थैमान करोनाचे … थैमान छद्मविज्ञानाचे

डॉ. प्रदीप पाटील - 9890844468

बुवा-पंडित-महाराज-ज्योतिषी वगैरेंनी कोरोनावर एक नवीन पॅथीच शोधून काढली आहे. ही पॅथी धर्म आणि संस्कृतीने जन्माला घातलीय. या पॅथीचे नाव आहे ‘यज्ञोपॅथी.’ अशा भन्नाट कल्पना डोक्यात भुता-आत्म्याची हवा भरलेल्यांच्या मधून निर्माण न झाल्यास नवलच. गयेतील गोदावरी नदीवरील मंदिरात पाच दिवस रूद्रचंडी महायज्ञ झाला. या ‘यज्ञोपॅथी’त हॉस्पिटलची जागा यज्ञ घेतो. औषधांची जागा ‘जपजाप्य’ घेतो. यातले प्रमुख औषध आहे ‘कोरोना स्वाहा’ मंत्रजाप. व्हायरस म्हणजे दैत्य. रोगनिवारण म्हणजे दैत्यसंहार.

येत्या पंधरा ऑगस्टला पंतप्रधान 75 वे भाषण यावर्षी करणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय विज्ञानमंत्री व आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक फतवा काढला आहे. ‘गो विज्ञान’ हवे तसे पुढे वेगाने सरकत नाही, म्हणून सर्व मंत्र्यांच्या खात्यांना इशारा दिलाय आणि ताबडतोब ‘गाय व त्यांची उत्पादने’ यामागील विज्ञान या सरकारच्या उपक्रमास चालना द्यावी, असा आदेश दिलाय.

‘सूत्रा-पिक’ असे नाव दिलेल्या भारतीय सरकारच्या या उपक्रमात काय-काय आहे, गोबर आणि गोमूत्र यांचे अफाट उपयोग – यापासून टूथपेस्ट, शॉम्पू, डासनाशके आदी वस्तू तयार करणे, कॅन्सर, डायबिटीस आदी रोगांवर औषधे म्हणून त्याचा वापर करणे इत्यादी अनेक गोष्टी आहेत. 2017 मध्ये या उपक्रमास नाव दिले होते – ‘स्वारूप’ म्हणजे सायंटिफिक व्हॅलिडेशन अँड रिसर्च ऑन पंचगव्य. पंचगव्य म्हणजे गाईचे शेण, मूत्र, दूध, दही, लोणी, तूप! आता हा उपक्रम ‘सूत्रा-पिक’ बनलाय. यासाठी 174 शोधनिबंधही आलेत. हे विज्ञान-तंत्रज्ञान खात्याच्या अधिकार्‍याने जाहीर केलेय.

ते हेच आरोग्य मंत्रालय आहे, जे कोरोनाचा वध करायला निघालेय, गायत्री मंत्राने! गायत्री मंत्र म्हटल्यावर कोरोना व्हायरस खरोखरच मरतो का? मंत्र पुटपुटल्यावर खरोखरच कोविड रोग बरा होतो का, या प्रश्नाने हिंदुस्थानी सरकारला पछाडलेय.

– आणि म्हणून या सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मंत्राचा कोविड रोगावर परिणाम कोणता होतो, यासाठी चक्क संशोधन करायचे ठरवले आहे. त्यासाठी लाखो रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था हे संशोधन करणार आहे. हे संशोधन सहजपणे व स्वैर करण्यात येणार आहे. असे असेल तर या संशोधनात एक विनोद दडला आहे. कोविड रुग्णांना दिली जाणारी आधुनिक औषधे चालू ठेवून त्यांच्यावर मंत्राचा कोणता परिणाम होतो का, हे पाहिले जाणार आहे. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, मंत्राचा परिणाम रोगावर किती व कसा होतो, हे पाहायचे असेल तर त्या रोगावर चालू असलेले औषध हे बंद करायला हवे, तरच संशोधनाचे परिणाम अचूक समजतील; म्हणजेच मंत्रामुळे रोग बरा झाला की औषधामुळे, अशी शंका उपस्थित होणार नाही. पण हिंदुस्तान सरकार करणार्‍या या संशोधनात असा नेमकेपणा नाही. उद्या निष्कर्ष जाहीर झाले तर ते निष्कर्ष विश्वास ठेवण्यासारखे नसणार. कारण हे सरकार सांगू शकणार नाही की, कोव्हिड बरा झाला तर नेमका तो औषधाने की मंत्राने?

या संशोधनाची दुसरी गंमत देखील आहे. योगाशिक्षक आणि डॉक्टर दोघेही या संशोधनात सहभागी होणार्‍या रुग्णावर उपचार करणार आहेत; म्हणजे उपचार करणारे जेव्हा एकापेक्षा अनेक होतात, तेव्हा रोग कोणत्या उपचाराने बरा झाला किंवा नाही झाला, हे कळणे शक्य नाही.

या संशोधनात तिसरी गंमत आहे. संशोधन हे अशाच रुग्णांवर होणार आहे, ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार नाहीत. जे निरोगी आहेत आणि ज्यांना कोव्हिड झालेला आहे, कोव्हिडची आतापर्यंत उपलब्ध झालेली माहिती असे सांगते की, मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार असणार्‍यांमध्ये रुग्णांना कोव्हिड जास्त धोकादायक ठरून रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते. जे निरोगी आहेत, त्यांना कोव्हिडपासून मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. यातही रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर रोग बरा होणार की नाही, हे ठरते. ही प्रतिकारशक्ती निरोगी व्यक्तींमध्ये चांगली असते. रोगी व्यक्तींच्या तुलनेत निरोगी व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर संशोधन हे अशाच व्यक्तींवर व्हायला हवे, ज्यांची प्रतिकार शक्ती ही ढासळलेली असते; पण हिंदुस्थान सरकारच्या या अफलातून चाचणीमध्ये निरोगी व्यक्तींवर फक्त संशोधन करण्यात येणार आहे. 100 कोव्हिड रुग्णांपैकी 96 टक्के स्वतःची प्रतिकारशक्ती व आधुनिक औषधांमुळे पूर्ण बरे होत आलेले आहेत. या 96 टक्क्यांनी कुठलेही मंत्र म्हणून स्वतःला झालेला कोव्हिड आजार बरा केलेला नाही.

या संशोधनाची चौथी गंमत अशी आहे की, एकाच वेळी प्राणायम आणि गायत्री मंत्र दोन्ही वापरले जाणार आहेत. मग निष्कर्ष जेव्हा निघतील, तेव्हा प्राणायम, गायत्री मंत्र की आधुनिक वैद्यक; यापैकी कशामुळे रुग्ण बरा झाला, हे ठरवायचे कसे, हे काहीही सांगितलेले नाही.

अशा भुसभुशीत पायांवर उभे असलेले हे तथाकथित संशोधन निश्चितपणे भुसभुशीत निष्कर्ष देणार आहे. खरे तर या संशोधनाला ‘अवैज्ञानिक संशोधन’ असेच म्हणणे योग्य ठरणार आहे. यात कोणतेही वैज्ञानिक निकष पाळले गेलेले नाहीत.

पाचवी गंमत या संशोधनाची आहे. ती अशी की, RT-PCR ही टेस्ट निगेटिव्ह आली की, रुग्ण मंत्रोपचाराने बरा झाला, असे घोषित केले जाणार आहे. RT-PCR ही टेस्ट सुरुवातीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह येते आणि उपचार सुरू केल्यानंतर कालांतराने काही जणांमध्ये ती निगेटिव्ह येते, तर काही जणांमध्ये खूप उशिराने निगेटिव्ह येते. असे असेल तर 14 दिवसांनंतर टेस्ट करून निगेटिव्ह आल्यावर मंत्रोपचाराचा परिणाम झाला, असे जाहीर करणे हास्यास्पद ठरेल.

खरंच कोणताही मंत्र एखादा रोग बरा करू शकतो का? खरोखरच एवढी ताकद मंत्रात असते का? याचे उत्तर नाही, असे आहे. मंत्र एखादा रोग बरा करतो ही समजूत रानटी आहे. आपल्या देशाला पुन्हा एकदा जंगलात घेऊन जाण्याचे हे जे शास्त्र आहे, हे जास्त धोकादायक आहे. मंत्र हे काम कसे करतात, हेच सिद्ध होणे कठीण आहे. कारण मंत्र म्हणजे चमत्कार करणारे, आध्यात्मिक शक्ती असलेले, गूढ परिणाम करणारे दैवी शब्द समजले जातात. चमत्कार, आध्यात्मिक, गूढ, दैवी हे सारे बिनबुडाचे असतात. आधुनिक विज्ञान एखादे औषध काम कसे करते, हे सप्रमाण दाखवून देते. रक्तात औषध गेल्यानंतर ते कसे काम करते, हे स्पष्टपणे सांगते. मंत्राची गोष्ट अशी नाही. मंत्र म्हटल्यावर ते रक्तात जाते, इंद्रियात जाते की, मेंदूतल्या एखाद्या ठिकाणी, हेच नक्की नाही. मंत्रात अशी कोणती शक्ती आहे, हेही नक्की नाही.

‘मंत्र म्हणजे वायफळ बडबड आहे,’ असे प्राचीन काळातल्या एका ऋषीने म्हटले आहे. ज्याचे नाव आहे वैदिक ऋषी कौत्स. वेद काळातच मंत्रांवर संशय व्यक्त केला गेला होता. भगवान महावीर व बुद्ध यांनी यज्ञसंस्कृतीला विरोध केला होता. कारण मंत्रांनी आकाशातील अज्ञात शक्ती जागृत होते (?) व ऐहिक जीवनामध्ये फायदा करून देते, हे खोटे आहे, हे त्यांना लक्षात आले होते म्हणून. मंत्रांवर स्टालसारख्या विचारवंतांनी आणि संशोधकांनी खूप अभ्यास केलेला होता. त्यांचे असे मत शेवटी बनले की, मंत्रांमध्ये गंभीर वगैरे अर्थ काही दडलेला नसतो. विशिष्ट असा नाद आणि लय यातून अनेक शब्द वारंवार बोलणे म्हणजे मंत्र असतात. या नाद आणि लयीमुळे डोके शांत झाल्यासारखे वाटते; पण त्यामुळे दैनंदिन समस्या सुटतात किंवा रोग बरे होतात, याला कोणताही काडीचाही आधार नाही. काही भंपक शास्त्री मंत्राचे समर्थन करताना म्हणतात की, मंत्रामुळे मेंदूतील पीनियल ग्रंथी आणि शरीरातील रसायने पाझरू लागतात, त्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते व रोग बरा होतो. हे भंकस शास्त्र असून हे सिद्ध न करता, वाट्टेल तसे व तेथे ठासून सांगितले जाते. मंत्राचे समर्थन करताना काही खोट्या व्हिडिओ क्लिप्स फेकू युनिव्हर्सिटीने सगळीकडे पसरविल्या आहेत. उदाहरणार्थ, ॐ मंत्राचा आवाज सूर्याच्या गर्भातून येतो, जो बिडेन आणि कमला हॅरीस यांनी शपथ घेताना मंत्र विधी केला, ॐ म्हटल्यावर जमिनीतून पाण्याचा फवारा एकदम वर आला. अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ हे खोटे आणि फेकू असल्याचे आढळून आलेले आहेत.

मंत्र सिद्ध करण्याचे हे सारे केविलवाणे प्रयत्न आहेत. त्यात आता सरकारपुरस्कृत भंपक प्रयत्नांची भर पडली आहे. सरकारला वैज्ञानिक चाचण्या व शोध लावण्याचे वावडे आहे, असे दिसते. इतिहासातले आणि हिंदू म्हणवले जाणारे असे काहीतरी उकरून काढायचे आणि ते सिद्ध करत बसायचे, असले उद्योग म्हणजेच विज्ञान असे यावरून दिसते आहे. यातून भारत हा पुन्हा जंगलात जाऊन बसणार आहे, हे दिसतेच आहे. आदिम आणि मंत्र-तंत्राच्या काळात आपण सारे पुन्हा निघालेलो आहोत. स्वधर्म आणि स्वपरंपरा यांच्यावरील आंधळ्या प्रेमापोटी असले भंपक प्रकार सरकारने करावेत, यासारखा मोठा विनोद कोणता नाही.

या विनोदाचा आणखी एक अंक आहे. खरे तर कोव्हिडवर कोणतेही औषध नाही. त्यावरील एकमेव औषध म्हणजे ज्याची-त्याची रोगप्रतिकार शक्ती; पण हे सामान्य जनांना न सांगता प्रत्येक पारंपरिक पॅथीने स्वत:चे औषध या साथीच्या बाजारात आणलेय. आयुर्वेद म्हटले की, भारतीयांची भक्ती उचंबळून टोकाला जाईल इतकी वर येते. या आयुर्वेदिक वैद्यांनी ‘रोगप्रतिकारशक्ती’ दणकट करण्याचा फालतू विडा उचललाय. छानपैकी नाव देऊन करोडो रुपये लुटलेत. हे नाव म्हणजे ‘हर्बल.’ हर्बल मास्क, हर्बल हँडवॉश, हर्बल सॅनिटायझर, हर्बल सोप आणि हर्बल इम्युनिटी बुस्टर देखील आहेत. आयुर्वेदिक कंपन्यांनी तर आता चक्क प्रत्येक ब्रँडवर ‘इम्युनिटी’ शब्द चिकटवायला मागे-पुढे पाहिलेले नाही व त्या घाबरतही नाहीत. कारण सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयानेच या हर्बलची तळी उचलून धरलीय. त्यांनीच ‘आयुष क्वाथ’ नावाचा काढा तयार केलाय. खरे तर हा काढा मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांना हानिकारक आहे.

या आयुर्वेदाचा ठेका घेतलेल्या बाबा रामदेवने तर कहरच केला. त्याच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने कोव्हिड 100 टक्के बरे करणारे औषध शोधलेय, असे जाहीर केले आणि आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व नितीन गडकरींच्या उपस्थितीत या जगात खळबळ उडवून देणार्‍या आयुर्वेदिक औषधांचे अनावरण केले. मंत्रोच्चारात पार पडलेल्या या कार्यक्रमात रामदेवबाबाने बढाई प्रवचन करताना म्हटले आहे, “सर्व चाचण्या पास झालेले, भक्कम पुरावा असलेले, कोरोनावरील आयुर्वेदिक औषध जगात पहिल्यांदा तयार केले, याचा मला गर्व आहे. आपले हे आयुर्वेदिक औषध फक्त रोग नियंत्रण करत नाही, तर बराही करते. फक्त 7 दिवसांत 100 टक्के कोव्हिडचा खात्मा करणारे हे औषध मृत्युदर शून्यावर आणून ठेवते.”

रामदेव बाबाच्या औषधात अश्वगंधा, तुळस आणि गूळवेल ही औषधे आहेत. हीच औषधे डाबर कंपनीच्या औषधांत देखील आहेत. दुसरे एक बुवा श्री श्री रविशंकर यांनीही ‘श्री श्री तत्त्व’ नावाची कंपनी काढलीय. त्या कंपनीच्या अजेंड्यावर देखील हीच औषधे आहेत. हिंदुस्थानी सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने देखील अश्वगंधा आणि रोगप्रतिकारशक्ती यावर संशोधन करून ठेवले होते आणि गप्प बसले होते; पण बाबा रामदेवने कायद्याच्या आणि नैतिकतेच्या सीमा पार तोडून ‘कोरोनील’चा उद्घोष केला. औषध नियंत्रण व विक्री अ‍ॅक्टखाली हा गुन्हा होतो. टी.व्ही.वर चक्क जाहिरात केली की, 100 टक्के बरे करणारे औषध! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नावाच्या जयपूरमधील वादग्रस्त विद्यापीठाशी संलग्न होऊन या औषधाची चाचणी केली, हा दावा तर हास्यास्पद होता. कारण या विद्यापीठात अ‍ॅलोपॅथिक संशोधन चालते; आयुर्वेदिक नव्हे. तपासणी करणारे अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर होते! ‘पतंजलि’चे सी.ई.ओ. बाबा बाळकृष्ण यांनी तर कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता पळच काढला.

कोव्हिड औषधांच्या बाजारात होमिओपॅथीने देखील उडी मारली. ‘आर्सेनिक अल्बम’चा पुरस्कार खुद्द ‘आयुष’ मंत्रालयानेच केला. ‘आर्सेनिक अल्बम 30’ रोज उपाशीपोटी एकदाच असे तीन दिवस घ्यायचे, हा आदेश काढला. होमिओपॅथिक औषधे पाण्यात साठवून ठेवलेल्या आठवणींवर उभे आहेत, जे पूर्णत: अवैज्ञानिक आहे; पण हा भुसभुशीतपणा नजरेआड करून अनेक होमिओपॅथी डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात ‘कॅम्प’ घेऊन अनाठायी दावे केले. आज दोन दिवसाला लाख रुग्ण कोव्हिडचे तयार होत आहेत. अशा वेळी हे होमिओपॅथी गायब आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून तर कोव्हिडसाठी औषधांचा महापूर ओसंडून वाहतोय. ‘अमूक पदार्थ घ्या’, ‘त्याचा काढा करा, तो रोज सकाळी प्या, कोव्हिड होणार नाही.’ अशा पद्धतीने चालणार्‍या या फसव्या प्रचारावर ना नियंत्रण आहे सरकारचे, ना खुद्द लोकांचेच! आंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्चनुसार या भंपक औषधांचा बाजार आज 80 लक्ष डॉलर्सचा आहे. येत्या दोन-तीन वर्षांत तो दुप्पट होईल. यासाठी तुम्ही-आम्ही जबाबदार आहेत. सोशल मीडियावर जे-जे येईल ते-ते आम्ही करत राहतो, ही अंधश्रद्धा आहे. याची यादी खूप मोठी आहे. उदा.

नाकात तिळाचे किंवा खोबरेल तेल सोडा, कोरोना राहत नाही.

लवंगाची पूड गुळात किंवा मधात मिसळून चाटण घ्या.

गरम पाणी प्या

जिरे, हळद, लिंबू रस पाण्यात मिसळून प्या.

‘योग भगाए रोग’ म्हणून विशिष्ट आसने करा.

अमुक रत्न घाला, कोरोना शिवणार देखील नाही.

गायीच्या तुपाचे हवन करा, कोरोना मरतो.

चंदनाचा धूप जाळल्यावर कोरोना नष्ट होतो.

अमुक देवाची उपासना करा, इम्युनिटी वाढेल.

अमुक पुस्तकातील पाठ करा, करोनाला हरवाल.

अमुक एका झाडाची पूजा करा, करोना पळून जाईल.

अमुक वारी उपवास करा, कोरोना संपेल.

घराबाहेर गेटवर लाल पाण्याची बाटली अडकवा, घरात कोरोना येणार नाही.

ही यादी लांबतच जाईल. आपण कुठेतरी व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावर हे वाचतो आणि त्याच्या आहारी जातो. यातील खोटेपणा आपण समजूत घेत नाही. कारण भविष्याची चिंता मोठी झालेली असते.

कोरोनाच्या या महामारीत फलज्योतिष कसे मागे राहील? ते तर ‘गूढ’शक्तींचा जीव की प्राण! कोरोनाची जन्मपत्रिका आहे का, ते कुंडलीत घुसून सांगणारे ज्योतिषी पैदा झालेत. राशीनुसार कुणाला कधी कोरोना होईल, हे भाकीत सांगणारे महादेवर्षी ऊर्फ फलज्योतिषी तयार आहेत. कोणत्या राशीवाल्यांवर कोणता परिणाम कोरोनाचा होईल, अशी बकवासगिरी देखील आहे. ज्योतिषभंकसशास्त्रानुसार, कोरोनाची कुंडली तयार केलीय आणि ‘शनी’मुळे कोरोना जन्मलाय. केतुमुळे तो ‘रहस्यमयी’ बनलाय, तर ‘राहू’मुळे तो फैलावतोय! (मास्क न लावल्याने नव्हे) म्हणजे कोरोनाच्या कुंडलीत या तीन ग्रहांचा प्रभाव आहे! अशी भीती दाखविल्यावर मग सुरू होतो ज्योतिषांचा ‘धंदा.’ राशीनुसार उपाय सांगण्याचा. जप-जाप, रंगबदल, गायीची पूजा, मंत्रपठण, अमुक धातूतून सेवन, भोजन त्याग, तीर्थस्थान यात्रा, सोने-चांदीची मूर्ती दान, गोमूत्र पान, अमुक वृक्ष व फुलांचे अर्पण, साधू-संतांना जेवण, मंदिरात तेल व दारू दान, नदीस्नान अशा सर्व उपायांचा भडीमार राशीनुसार करायला सांगण्याचे पैसे तर घेणारच! ज्योतिषशास्त्र हे भंपकशास्त्र आहे. त्याने कोरोनावर उपाय सांगणे ही भंकसगिरी आहे.

बुवा-पंडित-महाराज-ज्योतिषी वगैरेंनी कोरोनावर एक नवीन पॅथीच शोधून काढली आहे. ही पॅथी धर्म आणि संस्कृतीने जन्माला घातलीय. या पॅथीचे नाव आहे ‘यज्ञोपॅथी.’ अशा भन्नाट कल्पना डोक्यात भुता-आत्म्याची हवा भरलेल्यांच्या मधून निर्माण न झाल्यास नवलच. गयेतील गोदावरी नदीवरील मंदिरात पाच दिवस रूद्रचंडी महायज्ञ झाला. या ‘यज्ञोपॅथी’त हॉस्पिटलची जागा यज्ञ घेतो. औषधांची जागा ‘जपजाप्य’ घेतो. यातले प्रमुख औषध आहे ‘कोरोना स्वाहा’ मंत्रजाप. व्हायरस म्हणजे दैत्य. रोगनिवारण म्हणजे दैत्यसंहार.

गळ्यात घालायच्या रुद्राक्षाच्या, धातूंच्या मंतरलेल्या माळा, कोरोनाला जवळ येऊ देत नाहीत. असले भयंकर कोरोना प्रतिबंधक उपायसुद्धा बाजारात दाखल आहेत. या धातूंच्या माळांमागील विज्ञानही तेवढेच भयंकर आहे. ज्या धातूत कॅल्शियम आणि फेरोमॅग्नेशियम सिलिकेट आहे, ते कोरोनास पळवून लावते. गंमत म्हणजे यावरील शोधनिबंध ‘एल्सवेर’ कंपनीने प्रकाशित देखील केला होता! यानंतर याविरुद्ध बराच गलका झाला. धातुखड्यांच्या अंगठ्या कोरोनास साफ करतात, असा दावा करत ‘बातू अकीक अंगठी’ अरबस्तानात फैलावली. ‘अकर बहार’ नावाचे हातात घालायचे कडे देखील कोरोनानाशक म्हणून मार्केटात आले. अनेक आंतरराष्ट्रीय मांत्रिकांनीच त्याची होलसेल विक्री केलीय. एका ऑनलाईन मांत्रिकाने कोरोना प्रतिबंधक वस्त्र सुद्धा विकायला मागे-पुढे पाहिलेले नाही, म्हणजे पीपीई कीटला संपूर्ण नारळच द्यायला नको का?

काळी बाहुली कोरोनास रोखू शकली नाही, म्हणून मग मांत्रिकांनी यावरही उपाय काढलाय. बांबूच्या काठ्या उभ्या-आडव्या तीन रंगांच्या दोर्‍याने बांधून मंत्रून घरात छताला टांगल्या (ज्याला ‘टपक दारा’ म्हणतात) की, कोरोनाची घरात शिरायची हिंमत होणार नाही. नारळाच्या झावळ्यांची पाने घेऊन, फुलांनी सजवून, सुपारी, डाळी इत्यादी ठेवून तयार केलेली बाहुली अंगावर ठेवली की, कोरोना गायब! यात ??? नावाचा अंगावर जर मंत्र गोंदवून घेतला की, अंगात कोरोना घुसतच नाही म्हणे… म्हणे असे हे पारलौकिक जग! भूत-खेत-आत्मे-सैतान-दृष्ट शक्ती मानणार्‍यांच्या या जगात हरेक रोगावर औषध सापडेल; पण रोग मात्र ‘जैसे थे’च राहील. अज्ञात शक्तीवर जगणार्‍या या अनोख्या जगात कोरोनाला मारण्यासाठी वैज्ञानिक वृत्तीस नकार दिला जातो; किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याने पारंपरिक दृष्टिकोन महत्त्वाचा आणि अंतिम मानला जातो. अज्ञात शक्ती आपले भले करेल, ही आशा अशा अवैज्ञानिक व अंधश्रद्ध उपायांना मिठ्या मारते, यात सारेच आले. गरीब आणि कामगार या स्तरांपासून श्रीमंत आणि डॉक्टरांपर्यंत सारेच या अंधश्रद्धांत गुरफटलेत. कोव्हिड हा रोग आहे, यालाच नकार देणारी नवी अंधश्रद्धा तर सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. ‘हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे,’ इथंपासून ते ‘कोरोना नावाचा असा व्हायरस तयार करून मानवजात नष्ट करण्यासाठीचा एक कुटील डाव आहे,’ इथवरच्या भ्रमांनी अनेकांची डोकी भ्रष्ट केली आहेत.

आपण काय निवडणार आहोत? आपण निवडणार आहोत – विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन.

लेखक संपर्क : 98908 44468


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]