‘बटरफ्लाय इफेक्ट’ म्हणजे काय?

प्रभाकर नानावटी - 9503334895

संगणक व/वा स्मार्टफोन्सद्वारे होत असलेल्या माहितीच्या आदानप्रदानांचा प्रचंड वेग आपल्याला थक्क करून सोडत आहे. या माहितीचाच वापर करत वैचारिक मांडणी करत असताना कित्येक विचारवंत त्यांच्या लेखनात कळतनकळत ‘बटरफ्लाय इफेक्ट’, ‘कॅच-22’चा विरोधाभास, अनागोंदी (केऑस), डार्क एनर्जी, कृष्णविवर, लॅप्लासचे भूत, मूरचा नियम इत्यादी प्रकारच्या काही संकल्पनांचा वापर करून आपला मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक वेळा या संकल्पना वाचकांना अगोदरच माहीत आहेत, असेच गृहित धरून विचारांची मांडणी केली जात असते. अशा प्रकारचे लेख वाचत असताना या संकल्पनांची नीटशी माहिती नसल्यास वाचनाचा वेग खुंटतो व या संकल्पनांची प्राथमिक माहिती समजून घेण्यासाठी वृथा कालहरण होऊ शकतो. संकल्पनांचे संदर्भ शोधत बसल्यामुळे अनेक वेळा विचारवंतांनी केलेली मांडणीच विसरली जाण्याची शक्यता जास्त.

मुळात या संकल्पना अत्यंत वेगळ्या संदर्भात वापरलेल्या असल्या तरी प्रतिभावंत लेखक आपले विचार स्पष्ट करण्यासाठी त्यांचा वापर करत असतात. त्यामुळे वाचकांना त्या विचारामागील नेमका आशय पटकन समजू शकेल. शिवाय फसव्या विज्ञानाचे समर्थन करत अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे नेहमीच अशा संकल्पनांचे विकृतीकरण करून आपले मुद्दे सामान्यांच्या माथी मारण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी प्रतिवाद करण्यासाठी अशा संकल्पनांची योग्य माहिती असल्यास त्यांचे प्रयत्न उधळून लावणे शक्य होईल. अशा काही संकल्पनांची प्राथमिक माहिती देणारे हे सदर वाचकांना नक्कीच आवडेल.

बटरफ्लाय इफेक्ट’

हजारो किलोमीटर दूर असणार्‍या फुलपाखराच्या पंखांची फडफड आपल्याकडे तुफान आणू शकते का? अंदमानमध्ये एक छोटे फुलपाखरू उडताना त्याच्या पंखांमधून येणार्‍या हवेच्या तरंगामुळे मुंबईमध्ये वादळ येऊ शकते का? न्यूयॉर्कमध्ये आलेल्या वादळाला ब्राझीलमध्ये उडणार्‍या फुलपाखराचे तरंग कारणीभूत ठरतील का? अशा प्रकारचे वृत्तपत्रातील जाड मथळे वाचताना हे सर्व अशक्य किंवा अनाकलनीय वाटतात ना? पण गणिताच्या अनागोंदी सिद्धांतानुसार (‘केऑस थिअरी’नुसार) हे शक्य आहे. या नियमाला ‘द बटरफ्लाय इफेक्ट’ असे म्हणतात. हा प्रश्न वातावरणाचा अभ्यास करणार्‍या एड्वर्ड लॉरेन्झ या शास्त्रज्ञाने ‘असोसिएशन फॉर द एडव्हान्समेंट ऑफ सायन्स’च्या बैठकीत पहिल्यांदा जगासमोर केला होता.

एखाद्या फुलपाखराने पृथ्वीच्या एका कोपर्‍यात आपले पंख फडफडवले तर त्यामुळे पृथ्वीच्या दुसर्‍या भागात चक्रीवादळ निर्माण होऊ शकेल, अशी ही कल्पना! हे अर्थातच शब्दश: घ्यायचं नाही. परंतु छोटे बदल मोठ्या बदलाला जन्माला घालू शकतात, हा विचार अंतर्मुख करणारा आहे. एके ठिकाणी पर्यावरण प्रदूषित करणारा माणूस दुसर्‍या ठिकाणी होणार्‍या जीवितहानीला कारणीभूत ठरतो, हे चिंताजनक आहे. पूरपरिस्थिती आली की आपण साहजिकच नियोजनाचा अभाव, राज्यकर्ते, हवामान खातं अशा संन्याशांना (काही प्रमाणात) फाशी देतो; परंतु चोर सुटून जातो, त्याचं काय?

हवामान बदल, जागतिक तापमानातील वाढ, प्रदूषण, अतिवृष्टी-अनावृष्टी, ढगफुटी, महापूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळ इत्यादी गोष्टींचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने गणितीय प्रारुपांचा वापर केला जातो. त्यासंबंधी असलेल्या हजारो घटकांचा विचार करावा लागतो. इतिहासातील नोंदी तपासाव्या लागतात. त्यापैकी एखाद्या घटकात जरी चूक झाली तरी अंदाजात फार मोठा फरक पडतो. असे का घडते, याचे विश्लेषण करण्यासाठी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ ही संकल्पना उपयोगी पडते.

एड्वर्ड लॉरेन्झ यांनी या सिद्धांताचा वैज्ञानिक अभ्यास केल्यानंतर दिसून आले की कोणत्याही मोठ्या घटनेच्या सुरुवातीच्या परिस्थितीत झालेल्या अगदी लहान किंवा सूक्ष्म बदलामुळे भविष्यात एक वेगळाच पण मोठा परिणाम दिसून येतो. यालाच ‘फुलपाखरू प्रभाव’ (‘द बटरफ्लाय इफेक्ट’) हे नाव त्यांनी दिले. या प्रभावाचा खोलवर जाऊन अभ्यास केल्यास आपल्या वैयक्तिक जीवनातील, व्यवसायातील, बाजारपेठेतील आणि इतर बर्‍याच काही समस्या सोडवण्यासाठी नवीन दिशा मिळू शकतात, असे विचारवंतांना वाटते. आपल्याला अतिक्षुल्लक वाटणारी चूक आपले फार मोठे नुकसान करू शकेल, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. एखादी क्षुल्लक घटना इतिहासालाच कलाटणी देणारी ठरू शकते, याचा अंदाजच आपल्याला येत नाही. अशा प्रकारे हा फुलपाखराचा प्रभाव आपल्या जीवनाचाच प्रवाह बदलू शकतो.

संगणक व इंटरनेटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंदाज घेत असलेले तज्ज्ञ ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ही संकल्पना नेहमी मांडत असतात. मोबाइल फोनपासून फ्रीजपर्यंत आणि कॉम्प्युटरपासून इलेक्ट्रिक व/वा वाहकविरहित चारचाकी गाड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गोष्टी एकत्रितरित्या प्रकाशाच्या वेगात एकमेकांच्या संवाद-संपर्कात असतील. कदाचित येऊ घातलेल्या ‘फाइव्ह जी’ लाटेमध्ये हे सर्व वेगाने घडेल. बिग डेटा आणि क्लाउड तंत्रज्ञान व ‘फाइव्ह जी’ यांचा एकत्रित परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार आहे. ‘फाइव्ह जी’ म्हणजे आताच्या ‘फोर जी’च्या वीसपट अधिक वेग! आताच अनेक गोष्टी थ्री-डी प्रिंटिंगने तयार होऊ लागल्या आहेत. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी/व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी या गोष्टींचा वापर वाढत जाणार आहे. म्हणूनच या सर्व वेगवान घडणार्‍या तंत्रज्ञानाच्या तडाख्यात फुलपाखरासारखे चोळामोळा न होण्यासाठी हा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ जाणून घ्यायला हवा!

लेखक संपर्क ः 95033 34895


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]