उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून पत्नीच्या पावित्र्याची घेतली परीक्षा!

अंनिस -

पिडीत महिलेसोबत दुष्कर्म करणार्‍या पोलीसावर गुन्हा दाखल

पत्नीच्या पावित्र्याची उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून परीक्षा घेण्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यात समोर आला आहे. पारधी समाजातील या दुर्दैवी महिलेची चित्रफीत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली आहे. विशेष म्हणजे परांडा येथे 11 फेबु्रवारी रोजी घराबाहेर पडलेल्या या महिलेवर एका पोलिसासह दोघांनी अत्याचार केल्याची माहितीही समोर आली आहे. चार दिवसांनंतर तिला घरी सोडल्याने पतीने तिच्या पावित्र्याची परीक्षा घेतली.

ही घटना जेवढी भयानक आणि अस्वस्थ करणारी आहे, तेवढेच भयानक व दाहक वास्तव या घटनेच्या मुळाशी आहे. या घटनेची चित्रफीत तिच्या पतीनेच सोशल मीडियावर टाकली होती. ही घटना आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यातील एका झोपडपट्टीमधील. 16 फेबु्रवारीला घडली. जबरदस्ती करताना दिसणारा चित्रफितीमधील मनुष्य हा महिलेचा नवरा आहे. भाड्याच्या चारचाकी गाडीवर चालक म्हणून तो काम करतो. त्याचे नाव अप्पाशा व त्याची बायको कुशा (दोघांची मूळ नावे बदलली आहेत.) माहेरी जाण्यावरून 11 फेबु्रवारीला नवरा-बायकोमध्ये किरकिर झाली. त्यानंतर कुशा उस्मानाबादमधल्या आपल्या आई-वडिलांकडे 11 फेबु्रवारी रोजी संध्याकाळी निघाली. परंड्यातल्या खासापुरी चौकात उभी असताना एक जण तिला मोटारसायकलीवरून जबरीने घेऊन गेला. त्याने तिला उसाच्या फडात नेले. त्याने व परंडा पोलीसमधील एका पोलिसाने तिच्यावर दुष्कर्म केले. चार रात्री, चार दिवस हा प्रकार चालू होता. दरम्यान, तिचा नवरा अप्पाशा हा तिला सगळीकडे शोधत फिरत होता. उस्मानाबादमधील सिव्हिल हॉस्पिटल, बायकोच्या माहेरी आदी ठिकाणी तिचा शोध घेतला. 15 फेबु्रवारी रोजी कुशाला सोडून देण्यात आले. ‘कुणाकडे याची वाच्यता केली, तर तुम्हा दोघा नवरा-बायकोला पेट्रोलने जाळून टाकू,’ असा दम आरोपींनी दिला. पत्नी घरी आल्यानंतर अप्पाशा तिला सतत ‘एवढे दिवस कुठं होतीस?’ हे खोदून-खोदून विचारत होता. ‘त्या दोघांनी तुझ्याबरोबर काय केले,’ असे तो विचारत होता; पण दोघा जणांनी केलेल्या दमबाजीमुळे कुशा नवर्‍याला काही सांगत नव्हती. ‘काहीच केले नाही,’ असे म्हणत होती. तेव्हा खरे काय आणि खोटे काय, हे तिच्याकडून वदवून घेण्यासाठी 16 फेबु्रवारी रोजी अप्पाशाने उकळत्या तेलातून नाणे काढण्याचा अघोरी प्रकार केला. स्वत:चा व नवर्‍याचा जीव वाचावा म्हणून कुशा खरे काही सांगत नव्हती. तिने खरे बोलावे म्हणून तो प्रयत्न करत होता. हा प्रकार चालू असताना स्वत: नवरा चित्रफीत तयार करत होता. नंतर त्याने ही चित्रफीत सोशल मीडियावर टाकली.

पारधी समाजातील प्रथा

पारधी समाजामध्ये याबाबतची प्रथा आहे. खरे बोलत असलेल्या महिलेने देवाचे नाव घेऊन उकळत्या तेलातून नाणे काढले, तर तिला काही होत नाही. ती खोटे बोलत असेल, तर तिला पोळते व तेलातून जाळ निघतो, असा समज पारधी समाजात आहे. त्यातूनच ठिकठिकाणी असे प्रकार घडत असतात. ‘पारधी समाजातील भावांनो-बहिणींनो, मी बायकोला तेलात हात घालायला का लावतोय, हे तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत त्याने सर्व कहाणी पारधी भाषेत बोलून दाखवली आहे. ‘तो माणूस व पोलीस मला फक्त घेऊन गेला. काहीच केले नाही,’ असे बायको सांगते. तिने खरे सांगावे यासाठी हे करत असल्याचे त्याने चित्रफितीमध्ये म्हटले आहे.

अंनिसच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल :

पिडीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेवून तिच्यावर दुष्कर्म करणार्‍या दोघांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये एका पोलीसाचाही समावेश आहे. पिडीत महिलेच्या पतीवरही गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. गोविंद पाटील, निशा भोसले, मधुरा सलवारू, उषा शहा, ब्रह्मानंद धडके यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तेजस्वी सातपुते मॅडम यांची भेट घेवून त्यांना या प्रकरणाची गंभीरता पटवून दिली. त्यामुळे त्यांनी पोलीसांना आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. झिरो नंबरवर सोलापूर ग्रामीण पोलीसांनी गुन्हा नोंदवून तो परांडा जि.उस्मानाबाद येथे गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुढील तपासासाठी पाठविला. या प्रकरणाचा पाठपुरावा अंनिसच्या ‘जात पंचायत मूठमाती अभियाना’चे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला. या प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोर्‍हे यांनी बहुमोल मदत केली.

दरम्यान, पिडीत महिलेला सोलापूर जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून तिला कपडे व इतर साहित्य अंनिसच्या कार्यकर्त्या निशाताई भोसले यांनी पोहोच केले. तसेच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि अंनिसचे कार्यकर्ते अ‍ॅड. देवीदास वडगावकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]