक मुद्दा. काही प्रमाणात हा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनामध्ये असेल, पण मी माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगू शकेन. म्हणजे माझ्या परिवारातसुद्धा वसंत पळशीकर, देवदत्त दाभोलकर, मे. पु. रेगे यांच्याशी मी बोललो तेव्हा किंवा त्यांच्या काही लिखाणामध्येसुद्धा असं आढळून येतं की, कुठेतरी त्यांचा एका पारलौकिक तत्त्वावर विश्वास होता. त्याचबरोबर काही वेळा अंनिसवरती अशी टीकाही झालेली मला आठवतेय की, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या काही वैचारिक गोष्टींविषयी पुरेसा नीट विचार केलेला नाहीये. माझी त्या वेळेला अशी भूमिका होती की, अंनिसचे जे कार्य आहे ते इतके महत्त्वाचे आहे आणि ते कार्यकर्ते जे इतक्या चांगल्या रितीने काम करताहेत त्यांचा बुद्धिभेद करण्याऐवजी जर त्यांच्या विचारांमध्ये काही कमी असेल तर ती भरून काढण्याचा प्रयत्न करणं हे विचारवंतांचे काम ठरेल.
पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की, हा एक तात्त्विक मुद्दा आहे. तो तात्त्विक मुद्दा असा की कुठेतरी आत्मा किंवा एका पारलौकिक तत्त्वाला चंचुप्रवेश करून देण्याची बर्याच लोकांची एक मानसिक गरज असते आणि त्याच्यामध्ये चांगले मोठे विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, शंकराचार्यांपासून येणारा एक अद्वैती विचार आहे की तत् त्वम असि. ज्यानुसार मानवी चैतन्य किंवा consciousness या सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीमागे आहे. परंतु मला असं वाटतं, एक वैज्ञानिक म्हणून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून की सध्याचं जे आपलं विज्ञानाचं ज्ञान आहे त्याच्यावर आधारित असं कुठलं तरी एक चित्ततत्त्व (consciousness) विश्व व्यापून राहिले असेल की ज्यापासून सगळं विश्व निर्माण होतं या गोष्टीवर विश्वास ठेवणं आता जवळजवळ मुश्कील झालेलं आहे. म्हणजे आपण बघाल तर आता लक्ष दशलक्ष म्हणजे शंभर बिलियन तारे आपल्या स्वतःच्या आकाशगंगेमध्ये आहेत आणि अशा लक्ष दशलक्ष आकाशगंगा विश्वात आहेत. पृथ्वीसारख्या त्यातल्या एका नगण्य ग्रहावरील माकडापासून उत्क्रांत झालेल्या मानवाला जाणवणारे चित्ततत्त्व विश्वाच्या मुळाशी आहे असे म्हणणे अवघड आहे. आधुनिक विज्ञानाच्या भूमिकेतून आपण निखळपणे या विचारांचा त्याग केला पाहिजे.
परंतु त्याच्यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की विज्ञानाला काही मर्यादा आहेत का? किंवा आपण आत्मा आणि अशा प्रकारची पारलौकिक तत्त्वे जर एका निखळ जडवादी भूमिकेतून नाकारली तर नैतिकतेला काही एखादे अधिष्ठान आहे का? मला स्वतःला असं वाटतं की आपले जे काही उत्क्रांतीचे नियम आहेत, मनुष्याचे जे काही आकलन आहे त्यांच्या मर्यादेमध्ये विज्ञानावर आधारित असलेली नैतिकता आपण निश्चितच पाळू शकतो. ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण जगातील एवढा मोठा एक मानवी समूह इतके वेगवेगळे गुंतागुंतीचे कायदे आणि संविधान मानून सहकार्याने एकत्र राहू शकतो. याच्यातूनच ही गोष्ट सिद्ध होते की ज्या रितीने आपल्याला डोळे हे एक इंद्रिय आहे त्याच रितीने उत्क्रांतीमध्ये नैतिकतेच्या कल्पनेविषयी आपल्या मेंदूमध्ये एक आधार आहे आणि त्या आधारित आपण नैतिक वर्तन काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे. म्हणून मी असं म्हणेन की अंनिसचे जे कार्य चालू आहे ते त्यांनी जोमाने सुरू ठेवले पाहिजे. हे भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याच्यावर ज्या तीन प्रकारच्या टीका होताहेत त्या आपण समजावून घेतल्या पाहिजेत व त्यांचा प्रतिवाद केला पाहिजे.
त्याचबरोबर विज्ञानाच्या काही मर्यादा देखील आपण समजावून घेतल्या पाहिजेत. कारण कुठल्याही सामान्य व्यक्तीला, मला आणि तुम्हाला जीवनाला एक नैतिक आणि आध्यात्मिक आधार असण्याची गरज असते, पण तो मिळवण्यासाठी आपण विज्ञानाच्या बाहेर गेलं पाहिजे अशी जी एक कल्पना आहे त्याला काही आधार आहे, असं मला वाटत नाही. म्हणजे बर्याच वेळा टाळ्या घेण्यासाठी लोक असं म्हणतात की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. पण आध्यात्मिक दृष्टिकोन शेवटी काय आहे? तर व्यक्तीच्या पलीकडे जाणारी, मीपणाच्या पलीकडे जाणारी सर्वांना जोडून घेणारी मानवाच्या मनामधील ती एक वृत्ती आहे. मला असं म्हणता येईल की अशा वृत्तीची जोपासना करणारी, असा आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवणारी आणि एकमेकांचा आदर करणारी आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारी अशी एक वैज्ञानिक नैतिकता आपण वैज्ञानिक ज्ञानाच्या चौकटीत सांभाळू शकतो. हा विश्वास ठेवून आपण या सगळ्या आव्हानांना सामोरे गेलं पाहिजे.